माझे नाही, आपले


©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे


"अहो !  तुम्हाला काही जाणवत आहे का?"

"अग कशाबद्दल बोलते तू ?"

"अहो, वैदई आणि आशुतोष बद्दल. दोघे मला जरा नाराजच दिसतात. काही बिनसले असेल का हो त्यांच्यात? किती प्रेम करतात हो दोघे एकमेकांवर! गेली आठ दिवस झाले अस्वस्थ वाटतात. "

"तुझे काहीही हं ही रेवा ! असे काही नसणार ग !तुझे भास आहेत सगळे!"

 "असे असेल तर खूपच चांगले हो.  पण माहित नाही मला का असे वाटते ? नेहमी त्या दोघांच्या चेहऱ्यावरून मला आनंद आणि चिंता बरोबर समजते. यावेळी सुध्दा असेच काहीसे वाटत आहे."

"अग तुला इतकेच वाटते तर विचारना त्यांना.  तुझ्याशी नेहमी मोकळे पणाने बोलतात."

"हो ओ! पण आधी जरा अंदाज घेऊ या. मगच बोलते. नाहीतर तुम्ही म्हणता तसे माझ्या मनाचे खेळ असावे हे. त्यांच्यात तसे काहीच नसावे. "

"ते ही बरोबर ! जाऊ दे दोन चार दिवस आपसूकच बोलतील."

पाच सहा दिवस गेले. 

आशुतोष म्हणाला. "आई, बाबा मला कंपनीने शिफ्ट ड्युटी करायला सांगितली. मी बोललो , मी खूप लांब राहतो. मला  शिफ्ट ड्युटी करायला जमणार नाही. पण कंपनी म्हणते नोकरी हवी असेल तर करा. नाहीतर खुशाल घरी बसा.

बाबा, या कोरोना मध्ये नोकरी मिळणे कठीण आहे. आहे ती टिकवावी लागते. घरी बसून कसे चालेल. याचाच विचार करून आम्ही दोघे अस्वस्थ आहोत.

वैदईला माझी आणि मला तिची मिळून ऑफिसला जायची  यायची इतकी सवय झाली की  तिला हे  शिफ्ट ड्युटी पचनी पडतच नाही. त्यात लांब पडत हे वेगळचं"

"हो रे अगदी खरय तुझ !; दोघांचे ऑफिस जवळ जवळ, शिवाय वेळ पण एकच. दोन वर्षात वेगळी सुट्टी घेतली तरच एकटे. नाहीतर सतत सोबतच.'

"हो ना आई ! मला तर कल्पनेने पण कसे तरी होते. कशी होणार माझे  आशुतोष शिवाय."

बोलता बोलता वैदीईला सगळा भूतकाळ आठवला.

त्या दिवशी तीला interview साठी एका ऑफसला जायचे होते. साडेदहाचा इंटरव्ह्यू होता. साडेदहा तिला स्टेशन वरच झाले. भराभर जीना उतरून रिक्षा पकडली. पत्ता सांगताच म्हणाली., "भैया जरा लवकर ! खूप उशिर झाला. साडेदहाचा इंटरव्ह्यू होता."

हात जोडले , देवा माझे काम होऊ दे !

रिक्षावाला हे सगळे बघत असावा. 

 "ताई ! तुम्ही चिंता नका करू, लवकर पोहचू ! बघा ताई आज ट्रॅफिक पण नाही! 

ताई ! आज तुम्हाला उशिर झाला असला तरी तुमचे काम नक्की होणार बघा ! तुम्ही मला आज पेढा नक्की खीलवणार. 

"नाव काय दादा तुमचे?" 

"सुरेश !"

"मराठी का ?"

"नाही ताई ! तुम्ही रिक्षा वाल्याला बोलता तेच म्हणजे भैया !"

"मराठी छान बोलता !"

"ताई लहानपणा पासून इथेच वाढलो. सगळे सोबती मराठी. त्यामुळे जमतं. कधी कधी मलाच प्रश्न पडतो  माझ्या मराठी बोलण्याचा. UP ची भाषा विसरलो की काय असे वाटते. इतके या मुंबईने सामावून घेतले. ताई तुमचे ठिकाण आले." 

समोर एक मोठी वीस, पंचवीस  माळ्याची काचेची चकचकीत बिल्डिंग होती. थोडी भांबावली . लगेच स्वतःला सावरले. रिक्षा वाल्याला पैसे दिले. 

लिफ्ट मध्ये एक मुलगा आत शिरत होता. त्याच्या मागोमाग ही पण शिरली. त्याने २१ माळ्याचे बटन दाबले. तिलाही २१ व्या मजल्यावर  जायचे होते.  

लिफ्ट मध्ये AC होता तरी सुद्धा तिला दरदरून घाम फुटला. लिफ्ट पण  खूप फास्ट होती. तिला एकदम गरगरल्या सारखे वाटले. तिने त्या लिफ्ट मधिल मुलाचा हात घट्ट पकडला. 

तो समजून चूकला, कदाचित अश्या लिफ्ट मध्ये येण्याची पहिलीच वेळ असावी. 

त्याने तिला आधार दिला. पाणी दिले, तिला हायसे वाटले. दोघे एकाच मार्गाने चालले होते. तोच म्हणाला, "जेकप्स कंपनी मध्ये इंटरव्ह्यू साठी आलोय. तुम्ही ?"

"मी पण त्याच कंपनी मध्ये इंटरव्ह्यू साठीच. थोडा उशीरच झाला. मला साडेदहाला बोलावले होते. "

"मला अकराला."

 दोघे जाऊन पोहचले .लगेच शिपाई येऊन बोलला. मिस वैदई , ती उठून उभी राहीली. तुम्हाला सरांनी बोलवले. 

तो म्हणाला "ऑल दि बेस्ट" 

ती thanks बोलून आत जायला निघाली. तिने हळूच मागे वळून पाहिले. त्याने thumb दाखवला. तिला थोडा धीर आला. डोळ्याने thanks बोलुन आत गेली.

पंधरा मिनिटांनी बाहेर आली. इंटरव्ह्यू छानच झाला होता. आपले नक्की शिलेक्षण होणार असे वाटत होते. अजून दोन नंबर होते. नंतर त्या लिफ्ट मधिल मुलाचा. तिने विचार केला त्याने आधार दिला म्हणून आपण इतक्या धाडसाने उत्तरे देऊ शकलो. नाहीतर आपण पुरते घाबरून गेलो होतो. 

 त्याचे सिलेक्शन व्हायला पाहिजे. परत मनात म्हणाली, मला आवडायला लागला की काय तो ? 

त्याच्या बद्दल जरा जास्तच आपुलकी वाटायला लागली. 

स्वतःच एक गोड स्माईल स्वतःला दिले. त्याच्या बाजूला येऊन बसली. "कसा झाला इंटरव्ह्यू?"

"बरा तर झाला. बघू,"

ती जरा सैलासून बसली. अजून एका मुलाला आत बोलवले. तो सुध्दा १० मिनिटात बाहेर आला. 

लिफ्ट मधील मुलगा म्हणाला, "तुम्ही का थांबलात ? आताच रिझल्ट देणार आहे का?"

"नाही हो ! खर सांगू का मी तुमच्या साठी थांबले. तुम्हाला all the best करायला.'

"ओह ! So nice of you ! Thank you!"

साडेअकरा होत आले होते. आता त्याचा नंबर आला.

तिने त्याला all the best केले. तो आत गेला. जवळजवळ २० मिनिटांनी बाहेर आला. बॉस म्हणाले तुम्ही थोडावेळ थांबणार का? आताच रिझल्ट लागेल बोर्ड वर. 

त्याच्या बरोबर ती सुध्दा थांबली. ते दोघे मात्र निघून गेले होते. तोवर दोघांनी कॅंटीनमध्ये जाऊन चहा घेतला. 

अर्धा तासात परत आले तेव्हा बोर्डावर निकाल लागला होता. दोनच पोस्ट होत्या आणि त्या दोघांचे सिलेक्शन झाले. तिला खूप आनंद झाला. 

गावावरून मावशीने मुद्दाम इकडे नोकरी करायला बोलावले होते. पहिलाच इंटरव्ह्यू आणि ती सिलेक्ट झाली.

तिला रिक्षावाल्या भैयाचे शब्द आठवले. दिदी तुमचे  सिलेक्षण नक्की होणार. काय आश्चर्य तोच रिक्षेवाला तिथे बाहेर उभा होता ! 

त्याने बरोबर ओळखले. जवळ आला, "दिदी कसा झाला तुमचा इंटरव्ह्यू?"

"दादा तुम्ही म्हणाले तसे माझे सिलेक्शन झाले. हे तुम्हा दोघांमध्ये मुळे झाले. माझा आजचा पहिलाच इंटरव्ह्यू होता. खूप घाबरले होते. पण तुमचे शब्द आठवले , ताई तुमचे काम नक्की होणार, तुम्ही मला आज पेढा खीलवणार. आणि यांनी जो आधार दिला त्या बळावर मी आजचा हा गड सर करू शकले." 

त्याच रिक्षात बसून दोघे स्टेशन वर आले. दोघांचा रस्ता एकच. ती अंबरनाथला, तो कल्याणला. येताना ती घाटकोपरला उतरून आली होती.

मेट्रो बद्दल तिला फारसे माहीत नव्हते. आता मात्र त्याच्या सोबत मेट्रो मध्ये बसली. तो म्हणाला शिकून घे आता सगळं. 

ती म्हणाली तू आहेस न शिकवायला सोबत, आणि ती जबरदस्त लाजली. आपण हे काय बोलून गेलो? 

तो म्हणाला, "हो मी आहे, कायम तुझ्या सोबत आणि तिचा हात हातात घेतला."

दोघांचाही मनात वेगळीच चलबिचल चालली होती. दोघे मनातून विचार करत होते. हेच का प्रेम!!! असच होत असावं का प्रेमात? 

घाटकोपरला उतरून अंबरनाथ ट्रेन पकडली. ती लेडीज डब्यात बसली. तो जेंट्स मध्ये. कल्याण आले, तो उतरला . तिला डोळे शोधत होते. पण गर्दीत ती हरवली होती. 

रिक्षाच्या लाईन मध्ये उभे राहिल्यावर त्याला आठवले अरे आपण एकमेकांचे नंबर तर घेतलेच नाही.

आता joining ला आठ दिवस बाकी होते. फक्त त्या दिवसाची वाट पाहणे इतकेच त्याच्या हातात होते. 

आज तो दिवस उगवला, जॉईन होण्याचा. त्याने भरभर आवरले. आई, बाबा आणि आजीला नमस्कार केला. ७.४० ची लोकल पकडली. मनोमन म्हणत होता. याच लोकल मध्ये ती असू दे. मनात विचार आला नक्कीच तिने ही ट्रेन पकडली असेल. त्या दिवशी तिला जरा उशीरच झाला होता.

किती घाबरली होती ती ? AC लिफ्ट मध्ये घामाघूम झाली होती. कसा हात घट्ट पकडला होता. नंतर आठवून तीच जोरजोरात हसत होती. 

म्हणाली माझी पाहिली वेळ एवढ्या मोठ्या लिफ्ट मध्ये , त्यात ती भव्य ईमारत. 

अजूनही विश्वास बसत नाही आपण सिलेक्ट झालो यावर. म्हणाली होती, आशुतोष तुम्ही मला चिमटा काढा. स्वप्न आहे की सत्य ..!

अग सत्य आहे ! मुख्य म्हणजे आपण दोघेही सिलेक्ट झालो.  हळू हळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडत होते. पण पुढाकार घेऊन उघड कोणीच बोलत नव्हते.

एक वर्षात आशुतोष ने दुसरा जॉब पकडला. पण जायच्या आधी तिला प्रपोज करूनच.

लवकरच घरी सांगून सर्वांच्या सहमतीने लग्नाचा बार उडाला.

त्याचे नवे ऑफिस त्यांच्या जुन्या ऑफिस जवळच होते. त्यामुळे  लग्नानंतर सुध्दा रोज सोबतच येणे जाणे. 

आता सर्वच बदलणार. शिफ ड्यूटी त्यामुळे किती वाजता जाणार ? 

कधी येणार ? किती त्रास होणार!  रात्री बेरात्री प्रवास करायचा ?

तेवढ्यात आशुतोष चे बाबा म्हणाले, सूनबाई  !!! आणि वैदई भानावर आली.

"बाबा ! तुम्ही हाक मारली?"

"हो अग ! मला तुम्हाला काही सांगायचे आहे."

"बोला बाबा काय म्हणताय ?"

"बाळा आपला इथला थ्री bhk फ्लॅट आहे. मला वाटते तो विकून आपण थोडे पैसे टाकून , तुम्ही थोडे लोन काढून फार मोठा नाही तरी one BHK आरामात घेऊ शकू."

"नाही बाबा, तुमची प्रॉपर्टी अशी सहज आमच्या नावावर करू नका."

 "अग इतकी प्रेमळ तू, आम्हाला सोडून एक दिवस कुठे राहत नाही. माहेरी जायचे तरी गावी जावे लागते म्हणून कित्तेक वेळा टाळतेस."

"खर सांगू बाबा?  मला कधी असे वाटलेच नाही मी सासरी आले. आईबाबांची आठवण नक्की येते. पण सासरी आहे म्हणून नाही. ते जन्मदाते आहे म्हणून . तुम्ही आणि आईंनी ते जेवढे प्रेम ते करत होते, कदाचित त्याहून जास्तच दिले. 

बघा न बाबा , मला माझ्या बाबांनी कधीच जिन्स घालू दिला नाही. तुम्हीच स्वतःहून आईला सांगितले. रेवा ! सूनबाईला जर आवड असेल, आणि घालायची इच्छा असेल तर आशुतोषला सांग तिला घेऊन दे म्हणून.

आपल्याला मुलगी नाही. नाहीतर तिचे किती कोडकौतुक केले असते.हीच आपली मुलगी. तिच्या डोळ्यात कधी अश्रू येता कामा नये. बाबा मी तुमच्या बेडरूम च्या दारावरून जात असताना सगळा संवाद ऐकला होता.

दुसऱ्याच दिवशी आम्ही ऑफिस मधून जरा लवकर निघून एका मॉल मध्ये गेलो. जिन्स घालूनच घरी आले. तुम्ही म्हणाले, रेवा बघ किती गोड दिसते ग आपली पोरं.  रेवा, आज नजर काढ तिची. 

किती हसले होते मी बाबा ! तुम्ही ओरडले, हसू नको ! लागते नजर, असतात काही लोकांच्या नजरा खराब ! मग चिडीचूप झाले !

आईंनी नजर काढली. बाबा म्हणत मी मिठी मारली होती. तुम्ही डोक्यावरून हात फिरवत होता."

 "हो बेटा! आहेसच तू आमची मुलगी.  म्हणून म्हणतो आपण हे घर विकून मुंबईला घेऊ. लहान असेल पण तुझा आणि आशुतोष दोघांचा त्रास वाचेल." 

"बाबा पण इतके वर्ष झालीत तुम्ही इथे राहतात. तिकडे खरचं तुम्हाला नाही करमणार."

"नक्कीच नाही करमणार ! पण होईल सवय. आणि तुम्हाला आता जाण्यायेण्याचा त्रास नाही . मग आम्हाला  नातवंडं द्या. वेळ कसा जाईल कळणार पण नाही."

 वैदई लाजली !

 खूप अभिमान वाटला तिला आपल्या सासू सासऱ्यांचा.

आशुतोषला म्हणाली, "आशुतोष खरचं खुप भाग्यवान आहोत आपण. समजून घेणारे आईवडील मिळाले. ऑफिस मध्ये एकेक मैत्रिणी त्यांचे किस्से सांगतात. 

घरातले वाद डिस्कस करतात. मला हसू येत. मला म्हणतात तुझ्या घरी पण होत असेल. तू लपवते !

मला अगदी शपथे वर सांगावे लागते. आमच्या घरी असे काही नाही. त्या घरी मला सून म्हणून कधीच वागवले जात नाही. लेकीची माया मिळते. मी अभिमानाने सांगते. मला दोन आईवडीलांचे प्रेम मिळते."

"खरंय तुझ म्हणणं, आमच्या ऑफिस मध्ये पण मित्र बोलतात. बायकोचे आईचे पटत नाही. मग बायको वेगळी किट किट करते. आई वेगळी. 

बर कोणाचीच बाजू घेता येत नाही. बायकोची घेतली तर आई नाराज. आईची घेतली तर बायको नाराज. मग काय दोन्ही कडून डोक्याला ताप. मग म्हणतात, घरोघरी मातीच्या चुली ! कट् कारस्थान करण्यात बायका भारी ! आमचा जीव होतो वरखाली !

 सगळेच खूप हसतो. पण खरय माझे आईबाबा खरच खूप वेगळे आहे."

वैदई गुस्स्यात म्हणाली, "आशुतोष तुझे नाही, आपले आईबाबा !"

"सॉरी !आपले आईबाबा ! आशुतोष कान पकडून वैदईच्या पुढ्यात बसला.

पुन्हा एकवार म्हणाला, "सॉरी मॅडम...आपले आईबाबा...."


©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे

     कल्याण.


सदर कथा लेखिका सौ. प्रभा कृष्णा निपाणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने