मागे वळून पाहताना

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)



सकाळची सात वाजताची वेळ! सरिताताई हातात चहाचा कप घेऊन अंगणात बंगईवर येऊन बसल्या. हल्ली त्यांचा हा नियमच झाला होता.. म्हणजे महिनाभरापासून..


एक महिन्यापूर्वी सरिताताई नोकरीतून सेवानिवृत्त झाल्या अन् त्यांच्या वेगाने धावणाऱ्या आयुष्याला कायमचा ब्रेक लागला. गेली चाळीस वर्षे घडयाळाच्या काट्यावर धावणारं त्यांचं आयुष्य आता निव्वळ घड्याळाच्या काट्यांचं निरीक्षण करत सरू लागलेलं..


सरिताताईंनी चहाचा घोट घेतला.. अन् त्यांच्या लक्षात आलं.. विचारांच्या नादानं म्हणा किंवा बाहेरच्या गार हवेनं.. पण चहा बराच कोमट झालाय!


सरिताताईंचा मूड ऑफ झाला. त्यांना चहा अगदी गरम हवा असे.. अगदी जीभ पोळेल इतका! सुनिल म्हणायचादेखील त्यांना.. "बघ.. गरम चहा पिण्याच्या नादात नुसतीच जीभ नाही.. अन्ननलिकासुद्धा पोळून घेशील तू..!"


सुनिलचा विचार मनात येताच सरिताताई दचकल्या. आज इतक्या वर्षांनी सुनीलची आठवण? जवळपास पस्तीस वर्षे होऊन गेली त्यांच्या घटस्फोटाला! 

पायात एखादा काटा रूतावा.. तो काढल्यावरही काही वेळ त्याची सल राहावी अन् नंतर त्याबद्दल आठवण देखील होऊ नये.. इतकं सरळ सोपं आयुष्य होतं सरिताताईंचं! 

तरीदेखील आज सुनीलच्या आठवणीने त्यांना जाणवलं.. आपण विसरलो असलो अन् दुखत जरी नसलं तरी जखमेचा पुसटसा वण शिल्लक आहे अजून!

सरिताताईंना घरात फारसे काम नसेच. सकाळी कामवाली येऊन केरवारे,धूणीभांडी करून जाई. त्यानंतर स्वयंपाकीणबाई येऊन नाष्टा अन् दोन्ही वेळचा स्वयंपाक करून ठेवत. 

सरिताताई नोकरीत असल्यापासून ह्या दोघी बायका येऊन आपापली कामे निमूट करून जात. सरिताताईंना घरातलं बघण्याची सवय नव्हतीच अन् गरजदेखील.

दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्यांची आई होती. तीच घरातलं सगळं बघायची. ती नव्वदीच्या घरात असताना गेली. शेवटपर्यंत खमकी होती. घरात सरिताताई अन् त्यांची आई दोघीच.. अन् दोघींच्या दिमतीला दोन बायका! सगळंच आटोपशीर! 

दोन वर्षांपूर्वी आई गेली अन् सरिताताई एकट्या राहिल्या. एक धाकटा भाऊ होता त्यांना.. पण त्याच्या बायकोचं अन् आईचं कधीच पटलं नाही म्हणून संबंध दुरावले. आता इतक्या वर्षांनी पुन्हा ते जुळवणं सरिताताईंच्या स्वभावाला मानवणारं नव्हतंच.

सरिताताईंना रिकामपणाची सवय नव्हती. निवृत्तीनंतर काही दिवस एन्जॉय केलं त्यांनी.. पण आता मन सैरभैर होऊ लागलेलं.. त्यात सकाळी आलेली सुनीलची आठवण.. इच्छा नसतानाही त्यांच मन भूतकाळात जाऊन पोहोचलं.

सरिताताई लहानपणी बुद्धीनं अतिशय सामान्य. पण त्यांची आई अतिशय महत्त्वाकांक्षी स्त्री होती. घरादारावर तिचा वचक होता. आई हुषार होती अन् स्पष्टवक्ती.. सरिताताईंच्या आयुष्यावर आईचा अतिशय प्रभाव होता. त्यांना फारशा मैत्रीणीदेखील नव्हत्या.. आई हेच त्यांचं विश्व होतं..त्यांचं आईशिवाय पानदेखील हलत नसे.

आईनेच त्यांना नोकरीकरिता प्रवृत्त केले अन् सरिताताई अवघ्या विसाव्या वर्षी नोकरीला लागल्या अन् आईच्याच पुढाकाराने त्यांचं सुनिलशी लग्न ठरलं.. अर्थातच अरेंज्ड मॅरेज!

सरिताताईंचा आईवर विश्वास होता अन् आईचा स्वतःवर! मायलेकीची पसंती आहे म्हटल्यावर सरिताताईंच्या वडिलांनी लग्नाला होकार दिला.

साखरपुडा झाल्यावर सुनील दर आठ-पंधरा दिवसांनी सरिताला भेटायला म्हणून तिच्या गावी यायचा. सरिताच्या बाबांनी आणि सरितानं कितीही नको म्हटलं तरी आई त्या दोघांत बरोबरीने गप्पा मारायला असायचीच. 

"मीच माझ्या मुलीची मैत्रीण बरं का!" आई भावी जावयाला अभिमानानं सांगायची.. "अन् आता मी तुमची देखील मैत्रीण!"

सरिताला नक्को नक्को व्हायचं. पण ती वयानं लहान अन् बुजलेली! एकदा सरिता सुनीलला कसला तरी बालपणीचा किस्सा सांगू लागली तर सुनील पटकन् म्हणाला.. "तू नको सांगू.. आईला सांगू दे! त्या खूप छान बोलतात.. इंटरेस्टिंग!!" आणि सरिता गप्प होऊन गेली. अगदी सुनील परत जाईपर्यंत..

पण ते कुणाच्याच लक्षात आलं नाही.. सुनील तर तिच्यासाठी नवीन होता. पण आईला देखील तिचा गप्प राहणं खटकलं नाही ह्याचं तिला जास्त वाईट वाटलं.

सरिताच्या आईच्या नजरेत अनेक मुली होत्या.. ज्यांना सासुरवास होता.. अन् आपल्या मुलीच्या बाबतीत असं काही घडू नये म्हणून त्यांनी मनाशीच ठरवलं.. 

"दर महिन्यात एकदा तरी लेकीकडे फेरी करायचीच.. तिला काही त्रास तर नाही ना ? तिच्याशी सासरची मंडळी कशी वागताहेत ह्याचं निरीक्षण करायचं!"

यथावकाश सरिता लग्न होऊन सासरी आली. सुरूवातीचे दिवस बरे गेले अन् घरात कुरबुरी सुरू झाल्या. सासरचं एकत्र कुटुंब.. कधी घरातल्या कामांवरून तर कधी घरातल्या खर्चांवरून कुरबुरी सुरू झाल्या. 

कधी आईची लेकीकडे फेरी होई तर कधी लेकीची आईकडे! सरिता आईकडे मन मोकळं करू लागली. घरातल्या कुरबुरी.. तिची घुसमट.. सुनीलचा बेफिकिरपणा..

आईने जाणलं.. सरिता भोळसट आहे.. आणि म्हणूनच सासरची मंडळी तिचा गैरफायदा घेत आहेत.. तिनं कंबर कसली अन् लगोलग लेकीचं सासर गाठलं. 

तिच्या सासरच्या मंडळींना खडसावलं अन् त्याच पावली गावी परतली.. हे सगळं सरिताच्या माघारी!

सरिता ऑफिसमधून घरी परत आल्यावर तिला कळलं.. आपली आई घरी येऊन परस्पर भांडून गेलीय! तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं.

"आई, तुला काय गरज होती माझ्या सासरी जाऊन वाद करण्याची?" सरिताने दुसऱ्याच दिवशी ऑफिसातून आईला ट्रंक कॉल लावला.

"हे, बघ बेटा! तुला समजत नाही. मला तुझं भलं कशात आहे ते कळतंय. तुझ्या सासरची मंडळी तुला जुमानणारी नाहीत.. तुझा जीव घेतील ती अशानं! मला बोलू दे." आईनं उलट सरितालाच सुनावलं. चिडून अन् संतापून सरिताताईनी फोन जवळजवळ आपटलाच.

सासरची मंडळी सरितावर नाराज होतीच. एकतर तिनं घरातल्या गोष्टी माहेरी जाऊन सांगितलेल्या त्यांना आवडल्या नव्हत्या. 
त्यावर तिची आई त्यांना अद्वातद्वा बोलून गेलेली.. "आम्ही काय तुझा जीव बीव घेऊ असं वाटतं का गं तुझ्या आईला?" सरिताच्या भासऱ्यांनी स्पष्टच बोलून दाखवलं.


घरातील तंग वातावरण.. नवं लग्न अन् नोकरी.. सरितेची घरात चांगलीच धावपळ होऊ लागली.. तशातच ती संक्रांत सणाच्या निमित्तानं माहेरी गेली. "तुझी पाळी बिळी नाही ना गं इतक्यात?" आईनं विचारलं अन् सरीताच्या लक्षात आलं.. पाळीची तारीख उलटून सहा दिवस होऊन गेलेत.

"चल, डॉक्टर कडे जाऊन येऊ!" आईने सरिताच्या मागे तगादा लावला. "अगं, स्ट्रेसमुळे झाली असेल मागेपुढे! मी सासरी गेले की बघेन ना!" सरिताने भीत भीत सांगून पाहिलं.

"ते काही नाही! आत्ताच जाऊन येऊ!" म्हणत दोघी जाऊन युरीन टेस्ट करून आल्या. प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हटल्यावर सरिताला हुरूप आला. केव्हा एकदा घरी जाऊन ही बातमी सुनीलला सांगते असं तिला होऊन गेलं.

"मी तुला एकटीला मुळीच जाऊ देणार नाही!" आईने घोषणा केली. "आता तुला काळजी घ्यायला हवी. सुनीलला पण सांगायला हवं.. काळजी कशी घ्यायची ते!"


"आई, प्लीज नको! मागे झालं ते प्रकरण खूप झालं. आता नको येऊस.. नंतर ये कधीतरी!" सरितानं समजावून बघितलं पण आपली आई ऐकणाऱ्यातली नाही हे एव्हाना तिला कळून चुकलं होतं.

आईनं ठरविल्याप्रमाणे दोघी सरीताच्या सासरी पोहोचल्या. सुनील घराच्या फाटकाशी मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. "अभिनंदन, सुनील.. तुम्ही बाबा होणार आहात!!" आईनं दारातच मोठ्ठ्याने गौप्यस्फोट केला अन् सरिता पुन्हा एकदा शरमली. 

सूनीलचे मित्र खिदीखिदी हसत निघून गेले अन् सुनील सरिताकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत वर त्यांच्या खोलीत निघून गेला.

सरिता वेड्यासारखी त्याच्या मागून धावत गेली. "ही काय पद्धत आहे सरिता? सुनील खूपच नाराज होता.

"अहो, मी काय करू? आईचा स्वभाव माहीत आहे ना तुम्हाला??" सरिता खाली मान घालून बोलत होती. "ही गोड बातमी तुम्हाला द्यायची किती स्वप्नं बघितली होती मी! किती प्लॅन्स केले होते! तुम्हाला हे असं कळावं असं खरंच वाटत नव्हतं मला!!" सरिताच्या डोळ्यांत पाणी आलं.

दिवस राहिल्याची बातमी ऐकून देखील सासरच्या वातावरणात काहीच फरक पडला नाही. घरातली जडभारी कामं, ऑफिस अन् सुनीलचा बेफिकीरपणा! जे व्हायचं तेच झालं. सरिताचं मिसकॅरेज झालं.

मिसकॅरेजची बातमी कळताच आई बिथरली. सरिताच्या सासरी जाऊन तिनं पुन्हा एकदा गोंधळ घातला. ती सरिताचंच काय पण तिच्या बाबांचंही ऐकायला तयार नव्हती. आता मात्र सरिताला सासरी एकत्र राहणं शक्य नव्हतं.

एक तर ती सासरी ऍडजस्ट होत नव्हती. तिच्या सासरच्या अन् माहेरच्या वातावरणात आधीच जमीनअस्मानचा फरक होता. 

त्यात आईचा नको इतका हस्तक्षेप अन् सतत तुम्ही माझ्या मुलीचा जीव घेणार असा आरोप!! सरिता अगदी वैतागली होती. तिनं सूनीलकडे वेगळं घर करण्याचा तगादा लावला.

वेगळं घर केल्यावर सूनीलचा बेफिकिरपणा अधिकच वाढला. तो रात्र रात्र घरी येत नसे. अन् सरिता त्याची वाट बघत रात्र जागून काढे. 

सुनीलला आपलं घर सोडून राहण्याची सवय नव्हती. अन् ह्या वेगळ्या संसारात त्याचं मन रमत नव्हतं. सरिता सासरी जाऊन राहण्याच्या मनस्थितीत नव्हती.

सरिताने स्वतः सगळ्या गोष्टी पुन्हा मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला.. पण गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या होत्या की सरिताला पुन्हा माहेर गाठावं लागलं.

सरिताचे काका अन् मामा सुनीलकडे जाऊन भेटून तडजोड करण्यासाठी बोलून आले अन् हे कळल्यावर सरीताच्या आईनं आकांडतांडव केलं. "माझ्या मुलीच्या बाबतीत कसलीही तडजोड नाही! सगळं तिच्याच अटींवर सेटल व्हायला हवं.." आईनं घोषित केलं.

"तू खंबीर राहा.. काही होणार नाही.. तू डळमळू नकोस.. सुनीलला नाक घासत तुझ्याकडे यावं लागेल! विश्वास ठेव माझ्यावर!!" आई सरिताला सांगायची.

एक दिवस सुनील आला.. "चल, बाहेर जाऊ! मला ‌तुझ्याशी बोलायचं आहे!" म्हणाला. सरिता चटकन उठून तयार झाली तर आईनं अडवलं.


"जे काही बोलायचं असेल ते इथेच बोला!" आईनं ठणकावून सांगितलं.


"आई, मी जाऊन येते.. लवकर येते!" सरितानं ह्यावेळी ठामपणे सांगितलं.


"मुळीच जायचं नाही बाहेर.. तुम्ही बाहेर एकांतात जाऊन याल अन् तुझं पोट आलं की तू अडकशील ह्यांच्यात!!" आईनं स्वतःची अक्कल पाजळली.


आता मात्र सुनील संतापला. तरातरा बाहेर निघून गेला तो पुन्हा कोर्टातच दिसला.


"खरं तर चूक आपली पण होतीच!" सरिताताई पुन्हा वर्तमानात परत आल्या.


"स्वतःच्या आयुष्याचे निर्णय आपल्या स्वतःशिवाय कुणीच चांगले घेऊ शकत नाही.. आपण मात्र जवळ जवळ आपलं सगळं आयुष्यच आईच्या स्वाधीन करून टाकलं. 

तिचं पटत नव्हतं तरी ठाम विरोध करूच शकलो नाही कधी!" सरिताताईंच्या मनात आलं.. 

"पण आईवर विश्वास ठेवला हे आपलं चुकलं की आपलं आपल्याला नीट निभावता आलं नाही हे चुकलं.." हे आजही त्यांना उमगेना.


"सगळं जग तिच्या विरोधात असलं तरी मी तिची साथ कधीच सोडणार नाही!" सरिताताईंची आई 'तेव्हा' तिच्या काकांना म्हणाली होती.. अन् ती तिच्या शब्दाला जागली. बाबांच्या पश्चात तिनं सरिताताईंना साथ दिली.. तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत!!


पण मागे वळून पाहताना सरिताताईंना जे जाणवलं त्याची भरपाई करण्याची वेळ कधीच निघून गेली होती.


© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने