लवबर्ड्स


© धनश्री दाबके


रोजच्या सारखाच धावत पळत शशी ऑफिसला पोचला.  तसंही ऑफिसमधे बायकांची मेजॉरिटी असल्यामुळे तिथलं वातावरण नेहमीच उत्साही आणि हॅपनिंग असायचं पण आजचा उत्साह अजूनच वाढलेला वाटला शशीला. 

आज काय स्पेशल आहे कोण जाणे असा विचार करत शशी केबिनमध्ये शिरला.

इतक्यात राणे मॅडम त्याच्या पाठोपाठ आत येत म्हणाल्या, "Good morning सर ! मी काल जो मंथली रिपोर्ट बनवून पाठवला होता तो पाहिलात का? 

नाही म्हणजे बघितला असलात तर त्यात काही चेंजेस करायची गरज आहे का ते विचारायचं होतं. असतील तर मी जाण्याआधी करून दिले असते."

इतरवेळी ज्या राणेबाईंना रिपोर्टची आठवण करून द्यावी लागते त्या राणेबाईंनी ह्यावेळी स्वतःहून रिपोर्ट तयार केलाय आणि चेंजेसही करते म्हणतायत ते ऐकून शशी चाट पडला.

"अरे वा! राणे मॅडम ! ह्यावेळी तुम्ही फारंच प्रोॲक्टीव्हली रिपोर्ट बनवलात. मी मागच्यावेळी समजावलेलं तुम्ही चांगलंच मनावर घेतलंय वाटतं. Good good..पण मीटींग उद्या आहे ना. मी बघतो दुपारनंतर. मग करा जे चेंजेस असतील ते संध्याकाळी जायच्या आधी." शशी म्हणाला.

"अय्या काय सर !  तुम्ही मस्करी करताय की खरंच विसरलात आज महिला दिन आहे ते ! घरी मिसेसना विश केलंत की नाही? अहो आज आम्हा सगळ्या महिलांना मॅनेजमेन्टने हाफ डे ऑफ दिलाय ना..आम्ही सगळ्या आज सेलिब्रेशन करणार.. आधी जेवायला जाणार आणि तिथून घरी सटकणार. म्हणूनच तर विचारतेय तुम्हाला रिपोर्टबद्दल इतक्या सकाळी सकाळी " राणे बाई म्हणाल्या.

शशीचे आपण दम देऊन राणे बाईंना सुधारल्याचे समाधान क्षणात मावळले पण तरीही ते चेहऱ्यावर न दाखवता तो  म्हणाला, "ओह !  हो.. खरंच की आज आठ मार्च आहे ते  विसरलोच होतो. विश यू व व्हेरी हॅपी वूमन्स डे राणे मॅडम..आजचा तुमचा दिवस एंजॉय करा..तसा तो रोजच असतो म्हणा.. पण करा करा तुम्ही एंजॉय करा..मी करून टाकेन रिपोर्ट फायनल."

"थॅक्यू सो मच सर." म्हणून राणेबाई निघून गेल्या आणि शशी टेंशनमधे आला..

घरात एक बायको आणि दोन मुली.. तीन तीन वूमनिया असूनही मी त्यांना साधं विशही केलं नाही.. आता आज काही खरं नाही.

 तरीच सकाळी साधनाचा चेहरा जरा पडलेला वाटला.. काय होतंय विचारलं तर डोकं चढलंय  म्हणाली..पण आता तिचं डोकं का चढलं ते समजलं.. ह्या बायका पण ना.. कधी मनातलं सरळ का नाही बोलत काय माहिती? पण जाऊ दे. 

आता फोन करून सरळ शरणागती पत्करून विश करून टाकू म्हणून शशीने साधनाला फोन लावला.. पण तिने तो उचललाच नाही.

बाप रे बाईसाहेब फारंच रागावल्या वाटतं.. शशी अजूनच स्ट्रेसमधे आला.. इतक्यात त्याच्या साहेबांनी अचानक मीटींग बोलावली आणि शशी लंचपर्यंत त्यात अडकला. साधनाला कॉल करायचा राहूनच गेला.

इकडे साधनाचं डोकं मात्र खरोखरीच खूप चढलं होतं.. ॲसिडीटीने जोरदार उसळी मारली होती.. आणि तिला काही सुचत नव्हतं.

साधनाने दोन्ही मुलींना कसंबसं तयार करून शाळेत पाठवलं, मोबाईल सायलंट केला, गोळी घेतली आणि डोकं बांधून झोपून घेतलं.

शशी लंचसाठी बाहेर आला आणि त्याने फोन पाहिला.. सोसायटीच्या whatsapp गृपवर बायकांचे वूमन्स डे सेलिब्रेशनचे फोटो आले होते. सगळ्याजणी मस्त पार्टी करत होत्या पण त्यातही साधना नव्हती. 

ते पाहून शशीला अजूनच टेंशन आलं. परत त्याने साधनाला कॉल्स केले पण नो रिस्पॉन्स.. अरे इतकी काय रागवते ही? की खरंच डोकं दुखत होतं तिचं? हिच्या डोक्यामुळे माझं बीपी चढायची वेळ आली आता.

घाईघाईने त्याने बॉसला एका अर्जंट कामासाठी थोडावेळ बाहेर जाऊन येतो म्हणून सांगितलं आणि लगे घर गाठलं. 

चार पाच वेळा बेल वाजवली. बेलच्या आवाजाने साधनाची नुसती झोप चाळवली पण ती काही उठली नाही.

शेवटी चावीने दार उघडून शशी घरात आला आणि घरातली सामसूम पाहून अजूनच घाबरला.

घाबऱ्या घाबऱ्या त्याने सगळ्या घरात चक्कर मारली तर साधना झोपलेली. अरे हिला खरंच बरं नाहीये तर.. जेवली तरी आहे की नाही कोण जाणे म्हणून तो स्वैपाकघारात गेला तर काहीच केलेलं नव्हतं.

अरे बापरे.. हिने काही खाल्लेलंही दिसत नाही.. आता काय करावं? परत एकदा आत डोकावला तर साधानाने कूस बदलली होती.

हीच्यासाठी खिचडी टाकावी आणि मग हिला उठवावं असा विचार करून शशी कामाला लागला.

गाढ झोपेत बाकी काही नाही समजलं तरी आपल्या स्वैपाकघरातला कुठलाही बारिकसा आवाज सुद्धा स्त्रीच्या आत्म्यापर्यंत पोचतो. 
त्यामुळे भांड्यांचा आवाज ऐकून साधना एकदम दचकून उठली.

हा आवाज कुठून येतोय? अरे हा तर आपल्याच स्वैपाकघरातून येतोय. 

तिने आधी वेळ बघितली...आता कोण असणार घरात? हल्ली चोर दुपारीही येतात की काय? हळूहळू चालत साधना स्वैपाकघरासमोर आली तर शशी गॅसपाशी होता.

"शशी? तू आत्ता?" म्हणत साधना ओरडली आणि दचकून शशीच्या हातून मीठाचा डबा पडला.

"उठलीस? बरं नाही ना तुला? ॲसिडीटी त्रास देतेय का? मी किती फोन केले.. मला वाटलं तू रागवलीस.. मी साधं तुला विशही नाही केलं त्यामुळे." शशी तिच्या जवळ जात म्हणाला.

"अरे नाही रे .. मी नाही रागावले अजिबात.. तू आमच्यासाठीच इतके कष्ट उपसतोस ना?

 तू आज विश जरी नाही केलंस तरी माझी प्रत्येक विश जपतोस ना.. माझ्या हॉर्मोन्सच्या तालावर झुलणाऱ्या मनाला सांभाळून घेतोस ना.

तुझ्या  प्रत्येक निर्णयात मला सामील करून घेतोस ना..माझ्या हुशारीला, धैर्याला प्रोत्साहन देतोस ना..म्हणून माझा वूमन्स डे रोजच साजरा होतो.

तुझ्या साथीमुळेच मी माझं स्त्रीत्व एंजॉय करू शकते.. अजून काय हवं.." साधना अगदी मनापासून म्हणाली.

शशीच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. 

तो हसून म्हणाला, " अरे वा ! बायको.. तू ने तो सेंटी कर दिया आज.. तुझं चढलेलं डोकं शांत झालं वाटतं.. विश यू हॅपी लाईफ माय वूमन.. चल खिचडी खाऊन घेऊ.. मला परत निघायंचय ऑफिसला..आणि काय ग इतकी समजूतदार आहेस तर सकाळी मला आठवण तरी करायचीस ना .. आपल्या कन्यारत्नांनाही विश केलं असतं ना मी."

"अरे मग संध्याकाळी कर ना.. आणि सांगितलं मुद्दामहूनच नाही.. माझी दहशत अजून शाबूत आहे की नाही ते चेक करत  होते फक्त....चल बस जेवायला.. वाढते तुला"
साधना हसत हसत म्हणाली.

आणि अचानकपणे घडून आलेली ही लंच डेट दोघा लवबर्ड्सनी एंजॉय केली.

 © धनश्री दाबके


धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने