"ती"चं अस्तित्व (भाग 2)

© सौ. अनुजा धारिया शेठ आणि सौ.स्मिता गायकुडे 




सुजा पुढचे दोन महिने दुप्पट जोमाने कामाला लागते. फळे, नारळ पाणी, आपल्या मुलीसोबत सवितालाही दूध सगळं सगळं सुजा करत असते.. आपल्या आईसारखी काळजी घेताना पाहून सविताला सुजामध्ये आपली आईच दिसते.

पाहता पाहता तो दिवस उजाडतो.. ज्या बाळासाठी ह्या दोघींनी गाव सोडलेलं असतं तो दिवस उजाडतो.. सविता गोड मुलीला जन्म देते.मोठया मनाने काही कमी पडू न देता सुजा सविताचं बाळंतपण करते.

बाळ तीन महिन्याचे होते तसे सविता ट्युशन घ्यायला जायचा विचार करते, कारण ट्युशन मधून मिळणारा पगार सुजाच्या शिलाईमधून मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त असतो आणि बाळाचा ही खर्च वाढलेला असतो. फक्त शिलाई मधून मिळणाऱ्या पैशातून सगळं भागवणं अवघड होत असतं..

सुजा दोन्ही मुलींना सांभाळत घरातच शिलाईकाम चालू ठेवते तर सविता परत कोचिंग क्लासमध्ये ट्युशन घ्यायला जाते.. आपलं तीन महिन्याच्या बाळाला सांभाळायला आपल्यापेक्षा जास्त जीव ओवाळून टाकणारी काकी असल्यामुळे सविता खूपच निश्चिंत असते.. 

सविता ट्युशन घेत घेत ग्रेड्युएशन पूर्ण करायचं ठरवते आणि सुजा त्याला पाठिंबा देते.

दीवारें ऊंची हैं गालियां हैं तंग
लम्बी डगर है पर हिम्मत है संग
पाऊं पे छाले हैं सांसें बुलंद
लड़ने चली हूँ आज़ादी कि जंग
बेख़ौफ़ आज़ाद है जीना मुझे बेख़ौफ़ आज़ाद है रहना मुझे..

सुजाला कपडे शिवत शिवत गाणे म्हणायला खूप आवडत असतं.. तिला गोड गळ्याची देणगी लाभली असल्याने कोणालाही तिचं गाणं ऐकत राहावस वाटतं..

एके दिवशी सुजा हे गाणे गुणगुणत असताना संगीता मॅडम शिलाई मशीनचे पैसे घेण्यासाठी घरी येतात..त्या बराच वेळ दारात उभारूनच सुजाचे गाणे ऐकत असतात.. सुजा एकदम तल्लीन होऊन गाणे म्हणत असते.

आत गेल्यावर त्या सुजाला म्हणतात, "अग काय गोड गळा लाभला आहे तुला.. ह्या पुढून आमच्या संस्थेमधील सगळ्या कार्यक्रमाला गाणे गायची जबाबदारी तुझी.."

हे ऐकून सुजाला खूप आनंद होतो.

कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या आवाजाचा, गाण्याचा भरभरून कौतुक करत असतं.. सुजाची ही कला तिच्या मुलीमध्येही आलेली असते.

काम करत करत सुजा आपल्या मुलीलाही गाणे गायला शिकवत असते.. संगीता मॅडमने खूप विनवणी केल्यावर सुजा गरुडझेप संस्थेतल्या प्रत्येक कार्यक्रमात गाण्यासाठी जायला लागते.

खूप लोकांसमोर स्टेजवर येऊन गाणे म्हणायला लागल्यापासून सुजाचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असतो.. म्हणतात ना स्वकमाईचं तेज काहीतरी वेगळं असतं तेच तेज सुजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं.

हळूहळू गरुडझेप संस्था नावारूपाला येत असते.ही संस्था "स्त्री सक्षमीकरण", "स्त्री भ्रॄण हत्या'', महिलांसाठी बचत गट असे अनेक उपक्रम राबवत असते.. सुजा आणि सविताही आपापल्या परीने ह्या समाजकार्यात योगदान देत राहतात.. अधून मधून वर्तमानपत्रात ह्या संस्थेच्या बातमीत त्याचंही नाव यायला लागतं..

सुजा मुलीला जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकते. सविता अधून मधून घरीही तिचा अभ्यास घेत असते. बघता बघता दोन्ही मुली मोठया व्हायला लागतात.. 

सुजाची मुलगी नंदिनी हळूहळू अभ्याबरोबरच आईला शिलाई कामात मदत करायला लागते.. सुजाही आता ब्लॉउजबरोबरच मुलींचे ड्रेस, परकर, पिको फॉल शिकून घेते, नंदिनीबरोबर आता सविताची मुलगी समृद्धी ही शाळेला जायला लागते.

मुली बऱ्यापैकी मोठे झाल्याने सुजावरचा ताण कमी झालेला असतो.. त्यामुळे आता ती भरपूर वेळ शिलाई कामाला देऊन दुप्पट पैसे कमवत असते..

"ज्यांच्यासाठी सगळं सोडलं त्यांना काहीही करून खूप शिकवायचं, मोठं करायचं " हा निश्चयच दोघांनी केलेला असतो.. नंदिनी आणि समृद्धी दोन्ही बहिणीचं ही एकमेकांवर खूप प्रेम असतं. एकत्र अभ्यास करणे, खेळणे, आपल्या आया कामात असतील तर घर सांभाळणे सगळं मिळून समजूतदारपणे करत असतात.

आता नंदिनी बारावीत तर समृद्धी नववीत असते. नंदिनी बारावीच्या परीक्षेत नापास होते. सुजाला आणि सविताला खूप वाईट वाटतं पण ते नंदिनीला दाखवत नाहीत.. एके दिवशी रात्रीचं जेवण आटोपल्यावर सुजा आणि सविता आपल्या दोन्ही मुलींना घेऊन गप्पा मारत असतात..

"बाळांनो.. तुम्हाला नेहमीच प्रश्न पडत आलंय की तुमचे बाबा कोण? ते कुठे आहेत?

सुजा आणि सविता दोन्ही मुलींना बसवून आपला भूतकाळ सांगतात. वय पाहता बऱ्याच गोष्टीं कळायला त्या लहानच होत्या, पण मुलींच्या मनात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर त्या दोघांनी दिल्या. सगळे ऐकून झाल्यावर दोन्ही मुली खूप शांत झाल्या.

आपल्या आईंनी आतापर्यंत केलेले कष्ट, फक्त आपल्यासाठी निवडलेली ही खडतर वाट ऐकून मुलींनी अजून जोरात अभ्यासाला सुरवात केली. 

सूजाचे सर्वच गुण नंदीनीने घेतले होते. तिने फॅशन डीझायनर होण्याची इच्छा बोलुन दाखवली तर समूने कलेक्टर होऊन समाजात होणार्या अन्यायाविरूद्ध लढा द्यायचा ठरवला. सविता आणि सुजा या दोघींनी ठरवलंच होते की मुलींना स्वतःच्या पायावर उभे करायचं,सगळ्या बाजूने सक्षम बनवायचं..

इकडे गावात त्या दोघींच्या नवर्यांनी दुसर लग्न केले होते दोघांना एक - एक मुलगा होता. सविताचा नवरा आता त्या गावचा सरपंच होता आणि त्यांची मुलेही वडिलांच्या पायावर पाय ठेवत राजकारणात घुसलेले असतात.. स्वतःचं असं काही वेगळं कर्तृत्व नसतं..

बघता बघता समृद्धी कलेक्टर तर नंदिनी फॅशन डिजाईनर बनते.. तो दिवस म्हणजे सुजा आणि सवितासाठी आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस असतो.. सगळे जग आजच्या या दिवशी त्यांना ठेंगणे वाटत असते.. 

बऱ्याच दिवसांनी सूजा गुणगुणते,

" आज मै उपर आसमाॅ नीचे,
आज मै आगे जमाना है पीछे.."

"खरंच ग सवि ज्यासाठी इतके कष्ट केले, सगळ्या यातना झेलल्या त्या सगळ्याच चीज झालं बघ.. मुली मोठया झाल्या ग....!! "

दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते..

समृद्धी कलेक्टर झाली तिची नेमणुक नेमकी त्याच जिल्ह्यात झाली ज्या जिल्ह्यात तिच्या वडिलांच गाव होतं. सविता काळजीत होती, पण तिचीच मुलगी ना ती .. मोठी धीराची होती.आईला न सांगता तिने तो जिल्हा मुद्दाम स्वतःसाठी घेतला होता.

तो गाव बऱ्याच वर्षांपासून दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला होता.. पाण्याअभावी सगळे गावकरी खूप त्रस्त होते.. बाजूच्या जिल्ह्यातील धरणातून कालव्यामार्फत पाणी आणण्यासाठीचे गावकऱ्यांचे प्रयत्न चालू होते पण त्यासाठी खूप साऱ्या तांत्रिक अडचणी येत होत्या.. 

जेव्हा समृद्धी कलेक्टर होऊन गावात आली, तेव्हा तिने ह्या प्रकरणात पुढाकार घेऊन गावातील पाण्याचा प्रश्न मिटवला.. दुष्काळ दूर झाल्याने गावकरी प्रचंड खुश होते.. त्यानिम्मित त्यांनी कालव्याचे उदघाटन आणि कलेक्टरचा सत्कार आयोजित केला होता..

उदघाटनाचा दिवस उजाडला.. सकाळी दहाची वेळ ठरलेली होती.. खरंतर सकाळपासूनच सरपंच आणि गावकरी कलेक्टरच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले होते.. 

कोणालाही न जमलेला हा प्रश्न तातडीने सोडवणाऱ्या कलेक्टरला बघायला सगळेच आतुर होते.. सरपंच तर हातात हार घेऊन गावाच्या वेशीवरच वाट बघत थांबले होते.. काही कारणाने समृद्धीला यायला दोन तास उशीर झाला, 

दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर कलेक्टर समृद्धीची गावात दिमाखात एन्ट्री झाली. समृद्धीने आल्या आल्या उशीर झाल्याबद्दल गावकऱ्यांची माफी मागितली. ठरल्याप्रमाणे कालव्याचे उदघाटन झाले, मग् कलेक्टर समृद्धी भाषण करायला सर्वासमोर आली..

"मी समृद्धी सविता पार्टे.. मूळची ह्या गावचीच.."

हे ऐकताच सरपंच एकदम गार झाले.. आपल्या बाजूला बसलेल्यांना परत परत कलेक्टर चे पूर्ण नाव विचारू लागले.. कारण कानावर विश्वास बसत नव्हता ना.. 

समृद्धीची जीवनकहाणी ऐकून सरपंच आणि त्यांच्या घरातल्यांना खात्री पटली की, ही कलेक्टर समृद्धी दुसरी तिसरी कोणी नसून सरपंचाचीच मुलगी आहे..

भाषण झाल्यावर सर्वानीच टाळ्या वाजवल्या. लगेचच सरपंच आणि पार्टे कुटुंब समृद्धीला भेटून वेगळे घेऊन जाऊन बोलायचा प्रयत्न करू लागले.. पार्टे कुटुंब शांतपणे बोलुन जुनी ओळख सांगून नवीन नाते जोडायला बघत असतात. 

जेव्हा सरपंच सांगतात की मीच तुझा बाप आहे तेव्हा समृद्धी म्हणते, "माझी आई हीच माझा बाप..!!"

ज्या बापाला मला या जगात आणायची इच्छा नव्हती त्या बापाशी मला बोलायची अजिबात इच्छा नाही आहे.. माझ्यासाठी माझ्या आई आणि काकी ह्याच सर्वस्व आहेत. माझ्या बापाला मी ओळखत नाही..माझ्यासाठी तुम्ही फक्त एक गुन्हेगार आहात."

"ए आवाज करायचा नाय..." पुरुषी अहंकार दुखावल्याने सरपंच गरजले

"आवाज खाली, तुम्ही कलेक्टरशी बोलताय.." समॄद्धी तेवढ्याच जोरात गरजली.

"मनात आणले तर तुम्हाला मी खडी फोडायला पाठवले असते. तुमची पहिली बायको जिवंत असताना तिला कायदेशीर घटस्फोट न घेता तुम्ही दुसरं लग्न केलंय, मी तुम्हाला या एका मुद्द्यावर तुरुंगाची हवा खायला पाठवू शकते. 

पण ह्या जन्मी नाममात्र का होईना नातं आहे आपले ते ही रक्ताचे.. म्हणून तूमच्या दुसऱ्या बायकोचा आणि मुलाचा विचार करून सोडत आहे मी तुम्हाला.. आणि तुम्ही वयाने मोठे आहात म्हणून अजून पर्यंत तुमचा मान ठेवून बोलले मी.

या पुढे एक मिनिट जरी थांबलात तरी माझा संयम सुटेल.. वडीलधारी माणसांचा मान ठेवायला मला माझ्या आईने शिकवलं आहे, म्हणून मी गप्प आहे. हा पेशा ‌वय वगैरे काही बघत नाही, मला पेशाने वागायला भाग पडू देऊ नका.." असे म्हणतं दोन हात जोडत नमस्कार करत म्हणते येते आता.

सरपंच आणि घरातले सगळे खजील मनाने तिथून निघून जातात. घरी आल्यावर रागारागाने टीव्ही लावतात तर काय सुजा, सविता यांची मुलाखत चालु असते, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक होत असतानाच थोडे फार प्रश्न या संस्थेत कसे आलात? अशी चर्चा सुरू असते, दोघी खूपच आत्मविश्वासाने बोलत असतात.

त्यांच्या सोबत गरूडझेप संस्थेच्या संचालिका संगिता देसाई याना बघून तो मनात विचार करतो आणि अवाक होऊन बघतच बसतो.

तेवढ्यात मुलाखतीत एक प्रश्न विचारला जातो की जर सासरच्यांनी तुम्हाला माफ केलं तर तुम्ही परत सासरी पाऊल ठेवाल का?

त्यावर सुजा आणि सविता दोघी एकमेकींचा हात हातात घेऊन उत्तर देतात..

"त्यांना माहिती असलेल्या सूजाता आणि सविता कधीच मरून गेल्या, आता आम्ही लोकं काय म्हणतील?? कोणाला काय वाटेल? ह्या भीतीच्या पिंजर्यात अड़कत नाही त्यापेक्षा आपले मन सांगतय त्याप्रमाणे स्वच्छंद जगतो. त्यामुळेच तर खर्या अर्थाने मुक्त आयुष्य जगता येते आणि आम्ही असेच वागायचे ठरवले आहे.. "

गावातला दुष्काळ संपल्याने सगळे गावकरी जरी आनंदात नाहले असले, तरीही गावातले पार्टे कुटुंब मात्र भूतकाळातल्या कर्मामुळे पश्चातापाच्या जाणीवेत बुडाले होते.

समाप्त

वाचकहो, अजूनही या समाजात अशा अनेक गोष्टी घडत असतात, मुलगी झाली म्हणून दुःख करत बसणारे, तर काही गर्भातच तिला नष्ट करणारे, आई त्याला विरोध करते, पण तिला गप्प केले जाते. अशा वेळेस तिला गरज असते ती आधाराची, पाठींब्याची तो आपण द्यायला हवा. मुलीचा संसार, समाज या चाकोरीत न अडकता अन्यायाविरूद्ध आवाज उठवायला हवा हेच या कथेतून सांगायचं आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे.

स्मिता गायकुडे यांनी या आधुनिक प्रार्थनेतून गणेशाला नमन केले आहे..

नमन करिते मी तुला गणेश देवा,
मुलगी होऊ दे मला, करीन तुझी सेवा

मुलीची हौस मला खूपच भारी
का हो मारताय तिला पोटामधी

मुलगी असते घरची पणती
उजळून टाकते दोन्ही घरटी

परक्याचं धन म्हणून हिणवू नको हो तिला
सासरी जाऊन मान राखील हो आपला

शिकू दे तिला, उडू दे आकाशात
कैद नका करू हो तिला बंधनाच्या पिंजऱ्यात

सणावाराला तिच्यामुळेच तर येते घराला चकाकी
ती आठवण काढताच लागते इकडे उचकी

तिला जन्म देऊन थांबायचं नाही आता
स्वरक्षणाचे धडे देत बनूया आदर्श माता

तूच आहेस दुर्गा,ओळख स्वतःतल्या शक्तीला
जप नेहमी तूझ्या आत्मसन्मानाला

सहन नको करू कुठलाच अन्याय
स्वतंत्र उभी रहा तू भक्कम रोवून पाय.


© सौ. अनुजा धारिया शेठ आणि सौ.स्मिता गायकुडे 

सदर कथा दोन लेखिका मैत्रीणी म्हणजे सौ. अनुजा धारिया शेठ आणि सौ.स्मिता गायकुडे या दोघींची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकांकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने