अंधाऱ्या वाटेवरचा लख्ख प्रवास


© वर्षा पाचारणे




"आई, आज संध्याकाळी आपण गणपतीच्या मंदिरा बाहेर तो भेळवाला आहे, त्याच्याकडे जाऊन भेळ खाऊयात का गं?", लहानग्या चमेलीने आईकडे हट्ट धरला.

तितक्यात मोठी मेघा म्हणाली ,"मग भेळ खाल्ल्यावर मला आईस्क्रीम पण पाहिजे".

आधीच घरात पैशाची चणचण असलेली नीलिमा साऱ्या परिस्थितीने त्रासली होती. मुलींच्या हट्टांना पूर्णही करू शकत नाही, या विचाराने ती भूतकाळात हरवली. 

पदरी तीन मुली. मोठी मेघा , मधली चमेली आणि दोन वर्षांची चिमुरडी सोनू.
मुलींच्या शाळेचा खर्च करताना जीव अगदी मेटाकुटीला यायचा. नीलिमाचा नवरा ज्ञानेश्वर एका प्रायव्हेट कंपनीत कारकून म्हणून काम करायचा. 

साधारण सहा सात महिन्यांनी काय ते बाहेर जाऊन एखादवेळेस पाणीपुरी खाणं किंवा मग रोजच्या भाजी-पोळी शिवाय थोडा काही वेगळा बेत करण्या इतपतच ऐपत होती. त्यातही गावी कोणाचे लग्न सोहळे किंवा सण समारंभ आले, की आहेर म्हणून देण्याच्या वस्तूंमुळे संसाराचे पुरते गणित कोलमडून जायचे.

कमावणारा एक आणि खाणारी सहा तोंडं, अशी परिस्थिती.. सासरे फार पूर्वीच वारल्याने सासूबाईंनी घरकाम करत मुलाला शिकवलं. आयुष्यभराची साठवलेली पुंजी आणि स्वतःचे दागिने मोडून सासूबाईंनी चाळीत एक हक्काची खोली घेतली होती, तेवढीच काय ती स्वतःची हक्काची मालमत्ता.

नीलिमा सून होऊन जेव्हा घरी आली, तेव्हा सासूबाईंना आपल्या लेकाला सांभाळून घेणारी, या घराला कुठल्याही परिस्थितीत सावरणारी सून मिळाली याचा आनंद गगनात मावेनासा झाला.

कारण निलीमाचा स्वभाव मुळातच मनमोकळा, जिद्दी आणि समाधानी होता. नव्या नवलाईचे दिवस आयुष्यात कधीच आले नाहीत, याचे दिला अनेकदा वाईटही वाटायचे. 

कारण माहेरची परिस्थितीही अगदीच बेताची असल्याने सासरी तरी हौस मौज पुरवली जाईल, अशी भावी स्वप्न पाहणारी नीलिमा लग्न होऊन आली तेव्हाच तिला कळून चुकले, की आपली स्वप्नं ही केवळ स्वप्नंच राहणार आहेत, ती सत्यात उतरण्याची अपेक्षा करणं म्हणजे मृगजळच ठरेल.

चमेलीच्या एका वाक्याने विचारात पडलेली आई सोनूच्या रडण्याने भानावर आली.

"पोरींनो नसते हट्ट करू नका, चला शाळेत जायची वेळ झाली. पटापट आवरा आणि निघा बघू पटकन", असं म्हणत आईने मेघाच्या वेण्यांना घट्ट रिबिनी बांधल्या. 

दोघींची दप्तरं त्यांच्या खांद्यावर अडकवून देत मुलींना पाठवून आई पुन्हा कामात मग्न झाली.. घरातली आवराआवर करताना पिटुकली सोनू सतत मधेमध्ये लुडबुड करत होती.

आता सारी कामं आवरून निवांतपणे थोडं अंग टेकावं, या विचाराने आई बसणार, तितक्यात शेजारच्या पवार काकूंकडे फोन आला. 

कंपनीतून घरी येताना ज्ञानेश्वरची स्कूटर स्लीप झाली होती. त्यात समोरून येणाऱ्या कारची त्याला जबरदस्त धडक बसली होती. त्याला जबर दुखापत झाली होती. 

रस्त्यावरच्या लोकांनी जवळच असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केले होते. हातात चार कवड्याही नसताना आता हे मोठं संकट येऊन उभं राहिलं होतं.

नीलिमा मटकन खाली बसली. तितक्यात मंदिरात भजनाला गेलेल्या सासुबाई घरी आल्या. निलीमाला रडताना पाहून त्यांना काहीच सुचेना. आपली आई रडते म्हणून सोनू देखील कावरीबावरी झाली होती. मुली शाळेतून घरी यायची वेळ झाली होती.

"नीलू, अगं काय झालं? रडतेस का अशी?", सासूबाईंच्या आवाजाने नीलिमा भानावर आली.

"आई, अहो यांचा एक्सीडेंट झालाय. आत्ता नुकताच शेजारी फोन आला होता. त्यांना साने चौकातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.. मला लगेच जायला हवं"..

तिच्या चेहऱ्यावरची चिंता, भीती सारंकही सासूबाईंनी हेरलं होतं. "थांब, तू एकटी नको जाऊस. मी येते तुझ्या बरोबर", असं म्हणत दोघीजणी सोनूला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या.

ज्ञानेश्वरच्या हातांना इतका जबरदस्त मार लागला होता, की डॉक्टरांनी पुढचे काही तास अतीधोक्याचे सांगितले होते. तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी पाच हजार ऍडव्हान्स रक्कम भरावी लागणार होती.

"पाच हजार?... बापरे!.. आई कुठून आणायचे आता पैसे?"... असं म्हणत हॉस्पिटलमध्ये बाकड्यावर बसलेली असतानाच निलिमाच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. 

हॉस्पिटलमधील येणारा जाणारा प्रत्येक जण तिच्याकडे पहात होता. "हे बघ निलू, तू धीर सोडू नको.. तू आता घरी जा आणि तो मांडणीतला पितळाचा डबा घेऊन पहिली सोनार कडे जा.

त्याच्याकडे डब्यातलं माझं मंगळसूत्र गहाण ठेव.. हे गेल्यानंतर त्यांची आठवण म्हणुन इतके वर्ष जपून ठेवलं होतं, पण सोनं अडीअडचणीला उपयोगी आलं नाही तर त्याचा फायदा काय? त्यामुळे आता कसलाही विचार न करता, तू तडक घरी जा".

आपल्या मंगळसूत्रासाठी आणि त्यांच्या लेकासाठी सासूबाईंनी इतके वर्ष जपलेलं मंगळसूत्र गहाण ठेवायला सांगताच निलूला हुंदका अनावर झाला. तिने सासूबाईंना घट्ट मिठी मारली.

'रडण्यात वेळ घालवू नकोस. जा, लवकर घरी जा', असं म्हणत सासूबाईंनी स्वतःचं मन घट्ट केलं.

ज्ञानेश्वरवर शस्त्रक्रिया झाल्या. एक्सीडेंटमध्ये लागलेल्या जबरदस्त मारामुळे त्याचे दोन्ही हात निकामी झाले होते. 'हात नसल्यामुळे आता नोकरीही गमवावी लागणार, हॉस्पिटलचे बिल, मुलींचे भविष्य, घरादाराची अवस्था', या विचाराने ज्ञानेश्वर हॉस्पिटलच्या बेडवर पडल्यापडल्याच मनाने जणू कधीच मेला होता. 

डोळ्यातले अश्रू थांबता थांबत नव्हते. अन् ते अश्रू पुसण्यासाठी आता हात देखील स्वतःचे नसणार या विचाराने त्याचा संताप अनावर होत होता.

हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर कुठेतरी जाऊन जीव द्यावा, हा एकच विचार त्याच्या मनात सतत घोळू लागला होता. त्याची ही अवस्था पाहता निलिमाने आता काहीही करून आपण खंबीरपणे संसार सावरायचा, ही खूणगाठ मनाशी बांधली. 

ज्या माउलीने इतके वर्ष आपल्याला लेकीसारखा जीव लावला, आज इतक्या कठीण प्रसंगात जपून ठेवलेली नवऱ्याची शेवटची आठवणही तिने पणाला लावली, त्या माऊलीसाठी आपल्या जगायचे आहे, खचलेल्या नवऱ्याला पुन्हा हिम्मत द्यायची आहे, आपल्या चिमुरड्यांची स्वप्न कशीबशी का होईना पण आपल्यालाच पूर्ण करायचीत, या विचाराने तिने स्वतःशीच एक निश्चय केला.

दोन महिन्यानंतर नीलिमाने वृत्तपत्र विकण्याचा निर्णय घेतला. कुठेतरी छोटासा स्टॉल घेऊन मग कामाला सुरुवात करणं शक्यच नव्हतं, कारण त्याकरता आधी हातात पुरेशी रक्कम असणं गरजेचे होतं . 

सासुबाईंची तब्येतही वयोमानाप्रमाणे बिघडत चालल्याने दिवसभर घराबाहेर जाऊन कुठेतरी काम करणं तिच्यासाठी शक्य नव्हतं. त्यातच ज्ञानेश्वरही अजून निराशेच्या गर्तेतून पूर्णपणे बाहेर पडला नव्हता. 

घरात तीन मुलींच्या ‌भविष्याची जबाबदारी असल्याने हातपाय हलवणे शिवाय पर्याय नव्हता. तिने ओळखीतल्या एका व्यक्तीकडून हा व्यवसाय सुरू करण्याची माहिती घेतली. 

पहाटे चार वाजता वृत्तपत्राच्या गाड्या मुख्य चौकात यायच्या. तिथून मग वर्तमानपत्र आणून त्यातील पुरवण्यांची योग्य पद्धतीने जुळवाजुळव करून एका शाळेचे बाहेरच्या रस्त्यावर तिने आज तिच्या कामाचा श्रीगणेशा केला. 

शाळेजवळच मोठं उद्या नसल्याने तिथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची वर्दळ असायची. हीच गोष्ट हेरून तिने ती जागा निवडली होती. येणारे जाणारे वृत्तपत्र खरेदी करत होते.

पहाटे चार वाजता सुरू झालेले तिचे हे काम साधारणपणे सकाळी अकरा वाजेपर्यंत संपून जायचे. महिन्याभरानंतर तिचा चांगलाच जम बसला होता. दिवसभराच्या वेळेचे तिने आता छान नियोजन केले होते. 

आलेल्या पैशातून थोडी रक्कम का होईना, पण बाजूला साठवण्याचा तिचा निश्चय होता. तिच्या अशा मेहनतीमुळे ज्ञानेश्वरला देखील आता हुरूप आला होता. 

लग्नाआधीच गाडी चालवता येत असल्याने निलीमाने इतके वर्ष पडून असलेली स्कूटर आता चालवायला घेतली होती.

नीलूच्या मुली आता मोठ्या होऊ लागल्या होत्या. मोठी मुलगी दहावीत, मधली मुलगी आठवीत आणि धाकटी चौथीत गेली होती. 

मोठी मुलगी त्या मानाने आता समजदार झाल्याने ती आईला वृत्तपत्रे विक्रीमध्ये मदत करायची.

हळूहळ हेच काम वाढवावं, या विचाराने नीलिमाने आता मुख्य रस्त्याला लागून असलेल्या वस्तीजवळ एक छोटीशी टपरी घेऊन ज्ञानेश्वरला आणि मुलीला ती वृत्तपत्र विक्रीसाठी तिथे बसवू लागली. 

मुलीची शाळा दुपारची असल्याने सकाळी ती बाबांबरोबर तिथे जाऊन आधी वृत्तपत्र नीट मांडून ठेवायची. येणाऱ्या ग्राहकांकडून पैसे घेऊन वृत्तपत्र देण्याचे काम करायची. अकरा वाजता तिथलं काम संपलं, की ती शाळेत निघून जायची. 

तोपर्यंत ज्ञानेश्वर त्या टपरीवर राहिलेले वृत्तपत्र घेऊन बसून राहायचा. हातांनी अधू असल्याने येणारे-जाणारेही अकरा वाजल्यानंतर वृत्तपत्र घ्यायचे असल्यास स्वतःच्या हाताने घेऊन पैसे तिथेच बाजूला ठेवलेल्या एका डब्यात टाकायचे. 

नीलिमाचं काम आटोपून नीलिमा ज्ञानेश्वरला गाडीवर पुन्हा घरी घेऊन जायची.

आयुष्यात परिस्थिती कुणावरही सांगून येत नाही, पण त्या आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद मात्र आपली आपल्यालाच कमवावी लागते, हे निलूने जगाला दाखवून दिलं होतं.

 निलूच्या मुली अतिशय देखण्या असल्याने एक दिवस वृत्तपत्र घेण्याच्या बहाण्याने एक टपोरी मुलगा तिची छेड काढताना दिसताच निलू त्याच्या अंगावर धावून येण्याआधीच तिच्या मुलीनेच त्या मुलाला बदडून त्याचा चांगलाच समाचार घेतला. 

आपली लेक आलेल्या कुठल्याही परिस्थितीशी खंबीरपणे लढू शकते, हे पाहून निलिमाला आज मनोमन समाधान वाटले...

दरम्यान निलूच्या मुलींची लग्न झाली. आपल्या लेकी सुखाने नांदताहेत, यापेक्षा एका आईसाठी आणखी काय सुख असणार! 

जिद्दी स्त्रियांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टांची दखल घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या 'कष्टाला कौतुकाची थाप' या कार्यक्रमाअंतर्गत आज निलूचा सन्मान होणार होता. 

सत्कार समारंभात तिचा जीवन प्रवास ऐकताना साऱ्यांचे डोळे पाणावले होते. एक वेळ घरी भाजी पोळी खाण्यासाठी पैसे नसलेली बाई आज चार वर्तमानपत्र स्टॉलची मालकिण झाली होती. 

आलेल्या उत्पन्नातून दर महीना बाजूला काढून ठेवलेली रक्कम ती तिच्यासारख्याच अनेक गरजू महिलांसाठी वापरत होती. सत्कार समारंभात तिच्याबद्दल ज्ञानेश्वरला दोन शब्द बोलण्याचे आवाहन करताच त्याचे डोळे पाणावले.

'माझ्या आयुष्यात माझ्या आई इतकेच दुसरे कोणी आदर्श स्थानी असेल, तर ती म्हणजे माझी पत्नी. या दोन स्त्रियांनी माझा आयुष्य केवळ सुंदरच बनवलं नाही, तर ते वेळोवेळी सावरलं देखील. 

त्याबद्दल मी त्यांचे जन्मोजन्मी ऋणी राहील. माझे हात नसल्याने प्रत्येक गोष्टीसाठी गेले अनेक वर्ष मी तिच्यावर अवलंबून आहे, पण इतक्या वर्षात एकदाही तिच्या चेहऱ्यावर तिने कधिच त्रासीक भाव जाणवू दिले नाहीत. 

वेळप्रसंगी स्वतः दोन घास कमी खाऊन, घरचे कसे पोटभर जेवतील याकडे लक्ष देणारी हि माऊली म्हणजे साक्षात माझ्या आयुष्यातली अन्नपूर्णा.. सासूला आईच्या मायेने जीव लावणारी ही नसून तिची पोटी जन्मलेली लेकच असावी, असा भास होतो. 

एक्सीडेंटमध्ये दोन्ही हात गमावले नसते, तर कदाचित आज चित्र वेगळं असतं. पण त्या एक्सीडेंटमुळे विस्कटलेल्या आयुष्याच्या चित्रात मात्र रंग भरण्याचे काम सर्वस्वी नीलिमाने केलं आहे. नाहीतर आमच्या कुटुंबाचं तेच चित्र भरकटत जाऊन कुठल्यातरी रद्दी पेपरसारखं कदाचित कधीच काळाच्या पडद्याआड गेलं असतं. 

स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवत केवळ घराची विस्कटलेली घडीच तिने सावरली नाही, तर मुलींची लग्नही उत्तम प्रकारे लावून दिली. एका कर्त्या पुरुषाने करायच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात, त्या सार्‍या जबाबदार्‍या माझ्या नीलिमाने पार पाडल्या आहेत.

तिच्याबद्दल कौतुक करण्यासाठी आज शब्दही कमी पडतात. अशा या माउलीला माझा मानाचा मुजरा', असं म्हणत ज्ञानेश्वर पाणावलेल्या अश्रूंचा बांध रोखू शकत नव्हता.

निलूने त्याचे अश्रू पुसत एक स्मित हास्य करत त्याला विचारले," माऊली, खडतर परिस्थिती कोणाला नसते. पण आपला जोडीदार आपल्या सोबत आहे, ही जाणीवच मोठा आधार देऊन जाते. 

जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जगण्यापेक्षा त्याच जबाबदाऱ्यांना नेटाने पूर्ण करणं हेच खरं यशामागचं गुपीत असतं. आपल्याकडे काय नाही, यापेक्षा काय आहे याचा विचार जर केला तर जगण्यासाठी आणखी काय हवं!... 

प्रत्येक स्त्रीमध्ये संकटाशी सामना करण्याची ताकद आणि ऊर्जा असतेच, फक्त फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घ्यायची जिद्द मात्र कमवता यायला हवी".

एवढं बोलून पुरस्कार स्वीकारून नीलू आणि ज्ञानेश्वर सभागृहाबाहेर पडले. त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहणाऱ्या साऱ्यांना या आधुनिक विठ्ठल रखुमाईने जगण्यासाठी एक नवी ऊर्जा दिली होती हे मात्र खरं.


© वर्षा पाचारणे

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने