घाबरटपणाच्या कोशात गुरफटलेली 'ती'

© वर्षा पाचारणे




इन मीन चार माणसांचे कुटुंब असलेल्या घरात वाढलेली स्वप्नाली कधीच बिनधास्तपणे वागू शकत नव्हती. आई-बाबांनी खूप प्रयत्न करून देखील तिच्यातला तो घाबरटपणा काही केल्या कमी होत नव्हता. 

कुठलीही गोष्ट करायला सांगितली, की हिचा बागुलबुवा करायचा स्वभाव उफाळून यायचा. 

आई-बाबांनी तिला अनेकदा बँकांचे व्यवहार शिकून घे, छोटी-मोठी बिलं भरण्यासाठी बाहेर पडावे लागते तेंव्हा बिनधास्तपणे वाग, गाडी चालवायला शिक, असे अनेकदा समजावून पाहिले, ओरडून सांगितले, परंतु प्रत्येक गोष्टीत तिच्यातली भित्री भागुबाई जागी व्हायची आणि शेवटी ही सारी कामं आई-बाबांना वेळात वेळ काढून करावी लागायची.

स्वप्नालीचं लग्न ठरलं आणि या लाडक्या लेकीच्या लग्नाची धावपळ सुरू झाली. स्वप्नाली मात्र फारच धास्तावली होती. इतके वर्ष प्रत्येक गोष्टीत आई-बाबांवर अवलंबुन असलेली स्वप्नाली एखाद्या भित्र्या सश्याप्रमाणे बावरली होती. 

लग्न होऊन सासरी आल्यानंतर तिथेही चारच माणसं घरात असल्याने त्यामानाने तिच्या मनावर खूप सारे दडपण नव्हतं. 

सासू-सासरे शेतकरी माणसं. स्वप्नालीचा नवरा पुण्यात नोकरीला असल्याने लग्नानंतरचे देवधर्माचे विधी आटोपून स्वप्नाली आणि महेश पुण्यात परतले. राजा राणीचा नव्या नवलाईचा संसार सुरू झाला.

स्वप्नाली अगदीच आदर्श गृहिणी होती. देवधर्माचे कुळाचार, व्रतवैकल्य सारकही मनापासून करायची. सासू सासरे कधी गावावरून आले, तर त्यांची अगदी उत्तम काळजी घ्यायची. 

पण प्रत्येक गोष्टीबद्दलचा घाबरटपणा मात्र मनात आणि स्वभावात जन्मत:च मुरल्याने त्यात तसूभरही बदल झालेला नव्हता. 

महेश रोज सकाळी कामाला निघाल्यावर स्वप्नाली त्याला दहा वेळा 'गाडी नीट चालवण्याच्या सूचना द्यायची, ऑफिसला पोहोचल्यावर फोन करा असं सांगायची, दुपारी तो जेवला कि नाही म्हणून ती स्वतः त्याला फोन करायची, संध्याकाळी पुन्हा ऑफिस मधून निघताना फोन करायला सांगायची'. 

महेशला सुरुवातीला या गोष्टी छान वाटायच्या. कारण त्याच्या आयुष्यात त्याच्या हक्काची, त्याची काळजी घेणारी व्यक्ती असल्याने तिची मनाची घालमेल त्याला समजत होती. परंतु जसा काळ जाऊ लागला, त्याला स्वप्नालीचा हा अतीघाबरट स्वभाव जाणवू लागला.

"अहो, ऐकलत का? गाडी चालवताना मोबाइलवर बोलू नका. त्यात आज-काल सेल्समनच्या नावाखाली चोरटे देखील सोंग घेऊन येतात, असं ऐकलंय मी. मला आज काल दार उघडताना सुद्धा फार भीती वाटते. एक तर तुम्ही ऑफिसला जाता, त्यात घरात मी अशी एकटी".

"अगं, असल्या बातम्या ऐकतेस आणि फुकटची भीती वाढवून घेतेस. एवढं घाबरण्यापेक्षा आतूनच कोण आहे ते विचारत जा आणि तसंही आपल्याकडे येणारं असं कोणीच नाही. 

गावावरून कोणी येणार असेल तर त्यांनी आधीच कल्पना दिलेली असते, त्यामुळे दार नाही उघडलं तरी चालेल, पण अशी घाबरून राहू नको". महेशने तिच्या मनातली भीती समजून घेत तिला थोडा धीर दिला..

 "आणि राहिला प्रश्न माझ्या गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याचा... तर मॅडम, तुम्हीच मला दहा वेळा फोन करून विचारता, कुठे आहात? निघाले का? जेवले का?.. तुमच्या व्यतिरिक्त या पामराच्या आयुष्यात दुसरं कोणीही फोन करून एवढी विचारपूस करत नाही बरं!.. असं म्हणत महेश स्वप्नालीकडे बघून हसला

"थट्टा करू नका हो. मला काळजी वाटते.. आणि हो मी आहे अशीच लहानपणापासून घाबरट.. पण माझी काळजी समजून घ्या ना", असं म्हणत लटक्या रागाने स्वप्नाली स्वयंपाक घरात निघून गेली.

"अगं, मी तर दिवसभर घरी नसतो. तुझ्या मैत्रिणी कोणी असतील तर त्यांच्याबरोबर थोडी बाहेर पड, शॉपिंग कर, कसला क्लास लावायचा असेल तर तो कर', असं महेशने जवळपास दीड दोन वर्ष तिला समजावण्यात घालवला.

 तरीही 'घराबाहेर पडणं.. तेही एकटीने... छे! मला जमणारच नाही', असं म्हणत तिने प्रत्येक वेळी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

कुठलीही गोष्ट आणायची झाली की महेश सोबत हवाच. माहेरी जायचं झालं तरीही प्रत्येक वेळी महेशने सोडायला आलंच पाहिजे, त्याशिवाय ही घराबाहेर पाऊल ठेवणार नाही, अशी स्वप्नालीची परिस्थिती. 

बरं प्रत्येक वेळेस महेशला सुट्टी मिळेलच असेही नसायचं पण हिच्या अशा बुजलेल्या घाबरट स्वभावामुळे भले दोन दिवसांनी जायचं होईना, परंतु त्याला सुट्टी मात्र घ्यावीच लागायची.

'तुला रिझर्वेशन करून देतो, इथून गाडीत बसवून देतो, फक्त स्टेशन आलं की तुला उतरायचं तर आहे.. एवढी साधी गोष्ट', असं म्हणत महेशने तिला खूपदा एकटीच जा म्हणून समजावलं. पण मग शेवटी त्याचे समजावणं रागात रूपांतरित व्हायचं आणि शेवट हिच्या रडण्याने... असं करत निर्णयाची गाडी परत आहे तिथल्या तिथेच..

लग्नाला तीन वर्ष झाल्यानंतर घरात पाळणा हलला. सासू सासरे, आई बाबा दोघेही आळीपाळीने चार चार महिने येऊन राहिले. कारण स्वप्नालीला आधीच एकटीला घर खायला उठायचं, त्यात आता बाळाला सांभाळावं कि काम करावं, या संभ्रमात ती पुरतीच गांगरली होती. 

तिची ही घालमेल कमी करण्यासाठी शेतीची कामं थोडे दिवस बाजूला सारून दोघांच्याही आई-बाबांनी तिला सोबत केली. 

परंतु सासू सासरे आणि आई बाबा परत जायला निघाले, की हिचे मात्र डोळे पाणावलेले.. 'आता कशी करणार मी हे सारे?', असं म्हणत पुन्हा धास्तावलेली. तिच्या स्वभावाची आताशा साऱ्यांनाच सवय झाली असल्याने, तिला समजवण्याच्या भानगडीत आता सहसा कोणी पडत नव्हते.

बाळाला ताप आला, सर्दी खोकला झाला, पोट दुखत असलं, की झालं! हीच आपलं कावरंबावरं होणं सुरू. एका डॉक्टरकडे बाळाला नेऊन आणलं, की संध्याकाळपर्यंत फरक पडलाच पाहिजे, असं हीच मत. 

फरक नाही पडला तर 'दुसर्‍या डॉक्टरकडे नेऊन आणूयात का?, आधीच्या डॉक्टरांनी चांगली औषधं दिली असतील ना? वगैरे वगैरे विचार सुरू व्हायचे. जोपर्यंत तिच्या चिमुरड्या तन्मयला बरं वाटत नाही, तोपर्यंत हिचा काही जीव थाऱ्यावर नाही.

तन्मय मोठा झाला तसा स्वप्नालीला आता बऱ्यापैकी स्वत:साठी वेळ मिळू लागला, परंतु काही शिकण्याची जिद्दच नसल्यामुळे तिने कधी काही नवीन शिकावं, असा प्रयत्नच केला नाही. 'माझा अख्खा दिवस कामातच जातो', अशी सबब देत पुन्हा संध्याकाळी महेश आला की त्याच्या समोर तिची मात्र चिडचिड सुरू. 

आज-काल तिचं हे वागणं त्याला काही नवीन नसल्याने महेशदेखील एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत होता. कारण गेली अनेक वर्ष तो तिला समजावून थकला होता.

महेशला कंपनीत चांगली संधी चालून आली होती. सहा महिने बंगलोरला जावे लागणार होते. महेशच्या करिअरच्या दृष्टीने ही फार मोठी संधी होती. ही आनंदाची बातमी घेऊन महेश घरी आला.

"स्वप्नाली, आज आपण बाहेरच जेवायला जाऊयात.. मस्त एन्जॉय करू". "अगं, ज्या गोष्टीची मी अनेक वर्ष वाट पाहत होतो, ती फायनली आज मला मिळते. मला सहा महिन्यांसाठी बेंगलोरला जावे लागणार आहे. तिकडून आल्यानंतर माझी पोस्टही वाढलेली असेल आणि पगारही. आहे की नाही आनंदाची बातमी!", असं म्हणत महेशने स्वप्नालीला टाळी देण्यासाठी हात पुढे केला, परंतु या मॅडम मात्र विचारात गुंतल्या.

स्वप्नालीने "मी एकटी मुलाला घेऊन येथे राहणार नाही.तुम्ही फक्त तुमचा विचार करताय.. तन्मयचं आणि माझं काय? आम्ही कसे राहणार एकटे? इथे तन्मय ची शाळा आहे, सगळं अर्धवट सोडून द्यायचं आहे का? ते काही नाही तुम्ही हे असलं कुठलंही काम स्वीकारणार नाही आहात", असे सांगत तिने प्रश्नांचा भडिमार करत तो बागुलबुवा बॉम्ब त्याच्यावर टाकलाच.

"अगं, पण फक्त सहा महिन्यांचा प्रश्न आहे. आणि तुझ्या सोबतीसाठी माझे आई बाबा किंवा तुझे आई बाबा येऊन रहातील इथे. आणि महिन्यातून एकदा तुम्हाला भेटल्याशिवाय मला तरी करमणार आहे का? त्यामुळे दर महिन्याला मी येऊन नक्कीच भेटून जाईल", असे सांगूनही तिचा मात्र पारा काही केल्या कमी होईना.

शेवटी दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. हाती आलेली चांगली ऑफर शेवटीं महेशने नाईलाजाने नाकारली. त्यानंतर महिनाभर दोघांमध्ये अबोला होता. परंतु माझं कसं बरोबर होतं, हे वारंवार सांगून शेवटी स्वप्नालीने त्याला बोलतं केलं. पण मनाविरुद्ध नाईलाजाने नाकारलेली ती संधी त्याच्या मनात मात्र आयुष्यभर घर करून राहिली.

आज लग्नाला जवळपास वीस वर्ष पूर्ण झालेली स्वप्नाली अजूनही तितकीच घाबरटपणे वागते. 'मला हे जमेल का? मला हे शक्यच नाही', असं म्हणत प्रत्येक गोष्ट नाकारते. 

शिकलेली असूनही तिला आजही बँकांचे व्यवहार जमत नाहीत. शिकलेली असूनही मोबाईल हा केवळ बोलण्या पुरताच वापरणे एवढेच तिला ठाऊक. मोबाईल मध्ये अनेक अत्यावश्यक अॅप असतात, हे जाणून घेण्याची तिने कधीच तसदी घेतली नाही.

आज अनेक वर्षांनी शाळेतील मैत्रिणींचा री युनियनचा प्लॅन ठरताच या साऱ्यांना भेटायला एकटी कशी काय जाणार?‌ या विचारात असतानाच दारावरची बेल खणखणली. दारात लाडका लेक उभा होता. 

तो दिसताच स्वप्नालीला जणू आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं, असं वाटून गेलं.

"अरे, आमच्या शाळेच्या मैत्रिणींनी येत्या गुरुवारी एकत्र जमायचं ठरवलंय. पण ज्या ठिकाणी ठरवलं आहे, ती जागा आपल्या इथून फार दूर आहे आणि तुला तर माहीतच आहे, मी एकटी कधीच इतक्या लांब गेलेले नाही. 

खरंच खूप मजा येईल इतक्या वर्षांनी एकमेकींना भेटल्यावर. त्या दिवशी तू मला दहा साडेदहा वाजता त्या ठिकाणी गाडीवर सोडशील ना?" स्वप्नालीने अगदी मनातल्या विचारांचा सगळा गुंता तन्मय समोर मांडला.

"ए आई, नाही हा... गुरुवारी माझे कॉलेजचे प्रोजेक्टस आहेत. आधीच मला त्याचं खूप टेन्शन आहे, त्यामुळे तू हे असले आणखी पेच वाढवू नकोस. मला काही तुला सोडायला वगैरे जमणार नाही". असं म्हणत आधीच घाईघाईत आलेला तन्मय पुन्हा बॅगमध्ये दोन चार पुस्तकं टाकून दाराबाहेर पडला. झालं! 

तिच्या मात्र विचारांचा गुंता पुन्हा वाढायला सुरुवात.

'छे! म्हणजे आता जाणं अशक्यच!' असं म्हणत तोंड पाडून स्वप्नाली कामात स्वतःला मग्न करू पाहत होती. एकीकडे मैत्रिणींना भेटण्याची तीव्र इच्छा आणि दुसरीकडे कधीही घराबाहेर न पडल्याची खंत आज कुठेतरी जाणवत होती परंतु काही केल्या मन मात्र एकटीने बाहेर पडण्यासाठी अजूनही धजावतच नव्हतं. तितक्यात महेश ऑफिसमधून घरी आला.

"स्वप्नाली पटकन चहा दे. डोकं दुखतंय खूप. चहा घेऊन थोडा पडतो आत जाऊन", असं म्हणत महेशने बॅग सोफ्यावर टाकली आणि तो फ्रेश व्हायला गेला.

'यांचं आधीच डोकं दुखतंय म्हटल्यावर तो रियुनियनचा विषयही काढायलाच नको. कारण आत्ता मला तुम्ही सोडायला याल का असं विचारलं, तर विषयच संपेल', म्हणून स्वप्नाली महेशला चहा देऊन निमूटपणे स्वयंपाक करायला गेली. 

पण संध्याकाळी जेवताना तिच्या डोक्यात कसलातरी विचार चालु आहे, हे पाहून महेशने स्वतःच तिला विचारले ,"काय गं, कसलातरी विचार करतेस का?". 

आता स्वप्नाली काही बोलणार त्याआधीच जेवता जेवता तन्मय पटकन म्हणाला ,"अहो बाबा, काही नाही. तिच्या शाळेतल्या मैत्रिणी या गुरुवारी कुठेतरी भेटणार आहेत सगळ्याजणी. तेव्हा आईला जायचं आहे. 

पण त्यादिवशी मला अजिबातच वेळ नाही, कारण माझे कॉलेजचे प्रोजेक्टस आहेत. त्यामुळे मी आईला तिथे सोडू शकणार नाही. त्यामुळे ती विचारात आहे".

"अगं, मग कॅब करून जा ना. मी तुला कॅब बुक करून देतो. तुला जिथे जायचं आहे त्या ठिकाणावर ते नेऊन सोडतात. आणि तुमचा कार्यक्रम आटोपला की मला पुन्हा कॉल कर. मी पुन्हा कॅब बुक करून देईल. ना पत्ता सांगायची गरज, ना रस्ता.. आपल्याला जिथे पोहोचायचं आहे तिथे व्यवस्थित नेऊन सोडतात".

"बाई! म्हणजे मी अशी एकटी अनोळखी ठिकाणी कॅबने जाईल, असं वाटलं का तुम्हाला".. "जाऊ दे राहू दे ते युनियन.. एवढी काही गरज नाही पडली कोणाला जाऊन भेटायची. शाळेतल्या मैत्रिणी शाळेतच सुटल्या असं म्हणेल मी.. पण मी काही एकटीने जायची नाही", असं म्हणत मनातला संतापाचा पारा मनातल्या मनात गिळत तिने भांड्यांची आवराआवर केली. 

पण जाता येणार नाही याची धुसफूस मात्र मनात कायम होती आणि ती चेहऱ्यावरही दिसत होती.

रात्री झोपताना शेवटी महेशने तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि समजावलं ,"अगं, बाहेरच्या जगात वावरलीच नाहीस, तर कसा काय तुझ्यात बिनधास्तपणा येणार? 

आपल्या आनंदासाठी, आपल्या स्वतःच्या कामांसाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं, यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय! 

तन्मय लहान असताना आलेली संधी माझ्या हातून हुकली, त्याचं दुःख अजूनही माझ्या मनात कुठेतरी दडून आहे. पण तुझ्या हातून तर कितीतरी गोष्टी विनाकारण सुटल्यात आणि अजूनही सुटत आहेत. आता तरी तो बागुलबुवा बाजूला ठेव आणि मुक्तपणे, बिनधास्तपणे वावर की जगात".. 

"जगात बायका कुठल्या कुठे पोचल्यात. एकटीने परदेश प्रवास करतात, मोठ्या ऑफिसमध्ये बायका हेड पोस्ट वर असतात. मग प्रत्येकीनेच असा बागुलबुवा मनात बाळगला, तर मग घराबाहेर पडणं देखील अवघड होईल. 

माझं ऐक, भेटून ये मैत्रिणींना.. तेवढेच तुलाही छान वाटेल. जुन्या आठवणींमध्ये रमताना दिवस कसा भुर्रकन उडून जाईल, तुझं तुलाही कळणार नाही. काय गं, मग जाशील ना? महेशने मोठ्या आशेने स्वप्नालीकडे पाहिले.

त्याच्या प्रश्नाला निरुत्तरित ठेवून स्वप्नाली दुसर्‍या कुशीवर वळत झोपून गेली. 

गुरुवार बोल बोल म्हणता निघून गेला. स्वप्नाली त्या गुरुवारी दिवसभर मनात चरफडत राहिली. नवऱ्याचं आणि मुलाचं म्हणणं तिला कळत होतं, पण वळतच नव्हतं.. 

मनातल्या बागुलबुवाने तिच्या पावलांना आजही घराच्या उंबऱ्याआड बंदिस्त केलं होतं. कुणाचीही बंधन नसताना, कोणाचाही दबाव नसताना स्वप्नालीने स्वतःच्या विनाकारण मनात माजलेल्या भीतीवर मात न केल्याने तिने नवऱ्याच्या आयुष्यातील अनेक अनमोल क्षण तर वाया घालवले होतेच.

पण आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणींना मिळणारा उजाळा ही तिने पुन्हा एकदा त्या भीती नामक कुलूपाने मनाच्या कप्प्यात कोंडून ठेवला होता. 

शाळेतल्या मैत्रिणींनी व्हाट्सअपच्या ग्रुपवर सगळ्याजणी भेटल्यानंतरचे फोटो टाकताच तिला गहिवरून आले, परंतु पुन्हा कोणीही आपल्याला 'का भेटायला आली नाहीस? म्हणून विचारूच नये यासाठी तिने तो ग्रुपही तात्काळ सोडून दिला. 

लग्नाला वीसच काय चाळीस वर्ष झाल्यानंतरही, आपण किती गमावलंय याची कल्पना तिला आल्यानंतरही, दोष मात्र स्वतःकडेच असल्याने आता पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नव्हता.


वाचकांनो,
कधी कधी भोळसटपणा, घाबरटपणा काही व्यक्तींमध्ये इतका प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतो, की साध्या गोष्टीचाही त्यांच्या मनावर प्रचंड ताण असल्याचं जाणवतं. म्हणजे अक्षरशः एखादी परीक्षा असली की त्यांच्या पोटात गोळा येणार, एकट्याने एटीएम मधून पैसे काढायचे म्हटले की हृदयाची धडधड वाढणार, गाडीचं रिझर्वेशन करायचं म्हटलं की मनाची चलबिचल नको त्या प्रमाणात वाढणार, एकट्याने कुठलीही गोष्ट करायची म्हटली की ती मला जमेल की नाही या विचाराने आधीच हात-पाय गाळणार इतकी परिस्थिती असते. 

बरे या परिस्थितीला दुसरी-तिसरी कोणीही व्यक्ती जबाबदार नसून त्या व्यक्ती स्वतःच स्वतःभोवती एक कोश तयार करून घेतात. ज्यातून बाहेर पडणे त्यांना कदाचित शेवटपर्यंत शक्यच होत नाही. मग घरातलेही 'पालथ्या घड्यावर पाणी', असे म्हणत अनेकदा अशा व्यक्तींच्या वागण्याकडे दुर्लक्ष करतात. 

परंतु माणसाने जगात वावरताना सक्षमपणे, खंबीरपणे वावरावे एवढाच समज या गोष्टीतून द्यावयाचा आहे. कुणाच्याही आधाराशिवाय जगायला शिकावं. जेव्हा मनातील अनाठायी ठिय्या मांडून बसलेला बागुलबुवा नष्ट होईल, तेव्हाच आयुष्यातील अर्धे अधिक अडथळे दूर व्हायला मदत होईल.


© वर्षा पाचारणे

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने