अंतर

© धनश्री दाबके


वृंदा नुकतीच बाजारातून घरी येऊन चहा घेत बसली होती तेवढ्यात तिच्या व्हॉट्सॲप मेसेजचा टोन वाजला. कुंदाताईचा मेसेज होता. वृंदाने केलेल्या तिच्या चौकशीच्या मेसेजला रिप्लाय आला होता.

'वृंदा,

मी ठीक आहे ग. आता ठीक राहाण्याशिवाय काही पर्याय तरी कुठे आहे माझ्याकडे? ह्यांना वचन दिलंय ना मी ठीक राहिन म्हणून, मग जगतेय आपली स्वतःची जमेल तितकी काळजी घेत आणि एकेक दिवस मोजत. 

बाकी तुझं काय? कशी चालू आहे तुझ्या लेकाची परीक्षा? त्याचा काही प्रश्न नाही म्हणा. तो हुशारच आहे मुळात, तुझ्या सारखाच.

तू  एकटीच आहेस बघ जी आवर्जून माझी विचारपूस करते. नाहीतर बाकी कोणाचाही फोन, मेसेज काहीसुद्धा येत नाही. असो. काळानुरूप सगळं बदलायचंच म्हणा.. पण तरी तुझ्यात काकूचे माणसं जपायचे सगळे गुण उतरलेत हो.. नाहीतर आपल्या माहेरची काय गत आहे ते तुला माहितीच आहे.

आपले भाऊ काय आणि बहीणी काय? सगळे सारखेच..माझ्या नणंदा चांगल्या आहेत म्हणून जरा बरंय गं.. त्यांचा तरी आधार आहे.. कालच आले मी ताई वन्संकडून माझ्या घरी परत. बरी आहे मी.

..कुंदाताई '

कुंदाताईला पत्रासारखा लांबलचक व्हॉट्सॲप मेसेज लिहायची सवय होती. वरती कोणाला लिहायचं आहे त्याचं नाव आणि खाली तिचं नाव ती अगदी आवर्जून लिहायची. 

व्हॉट्सॲप चॅटवर आपलं नाव लिहायची गरज नसते असं एक दोनदा वृंदाने तिला सांगून बघितलं पण तरी ती तशीच. मग वृंदाने तिची व्हॉट्सॲप पत्रं वाचायची सवय करून घेतली. जशी इतकी वर्ष तिच्या सतत सासर आणि माहेरच्या लोकांची तुलना करण्याच्या स्वभावाची करून घेतली होती तशीच.

कुंदाताईला फक्त वन वे ट्रॅफीक माहित होतं. म्हणजे फक्त ती बोलणार, अगदी परखडपणे दुसऱ्यांच्या, म्हणजे माहेरच्यांच्या, चुका दाखवत सतत नेगेटीव्हीटी पसरवणार आणि माहेरच्या कोणाचे काहीही ऐकून घेणार नाही.

आत्ताचा तिचा रिप्लायही फक्त मी बरी आहे किंवा माझी तब्येत ठीक आहे असा आला असता तरी चालला असता. कारण बाकीचं सगळं वृंदाला माहितीच होतं. पण तरीही तिने एवढं लांबलचक उत्तर देऊन त्यात तिच्या मनात रूतलेला माहेरच्या लोकांबद्दलचा राग आळवलाच.

इतकाली वयं झाली तरी ही काही लोकं स्वतःचा हेका सोडतच कशी नाहीत आणि का आपण तरी त्यांचा हेकेखोरपणा चालवून घेतो. सगळं माहिती असूनही का मी परत परत हिच्याकडून बदलाची अपेक्षा करते. वृंदाच्या मनात नेहमीचं द्वंद्व सुरु झालं. 

कुंदाताई वृंदाची सगळ्यात मोठी चुलत बहीण. नात्याने बहीण जरी असली तरी वयाने मात्र आईसारखीच. वृंदाचे वडील भावंडात सगळ्यात लहान आणि कुंदा तिच्या सगळ्यात मोठ्या काकांची थोरली लेक. कुंदाताई आणि वृंदाची आई यांच्यात जेमेतेम तीन वर्षांचं अंतर.  

कुंदा आई वडलांची सगळ्यात मोठी लेक. पाठीमागे तीन बहिणी व दोन भाऊ. घरची परिस्थिती, त्या काळात जशी सगळ्यांचीच असायची तशी, बेताचीच. 

वडलांचा पगार अगदी जेमतेम पुरणारा त्यामुळे ते सदैव ओव्हरटाईमच्या मागे. इतक्या बाळांतपणानंतर आधीच थकून गेलेला आईचा जीव नवऱ्याने दिलेल्या पैशात घर चालवण्याची कसरत आणि धाकट्या मुलांचं करण्यातच गुंतलेला. 

कुंदा आईची बाळांतपणं आणि तब्येतीच्या तक्रारी बघतच मोठी झाली. त्यात घरात सदैव देव देव,  कुळाचार आणि रितीभाती. साहजिकच कुंदावर घरातली खूपच जबाबदारी पडायची. 

धुणी, भांडी, स्वैपाकात मदत, लहान बहिणींना सांभाळणं ह्यातच तिचा सगळा दिवस जायचा. मुळात अभ्यासाची गोडी नव्हतीच, त्यात आईने कधी त्याचं महत्व समजावून सांगितलं नाही की वडलांनी कधी धाकाने अभ्यासाला बसवलं नाही. त्यामुळे गटांगळ्या खात खात जेमतेम दहावी पास झाली आणि मग घरातच बसली. 

अभ्यासात गती नसली तरी घरकामात मात्र तरबेज झाली. स्वैपाक उत्तम जमायला लागला. पण सकाळ संध्याकाळ घरात राबूनही आईवडलांनी कधीच कौतुकाने पाठ थोपटली नाही की प्रेमाने तिला गोंजारलं नाही. 

त्यामुळे आई, वडील दोघांबद्दलही तिच्या मनात अढी बसली. 

घरातली कामं वाढवणारे सणवार, पूजाअर्चा यांची तर तिला जणू ॲलर्जीच झाली. देवाचा राग येऊ लागला आणि एक प्रकारची नकारात्मकता मनात ठाण मांडून बसली. 

वृंदाची आई लग्न करून ह्या इतक्या माणसांच्या कुटुंबात आली तेव्हा कुंदा आणि तिच्या पाठच्या बहीणींची तिला घरात रूळण्यासाठी खूप मदत झाली. 

काकू काकू करत सगळ्याच मुलांनी तिला जीव लागला आणि वृंदाच्या आईनेही सगळ्यांना तितकेच प्रेम दिले. कुंदाला तर आईवडलांपेक्षा काका काकू जास्त जवळचे वाटू लागले. काकूच्या रूपात एक समजून घेणारी समवयस्क मैत्रीण मिळाल्याने कुंदा काकूपाशी मन मोकळं करू लागली.

गाठीशी शिक्षण नाही आणि विधात्याने रंगरूपाच्या बाबतीतही हात आखडता घेतलेला,  त्यामुळे लग्नाचा योग यायलाही कुंदाला खूप वर्ष वाट पहावी लागली. खूप नकार पचवावे लागले.

दोन नंबरच्या बहिणीचं लग्न आधी लागलं आणि कुंदा मात्र मागे राहिली. त्या वेळी काकूने खूप प्रेमाने तिला सांभाळले. 

नंतर काकांची ऑफिसच्या लांबच्या शाखेत बदली झाली. काका काकू शहरात राहायला आले. मग त्यांनी तिकडे कुंदासाठी वरसंशोधन सुरु केले आणि त्यांच्या जवळच राहाणाऱ्या संजय लेलेचे स्थळ त्यांना समजले. 

मग एक दिवस कुंदाला पाहायला संजय लेले आणि कुटुंब आले. संजयकडेही बहीण भावंडांचा ताफाच होता. फक्त संजय भावंडांमधे सगळ्यात लहान होता त्यामुळे त्याच्यावर फारशी जबाबदारी नव्हती. 

आईवडील दोघंही हयात नसल्याने संजयच्या लग्नाची जबाबदारी मोठ्या भावंडांवर होती. संजयच्या बहीण भावडांमधे खूपच एकोपा, समंजसपणा आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती होती. 

आईवडलांची आजारपणं आणि त्यांच पाठोपाठ जाणं या सगळ्यात संजयच्या लग्नाला तसा उशीरच झाला होता. कुंदा आणि संजयने एकमेकांना पसंत केले आणि लगेचच्या सुमुहूर्तावर शुभविवाह पार पडला. . 

संजयच्या कुटुंबात कुंदाचं खूप प्रेमाने स्वागत झालं. तिच्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई स्वभावाने थोड्या कडक होत्या. पण कुंदा घरकामात चोख असल्याने त्यांनी तिला पटकन आपलंस केलं. 

कुंदालाही लेले कुटुंब आवडल्याने तिनेही सगळ्यांशी जुळवून घेतलं आणि ती सासरच्या मंडळींमधे रमली. तिला माहेरची ओढ अशी कधी वाटलीच नाही. काकूवरची तिची माया मात्र अबाधित राहिली. दोघींची घरंही जवळ असल्याने काका काकूंकडे ती जात येत राहिली. 

कुंदाच्या लग्नानंतर काही महिन्यांतच काकूला दिवस गेले. गोड बातमीमुळे घरात आनंद पसरला. 

काही अडचणीमुळे  काकूचे आईवडील तिला माहेरी नेऊ शकले नाहीत. पण तिची धाकटी बहीण मदतीसाठी आली. कुंदाही काकूकडे राहायला आली. 

दोघींनी मिळून काकूचे बाळांतपण निभावले. कुंदाची अनुभवी आई होतीच सगळं सांगायला. तिच्या सुचनांनुसार या दोघी मुलींनी सगळं उत्तमरीत्या पार पाडले. 

काकूची बहीण थोड्या दिवसांत परत गेली पण कुंदा मात्र चांगले दोन महिने राहिली. 

तुझं नवीन लग्न झालंय. तू संजयरावां बरोबर राहायला हवंस..तू घरी परत जा. असं काका काकू तिला खूप समजावयाचे पण कुंदाने त्यांचे नाहीच ऐकले. 

मी संजयना सांगितलय आणि त्यांची काहीच हरकत नाहिये असं म्हणून तिने खूप मदत केली.  संजयरावांनीही खूप समजूतीने घेतले. काकू तुमची वेळ महत्वाची आहे तेव्हा कुंदाला इथेच राहू दे. मग आहोतच की आमचे आम्ही दोघं म्हणून त्यांनीही कुंदाला सपोर्ट केला. 

लहानगी वृंदा रडायची,  रात्र रात्र जागवायची तेव्हा कुंदाने जागरणं करून तिला सांभाळले. तिला अंगाखांद्यावर खेळवले. तिचे खूप लाड केले. त्यामुळे वृंदालाही तिचा खूप लळा लागला.

बघता बघता दोन वर्ष सरली. कुंदा आणि संजयरावांच्या आयुष्यातही स्थैर्य आलं. स्वतःच घर झालं. दोघं आनंदात राजाराणीचा संसार करू लागले. 

कुंदाच्या मनातली स्वतःच्या आईवडलांबद्दल असलेली अढी संजयरावांना जाणवायची.  बायकांना माहेरबद्दल असलेला जिव्हाळा, माहेरी जाण्याची ओढ कुंदामधे अजिबात कसा नाही याचं त्यांना सुरवातीला खूप आश्चर्य वाटायचं. 

पण हळूहळू त्यांना परिस्थिती उमगत गेली आणि तिच्या मनात माहेरापासून असलेल्या एका मोठ्या अंतराची सवयही होत गेली. 

पहिले वर्षभर सणवारांमुळे जेवढे माहेरी जाणे येणे झाले तेवढ्यातही त्यांना कुंदाच्या आणि तिच्या आईवडलांच्याही कोरडेपणाने वागण्याची सवय होऊन गेली. 

आता कुंदाला मातृत्वाची ओढ लागली. पण तिच्या नशीबात ते सुख लिहायचं त्या सटवाई कडून राहूनच गेलं असावं. कारण सगळे प्रयत्न करूनही कुंदा आणि संजयरावांची ही आस पूर्ण झाली नाही. 

दोघांनाही दत्तक मूल नको होतं. त्यामुळे दोघांनी कायमसाठी हा विषय बंद करून टाकला. फक्त एकमेकांच्या साथीने आयुष्य जागायचं ठरवलं आणि दोघांच्याच विश्वात आनंदी आणि समाधानी राहाण्याचा पुरेपूर प्रयत्न करायला लागले. 

कुंदाच्या मनात देव आणि दैव दोन्हीबद्दलही प्रचंड अनास्था निर्माण झाली व मनात सदैव वास्तव्याला असलेल्या नकारात्मकेने परत डोकं वर काढलं. 

नशिबाने सगळ्याच बाबतीत आपल्यावर अन्याय केलाय असं तिला वाटू लागलं. ती सगळ्यांचा राग राग करू लागली. पण संजयराव आणि सासरच्या इतर मंडळींनी तिला खूप समजून घेतलं. 

काकूनेही तिला त्या काळात खूप मानसिक आधार दिला. मन रमवण्याचे वेगवेगळे मार्ग सुचवले. संजयरावांच्या दोन्ही बहिणींनी तर स्वतःच्या लेकींसारखी तिच्यावर खूप माया केली. 

कालांतराने कुंदा सावरली आणि वेगेवेगळ्या व्यापात स्वतःला गुंतवत तिने आपण कधीही आई होणार नाही हे सत्य स्विकारून टाकले. 

काकूसोबत तर आधीच होते पण ह्या काळात कुंदाचे तिच्या दोन्ही मोठ्या नणंदांबरोबर कधी न तुटणारे घट्ट बंध निर्माण झाले. 

कदाचित जे प्रेम ती माहेरच्या घरी शोधत होती तिला नणंदांनी दिलं आणि त्या तिच्यासाठी सब कुछ झाल्या. त्या दोघी करतात ती प्रत्येक गोष्ट बरोबर आणि फक्त त्याच बरोबर असं तिला वाटायला लागलं. 

त्यांच्या मुलाबाळांत तिने मन रमवायला सुरुवात केली. फक्त लेले आणि कुटुंबीय हे फार चांगले, यशस्वी, आनंदी आणि त्यांच्यासमोर  माहेरकडचे सगळे फक्त चुकीचेच वागणारे आणि कमी सुखी अशी काहीशी भावना मनात रूजली. ती सतत माहेरच्या माणसांची लेलेंशी तुलना करायला लागली. 

कुंदाचा सगळ्यात धाकटा भाऊ आणि तिचा पुतण्या साधारण एकाच वयाचे. दोघंही हुशार आणि तितकेच मेहनती. पण कुंदाला तिच्या पुतण्याच प्रत्येक बाबतीत भावापेक्षा वरचढ वाटायचा. सतत त्या दोघांची तुलना करून ती भावाला काही ना काही बोलत राहायची. 

वृंदाही तिच्या या तुलनेच्या कचाट्यातून सुटली नाही. वृंदा आणि कुंदाची भाची एकाच इयत्तेत शिकायच्या. तर ती आमची भाची कशी हुशार आहे. कसं छान गाणं म्हणते, डान्स शिकते, छानच दिसते, तू फक्त अभ्यास एके अभ्यासच करत राहाते असं बरंच काही वृंदाला सतत ऐकवायची. 

त्यावर वृंदा काही सांगायला गेली तर लगेच तू मला उलट बोलतेस म्हणून वैतागायची. वृंदाचं काही ऐकूनचं नाही घ्यायची. 

वृंदाला त्यामुळे कुंदाताईचा खूप राग यायचा. तिने घरी येऊ नये असं वाटायचं आणि वृंदाची आई तर छोट्या मोठ्या प्रत्येक समारंभाला तिला बोलवायची.

वृंदाच्या घरी गौरी गणपती, नवरात्र, कुळाचार, चातुर्मासातली व्रतं, वेगवेगळी हळदीकुंकवं अशा ह्या ना त्या कारणाने सतत माणसांचा राबता असायचा. कुंदाताईचही कायम येणं जाणं असायचं. 

तिला बोलावण्यावरून आईशी वाद घातला की आई म्हणायची,  "वृंदे, माणसाने आपली वेळ कधी विसरू नये. तुझ्यावेळेला ही कुंदाच माझ्या सोबत होती. माझ्या बाळंतपणात खूप केलंय तिने माझं. मी कधीच तिला अंतर देणार नाही. 

तुला माहितीये ना तिचा स्वभाव. मग थोडं दुर्लक्ष करायला शिक. तिच्या भाचीबद्दलचे चार कौतुकाचे शब्द ऐकून घेतले तर काय आपल्या अंगाला भोकं पडणारेत का? मी असेपर्यंत तरी कुंदा आणि संजयराव इथे येत राहाणार." आणि झालंही तसंच. शेवटपर्यंत आईने  कुंदाला कधीच अंतर दिलं नाही. 

पण वृंदासारखीच घरातल्या इतरांची मात्र कुंदा नावडतीच होऊन गेली. कायमसाठी. कारण सतत लेलेंकडच्या लोकांच्या कौतूकामुळे कुंदाताई बहीण भावडांना टोचून बोलतच राहिली. 

वरवर कोणी स्पष्टपणे बोलत नसलं आणि सगळेजण तिला गमतीने लेले मॅडम, लेले मॅडम म्हणून चिडवून तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असले तरी ती सगळ्यांच्या मनातून उतरतच गेली. हिला आपल्यात काहीच चांगलं दिसत नाही असं म्हणून सगळ्यांनी तिला मनापासून लांबच ठेवलं.

वर्षांमागून वर्ष सरत गेली. कुंदा आणि वृंदा दोघींचेही आईवडील काळाच्या पडद्यामागे गेले. एक अख्खी पिढी पुढे सरकली.

वृंदा जस जशी मोठी होत गेली तस तसं तिला आईच म्हणणं कळत गेलं आणि पटतही गेलं. ह्याच कारणाने ती आजही आणि लांब दूरदेशी राहूनही कुंदाताईच्या संपर्कात होती. तिला कधी काही लागलंच तर पाहात होती. 

सहा महिन्यांपूर्वीच संजयरावांच निधन झालं तेव्हा कोरोनाच्या रेस्ट्रिक्शन्स मधेही वृंदा कुंदाताईकडे जाऊन आली होती. मोठ्या दोन्ही बहिणींच्या आधीच संजयरावांनी एक्झिट घेतली होती तरी त्या बिचाऱ्या स्वतःच दु:ख बाजूला ठेवून कुंदाला सावरत होत्या. 

कुंदाच्या सासरचा सगळा गोतावळा जमला होता. तिला धीर देत होता. संजयरावांचा जीव मात्र गेल्यानंतरही कुंदाच्या काळजीत अडकला होता. कुंदाताईने 'मी सगळ्यांना धरून राहिन आणि स्वतःची काळजी घेईन' असं सांगितल्यावरच त्यांच्या पिंडाला कावळा शिवला होता. 

रीतीला धरून कुंदाचे जवळ राहाणारे भाऊ आणि वहीनी आले होते आणि बाकीच्यांनी कोरोनाचा आधार घेत न येण्याचं साधून स्वतःची सोय पाहिली होती. 

आता कुंदाताई सावरली होती. दहाव्याला संजयरावांना वचन दिलेली कुंदाताई आता परत बहीण भावडांचे अवगुण आणि नणंदाचे चागले गुण वृंदाला ऐकवत होती. म्हणजे आयुष्याची गाडी परत नेहमीच्याच मार्गाने धावत होती.

 इतकी वर्ष ज्यांच्या सोबत सुखदु:ख वाटून घेत कुंदाताईने आयुष्य उपभोगलं होतं त्या संजयरावांचा स्वतःच्या माणसांना जपण्याचा स्वभाव आणि प्रेमळपणा काही अंशीही तिच्यात रूजला नव्हता. 

ते नेहमी समजवायचे की तुझ्या मनातल्या जुन्या गोष्टी विसरून जा. तुझ्या सख्ख्यांना दुखवू नको. पण ती त्यांच्याकडून काहीच शिकली नव्हती. 

जीवन मृत्यूचा एक फेरा पूर्णत्वाच्या वाटेवर होता पण कुंदाताईमधे काहीच फरक पडला नव्हता.

खरंच काही माणसं कधीच बदलत नाहीत आणि काही अंतरं कधीच मिटत नाहीत. अगदी कोणाच्या येण्यानेही नाहीत आणि जाण्यानेही नाहीत. 

पण मी मात्र आईसारखंच कुंदाताईला कधीच अंतर देणार नाही.  तिचं वागणं तिच्यापाशी आणि माझं माझ्यापाशी .

वृंदा विचारांच्या आवर्तनात हरवली होती आणि भींतीवरच्या फोटोमधून आई हसून तिच्याकडे पाहात होती.

© धनश्री दाबके


धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने