तिच्या मनाची घालमेल


© वैशाली देवरे




"मेघना अगं किती हे पानचट जेवण.. जरा मन लावून करत जा गं... तोंडातही जात नाही बघ... जीवावर आल्यागत करतेस का गं...?? दोन घास देतेस ना ?? तेच जरा नीटनेटकं देत जा बाई.

आमचंच घर व आम्हालाच खायची चोरी सूनेच्या आधिन जीवन झालं गं बाई...,देवा काय दिवस दाखवतोस रे ..., त्यापेक्षा उचल रे लवकर.." सासूबाईंची बडबड सुरू होती .

रवी तयारी करून आफिस ला निघाला होता.

त्याचा टिफिन ,त्याची तयारी यात मेघाची धावपळ होती.

सासुबाईच जोरजोरात बोलणंही त्यात चालूच होतं.आईच बोलण रवीच्या कानावर पडलं.

संतापाने बोलणारी आई बघून तोही तोही भडकलाच मेघावर..

"अगं मेघा काय ते रोज सांजा, पेज, व पोहे देतेस ग त्यांना नाश्ताला. वय झालयं त्यांच. तोंडाला चवही हवीच ना? ते खातात म्हणून काहीही करून खायला घालशिल का?..जरा त्यांच्या वयाचा विचार कर.

उद्यापासून त्यांच्या आवडीचंही बनवून बघ ना, त्यांनाही बरं वाटेल. काय बोललो ऐकलं ना?. लक्षात ठेव.

नाही तर तुझं माहित आहे मला. एका कानाने ऐकायचं व एका कानाने सोडून द्यायचं. तुला हवं तसंच करते तू.

ते नको आहे मला.."

मेघावर रागवतच रवी आफिसला चालला गेला.

रवी बोलल्याने मेघा जरा नाराजच झाली. 

काय करेल ती तरी. सकाळी पाचला उठली होती. 

रवीच्या आँफिसमध्ये आज टिफिन पार्टी होती व सोबत मुलांची शाळा असल्याने त्यांचाही टिफिन.

सकाळपासून दशम्या, दोन सुक्या भाज्या..तिन प्रकारच्या चटण्या हे सारं करण्यात जवळपास एक तास गेला.

तरी बरं बरीचशी तयारी मेघांने रात्रीच करून ठेवली होती.

मुलांची तयारी करून शाळेत पाठवत, रवीच्या आफिसची तयारी करत , सासूसासर्‍यांना गोळ्या घ्याव्या लागतात म्हणून पटकन नाश्ता द्यावा लागतो म्हणून घाईघाईने तीने सांजा बनवला होता.

खरंतर किती ती धावपळ होती तिची.. दोन दिवसांपासून जरा अंगात कसकसही होती. पण तरीही कोणतीही तक्रार न करता ती सगळं यथोचित करत होती..

सासूबाईंची कटकट व त्यात रवीचं सतत त्यांच्या बाजूने बोलणं तिला कायम खटकत असे. पण दुर्लक्ष करत ती सारं करत असे.

पण आज ती जरा अस्वस्थ झाली होती.

"रवीलाही समजू नये माझ्या जीवाची घालमेल? मी कामच करत होते ना ? शांत थोडीच  बसली होते??? 

आई आज काम जास्त होती...घे ग खाऊन इतकं जरी बोलले असते तरी बरं वाटलं असतं मला.

ह्यापेक्षा जास्त काही अपेक्षा नाही...पण हेच जर बोलू लागलेत तर सासुबाईं माझा मान ठेवतील का?...त्या तर माझा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नाहीत.."

मेघाच्या मनात नाना प्रश्न रुंजी घालत होते.

आता तिला तिची चूक आठवत होती..व स्वतःलाच दोष ती बडबडत होती.

"वेडीच गं तु मेघा .आज नोकरी केली असती तर हाताखाली बाई ठेवली असती व तिने बनवलेल काहीही अगदी आनंदाने सार्‍यांनी खाल्लं असतं.  तुलाही मान असता.  कोणीही उलटून बोलल नसतं कि चिडल नसतं . पण ह्या सगळ्या गोष्टींना तुच तर जबाबदार आहेस . तुझ्यावर ही वेळ तुच तर ओढवून घेतलीस. त्याचेच तर भोग आहेत हे..."..

विचारांच्या गर्दीत मेघाचं मन सुन्न होत होतं.

त्यातच मेघाच्या बहिणीचा फोन आला.

"हॅलो ताई ...कशी आहेस?"

"मजेत गं...बोल काय म्हणतेस.."

मेघाचा आवाज खोल गेलेला होता...ते बहिणीच्या लक्षात आले होते...बहीण आईकडे आलेली होती व मेघानेही आईकडे यावं, थोडासा वेळ घालवावा असंच तिला वाटत होतं.

"ताई अगं मी आईकडे आले आहे ,तू  आज आईकडे येतेस का? 

आईची तब्येत बरी नाही गं.. म्हणून आले मी आईकडे आणि तुलाही भेटले नाही ना कधीची. ये मस्त धमाल करु आपण "

ती तिकडनं बोलत होती व मेघा शांत ऐकत होती.

तिचं बोलणं संपल्यावर मेघा म्हणाली, "अगं ऐक ना राणी... मी जाईन गं नंतर आईला भेटायला. कारण निलची परीक्षा चालू आहे व घरी आईबाबांना एकटे कसं बरं  सोडणार. 

हेही कामात असतात बघं ..नाही जमणार गं मला खरचं सॉरी गं राणी. "

मेघाच बोलणं ऐकल्यावर तर बहीणीचं डोकंच सणकलं

"अगं संध्याकाळी स्वयंपाक कर आणि ये ना. सकाळी मी सोडते निलला शाळेत व जातांना सगळ्यांना टिफिन ने.

जिजू खातील एक दिवस कॅंटीनमध्ये. तू ना नको त्यात गुंतवलस बघ स्वतःला. जरा स्वतःसाठी जग गं.. उगीच बांधून घेतलं स्वतःला... "

चिडून तिने कधीच फोन ठेवला होता.

मेघाने साथ शांत ऐकून घेतले. तिला सकाळची चिडचिड आठवली.

पटकन आवरायला घेतलं. एव्हाना पाच वाजले होते.

निल व रवी घरी येणारच होते.. तिने सगळं पटापटा आवरलं.

मनात ठरवलं जर लवकर सगळं आवरून झालं तर रवीसोबत एखादा तास आईच्या घरीभेट द्यावी.

छोटीलाही बरं वाटेल व आईलाही भेटणं होईल .

तिने स्वयंपाक करायला घेतला निल व रवीही एव्हाना घरी आले होते.

सगळं आवरून झालं होतं.. तिने रवीचा मूड बघितला व हळूच म्हणाली, "अहो स्मिता येतेय आईकडे... जरा आपणही जाऊन यायचं का? आईला बरं नाही. एखादा तास जाऊन येऊ माझी सारीच कामं आवरून झाली आहेत चालेल का तुम्हाला?."


रवी आताही चिडलाच ,"अगं तूझं तूच  ठरवते का?..माझीही कामं असतात ना?? मला फाईल वर्क करायचं आहे. त्यामुळे शक्य नाही ते. काहीही डोक्यात घालून घेते. "

मेघा फक्त ऐकत होती. रवीची बडबड चालूच होती.. मेघा जरा हिरमुसली व शांतपणे किचनमध्ये निघून गेली.

आता तर ती रडवेलीच झाली होती.

घराची जबाबदारी अंगावर घेऊन चूक केली असंच तिला वाटत होतं.

सोबतीच्या मैत्रिणी बिनधास्त सगळीकडे फिरत. स्वत:साठी जगत. कोणाच रोखणं नाही कि टोकणं नाही. 

घरी एक मदतनीस ठेवली कि संपलं. त्यांचे नवरेही काही बोलत नाहीत.

मला तर कोणतीही गोष्ट करताना सतत सगळ्यांचा विचार करावा लागतो. क  गुंतले मी घरामध्ये? कि कुठेतरी माझेच चुकतं?? का असं होतं ?? का समजून घेत नसतील मला हे सगळे? मीही एक व्यक्तीच आहे ना??

विचारांच्या गर्तेत सापडली होती ती..

बघता बघता जेवणाची वेळ झाली.. जेवायला वाढलं ती आवरत बसली तोवर सगळे  झोपलेही.. 

मन सून्न झालं होतं तिचं. जेवणही जाईना.

तसेच दोन घास पोटात लोटले व सारा पसारा आवरून अंथरुणावर पडली.

डोळ्यात थांबवलेले अश्रू आता वाहू लागले होते.

तिच मन म्हणतं होतं..." चुकतयं तुझंच कुठेतरी... तुच अडकलीस ह्या संसारात. जरा हे पाश सोड व जग स्वतःसाठी व तुझ्या आनंदासाठी. येथे सगळ्यांना मुभा आहे आपलं आयुष्य जगण्याची. 

तिने ठरवलं बदलायचं उद्यापासून. पडूयात बाहेर व मनासारखं वागूयात, स्वातंञ व मनमोकळ जगूयात. " ह्याच विचारातच तिचा डोळा कधी लागला कळलंच नाही..

सकाळ झाली तशी रात्रीच्या अंधारात काल घडलेलं सारं गडप झालेलं होतं. 

ती आज पुन्हा नव्याने कामाला लागली होती.

कामात असतांना मध्येच रात्री मनाशी झालेले संवाद आठवले व तिचंच तिला हसू आलं 

"अगं वेडे कधीतरी मनात येतं. पण हे चूकीचं गं. किती छान आहे तुझा संसार , मज्जा करून काय करायचं तुला.

तुझा मुलगा बघ व तुझा नवरा बघ.. निरोगी आहेत छान प्रगती आहे त्यांची. सासूसासरे तुझ्यासोबत आहेत त्यांची आबाळ नाही. त्यांना जपतेस तु गोकुळासारखं घर आहे तुझं.

काहीवेळेस वेड्यासारखा विचार करतेस... नाही जमणार तुला बाकीच्या बायकांसारखं. तू जगतेस हेच योग्य आहे बघ तुझ्यासाठी. रवीलाही कळेल तुझी किंमत. रवीवारी आईकडे नेईल गं रवी .." म्हणत ती कामाला लागली.

चेहऱ्यावर एक छान स्मितहास्य होत मेघाच्या... कारण घर व घरातील माणसं तीला जपायची होती बस.


खरंतर कधी कधी मनात काही गोष्टी येतात. आपण कुठेतरी चुकतो. गृहिणीने घरासाठी वाहुन घेतलेल असतं.

पण त्रागा झाला कि तीला त्यातून मुक्त व्हावसं  वाटतं... ते इतक सोपं नसतं हो...!

कारण मनातून अडकलेला असतो तिचा जीव संसारात. फक्त कल्पनाच असते सगळंं सोडायची पण वेळ आली कि मग पुन्हा कामाला लागते ती. दुसर्‍याची बरोबरी नाही जमत तिला... बरोबर ना?


काय वाटत तुम्हाला?  तुमचंही असंच होत का?.. जरूर कळवा.. तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट बघतेय..


वैशाली देवरे

सदर कथा लेखिका वैशाली देवरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने