वाडा चिरेबंदी

© राखी भावसार भांडेकर





आई - "ऋता , ऋता चल उठ लवकर. किती वेळ झाला बघ जरा. सूर्य डोक्यावर आला आहे."

बाबा - "अगं झोपू दे तिला. एकदा सासरी गेल्यावर उशिरापर्यंत झोपण्याची चैन तिला मिळणार नाही आणि परवडणार तर अजिबातच नाही."

आई - "हो ना! म्हणूनच म्हणते आत्तापासूनच सवय नको का करायला सकाळी लवकर उठायची."

ऋता - "कशाची सवय करायला हवीये मी?"

आई - "अगं सकाळी लवकर उठण्याची."

ऋता - "अगं पण लवकर उठून काय करायचं आहे आई?"

आई - "घर संसार म्हटलं की, पुष्कळ काम असतात आणि तुम्ही आत्ताच्या पोरी नोकरी करणाऱ्या, स्वतःचा व्यवसाय सांभाळणाऱ्या , शिवाय मनाला, शरीराला एकदम स्वस्थ , सॉरी सॉरी 'फिट' ठेवणाऱ्या मग सकाळी लवकर उठण्याची चांगली सवय नको का लावायला?"

तर मंडळी ही आहे ऋता आपल्या कथेची नायिका. ऋता तिचा लहान भाऊ रोहित आणि आई वडील असे हे चौकोनी सुखी कुटुंब. 

ऋताने एम.सी.ए. केलं आहे आणि एका सॉफ्टवेअर कंपनीत तिला नोकरी लागलेली आहे. आणि दोन महिन्यानंतर तिचं लग्न आहे. म्हणून घर संसाराच्या चार गोष्टी सांगण्यासाठी तिच्या आईची धडपड सुरू आहे.

आईच्या या वाक्यावर ऋता थोडासा विचार करते.

ऋता - "पण आई नोकरी-व्यवसाय , शारीरिक- मानसिक स्वास्थ्य यांचा आणि सकाळी लवकर उठण्याचा संबंध येतो कुठे?"

आई -( डोक्यावर हात मारून घेत) अग राणी ! आपले पूर्वज सांगून गेले आहेत 'लवकर निजे ,लवकर उठे, त्याला आयु -आरोग्य लक्ष्मी मिळे'. 

म्हणजे निसर्गनियमानुसार लवकर झोपतो , सूर्योदयापूर्वी उठतो त्याला उत्तम आरोग्य, दीर्घ निरोगी आयुष्य, आणि धनसंपत्ती मिळते. 

म्हणजे असं बघ , रात्री लवकर झोपल्याने पचनक्रिया चांगली राहते. अन्न व्यवस्थित पचलं तर आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत ,आणि डॉक्टरच्या - दवाखान्याच्या , फेऱ्या माराव्या लागत नाहीत. त्यामुळे आपोआपच आपला पैसाही वाचतो होना!

ऋता - "पण आई सकाळी लवकर उठून करायचं काय?"

आई - " हं! छान प्रश्न विचारलास, अगं आमचा काळ वेगळा होता. आम्ही सकाळी उठून घरासमोरच भलंमोठं आंगण झाडुन सडासंमार्जन करून छान रांगोळी काढायचो अंगणात. 

रोज अगदी न चुकता! मग घर स्वच्छ झाडून , पुसून आंघोळ करून ,स्वयंपाकाची तयारी.  तुझ्या बाबांचं ऑफिस असायचं ना! सकाळी साडेनऊला ते घरून निघायचे . 

मग माझ्या संसाराच्या वेलीवर तू आणि रोहित उमललात . मग तुमची शाळा, अभ्यास ,टिफिन , वेगवेगळे छंद वर्ग , खाण्याच्या आधुनिक आवडीनिवडी सर्व करायला लवकर उठावं लागायचं मला.

ऋता - "पण आता अंगण नही नाही रांगोळी पण नाही शिवाय मदतीला मावशीबाई असतातच ना!"

आई - "हो मान्य आहे मला , आता घराच्या सदनिका झाल्या. अंगणाचा चार बाय चार चौरस फुटाचा पोर्च. घरात कामाला बाई पण येते . पण तरीही सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या ऑफिसची वेळ अजूनही तीच आहे. 

शिवाय घरातली इतर कामं म्हणजे तू घरातून नऊ वाजता निघणार तर डब्बा घेऊन, त्यासाठीची तयारी आधी रात्री किंवा सकाळी उठून करावी लागेल ना! 

तुला जर कधी मटकीची उसळ, कधी इडली, डोसा, कधी पावभाजी तर कधी पॅटीस नाष्ट्याला हवं असेल तर तशी तजवीज आधीच करून ठेवावी लागेल हो ना? 

बरं हे झालं खाण्यापिण्याचं पण कधी नोकरीतलं टारगेट पूर्ण करताना दमछाक होते. कधी बॉस चिडतो , तर कधी हाताखालची माणसे सहकार्य करीत नाहीत. 

कधी स्वतःचा परफॉर्मन्स स्वतःलाच डाऊन वाटतो आणि मनस्वास्थ्य हरवतं मग ते टिकवण्यासाठी थोडासा व्यायाम योगा ध्यानधारणा नको का करायला? 

नोकरीच्या धावपळीत सकाळी लवकर उठलीस तर थोडासा निवांत वेळ तुला स्वतःला स्वतःसाठी द्यायला मिळेल.

ऋता - "अय्या खरंच! पण आई एक सांगू का आजकाल सगळं बाजारात मिळतं. मोड आलेली मटकी , ईडली - डोसा मिश्रण, इन्स्टंट ढोकळा पीठ, उपमा पिठ बाजारात सगळं मिळतं."

आई - "हे सगळं जरी बाजारात मिळत असलं ना तरी मायेची उब, आपुलकीचा गारवा आणि निस्वार्थ प्रेम अजूनही नाही मिळत बाजारात बाळा."

बाबा - "अगं किती गप्पा मारणार आहात आज मायलेकी? मला भूक लागली आहे आणि ऋता पणजी आजी चा फोन आला होता. तिने तुला गावाकडं बोलावलंय. एकदा भेटायला ये असं तीन-तीनदा म्हणत होती पणजी आजी."

आई -"अहो दोन महिन्यावर लग्न आलाय तिचं आणि तीला नोकरी लागून सहाच महिने झाले आहे. कसे शक्य आहे गावाकडे जाणं?"

ऋता - "बाबा मला एवढं तरी रजा मिळेल असं वाटत नाही."

बाबा - "अगं दोन महिन्यावर लग्न आलंय म्हणूनच म्हणतोय , नंतर लग्नाच्या तयारीत, धामधुमीत, धावपळीत आपल्याला शक्य होणार नाही गावी जाणं म्हणूनच चार दिवस सुट्टी काढुन एकदा भेटून येऊ ग माझ्या आजीला."

वडिलांच्या आर्जवी विनंती पुढे मायलेकींनी मान झुकवली आणि शनिवारच्या रम्य सकाळी ऋता , रोहित आणि त्याचे आई वडील पणजी आजी च्या गावाला निघाले. 

तीन तासाचा प्रवास करून ते पणजी आजीच्या 'खेड' गावी पोहोचले. गाव आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं कौलारू घरांची जागा आता सिमेंट काँक्रीट आणि स्लॅबच्या घरांनी घेतली होती. 

मातीचे कच्चे रस्ते आता छान डांबरी झाले होते. रस्त्याच्या दोन्ही कडेला पथदिवे ही लावले होते. त्यामुळे 'खेड' हे गाव खेड वाटतच नव्हत. 

काळ्या डांबरी रस्त्यावर वळण-वळण घेत ऋता ची गाडी पणजी आजी च्या मोठ्या चौसोपी वाड्यापर्यंत येऊन पोहोचली. 

पणजी आजी एका बाईसोबत मुख्य दरवाजाच्या जवळ उभी होती. ती बाई पणजी आजीची मदतनीस सुमनबाई होती. सुमनबाई 24तास पणजी आजी सोबतच त्या वाड्यात राही.

ऋता , रोहित , आई-बाबा त्या भक्कम चिरेबंदी आयताकार वाड्याला डोळ्यात सामावून घेत होते. 

त्या वाड्याला चौफेर तटबंदी होती आणि तटबंदीला साजेसा तेवढाच भक्कम अस्सल सागवानी व पितळी कड्यांचा दहा-पंधरा फूट उंचीचा नक्षीदार दरवाजा. त्यातूनच उघडणारा एक छोटा दरवाजा. 

थोडे चालून आत गेल्यावर वाड्याची दुमजली मुख्य इमारत होती.लाकडी तुळया, महिरपी, प्रत्येक खांबावर कोरलेला देखणा मोर - लाकडी कमळ चोचीत धरलेला. 

सज्जे खिडक्या चौकटी वर असणारी लाकडात कोरलेली वेल डोळ्याचं पारणं फेडत होती.

मुख्य इमारतीत आत प्रवेश केल्यावर असणारा भव्यदिव्य चौक उभ्या खांबाची रचना असणारा. त्या चौकातच एक छान सुंदर रेखीव तुळशी वृंदावन होते. 

पुढे दगडी पायऱ्या चालून गेल्यावर एका क्रमाने असणार दिवाणखाना , माजघर , भांडार गृह , स्वयंपाक घर , देवघर व लाकडी जिना खाली असणारी एका कोपर्‍यातली बाळंतिणीची खोली.

वाड्याचं हे भक्कम भारदस्त परंतु तेवढेच देखणे रूप सगळेजण डोळ्यात सामावून घेत होते. सुमन बाईंनी सगळ्यांना गूळ पाणी दिलं आणि जेवणाच्या तयारी करता त्या स्वयंपाक घरात निघून गेल्या.

आधी ऋताच्या बाबांनी आणि मग क्रमाने तिच्या आईने, ऋताने आणि रोहित ने पणजी आजीला नमस्कार केला. 

आपल्या सुरकुतल्या थरथरत्या खरबरीत हात पणजीने ऋताच्या चेहऱ्यावरून, गालावरून फिरवला आणि डोळ्यातून दोन टपोरे थेंब तिच्या गोर्‍या गालांवर ओघळले.

माजघरात पानं वाढली गेली. ऋताच्या ताटाभोवती सुंदर रांगोळी काढली होती. उदबत्त्यांचा घमघमाट वातावरण प्रसन्न करीत होता. 

काळ्या शिसवी पाटावर चांदीच्या ताटात पुरणपोळी, भरल्या वांग्याची भाजी ,ओल्या डाळीची कैरी घालून केलेली चटणी ,कुरडई ,पापड ,सांडळ्या आणि चांदीच्या वाटीत आंब्याचा रस आणि शेवयांची खीर असा सगळा जेवणाचा मेनू होता. 

पाटाच्या बाजुला चांदीच्या बुधलीत साजूक तूप, आणि ऋताला बसायला खास चंदनी पाट असा सगळा थाट होता. सुमन बाईंनी ऋताला चांदीच्या करंड्यातलं हळदी कुंकू आणि अत्तर लावलं. 

अस्सल चांदीची जर असलेली डाळिंबी पैठणी, चांदीचा करंडा आणि गर्भरेशमी खणाने ऋताची ओटी भरली. ऋताने सुमन बाईंना वाकून नमस्कार केला.

पणजी -"ऋता तू आमच्या घराण्याची पाचवी पिढी म्हणून हा जाधव यांचा वारसा तुझ्याकडे सोपवते. मला माहिती आहे आजकालच्या आधुनिक काळात तुलाही पैठणी नेसायची फारशी संधी मिळणार नाही पण तरीही आता तू गृहस्थाश्रमात प्रवेश करणार म्हणून हा वारसा तुला देते आहे. 

अगं लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्ती , दोन कुटुंब किंवा दोन संस्कृतींचे एकत्र येणे नव्हे. तर दोन सक्षम स्त्री-पुरुषाने एकत्र येऊन, समस्त मानव जातीसाठी आणि सृष्टीतील चराचरांसाठी एकत्र येऊन त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं.

विटा दगडांच्या चार भिंतींना आणि त्यावर असलेल्या छपराला घरपण देण्याचं काम एक स्त्रीच करू शकते.

दिवाणखाना म्हणजे घराण्याची अदब ती तूच राखायची आहेस. 

कधी आश्रयाला आलेल्या किंवा कधी केवळ भिक्षा मागणाऱ्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नको. 

संसारातल्या कुरबुरी लहान-मोठी चहाच्या कपातली वादळं माजघरातल्या आत्या, मावश्या, काकीं सांगून मन हलकं करावं. 

बाळा तुझं मन औदार्यानं भरलं असेल तर तुझं भांडार घरही कधी रिकामा नाही राहणार. 

परसदारी चार -दोन फुलझाडाची तजवीज करावी देवघरातल्या देवाला तीच फुलं जास्त आवडतात बरं ! लग्न झाल्यावर अन्नपूर्णेचा वसा घेऊन सासरच्या स्वयंपाक घरात पाऊल टाक आणि दोन्ही कुटुंबाचं नाव मोठा कर मी माझ्या मनापासून तुला आनंदी गोकुळ आणि उदंड , अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते.


जेवण झाल्यावर सगळ्यांनी आराम केला. सायंकाळी पणजी आजीने ऋताच्या आईला अंजिरी रंगाची छान काठपदराची साडी दिली. 

ऋताच्या बाबांना कोसा सिल्क चा कुर्ता आणि सुती मलमल चा पायजमा दिला. रोहितला सोन्याची अंगठी.


सकाळी सगळेजण चहापाणी आटपुन परतीच्या प्रवासाला निघाले. पण पणजी आजीने सांगितलेलं गृहस्थाश्रमाचा रहस्य ऋतानं मनात अगदी छान सामावून घेतलं होतं.


© राखी भावसार भांडेकर


सदर कथा लेखिका राखी भावसार भांडेकर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने