सावट

 ©® मृणाल शामराज


गुलमोहर.... ती  टुमदार  छोटीशी बंगली... लाल चुटुक कौलांनी नटलेली..हिरव्या गार झाडीत विसावलेली... शहराच्या एका कडेला.. जुन्या संस्कृतीची नाळ जपत.. नव्याची कास धरत.. बांधलेलं हॆ घरकुल... 

वास्तुविशारद  साकार आणि सायली  यांच.. सुबक.. आणि सुंदर.. आटोपशीर.. इथं आलं की मन कसं सहज विसावे.. आत जाताना मनावर कसलाही ताण नसे.

घरासारखे त्याचे मालक, मालकीण... की ह्या दोघांसारखं हॆ घरं  हा प्रश्न पडावा इतकं हयांच्या गुणधर्मात  सारखेपणा.. सतत माणसाचा राबता.. हसतं, नांदतं घरं.. आणि स्वागताला दारातला गुलमोहर... सतत गच्च भरलेला.. हिरवागार..

सलोनी त्यांची एकुलती एक मुलगी.. बारावीत असणारी.. आणि पूर्ती.. पुतणी..नोकरी करणारी... साकारच्या मोठ्या भावाची मुलगी... साकारची खूप लाडकी.. इथे नोकरी लागली.. बाहेर कुठं राहू नकॊ म्हणून सायलीने इथंच  ठेवून घेतलेली...

सायली नावाप्रमाणे  नाजूक, प्रेमळ हळवी.. स्वतःच्या संसारात रमणारी.. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास असणारी..

साकार त्याच्या व्यापात गर्क.. त्यामुळे घरं.. सणवार, आलं गेलं, सलोनीला वाढवणं सगळं तिनं स्वतःवर ओढवून घेतलं होतं.. पण त्यातही तिला आनंद वाटायचा.. 

मोठे दीर, जाऊ यांना तीचं कोण कौतुक.. आई, वडीलचं वाटायचे ते तिला.. आणि पूर्ती.. ती तर जणू मैत्रीणच.. सलोनी तशी लहानच हॊती.. पण या दोघींचं खूप पटायचं.

दिवस कसे छान चालले होते..

साकार आताशा जास्तच व्यस्त असे. सतत येणारे फोन.. उशिरा पर्यंत  लॅपटॉप वर काम.. मग या तिघींच गप्पा मारत बसत.. बाहेर जात.

"काकू.. अगं थोडं बोलायचंय." एक दिवस ऑफिस मधून आल्यावर पूर्ती म्हणाली.

"काय ग? काय विशेष? परवानगी मागते आहेस ती! "

"बागेत जावू यात का काकू?" 

"हो, चालेल. दमून आलीस थोडं खा.. तुझी कॉफी ठेवलीय. ते घे बघू आधी."

सायली बघत हॊती. आज हीच काही लक्ष दिसतं नाही आहे. 

काय बरं झालं असेल?

दोघीही बागेत येऊन झोक्यावर बसल्या.

"अगं बोलणार होतीस ना.. बोल ना काही तरी..."

"काकू, आज बाबांचा फोन आला होता.."

"बरं मग?"

"त्यांनी एक स्थळ  आणलंय.."

"अगं, मग विचार करण्यासारखं काय आहे त्यात?? आता बघणारंच ना.. शिक्षण झालं.. चांगली नोकरी आहे.."

"काकू.". पूर्तीने अवंढा  गिळला.

"का ग? कुणी शोधला आहेस का ?"

"नाही.. म्हणजे हो... माझ्या ऑफिस मधे आहे तो.. पवन सिन्हा."..ती चाचरतच  म्हणाली.

"किती दिवसापासून चालू आहे हॆ..?"

"नाही ग.. तसं काही.. मला तो खूप आवडलाय.. देखणा आणि हुशार.."

"आणि त्याला?"

"हो काकू.. मी आवडते त्याला.. पण आई, बाबा.."

"बघुयात.. मी बोलते साकारशी..तोपर्यंत कुठलाही टोकाचा निर्णय घेवू नकोस.."

रात्री ती साकारशी  बोलली. 

मुळात तिला तो कसा रिऍक्ट होईल ह्याची जास्त काळजी हॊती दादा, वहिनीपेक्षा. त्याची मत जुन्या वळणाची हॊती.

पण त्यानी हॆ खूपच सहज घेतलं..

"आता काळ बदलला आहे. प्रत्येकाला स्वतःच मत असतं. काय गैर  आहे.?" 

ती आवाक झाली. आपल्यावर रूढी, परंपरा लादणारा हाच का हा साकार! 

"अगं तुला माहिती नसेल पण आता मुलं मुली लिव्ह इन रिलेशन्सशीप  मधे राहतात.. लग्न ही जुनी संकल्पना झाली..अगदी सहज बोलत होता तो."

"साकार.. तु बोलतो आहेस हॆ? म्हणजे लग्न.. ते अजन्म बंधन.."

"झूट आहे ते.. माणसाने कसं मुक्त जगावं.. हवं तसं..असू दे नंतर या विषयावर बोलू..आपण  त्या पवनला भेटू," 

पवनच्या घरी  साकार आणि सावनी जावून भेटले.. चांगल्या  घरातला मुलगा होता. हुशार, चटपटीत... आई आणि तो राहायचा. त्याच्या बोलण्यातून पुढे जायची धडाडी  दिसतं हॊती.आई पण प्रेमळ वाटली. तसं नाकारण्यासारखं काहीही नव्हतं. पण आता दादा, वहिनी.. कसं रिऍक्ट करतील..

"काकू... आता कसं.. बाबा.."

"धीर धर बघू आपण.."

आणि एक दिवस काहीतरी निमित्त काढून तिनं दादा, वहिनींना बोलवून घेतलं. इकडंच्या, तिकडच्या गप्पा झाल्यावर तिनं हा विषय काढला.

दादा खूपच चिडले. पूर्ती घाबरून रडू लागली. सायलीनी त्यांना शांत होऊ दिलं. 

नंतर सगळ्या  चांगल्या, वाईट बाजू मांडल्या.. फक्त जात वेगळी आहे म्हणून नाही म्हणणं कसं चुकीचं आहे हॆ त्यांना समजावले. 

हो, नाही करत दादा त्याला भेटायला तयार  झाले आणि त्यांना तो आवडला. आपल्या मुलीचा निर्णय चुकीचा नाही. हॆ त्यांना पटले. लग्नाची तयारी सुरु झाली. 

पूर्ती इथं राहत हॊती म्हणून हेच लग्न घरं झालं. तिघीही शॉपिंग मधे दंग. 

साकारला म्हटलं तर कामाचं कारण सांगून तो टाळे. त्याला फोन लावावा तर सतत एंगेज.. त्याला कशात इंटरेस्ट दिसतं नव्हता. 

एकदा पूर्ती म्हणाली सुद्धा.. "काय रे काका..सतत कुणाशी बोलत असतो..?"

तो एक क्षण चपापला, "काही नाही ग क्लायन्ट्स.."

सायलीलाही जाणवत होतं.. ह्याला आताशा घरात काही इंटरेस्ट वाटतं नाहीये.

लग्न छान थाटात साजरं झालं. पूर्ती सायलीच्या गळ्यात पडून खूप रडली.. सायलीला पण तिची मैत्रीण दुर जाणार ह्याच दुःख होतं होतं.

आता सायली खूपच रिकामी झाली. सलोनी तिच्या अभ्यासात मग्न.. साकार कामात..

एके दिवशी एक फोन आला. साकार कामात होता तो पटकन उठून गाडी घेवून बाहेर गेला. सायलीला हॆ काहीतरी वेगळंच  आहे जाणवलं.

तिनं आल्यावर विचारलं तर त्यानं उडवाउडवीची  उत्तर दिली. 

आता मात्र त्याच्या फोन वर ती लक्ष  ठेवू  लागली. एकदा दोन तिनं मिसकॉल  दिसले म्हणून तिनं त्याच्या फोन वरून त्या नंबर वर फोन केला.

तो एका बाईंनी उचलला.. "हॅल्लो.." तिचा लाडीक आवाज आला.

"कोण बोलतंय.?"

ती दचकली.

"साहेब, आहेत का? काम होतं."

"कोण आहात तुम्ही? सारखा का फोन करता?? असं काय काम आहे??"

तिनं पटकन फोन ठेवून दिला..

येतायेता त्यानं हॆ ऐकलं होतं. त्याच्या घशाला कोरड पडली..

"काय आहे हॆ?  का येतात तुम्हाला या नंबर वरून सारखे फोन..?" 

तीच ते उग्र रूपं पाहून तो घाबरला.. आता सांगावंच लागेल..

"केव्हापासून चाललंय हॆ?"

"पाच. सहा  वर्षे झाली.."

"कोण आहे ही?"

"आहे एक विधवा.. एक अपंग मुलगा आहे तिला.."

"काय सुचलं तुम्हाला हॆ या वयात?"

"वयाच काय.. तु ही अशी.. ती बघ कशी राहते.. सतत हसत असते.. तुला कशात ही इंटरेस्ट नाही..सतत कामात.. म्हाताऱ्यासारखी वागतेस.."

"अरे, लग्नाला इतकी वर्षे झाली.. घरात तरुण मुली आहेत .. तिच्या बोलण्यावरून तरी ती काही चांगल्या घरातली दिसत नाहीये.."

"काय करायचं चांगल्या घरातली.. बाई आहे ती..कशी टवटवीत.. रसरशीत.."

सायली धाय  मोकलून रडू लागली. पूर्ण कोलमडून  गेली हॊती ती..

साकार.. किती साधा, सज्जनं वाटतं होता आपल्याला.. आणि इतरांना.. केवढा विश्वास होता आपला त्याच्यावर..

आता काय..

सगळं घरं गरगर फिरू लागलं तिच्या भोवती..

घरात ताणलेल वातावरण असायचं सतत.. तो दिसला की ती बेफाम व्हायची. संतापायची, चिडायची..

त्याच्यावर कसलाच परिणाम दिसतं नव्हता.. जणू हॆ काही गैर नव्हतच 

त्याच्यासाठी.. सलोनीनी तर  त्याच्याशी बोलणंच टाकलं. आपल्या खोलीत ती बंद बसून राहायची..

 रात्रं रात्रं  ती नुसती बसून असायची. भविष्याची काळजी तिला भेडसावत  हॊती. मधेच ती  दचकायची.. घामानी गच्च  भिजायची..तो गाढ झोपलेला असायचा.. 

आपल्या भोळ्या स्वभावाचा तिला राग येतं होता.. इतका का आपला चांगुलपणावर विश्वास.. किती चांगला वागायचा  हा.. इतकं खोटं कसं वागू शकतो..

येवढाच माझ्याशी प्रॉब्लेम होता तर कायदेशीर वेगळं व्हायचं.. असं वागणं.. कसं सहन करू.. ही फसवणूक.. वेगळं होऊ का.. आणि सलोनी .. तीच काय.. ती सहन करू शकेल का हॆ.. आणि तीच भविष्य काय.. तीच डोकं आता विचार करून  फुटेल की काय असं वाटतं होतं..

मधेच त्याला जाग आली तर तो म्हणायचा, "झोप.. उगीचच का जागते.."

इतकं सहज असतं का हॆ सगळं.. कसं समजावून सांगू.. काय करू.

एक दिवस पूर्ती अचानकच घरी आली..भेदरलेली..

"काकू..."

"काय ग.. अशी अचानक.. बरी आहेस ना? सगळं ठीक आहे ना?"

"हो ग, पण तु का अशी दिसते आहेस?"

डोळयांतलं पाणी लपवत ती म्हणाली, 'काही नाही ग डोकं दुखतंय.."

"काकू "ती अडखळली.."काकू.."

"अगं बोल ना.."

"कसं सांगू?"

"बोल ना.."

"अगं आज दुपारी.. काका दिसला.. एका बाईबरोबर..."

सायलीचे डोळे विसफ़ारले.. आता काय ऐकू येईल..

जोरात किंचाळत  हॊती ती.. काका तिची समजूत घालत होता.. अतिशय असभ्य हॊती ती..

आता सायलीचा धीर खचला. ती तिच्या गळ्यात पडून रडत हॊती..

इतके दिवस बांधून ठेवलेलं तिचं अवसान सुटलं. ती हमसून हमसून रडू लागली. तिचं सगळं अंग गदगदत  होतं. चेहरा विलक्षण अश्या वेदनेने ग्रासला होता..

"पूर्ती..."

"काकू... तुला माहिती होतं हॆ?"

तिनं होकार्थी मान हलवली...

"काका.. माझा.. असं कसं वागू शकतो?"

"माझा तर किती विश्वास होता त्याच्यावर... किती सज्जन नवरा आहे माझा.. ह्या भरवश्यावर होते... काय करू? कशी बाहेर पडू?"

"आई, बाबांशी माझ्या, बोललीस का?"

"अगं, काय करू सांगून?? साकार ऐकायच्या मनस्थितीतचं नाही.. आपले प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात..."

पूर्ती निरखून बघत हॊती. सायलीचे कपडे चूरगळले होते... कपड्याच्या रंगसंगतीच गणित चुकलं होतं.. कसे तरी बांधून ठेवलेले केस तिची विस्कटलेली मनस्थिती  दाखवत होते.. ते व्यथित डोळे.. घट्ट बंद करून घेतलेल्या मुठी... नेहमीची हसतमुख, टापटीप असणारी काकू कुठे माझी...

"काकू.. काय करूयात?"

"कसलं ग काय.. आणि तु अचानक.. What a pleasant surprise..."साकार आत येतं म्हणाला..

कोणी काही बोललं नाही. सायलीचा चेहरा.. भरलेले डोळे बघून काय घडलं असेल ह्याचा त्याला अंदाज आला. तो आत जायला निघाला..

"काका, थांब..बोलायचं तुझ्याशी..कोण हॊती ती?? पाहिलं मी तुम्हाला.."

साकार चपापला ..

"किती दिवस चाललंय हॆ?"

"तसं काही नाही.. फक्त मैत्री आहे..."

"काका.. मी पाहिलंय...तु विचार केलास का काही... ह्या वयात.. आपलं घरं.. मी, सलोनी.. आमचं आयुष्य.. सगळे काय म्हणतील.??".

"त्याची कोण पर्वा करतंय.. लोंकाशी  काय करायचं मला !"

"अरे पण आम्ही दोघी... काका, बाबांपेक्षा तु जवळचा आहे मला.. तुटून गेले रे मी.. स्वप्नात सुद्धा असं काही करशील असं वाटलं नव्हतं. काय करायचं आम्ही..."

तिचा चेहऱ्याकडे बघायचं धैर्य त्याच्यात नव्हतं. नुसता बसून होता तो..

"काका.. उत्तर दे..असं काय झालं?"

"तुझ्या काकूंत आता काही चार्म राहिला नाही आता.."

सायलीनी चमकून पाहिलं..

"म्हणून हॆ असं??असं, होतं तर आधीच सांगायचं आपण वेगळं राहिलो असतो.अजून वेळ गेली नाहीये.. आपण वेगळं होऊ या.." सायली ठामपणे म्हणाली.

तिच्या अगतिकतेला आता निर्धाराच बळ आलं होतं.

साकारला हॆ अनपेक्षित होतं.

"अगं.. पूर्तीच्या सासरी काय म्हणतील?? सलोनीच लग्न व्हायचंय.".

"अरे.. हा विचार तु पूर्वी करायचा  होता.."

आता मात्र त्यांच धाबं दणाणलं होतं. ह्या कारणामुळे सायली आपल्याला सोडून जाणार नाही.. तिचे हात दगडाखाली आहेत, असं त्यानं गृहित  धरलं  होतं..आणि आता ती म्हणतेय सोडून जाते..त्याच्या मनात वादळ उठलं.

"चुकलं माझं.. मी आता नाही तसं वागणार.. खरं  अगदी शप्पथ."

खूप वेळ त्याला समजावून पूर्ती घरी गेली.

साकार.. आडवा  पडून आठवत होता..

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट.. सायली.. नाजूकशी.. हळवी..आदर्श बायको.. पण आताशा पूर्ती.. सलोनीत रमलेली.. तीच जगच वेगळं.. तिला आपलं जवळ येणं फारसं आवडत नाहीये..हल्ली खूप बेचैन असायचा तो.. कुणी छान समोर दिसली की तो सैरभैर व्हायचा.. अशातच रीमा  त्याच्या आयुष्यात आली... काहीतरी काम घेवून.. 

दिसायला तशी सुमार.. पण भरदार अंगयष्टी.. रसरशीत.. आणि बोल्ड... खळखळून हसणारी.. आपल्या विभ्रमानी आपल्यावर  नजर खिळवून  ठेवणारी.. आपल्या या सगळ्या गुणांना प्लस पॉईंट करत आपलं काम करून घेणारी.. तिला साकारचा अंदाज आला..

हा साधा, सरळ.. डोळ्यात अस्थिरता ..ह्याला गटवणं  सोपं आहे.. तिची खेळी सुरु झाली..

साकार.. वेडावला.. तिची झिरझिरीत वस्त्र.. डोळ्यात डोळे घालून बोलणं.. सतत मोहक हसणं..

तासनतास  ती येऊन बसू लागली. तिच्या भ्रमरी  अदा ह्याला वेडं लावू लागल्या.. पेन हातात देताना दिलेला हात हातात किती वेळ तसाच  राहू लागला..

त्याला आता तिच्या शिवाय काही सुचेना.. सतत फोन वर गप्पा. रात्री फोनवर तिचे  फोटो बघत राहणं... सायली आणि मुली तर कामात दंग.. त्यांना वाटायचं ह्याला कामाचा लोड आहे.. 

पूर्णपणे खुळावून गेला तो रीमा मधे... ती यायची... आपण विधवा आहोत ह्याची सहानभूती मिळवायची.. ह्याला ही बरं वाटलं  आता हिला पटवणं सोपं झालं.

त्यानं सायलीचे वीक पॉईंट तिला सांगितले.. सॉफ्ट कॉर्नर मिळवण्यासाठी.. आणि रीमा..

ती तर आता खूप खूष झाली. मोठा मासा अनायसे जाळ्यात सापडला..

लाईफ बन  गई  यार.. तिनं तिच्या मित्राला कळवलं.

साकार तर वेडा झाला होता तिच्या साठी..

पूर्तीचं लग्न थाटात पार पडलं.. कुणालाही काही लक्षात आलं नाही.

असेच पुढचे दोन महिने गेले.  अन ज्या सतत येणाऱ्या मिसकॉल ने सायलीला सारं कळलं होतं.. त्या दिवसापासून  चैन नव्हतं तिला. आयुष्यतल्या या खाच खळग्यांनी भरलेल्या वाटेतून मार्ग कसा काढायचा.. ती बेचैन हॊती.. कामात लक्षच नव्हतं तीच..

पूर्ती येऊन गेली हॊती. नुकतीच.. सुन्न होऊन साकार सोफ्यावर बसला होता... नुकतच रीमाशी झालेलं बोलणं आठवत.. आता ती लग्न करा म्हणून मागे लागलीये.. 

मूर्ख.. मी आणि लग्न... एवढा  सुखात चाललेला संसार सोडून.. वाटलं थोडी मजा करून बघू.. ती विधवा... तिला ही गरज असेल..

समोर भकास नजरेनी गुलमोहर न्याहाळणाऱ्या सायलीकडे त्याचं लक्ष  गेलं.. किती सुकली ही दोन महिन्यात..

हीच हॆ अबोल राहणं छळतंय  मला... हिच्या शिवाय राहायचं... कसला मोह पडला मला.. मी असं वाहवत  चाललोय.. वेड्या आकर्षणापायी..  मी रीमाचा सोईचा आसरा घेतला.. 

ह्या आकर्षणाला मर्यादा घालायची प्रगल्भता  माझ्या मधे असू नये का.. माझ्या या वागण्यानी सायली, सलोनी उध्वस्त झाल्यात.. इतक्या वर्षातली उत्कटता अशी सहज विरून चालली आहे..

स्वप्न आणि सत्य ह्यात असणारा फरक मी कसा विसरलो..ते ही त्या तसल्या बाई साठी... पैश्यासाठी मागे लागली माझ्या..

सायली एकटक त्या झाडाकडे बघत हॊती.. इतकी वर्षे बघतेय.. इथे आलो तेव्हा हॆ फुलांनी भरलेलं झाडं बघून आपण दोघांनीही गुलमोहर घराच नाव ठरवलं.. आपलंही घरं असंच बहरलेलं रहावं म्हणून... काय झालं हॆ.. अनपेक्षित.. 

सहजीवन असं असतं का.. कुठे चुकले मी.. त्याला जाणवली असेल काही रिक्तता.. उणेपणा  माझ्यात.. पण हा काही पर्याय नव्हता न.. मी आपणहून बाजूला झाले असते.. पण ही प्रतरणा.. इतके वर्षाचा संसार असा मोडून पडलाय.. माझं खेळणं केलं यानी.. गरज हॊती तोपर्यंत वापरलं नी आता..

तीच डोकं विचारांनी फुटून जाईल का असं वाटतं होतं तिला..

आणि सलोनी... ती तर  सैरभैर झाली हॊती..सतत असुरक्षितता.. घरातलं दाटलेलं वातावरण.. आईचे भेदरलेले डोळे.. 

बाबा, जीव की प्राण होता आपला.. पूर्तीताई तुझी लाडकी असं म्हटलं तर तुचं माझं पिल्लू ग.. म्हणून प्रेमानी जवळ घ्यायचा.. आजारी पडले की रात्रं रात्रं जागायचा.. सतत हसवायचा..  

माझा बाबा..तो आता दुसऱ्या कुणाचा.. नाही मला हॆ सहन होतं नाहीये.. या खोलीबाहेर जावं वाटतं नाहीये..

सगळीकडे सन्नाटा... तासनतास... हा प्रश्न सुटेल कसा..

साकार उठला.. सायली जवळ गेला..

सायली.. ती स्तब्ध...

"सायली.."त्यानी तिला हलवलं.. "सायली.. काय अवस्था करून घेतलीस स्वतःची?"

"अं.. काय.. सायली दचकली."

"चुकलं ग माझं." त्याचा बांध  सुटला.

तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडू लागला.

"साकार.. बस  झाली नाटकं.. इतकं झालं ते पुरे नाही का?"

"खरं सांगतोय ग, मी वाहावलो पण माझ्या मनात असं काही नव्हतं".

"मग हॆ सगळं काय?"

"मी गंमत करत होतो.."

"गंमत अशी.. कुणाशी.. माझ्याशी.. की तिच्याशी?"

"तिच्याशी.. मैत्री हॊती फक्त आमच्यात.."

"मैत्री.. अशी.. लपून..का फसवणूक? इतकं आकर्षण.. ह्या वयात!"

"नाही ग.. तुला वाटतं तस  काही नाही.. मी वाहवलो खरा.. इतकी वर्षे.. फक्त मैत्री.. खरं सांगू, तिनं मला नादावलं.. खेळवत ठेवलं.. तिला पैसे हवे  होते..लग्न करायचं होतं माझ्याशी.."

"मग.. कर ना.. तुला त्यात आनंद आहे ना.. आपण वेगळं होऊ यात. हॆ मी नक्की ठरवलंय."

"नाही.. नाही.. नकॊ ग.. तुमच्या दोघींशिवाय मला कुणी नाही.. खरं परमेश्वरा शप्पथ..आज आमचं खूप भांडण झालं.. मी सगळं सोडून आलोय. माझी चूक मला कळली आहे.."

"साकार.. घरं.. हॆ तडजोडीतूनच उभं राहतं. इथं परिपूर्ण कुणीच नसतं. कुठलाही निर्णय आपल्याला टोकावर जावून घेता येतं नाही. वेड्या हट्टपायी स्वतःबरोबर अजूनही घरातल्या सगळ्यांची आयुष्य पणाला लावतो आपण.. नाहीरे.. एकदा हा डाव विसकटला की विसकटला.."

"नाहीं ग  नकॊ ना.. माझ्या वेडेपणाचं  उत्तर तु ही असं वेडेपणाने देतेस का.."

"मला वेळ दे थोडा साकार.. खूप विस्कटलेय मी.. उदया सकाळी बोलू.. एकटं सोड मला..."

किती तरी वेळ ती अशीच बसून हॊती.. घड्याळाच्या फिरणाऱ्या काट्याबरोबर तिचे विचार फिरत होते.. हलणारा लोलक  हो.. नाहीत.. हेंदकाळत  होता.. त्या निःशब्द वातावरणात तो नाजूकसा आवाज पण खूप मोठा वाटतं होता..

काय करू.. चुका दोघांच्याही झाल्यात.. दोन पाऊल मागं जायचं का.. कदाचित ही घेतलेली माघार शहाणपणाची ठरेल..

ती उठली.. सलोनीच्या खोलीत डोकावली.. Light चालू होता.. सगळं अंग आक्रसून ती पलंगाच्या कोपऱ्यात झोपली हॊती..

सायलीनी तिला सरळ केलं. अंगावर पांघरूण घातलं. आणि जवळ घेतलं.

झोपतेच तिनं आईचा हात घट्ट धरून ठेवला..

"बाळा.. मी आहे.. खंबीर.. तुझ्या जवळ.. तुझ्यासाठी.."

खळकन  ओघळलेले तिचे आसू सलोनीच्या गालावर पडले..

ती झोपेतच पुटपुटली.. "आई."

"झोप बाळा.. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हॆ असतंच.. फक्त शोधावं लागतं"

ती आली. काहीतरी ठरवूनच..

त्या रात्री तिला शांत झोप लागली..

"सायली... बोल ना.. काहीतरी.. सांगणार होतीस ना तु सकाळी.. दुपार होतं आली.. तुझं असं कोरडं वागणं सलतंय गं मला.."

"साकार.. मी बोलतेय ते लक्ष देऊन ऐक.  आनंदाच्या अनावर क्षणी आपण किती गाफील असतो. पण आयुष्य हा जुगार नाही .. नाही जमला डाव तर.. परत खेळू.. आता हरलोय.. नंतर जिंकू.. घर पणाला लागतं रे सारं.. 

नाही म्हटलं तरी इतकी वर्षे आपण न कळत  गुंततो एकमेकात..मान्य आहे की मन वेडेपणा करत कधीतरी.. पण उधळून देण्याइतकी आयुष्य स्वस्त नाही आहेत रे.. चांगुलपणावरचा विश्वास उडतो मग..नात्यांची खरी ओळख सहजीवनात होते..पण त्यासाठी नातं निकोप लागतं..."

"नाही गं.. खरंच नाही.. कळलीये चूक मला.. एक संधी दे मला प्लीज..."

"हो.. मला ती दयावीच  लागणारं आहे.. ह्या घरासाठी.. सलोनीसाठी.. ठेचं लागली म्हणून चालणं थांबवता येतं नाही ना.. नियती प्रत्येकाला एक संधी देते. बघू या हा ही डाव खेळून. अपेक्षा करते की परत असं होणार नाही."

सायली... पुढे निःशब्दता..

आणि सायली... उत्तर शोधतेय..

हॆ सगळं  खरंच संपलंय का.. परत अविश्वासाच्या अंधाऱ्या बोगद्यात आपण दूरवर तर फेकले जाणार नाही..ह्या तडजोडीनं तुटलेलं घरं परत अभंग राहिलं ना..

दारातला गुलमोहर मंद सळसळतोय.. होकारार्थी.. नकारार्थी... च्या  डहाळीवर... उत्तर शोधतोय तो ही ह्या प्रश्नाचं...

समाप्त

©® मृणाल शामराज

सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा

प्राक्तन

हिस्सा

छबी

         

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने