अतुट बंधन

© मृणाल शामराज


रात्र चढत हॊती. यशोदा  बाहेरच्या व्हरांड्यातून रस्ता न्याहाळत हॊती. रुंद वळणे घेतं, तो अजगरासारखा सुस्त पसरला होता.

वाहनांची वर्दळ आता रोडावलेली.. मधूनच एखादं वाहन भरधाव  जाई तेवढाच आवाज.. बाकी शांतता..

नाही म्हणायला एखादं कुत्रं मधेच भुंके.

'किती उशीर झालाय! काय करावं या मुलीला, तरणीताठी  पोरं ही, वेळेच भान ठेवावं थोडंतरी.
लाडवून ठेवलंय बाबांनी तिच्या. घोर लावलाय जीवाला माझ्या.' यशोदा म्हणत हॊती, ते खरंच होतं.

रमेश,यशोदाची ही एकुलती एक मुलगी. स्वाती. लग्नानंतर बरेच वर्षांनी झालेली. देखणी, आणि हुशार..

रमेश सरकारी नोकरीत.. उच्च पदाधिकारी. त्यामुळे पैशाची काय,कसलीच कमतरता  नव्हती तिला.

हम करे  सो कायदा. तशी मनानी  चांगली हॊती ती. पण कमालीची हट्टी आणि हेकट. यशोदा, रमेश वर चिडायची. किती लाड करता हिचे, काही शिस्त, वळणं नकॊ का? उद्या दुसऱ्या घरी जायची आहे.

अगं, अंगावर पडलं  की होईल सगळं नीट. हेच वय आहे मजा करायचं,करू दे.

तिला हॆ बोलणं सगळं आठवत होतं.

तिनं आत डोकवून पाहिलं. हॉल रिकामा होता. हॆ गेले वाटतं झोपायला. लेक अजून आली नाही, झोप कशी येतें ह्यांना काय माहिती? वैतागून ती पुटपुटली.

सव्वा बारा झाले. ही मुलगी फोन ही उचलत नाही. काय करू आता? ती विचारात पडली.

"मामी, हॆ काय तुअजून जागीच का ?"

"अरे.. बघ ना स्वाती अजून आलीच नाही."

त्यानं घड्याळात बघितलं. "बरेच वाजलेत की. कुठे गेली हॊती? काही सांगितलं का तिनं?"

"अरे, चार चौकात तिची मैत्रीण राहते. तिच्याकडे जाणार हॊती."

"बघून येतों मी तिला" तो निघाला.

"सोहम गाडी घेवून जा.. तिथे किल्ली आहे ऍक्टिवाची."

"बरं. येतों जावून." तो वळला.

किती उंचापुरा आहे हा. वागणं, बोलणं तर किती मर्यादशीर.

सोहम, रमेशच्या बहिणीचा मुलगा. बहीण एका लहान गावात राहायची. हा पुढील शिक्षणासाठी इथे येऊन राहिला होता.

बाबा, कशाला ठेवून घेतलंत  याला? खेडवळ  कुठला.

स्वाती, असं बोलू नये. थोडेच दिवसाचा तर प्रश्न आहे.

स्वाती तोंड वाकडं करून तिथून निघून गेली.

सोहम राहिला तिथे. पण त्याचा काही त्रास नव्हता. जमेल तेवढी मदत तो सगळ्यांना करायचा. आपलं काम झालं की आपल्या खोलीत जावून बसायचा. रात्री जेवायला सगळे एकत्र बसायचे.

त्या दिवशी यशोदानी कटलेट केले होते.

"हयाला काय म्हणतात? खूप छान झालेत."

"सोहम, पोटभर खा, आवडले ना ? हयाला कटलेट म्हणतात."

"अरे, तुला हॆ ही माहिती नाही? साहजिक आहे खेड्यात असं थोडीच मिळतं."

"स्वाती.. जेव पुढं बघून." सोहमचा पडलेला चेहरा बघून यशोदा म्हणाली.

एक दिवस रात्री सोहम अभ्यास करत बसला होता. स्वाती तिकडे आली. लाईट बंद करत म्हणाली, सकाळी अभ्यास कर. बिल येतं एवढालं. त्याला कमीपणा दाखवायची एकही संधी ती सोडत नसे.

एक दिवस तिच्या मैत्रिणीचा फोन चालू होता. ती बोलत हॊती. सोहम किरण्याच्या जड पिशव्या घेवून आत आला.घामानी गच्च भिजला होता तो. पिशव्या कडेला ठेवून त्यानं फ्रीझ उघडलं आणि गार पाण्याची बाटली काढली.

तो ग्लास मधे घालून पिणार इतक्यात त्याच्या कानावर शब्द आले, "अगं हॆ खेडवळ.. तिथे विहरीतून उपसल्या शिवाय पाणी मिळत नाही, पण इथे आल्यावर त्यांना फ्रिजचंच  पाणी लागतं."

त्यानं तसाच  ग्लास खाली ठेवला व तो आपल्या खोलीत निघून गेला. आपण इथे राहतोय हॆ स्वातीला आवडत नाही हॆ त्याला चांगलंच माहिती होतं. पण मामा, मामी,किती माया करतात. एवढी फी भरली आहे, अर्धवट शिक्षण टाकून जण ही शक्य नाही. बाहेर राहणं आपल्याला परवडणार नाही.

त्यानी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं,तरी कधीतरी तो उदास व्हायचा. आपल्या परिस्थितीची त्याला चीड यायची.

कशी अजून घरी आली नाही ही? रोज मीडियावर आपण नकॊ नकॊ त्या बातम्या बघतो. कळत नाही का हिला?मामी,किती काळजीत आहे. अरे.. तीच येतेय वाटतं समोरून..

"काय रे?इकडे कुठे निघालास तू?"

"तुलाच बघायला."

"बॉडीगार्ड आहेस का माझा तू?"

"अगं, मामी,किती काळजीत आहे."

"ही आई ना, मी काय कुक्कुल बाळ आहे."

दोघही  घरी आले. यशोदेनी  सुस्कारा सोडलेला पाहुन स्वाती म्हणाली.. "एवढं काय ग आई, येतंच  होते ना मी."

"हो ग बाई. काय बोलू तुझ्याशी? आई होशील ना तेव्हा कळेल. वेळेवर येतं जा ग, जीवाला थारा  नसतो." माझ्या. बोलताना पाणी आलं यशोदेच्या  डोळ्यात.

स्वातीला ते जाणवलं. "आई, येईन ग वेळेवर यापुढे, प्रॉमिस."
"गुणी बाळ माझं, झोप आता."

असेच दिवस जात होते. त्या दिवसापासून स्वाती वेळेत घरी येतं हॊती. उशीर होणार असेल तर  कळवत हॊती. यशोदाला वाटलं जेवढं नाठाळ समजत होतो तितकी नाही आहे ही. 

आषाढ निम्मा सरला होता. पाऊसाची रिपरिप चालू हॊती. सोहम, स्वाती दोघेही कॉलेजला गेले होते. यशोदेनी सगळी काम आवरली. निवांत एका खुर्चीवर विसावली. बाजूलाच टीपॉयवर ठेवलेलं विणकाम तिनं हातात घेतलं.किती सुंदर रंग होते ते दोन्हीही.. स्वातीचे आवडते.

तिच्यासाठी स्वेटर विणत हॊती ती. वाढदिवस होता तिचा पुढच्या महिन्यात. तिच्या डोळ्यासमोरून स्वातीचं लहानपण  सरकू लागलं. कशी गोड हॊती.. अतिशय लाघवी..
समोरचा तिला बघून मोहून जाई. काळजाचा तुकडा आपल्या. बाबाची आणि तिची खूप गट्टी.सगळं  बाबाला सांगितल्याशिवाय तिला चैन नसायचं.

आणि बाबा, तो तर तिच्याहून हळवा. माझ्या लेकीला मी सासरी पाठवणारच नाही. जावयालाच इथे घेवून येईन म्हणायचा.
एक दिवस कधी ती सहलीला गेली तरी बेचैन व्हायचा. हलकेच हसली ती..
जगरहाटी आहे ही.. जायचंच पिल्लू भुरकन उडून एक दिवस.

तिचे हात भरभर चालत होते. अजून कशी नाही आली ही. मगाशीच यायला हवी हॊती.
येईलचं.. अगं बाई, फोन वाजतोय वाटतं.

"हॅल्लो....हो.. हॆ स्वाती काळेचंच  घरं.मी आई बोलतेय तिची....काय..???" ती जवळपास किंचाळलीच.
असं कसं झालं.. तिला रडू आवरेना.
"हॆ बघा. धीर धरा. मी काय सांगतोय."
तिच्या हातातून मोबाईल निसटून पडला.

ती धाय मोकलून रडू लागली. दार केव्हाचं वाजत होतं.
काय करू.. स्वाती.. अहो..
"मामी,दार उघड..." दार जोरजोरात वाजत होतं.
आता ती भानावर आली.

कसं तरी जावून तिनं दार उघडलं. सोहम आत आला. तिचा भेदरलेला रडका चेहरा, खाली पडलेला मोबाईल.
काहीतरी घडलंय  याचा अंदाज त्याला आला.
"मामी.. बस इथे." त्यानी तिला ग्लासभर पाणी प्यायला लावलं,  "सांग बरं मला, काय झालं?"
"सोहम.. स्वाती.. आपल्या स्वातीचा.."
"मामी.."
"अपघात.. हॉस्पिटल.."

"अरे देवा.. कुठं आहे ती..?"

यशोदा आता चांगलीच भानावर आली. सोहम.. फोन.
"थांब, मी बघतो."
त्यानी मगाशी आलेल्या नंबरवर फोन लावला.
"हॅल्लो....बरं....आम्ही पोचतो तिथे लागलीच."
त्यानं पटकन रमेशला फोन लावला, "मामा घाबरू नकोस. तू ये तिकडे. मी मामीला घेवून पोचतोच."

तो खोलीत गेला. स्वतःच आधारकार्ड, ब्लडग्रुपच कार्ड.. होते तेवढे पैसे त्यानं बरोबर घेतले.
पाण्याची बाटली, थोडी बिस्किटे घेतली.
"मामी, चल निघू या का ?"
ती देवापुढे उभी हॊती. डोळ्यातून धारा  वाहात होत्या.

"चल मामी. काळजी करू नकोस." दोघही अपोलो  हॉस्पिटला पोचली.
स्वाती I. C. U. मधे हॊती. तिथलं सगळं बघून यशोदेचं  अवसानच गळालं.
सोहम डॉक्टरांशी बोलत होता.
त्यानं सगळं नीट समजवून घेई पर्यंत रमेश आला.

"मामा, तू इकडे थांब मी येतों औषधं घेवून." तो खाली गेला.
त्यानी आपल्या मित्रांना फोन केले. दोघं, तिघं लागलीच येतों म्हणाले. एकाचा  भाऊ तिथे डॉक्टर होता. त्यानं त्याला फोन करून सांगितलं.
औषधं घेवून सोहम वर आला.
रमेश हताश  होऊन बसला होता.

"मामा, ये इकडे. हॆ डॉक्टर प्रकाश. माझ्या मित्राचे भाऊ. काळजी करू नकोस आता."
"हो. अजिबात काळजी करू नकात. मी आहे इथे."
"खूप लागलंय का हो? बरी होईल ना ही लवकर? माझ्या बाळाला बरं करा हो."

"आपण प्रयत्न करतोय. रक्त खूप वाहून गेलंय. रक्त द्यावं लागेल. तिचा ब्लड ग्रुप कोणता आहे?"
"A  negative"
"तुमचा?"
"B positive"
"तिच्या आईचा?"
"तिचा A positive."
"आता A negative ग्रुपच आहे का कोणी ओळखीत?"
रमेश, यशोदा आठवत होते तोपर्यंत सोहम म्हणाला,  "मी आहे.. A negative. माझं रक्त घ्या."

सोहमनी रक्त दिलं. स्वाती थोडया वेळाने शुद्धीवर आली.
रमेश, यशोदाचा जीव थाऱ्यावर आला.
सोहमच्या मित्रानी जबरदस्तीने त्यांना कॉफी प्यायला लावली.
"डॉक्टर.."
"आता तिचा धोका टळलाय. मात्र हाताला खूप मार लागलाय. प्लास्टर राहिलं. मुका मार  ही बराच लागलाय. बरं व्हायला वेळ लागेल."

"धन्यवाद. डॉक्टर."
"धन्यवाद कसले?? सोहम माझ्या भावाचा जवळचा मित्र आहे. तो तसा मी समजा."
"मामा, मामी. तुम्ही खूप दमलात. खूप मानसिक ताण आलाय तुम्हाला. मी आणि माझा मित्र थांबतो रात्री इथे. डॉक्टर प्रकाश पण आहेत.
तुम्ही घरी जावून आराम करा. आता काळजीच कारण  नाही. ऐकाल का माझं. प्लीज."
दोघांना त्यानं जबरदस्तीने घरी पाठवलं.

रात्रभर तो बसून होता तिथं. सकाळी रमेश, यशोदा आली.
"जा रे तू घरी  आता. रात्रभर जागा होतास. किती केलंस रे आमच्या साठी !"
"मामा, मामी.. स्वाती माझी बहीण आहे ना.. मग भाऊ करणार नाही का बहिणीसाठी?"
"हो रे बाळा.. खरं बोललास."
स्वाती आता शुद्धीवर आली हॊती. दुखत  होतं खूप.. पण आई बाबांना लागलीच बिलगली.

यशोदाचे डोळे अखंड वाहत  होते.
रमेश नी विचारलं.. कसं झालं हॆ.
"बाबा.. समोरून भरधाव ट्रक येतं होता, त्याला गाडी आवरली नाही, मी बाजूला घेतली माझी गाडी तरी ऍक्टिवाला जोरात धक्का बसला आणि मी फेकले गेले. पुढंच मला आठवत नाही काही."
"असू दे. बाळा आराम कर."

दुपारी सोहम आत आला,  "कशी आहेस स्वाती?"
तिनं तोंड भिंतीकडे  फिरवलं.
इवलंस तोंड करून त्यानं विचारलं,  "मामा, जरा बाहेर येतोस का?"
रमेश बाहेर गेला.

यशोदा स्वातीला म्हणाली, "बाळा.. असं वागू नये."
"इथे ही हा माझा पिच्छा सोडत नाहीये."
यशोदानी मग स्वातीला कालची सगळी हकीकत सांगितली.
"त्यानी रक्त दिलं मला आई.."
"हो, नुसतं रक्त नाही बाळा.. जीवदान दिलंय तुला."

"आई.. आणि मी नेहमीच वाईट वागत होते ग त्याच्याशी."
"बाळा, परिस्थिती कुणाच्या हातात नसते, पण आपण चांगलं वागू शकतो ना सर्वांशी."
"हो, आई. बोलावं ना त्याला.
सोहम.. ये ना. सॉरी,.मी खूप वाईट वागले रे तुझ्याशी."
"वेडाबाई.. असं असतं का कधी. आराम कर. विचार करू नकोस."

थोडया दिवसांनी स्वाती घरी आली. आता ती खूप मजेत हॊती. घराबाहेर जावू शकत नव्हती. पण सोहम तिला छान, छान पुस्तकं आणून देई. छानसा मूवी लावून देई. सगळे मिळून पत्ते खेळत.
कधी तो तिच्या आवडीचं काहीतरी खायला घेवून येई.
तिला आनंदी ठेवायचा त्याचा प्रयत्न तिला खूप आवडे.

श्रावण सुरु झाला. पौर्णिमा आली.

"आई, आज मला छान ड्रेस घालायचा आहे. बाबा, मी सांगितलं ते तुम्ही आणलत ना?"

तिला असं आनंदात पाहून आई, बाबा खूष होते.

"सोहम.. सोहम.."

"आलो.. काय ग?"

"बस ना इथे.."

"काय आहे ग आज?"

त्याच्या हाताला घट्ट राखी बांधत ती म्हणाली.. भैय्या.. मेरे.. राखीकी बंधन को निभाना..नाही.. निभाया."

तिच्या डोळयांतले अश्रू त्यानी हळूच पुसले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला.

आज हॆ राखीचचं नव्हे तर  रक्ताचं, रेशमी बंधन आजन्म बांधलं गेलं होतं.

समाप्त

©® मृणाल शामराज

सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा

अबोल प्रीत बहरली

अंतर

मोह


  

1 टिप्पण्या

  1. कथा छान च आहे. फक्त एक चूक झाली आहे, आई वडील दोघांचे पॉसिटीव्ह रक्त गट असल्यास मुलांचा पॉसिटीव्हच असतो, तो नेगेटिव्ह होत नाही.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने