©® मृणाल शामराज
सकाळचं धुकं थोडं वितळलं. थंड, स्वच्छ प्रकाश सगळीकडे पसरला. विक्रमनी चौफेर नजर फिरवली. आठवड्यावर आठवडे असेच जात होते. रात्रीच तापमान शून्याच्या खाली जायचं. बर्फाचा जोरदार पाऊस व्हायचा.
सोबतीला थंडगार वारे.
सैनिकांच हेच खडतर आयुष्य. आता अंगवळणी पडलंय.
घरची ओढ जाणवतेय..किती दिवस झाले.. अडीच, तीन वर्षें.
घरातून निघतांना हिमांशूनी आपल्या कोवळ्या हातांनी घट्ट मारलेली मिठी.. गाडीत बसेपर्यंत घट्ट धरलेला हात.. देविकाचे ते व्याकुळ डोळे.. औक्षण करतांना थरथरणारा हात... जाणवत होतं आपल्याला ही हॆ सर्व.
तिथून पाय निघत नव्हता. औक्षण करून हात जोडून छातीला लावताना जाणवला तो वर्दीचा स्पर्श..भानावर आणलं त्यानी..
जायला हवं.. ती भारतमाता साद घालतेय..
क्षणभर भांबवलेलं मन स्थिर झालं.
देविकेला क्षणभर थोपटलं त्यानं. डोळ्यातली ती अबोल भाषा ओळखली तिनं.
"हिमांशू.. बाबा, येणार आहे लवकरच. तुला ही बाबासारखी बंदूक हवी आहे ना.. आणणार आहे तो येतांना तुला..जावू दे त्याला."
तो ही आई सारखाच समजुतदार.
"बाबा.. लवकर ये. तो आर्यन आहे ना.."
"कोण रे ?"
"अरे, तो माझा मित्र, माझ्या बाकावर बसणारा.."
"मग.."
"त्याचे बाबा.. नगरसेवक आहेत. कधी, कधी मोठी गाडी घेवून सोडायला येतात. शाळेत सगळे मान देतात त्यांना. आणि तू.. तुला वेळच नसतो कधी."
"आता परत आलो की येईन हं नक्की..प्रॉमिस..तुझी आई येतें, त्याची येतें का?"
"बाबा, तुच हवास मला."
"हो.. येणार हं तुझ्या बरोबर, परत आलो की "
त्याला तरी कुठे माहित होतं की, आपण परत कधी येणार..येणार की नाही.
आज सगळं सगळं आठवत होतं त्याला. नुकतीच सुट्टी मंजूर झाल्याचं कळलं होतं.
या वेळेस ठरवलं त्यानं, की न कळवताच जायचं, अचानक. हिमांशू, देविकाला झालेला आनंद डोळे भरून बघायचा.
परतताना तो दिल्लीला थांबला होता.
काही काम होतं. काम आटपून तो बाहेर पडला.
काय न्यावं हिमांशूला..
समोरच मुलांचं कपड्याचं दुकान होतं. त्याच्या शोकेस मधे एक छानसा सैनिकी कपड्यातला मुलाचा ड्रेस होता.
अरे.. किती छान.. हॆ हिमांशूला आवडेल.
तो दुकानात गेला.
"तो ड्रेस दाखवाल का?"
"केवढा आहे मुलगा?"
तो विचारात पडला, केवढा झाला असेल आता. उंची वाढली असेल तर?
दुकानदाराला त्याचा संभ्रम लक्षात आला.
"साहेब, किती वर्षाचा आहे तो ?"
"दहा "
"हा घ्या, हा बरोबर बसेल."
"बरं, दया, हा."
तो बाहेर आला. त्याला आठवलं आपण बंदूक आणणार म्हणून कबूल केलेलं त्याला. त्यानं खेळण्याच्या दुकानातून एक बंदूक घेतली.
देविकाला एक छानशी साडी घेतली.
आता त्याला घरी जाण्याचे वेध लागले.
टॅक्सीतून तो स्टेशनला उतरला. जिना चढताना एका पायरीवर एक स्त्री दिसली. अवघडलेली हॊती.
मोठ्या दोन बॅगा आणि सहा, सात वर्षाची मुलगी. तिला ते उचलून नेताना दम लागला म्हणून ती तिथे बाजूला थांबली हॊती. आजूबाजूनी इतके जण जात होते, पण कुणी तिच्या कडे लक्ष देतं नव्हतं. हा पटकन पुढे झाला.
आपली सॅक त्यानं खांदयाला अडकवली.
"दीदी, मी मदत करतो चला."
त्यानं पटकन त्या बॅग्स उचलल्या आणि तो चालायला लागला.
ती मागून मुलीला घेवून आली.
"थँक्स.."
"दीदी, असं म्हणू नका."
तो तिथून निघणार इतक्यात त्या छोट्या मुलीनी त्याला सलाम केला, आणि म्हणाली.
"भारतमाता की जय."
त्याला लक्षात आलं, अरे आपण वर्दीत आहोत.
तो हसला. तिला जवळ घेतं तो ही म्हणाला.
"भारतमाता की जय."
इकडे हिमांशूची देविकाच्या मागे भुणभुण चालली हॊती.
"उदया स्वातंत्र्य दिन, मला शाळेत देशभक्तीपर गीत म्हणायचं आहे, एकटयाला. मी काय घालू? "
"बाळा, संध्याकाळी जावू बाजारात. तुला छानसा, पांढरा झब्बा, पायजमा आणू.. चालेल ना."
"हो, आई.. पण तू आलं पाहिजे उदया. त्या आर्यनचे आई, बाबा दोघेही येणार आहेत. माझे बाबा इथे नाहीत. तू तरी येशील ना?"
"हो रे राजा.. नक्की येणार.जा आता शाळेत."
हिमांशू शाळेच्या गेट मधुन आत गेला तो त्याला हाक आली..
"हिमांशू."
त्यानं मागे पाहिलं तर आयर्न गाडीतून उतरला होता.
"थांब रे माझ्यासाठी, आलोच."
तो त्याच्या बाबाच्या जवळ गेला आणि त्याचा पापा घेतला.बाय केलं. आणि हिमांशू कडे आला.
"काय रे, तुझ्या डोळ्यात पाणी "?
"बाबाची आठवण आली रे."
त्याच्या गळ्यात हात टाकत आयर्न म्हणाला.. "चल, शाळा भरली."
शाळा सुटल्यावर तो घरी आला.
आई दारातच वाट बघतेय पाहिल्यावर त्याला नवल वाटलं. तो धावत आला, आईच्या गळ्यात हात टाकत तो म्हणाला..
"आई, माझी आई."
"चल आत, गंमत आहे तुझ्यासाठी."
"बाबा..तू , केव्हा आलास."
"केवढा मोठा झालास रे.."
त्याला जवळ घेतं विक्रम म्हणाला.
"ही बघ गंमत तुझ्यासाठी."
विक्रमनी आणलेला ड्रेस त्यानी लागलीच घालून पाहिला. खूप खूष झाला तो.
"आई, मी उदया हाच ड्रेस घालणार."
"आणि ही बंदूक बघ."
आता तर हिमांशूनी टुणकन उडी मारली.
"हॆ, हॆ.. अशी बंदूक कुणाकडेच नाही. बाबा.. माझा लाडका बाबा."
त्यानी पटकन विक्रमचा पापा घेतला.
आता त्याला खूपच सुरक्षित वाटतं होतं.
"बाबा.. उद्या माझं गाणं ऐकायला येशील ना?"
"हो, येणार तर माझ्या पिल्लू साठी. "
सकाळ झाली. रोज मिनतवाऱ्या करून उठवायचं याला आणि आज कसा पटकन तयार झाला हा! देविकाला नवल वाटलं.
विक्रम बघत होता.
कसा हुबेहूब आपल्या सारखा दिसतोय हा या सैनिकाच्या गणवेशात..
बंदूक तर कशी ऐटीत धरलीय.
"चला लवकर बाबा."
"अरे, हो, कुलूप तर लावू दे.'
देविका बिल्डिंगच्या गेट मधुन बघत हॊती.
दोघेही गणवेशात होते..
किती एकसारखे दिसताहेत हॆ.
"चला राजे, निघायचं का.."
" हो , बाबा.भारतमाता की जय."
"भारतमाता की जय."
बाबाचा हात घट्ट धरून हिमांशू निघाला. रस्त्यात लोकं थांबून थांबून विक्रमशी बोलत होते. चौकशी करत होते.
"चल ने रे बाबा.. उशीर होतोय. सगळे आले असतील."
ते तिघ शाळेत पोचले.
दारातच उभी असलेली आयर्नची मोठी गाडी हिमांशूला दिसली.
"बाबा, तो सगळ्यात पुढे बसला आहे ना तो आयर्न, आणि त्याचे आई, बाबा"
"असं का.. छान. "
कुठं बसावे ह्याचा विचार विक्रम करत होता तोपर्यंत हिमांशूचे वर्गशिक्षक तिथे आले.
"नमस्कार. हिमांशूचे आई, बाबा. या ना पुढे इकडे बसा."
त्यांनी त्यांना सगळ्यात पुढच्या ओळीत आयर्नच्या आई, बाबांजवळ नेवून बसवलं. आयर्न चे बाबा उठून उभे राहिले आणि त्यांनी विक्रमला नमस्कार केला.
"अरे, हिमांशू, चल लवकर, तुझं गाणं आहे आता."
सर म्हणाले.
हिमांशू स्टेजवर गेला. त्यानी खाली पाहिलं. त्याचे बाबा कौतुकानी त्याच्याकडे बघत होते.
'बलसागर भारत होवो '
त्याचे सूर ठासून येतं होते.
गाणं संपलं. तो खाली आला.
आयर्न आपल्या बंदुकीकडे कुतूहलानी बघतोय हॆ त्याच्या लक्षात आलं.
आज आपल्याकडेही असं काहीतरी आहे जे त्याच्याकडे नाही ह्याचा त्याला अभिमान वाटला.
कार्यक्रम संपला.
स्टेजवर मुख्याध्यापकांनी विक्रमला बोलवलं त्याचा सत्कार केला.
ते बोलायला उभे राहिले, "नमस्कार, आज आपल्याला आपला ऊर अभिमानाने भरून येईल असा सन्माननीय प्रमुख पाहुणा मिळालाय.
ज्यांच्या भरवश्यावर आपण भारतीय इथे निर्धास्त राहतोअश्या शूर सैनिकांपैकी एक असे विक्रम भोसले.त्यांनी आपलं मनोगत सांगावं."
विक्रम अर्धा तास बोलत होता. सीमेवर आपले सैनिक जीव तळहातावर घेऊन कसे लढतात हॆ तो सांगत होता. त्याचं वर्णन ऐकताना लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
भाषण संपलं.
टाळ्यांचा कडकडात झाला..
हिमांशू बघत होता. आयर्नचे बाबा पण उठून उभे राहून टाळ्या वाजवत होते. त्याचा ऊर अभिमानाने भरून आला. तो जोरात ओरडला.
"भारतमाता की जय."
लोकांच्यातून तितक्याच जोरात प्रतिसाद आला.
"भारतमाता की जय."
हिमांशू बघत होता.
आज त्याला त्याचा बाबा आभाळाहून मोठा वाटला.
आणि इकडे विक्रम स्टेजवरून बघत होता..
आपलं प्रतिरूप..मोठं झालेलं.
त्याच वर्दीत.. बंदूक घेवून..
लढणारं मातृभूमीसाठी...
जय हिंद.. जय भारत.
भारतमाता की जय.
©® मृणाल शामराज
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
