सांगा या वेडीला गुलछडीला.. तिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला

© शुभांगी मस्के



"पाय धुवायला पाणी आणा, जावई आलेत".... अण्णांनी बाहेरच्या पडवीतून जोरात आवाज दिला.

डोक्यावरचा पदर सावरत, माई गडवाभर पाणी घेवून बाहेर आल्या...

माईंनी, पटकन अंगणात पाट ठेवला,

"या जी जावई," पाय धुवायला.. गडवाभरून आणलेलं पाणी, परागच्या पायावर टाकण्यासाठी माई खाली वाकल्या.

"अहो असू द्या असू द्या. पायी थोडीच आलो मी," परागने पाय धुवायला नकार दिला.

"पाहुण्यांचा मान असतोय तो, घ्या"....
अण्णांनी माईच्या हातचा गडवा घेवून जावयाच्या हाती दिला..

"बर, तुमचा मान.. म्हणून" गडवा हाती घेऊन, गडवाभर पाणी त्याने पायावर ओतलं. टाक्यातलं गार पाणी पायावर ओतताच.. परागला छान थंडगार वाटलं.

"मुक्ते, नँपकीन आण गं. कपाटातून काढून. जावई आलेत बघ," माईंनी बाहेरुनच आत मुक्तीला आवाज दिला...

स्वयंपाक खोलीतून कोठी घरात धावपळ करतानाची लगबग आणि खाडकन्, कपाट, उघडल्याचा आवाज बाहेर पर्यंत ऐकू आला.
"हं!! हा घे....!" दारातूनचं मुक्तीने नँपकीन माईच्या दिशेने भिरकावला.

"पाह्यली पोरगी... कित्ती आगावू हाय ती" माई स्वत:शीच पुटपुटल्या..

पलंगावर एका साईडने फोल्ड करुन ठेवलेली गादी, अण्णांनी पलंगभर पसरवली आणि खांद्यावरच्या दुपटट्याने चादर झटकायला लागले.

तोच माई लगबगीने, पुढे आल्या... सरका बाजूला, माईंनी विस्कटलेली चादर पटकन सवारली.

"बसा जावई!"....

"आरामात मागे सरकुन, भिंतीला टेकून निवांत बसून घ्या" अण्णांनी बसायच्या जागी, पुन्हा दुपट्ट्याने झटका देत जावयाला बसायला सांगितलं.

भक्ती आणि युक्ती... मुक्तीच्या दोन्ही छोट्या बहिणींची, ह्या ना त्या कारणाने, एकदम तिकडून सारखी, घाईगडबड सुरु होती.

"मुक्ते चहा टाक गं, जावयासाठी..." माईंनी सांगितलं. 

"भाऊजीसाठी चहा करायला सांग ताईला, त्यांना आवडतो तसा, वेलची पाटीवर मसाल्याच्या डब्ब्यात आहे म्हणावं" माईंनी भोवताली घुटमळणाऱ्या भक्तीला सांगितलं.

मुक्तीने आल, वेलची टाकून परागला आवडतो तसा, जास्ती वस्ती दुधाचा, चहा बनवला..

वाफाळत्या चहाचा ट्रे.. तिने युक्तीच्या हाती दिला..

युक्तीच चहा घेऊन आली होती.. परागने बसल्या जागी, स्वयंपाकघराच्या दिशेने डोकावल..

परागची नजर मुक्तीला शोधत होती....

अंधारलेल्या स्वयंपाक खोलीत, टिमटिमत्या लाईटच्या प्रकाशात, पाठीवरच्या लांब केसांचा शेपटा इकडून तिकडे हलवत, कमरेला ओढणी लपेटलेली मुक्ती.... आभाळात ढगाआड लपलेल्या चंद्रासारखी लपाछपी खेळत होती..

अधूनमधून येणारी, तिच्या पैजणांची छुनछुन....बांगड्यांची किणकिन, परागला अगतिक करत होती.

बहिणी बहिणीत कसलीशी कुजबूज, बोलण्यातली खुसुरपुसुर, अधुनमधुन परागच्या कानी पडत होती...

मुक्ती आणि परागचं नुकतंच लग्न झालं होतं आणि रीतिरिवाजाप्रमाणे पहिल्या अमावस्येसाठी मुक्तीला, अण्णा तिला माहेरी घेऊन आले होते...

उद्या घ्यायला येणारा, पराग... एक दिवस आधीच.. मुक्तीला घ्यायसाठी, असा अचानक... पहिल्यांदाच असा सासरी राहायला आला होता.

"जावई पहिल्यांदा आलेत. त्यांना आवडतो तसा स्वयंपाक कर".... अण्णांनी हळूच मुक्तीला घरात येऊन सांगितलं...


अण्णांच्या बोलण्यावर मुक्तीने फक्तच होकारार्थी मान डोलावली.

"जावयाच्या, मानापनात काही कमी नको रहायला. थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या त्यांच्याकडे" अण्णांनी माईला सक्त ताकीदच दिली होती..

सायंकाळ झाली तशी माईने अंगणात पाणी शिपडलं.. अंगणात दोन खाटा समोरासामोर टाकल्या. अण्णा जावयासोबत बाहेर अंगणात इकडच्या तिकडच्या गप्पा करत बसले...

येता जाता गावातले, शेजार पाजारचे, नव्या जावयाची आतुरतेने चौकशी करत होते..

"कसे हायसा? समद ठीक नव्ह!! न्हाई म्हणतो.. तुमच्या सयरात मोठी गजबज आस्ते हिकड, करमत नसलं न्हाई?" शेजारच्या महादूने विचारलं..

"आपल्या मुक्तीला घ्यायला आलेत जावई".. अण्णांनी म्हादुला सांगितलं.

शहरात अण्णांच येणं जाणं नेहमीचच होतं, खेडेगावात राहून अण्णांच राहणीमान, वागणं, बोलणं अगदी शहरातल्या सारखं होतं...

आपला जावई शहरात मोठा इंजिनियर आहे, अण्णा मोठ्या कौतुकाने सर्वांना सांगत होते.

दिवेलावणीची वेळ झाली होती, 
पराग येवुन चांगले पाच सहा तास उलटून गेले तरी, मुक्ता काही परागच्या डोळ्यांना दिसली नव्हती.

लाज-या बुज-या युक्ती आणि भक्ती... मात्र जीजाजी जीजाजी करुन आतबाहेर घुटमळत होत्या..
"चहा दे पाणी दे" दोघी जणू नव्या जीजाजींच्या दिमतीलाच होत्या..

साग्रसंगीत थाटात स्वयंपाक तयार झाला होता. दरवाजामागूनचं... मुक्ती.... कुरुड्या.. पापड, आंब्याचा रसाचे पातेले बाहेर सरकवत होती...

"मुक्ते, बाई तूच वाढ जेवण".... माईंनी फर्मान सोडलं..

मुक्ती बाहेर आली, लाजेची लाली तिच्या गालावर चढली होती. शांतपणे, फार काही न बोलता, खाली मान घालून मुक्ती जेवण वाढायला लागली..

माईंचं जावयाच्या ताटाकडे व्यवस्थित लक्ष होतं. ताटातल संपायच्या आत, आग्रहाने माई मुक्तीला वाढायला सांगत होत्या...

गावरान आंब्याच्या रस, कुरुडीच्या जेवणावर जावयाने उलट्या हाताने ताव मारला. आंब्याचा रस आवडला त्यांना, चांगला चाटून पुसून पोटभर खालला. 

एवढे शहरात राहणारे, पण मांडीला मांडी लावून आपल्या सोबत, खालीच बसले जेवायला.. श्रीमंत आहेत पण साधे आहेत... अण्णा माई मनोमन सुखावले होते.

परागचं जेवणं आटोपलं... हात धुवायला तो मोरीकडे गेला...


"जा नॅपकिन नेऊन दे जावयाला". हात धुवायला मोरीकडे गेलेल्या, परागच्या मागे माईंनी मुक्तीला पाठवलं.


हातात, नॅपकिन घेऊन उभ्या असलेल्या मुक्तीने लगेच नॅपकिन पुढे केला. कमरेला बांधलेली ओढणीच त्याने झटक्यात ओढली, तिच्या ओढणीलाच त्याने हात पुसला...

मुक्ती दाचकलीच.. मुक्तीचं सात्विक, शांत, लाजर, गोरमोर रूप त्याने डोळ्यात वेचलं.

ओढणीचा दाबलेला काठ ओढताना, त्याची पाचची पाच ही बोटं तिच्या कमरेवरून फिरली, कमरेला त्याच्या हाताच्या स्पर्शाने, तिच्या उभ्या अंगाला शहरा आला ती लाजेने गोरी मोरी झाली..

"अह!! ह!!" अण्णा येत असल्याच्या चाहुलीने..मुक्ती गडबडली. 
 मागून येणा-या अण्णांनी नवरोबाचं असं बालिश वागणं, बघितलं तर नसेल ना, ह्या विचारात पळतच ती आत गेली..

"चला आता तुमची जेवणं आटपा आणि जावयाची झोपायची सोय करा"... अण्णांनी फर्मान सोडलं.

पानसुपारीचं पानदान घेवून, अण्णा पुन्हा जावयाशी बाहेर येऊन गप्पा मारत बसले....

माई, भक्ती, मुक्ती, युक्ती ने जेवून घेतलं. जेवणं आटोपली तशी, माईंनी कपाटातून नवी कोरी चादर गादीवर घातली. उशीची खोळ बदलवली, पांघरायला नवी चादर पायाशी ठेवली. 
छापरी वजा गावातल्या हॉल मध्ये, हवेशीर जावयाची झोपायची सोय केली. 
गर्मी होऊ नये म्हणून, सीलिंग फॅन असून ही तोंडाजवळ टेबल फॅन ही लावला होता.

"जावई तुम्ही झोपा निवांत. मी जातू़ शेतावर जागणीला"... अह!! ह!! मुद्दाम खोकला आल्यासारखं करत त्यांनी माईंकडे बघितलं आणि अण्णा शेेतावरर जागणीला निघून गेले.

बाहेर, छान झुळझुळ वारा वाहात होता..

"भक्ती, युक्ती... चला गं पोरींनो बाहेर जरा वेळ".. शतपावली करु... माई बोलल्या.

"रोज तर नाही ना करत, आजच का?" भक्ती, मुक्तीने माईंना प्रश्न केला.

"काही नाही... चला जरावेळ फिरा जेवण झाल्यावर"... माई दोघींना बाहेर घेवून आल्या.

"काय हवं नको ते बघ". माईने मुक्तीला हातानेच तिथेच थांबण्याचा इशारा केला...

माईंच्या इशा-याने, मुक्ताला कससच झालं... तळपाया पासून तर अंगभर... तिच्या उभ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

"पाणी", तिने तांब्याभर पाणी परागच्या पलंगाजवळ आणून ठेवलं.... पाठमोऱ्या मुक्तिचा हात, दुसऱ्याच क्षणी, परागने करकचून पकडला..

ती, त्याच्या हातून हात सोडवण्याचा प्रयत्न करायला लागली. जाणीवपूर्वक तिचा प्रयत्न असफल झाला होता.

हवेची झुळूक आली... तशी बाहेरच्या वाऱ्याने, दरवाजा खाडकन बंद झाला..

"काय मँडम माहेरी, आलात तसे भाव वाढलेत तुमचे. बघा बघा.. निसर्ग ही आपल्या मिलनाची किती आतुरतेने प्रतिक्षा करतोय. वा-याचा झोका.. दरवाजा कसा बंद करुन गेला बघा!" त्याने, तिचा हात घट्ट आवळला.

"सोडा ना", हलकंस स्माइल तिच्या ओठांवर आलं, तिने चोर नजरेने त्याच्याकडे बघितलं. तोच परागने कचकन डोळा मारला..

त्याच्या बंद मुठीतून ती हात सोडवण्याचाय प्रयत्न करतच राहीली.. "सोडा ना", " बघेन कुणीतरी".. "अहो सोडा ना"


"ये चांदसे रोशन चेहरा... जुल्फोंका रंग सुनहरा...
ये झिलसी निली आखें".... पराग गाण्याच्या ओळी गुणगुणायला लागला...


"दिवसभरापासुन तरसवलयं म्हटलं, आता माझ्या तावडीतुन या चांदणीची आता सुटका नाही".. त्याने तिच्या हातावर हलकेच ओठ टेकले.


"कुणी तरी येईल ना!"
मुक्तीने इकडे तिकडे बघत.... कसाबसा त्याच्या हातून स्वत:चा हात मुक्त केला.....


"काही तरीच तुमचं. काहीही काय, माहेरी आहे मी! लहान लहान बहिणी आहेत, त्या आल्या म्हणजे. अण्णा, माई आहेत, बरं दिसत का! काय विचार करतील ते ! लाज वाटते मला.". काहीस पुटपुटत.  धावत ती स्वयंपाक घरात गेली..

तिची छाती धडधडत होती. माठातल, घटाघटा पाणी पिली.

पराग, इकडे तिकडे बघत.. लगेच तिच्या मागे स्वयंपाक खोलीत गेला.... तिच्या कमरेला हातानं आलिंगन देत, घट्ट छातीशी, कवटाळून घेतलं..
खांद्यावर त्याचे लांब लांब उष्ण श्वास...त्याचे ओठ मानेवर फिरायला लागले... तिची छाती जोरजोरात धडधडायला लागली.

शून्य प्रतिक्रियेत, कुठलीच हालचाल न करता, एका जागी ती स्तब्ध उभी होती.

आता त्याने तिचे दोन्ही हात अलगद मुठीत बंद केले. एकमेकांत अडकलेली बोट फक्त.. जणू संवादात रमली होती. दोन जीव एक होऊन.... त्या आर्त क्षणांना.. बोलकं करतात होते.

वाऱ्याची झुळूक स्वयंपाक घराचा दरवाजा ला ही धक्का देऊन.. खाडकन बंद करून गेली होती...

त्याची मिठी सैल झाली.

धावत जावून बंद दरवाजा तिने उघडला.

"आता नको... ना प्लीज. घरी सगळेच आहेत" बोलताना, लाजरी बुजरी केविलवाणी नजर, लाजेने चूर चूर झाली होती.

"हे कारण आहे तर. दूर दूर राहण्याचंं .मला वाटलं, राग आलाय की काय आमच्या राणीसरकारांना? अगं पण वेडे.. लग्न झालय आता आपलं.
तुझ्यासोबत बोलायला मला आणि माझ्यासोबत बोलायला तुला.... कुणाच्या परमिशनची गरज नाही आता."

पराग, हळुवार बोलत होता, मुक्ती चोरट्या नजरेने, परागकडे फक्त बघत होती...

मनात गुदगुल्यांचे कारंजे उडत होते.... पहिल्या रात्रीच्या स्पर्शांतली मादकता तितक्याच तीव्रतेने तिला आजही जाणवत होती..

"मग काय म्हणता? करायचा का दरवाजा बंद?"

त्याने दरवाजा बंद करण्याचा हलकासा इशारा केला..

तिने हलकेच नकारार्थी मान हलवली. धावत जाऊन, बंद झालेली दोन्ही दार.. सताड उघडी केली..

"सांगा सांगा, या वेडीला.. माझ्या गुलछडीला
हिच्यासाठी आलो मी सासरवाडीला" पराग स्वत:शीच पुटपुटला.

घ्यायला आलेल्या तिच्या जोडीदारासोबत.. सासरी जायला आता ती ही आतुर होती..

आजच्या काळात.. लग्नापूर्वीच मुलंमुली भेटतात, वागण्या बोलण्यात तेवढसा बुजरेपणा नसतो. पूर्वी परिस्थिती, वेगळी होती. नुकतच लग्न झालेल्या मुलीसाठी, नवऱ्याशी बोलताना वेगळ्या प्रकारचं अवघडलेपण असायचं.
सासरी, नवरा बायकोची स्वतंत्र खोली, माहेरी तशी ही सोय नाही. अशावेळी नवीन लग्न झालेलं जोडपं असो की संसारात मुरलेलं जोडपं असो. नवऱ्याने हक्काने केलेली शारिरीक सुखाची मागणी, तिच्या हक्काच्या माहेरी तिच्यासाठी गैरसोयीची व्हायची. खरयं का? प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्की आवडेल.

© शुभांगी मस्के.

सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने