©® शुभांगी मस्के
ताज्या पळसाच्या पानांची पत्रावळ, त्यावर कढी, पन्ह्याचे द्रोण.. कुरडया, पापड्या, वडे-भजी, भात भाजी-पोळी, खीर पुरी, चटण्या, आंबरस.. पुरणाची पोळी आणि त्यावर तुपाची धार ही.
"अगं पन्ह्यावर नी आमरसावर ही तुपाची धार वाढ" निखिल पात्र वाढताना जातीने लक्ष घालत होता.
किर्तीने पात्राभोवताली रांगोळी रेखाटली, धुंदमुंद करणा-या धूपबत्तीच्या सुवासात साग्रसंगीत स्वयंपाकाच्या जेवणाचा थाट पत्रावळीवर सजवला जात होता.
"मम्मा हे कुणासाठी?" किर्ती आणि निखिल यांच्या आठ वर्षाच्या लेकाने रियानने विचारलं.
"बाळा आज तुझे आजोबा येणार ना आपल्या घरी जेवायला त्यांच्यासाठी", किर्तीने उत्तर दिलं.
"आबा येणार, वाह वाह... कित्ती काय काय सांगायचयं मला, खूप गप्पा करायच्यात आबांसोबत. आत्ता आले की, मी त्यांना जाऊच देणार नाही." रियान आबांची वाट बघत बसला.
सर्वांची जेवण आटोपली तरी आबा आलेच नव्हते. आबांसाठी वाढलेली पत्रावळ शेवटी गाईला लावण्यात आली. इवलासा तो जीव आजोबा आजीची वाट बघत कोमेजून गेला.
आजोबांच्या फोटोकडे एकटक नजर लावून बघत रियानने विचारलं.
"आबा तुम्ही का नाही आलात? आज मम्माने तुमच्यासाठी काय काय बनवलेलं. छान छान मस्त मस्त मी तर पोटभरून जेवलो." पोटावरुन हात फिरवत रियानने ढेकर दिली.
"आबा आठवत तुम्हाला, तुम्ही एकदा आमच्या घरी, न कळवता अचानक आलेले. वेळेवर तुमच्यासाठी स्वयंपाक करावा लागणार. दुपारच्या झोपेचा खोळंबा झाला. म्हणून मम्मा कित्ती चिडली होती तुमच्यावर.
रिवू बाळाची आठवण आली गं, म्हणून भेटायला आल्याचं तुम्ही पुन्हा पुन्हा सांगत होतात, पण ऐकेल ती मम्मा कुठली.
आबा, तुम्ही माझा लाड केलात, माझ्या गालाचे भराभरा पापे घेतले आणि न जेवताच निघून गेलात. मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला, पण थांबला नाहीत तुम्ही.
मम्मा खूप वाईट आहे. तुमच्यावर बघा कशी चिडली, तुमच्यावर ओरडली. मी तुम्ही थांबावं, म्हणून तुम्हाला खूप विनवण्या करत होतो. मम्मा तुमच्यावर रागावत होती. मला खूप रडू येत होतं.
तुम्ही मला जवळ घेतलतं, मांडीवर बसवलतं आणि म्हणालात, 'बाळा आईबाबा कधीच वाईट नसतात रे!' तुम्ही माफी मागायला सांगितली.
मी कानाला हात लावून sorry म्हटलं. तुम्ही माझा हात हातात घेतला तुमच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब माझ्या हातावर पडला.
आबा तुम्ही रडत आहात, मी विचारलं. 'नाही रे बाळा, मी कशाला रडू' म्हणत तुम्ही शर्टच्या बाहीनेच, डोळे पुसले. तुम्ही रडत होतात आबा, मला कळलं होतं तेव्हा.
तुमच्यासोबत यायच होतं मला, मी येतो म्हणून हट्ट ही कला होता. पण तुम्ही म्हणालात, 'बाळा तू माझ्यासोबत आलास तर, तुझ्या मम्मा पप्पांची काळजी कोण घेणार. त्यांना अस एकटं नाही सोडायचं रे मम्मी पप्पा ना ते तुझे.' त्यांना कधीच एकटं न सोडण्याचं तुम्ही माझ्याकडून प्रॉमिसही घेतलं.
पण मी तर तुम्हाला एकटं सोडलं ना आबा, त्याचं काय!! त्याबद्दल तर तुम्ही कधी बोललातचं नाही.
आजोबा मम्माने आज बनवलेल्या जेवणातलं, तुम्हाला काहीच आवडलं नाही का? म्हणून तुम्ही नाही आलात का?
तुम्ही एकदा आजारी होतात. मम्माचा सगळा स्वयंपाक झाला होता, तुम्हाला जेवायची इच्छाच नव्हती, जेवण बघूनच ओकारी यायची, कडूकडू वाटायचं. तुम्हाला आंबट बेसन, भाकरी सोबत ठेचा आवडायचा म्हणून मग आजीने पटकन भाकरी, आंबट बेसन आणि लसून घालून हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला.
मी तुम्हाला, माझ्या हातांने जेवण भरवलं होतं. भर तापात निदान दोन घास पोटात गेले म्हणून आजीलाही बर वाटलं. आजी आपल्या दोघांकडे बघून गालातल्या गालात हसत होती.
मम्मा ऑफिसमधून आली, दुपारचं जेवण जसच्या तसं राहीलं म्हणून आजीवर खूप चिडली. आजी काहीच का बोलली नाही तेव्हा?
मम्माचं वागणं मला तेव्हाही आवडलं नव्हतं. मी मम्माला म्हटलं, आजीला काहीच बोलायचं नाही. मम्माने गप्प बसवल . फार शेफारलायस, म्हाता-यांसोबत राहून म्हणत रुममध्ये ओढत ओढत नेलं.
आबा तुम्ही आईबाबा आहात ना पप्पांचे, मग तुम्हाला मम्मा म्हातारे का म्हणाली?? मुलं मोठी झाली की आईबाबा म्हातारे होऊन जातात मला पहिल्यांदाच कळलं.
मम्मा तू फार वाईट आहेस. आजीआबांवर सतत रागावत राहातेस. मोठे आहेत ना ते. माझं ऐकून मम्माने माझ्या पाठीत एक जोरात दणका दिला.
मी लाडका ना तिचा, मला मारलं म्हणून मग तीच एकटी रुममध्ये रडत बसली होती.
आजीने मला जवळ बोलावलं, समजावलं. आज्जी म्हणाली, 'मम्माला असं उलटून कधीच बोलायचं नाही. सगळ्या भाज्या खायच्या असतात. वेळेवर जेवायचं असतं. जेवताना नखरे नाही हं करायचे. आबांनी हट्ट केला, स्वत:च्या हातून वेळेवर जेवले नाहीत. म्हणून मम्मा रागावलीय.' बोलताना आजीच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं.
मम्मा आणि आज्जी, मला तापात काय काय करुन देतात, तुम्हाला आजीने तुमच्या आवडीच जेवण बनवून दिलेलं, मग मम्मा तरी आजीवर का रागावली??
खूप प्रश्न पडलेत आबा? आणि मला ते तुम्हालाच विचारायचे आहेत? पण तुम्ही आलातच नाही." रियान आबांच्या फोटोकडे बघून बोलत होता.
"एक दिवस, सकाळी सकाळी तुम्ही तयार झालात. डॉक्टरकडे जातोय सांगून बाहेर गेलात. जाताना माझ्याकडे बघितलं तेव्हा तुमचे डोळे पाण्याने डबडबले होते. आजीही पदराने आसू पुसत होती. तुम्हाला रडताना बघून मलाही रडू येत होतं.
त्यानंतर तुम्ही आलातच नाहीत. मम्मा आणि काकू एकदा आपापसात बोलत होत्या. तुम्हाला स्वतंत्र राहायचयं, म्हणून.
एक दिवस काकांच्या आर्यन दादाने सांगितलं, तुम्ही तर आकाशातला तारा झालात, कित्ती रडलो होतो मी, मला सांगून का नाही गेलात आबा तुम्ही??
आकाश खूप दूर आहे, म्हणून नाही येता आलं का तुम्हाला. तिकडे पण तिकडे पण कोरोना, लॉकडाऊन वगैरे होतं का आबा. आजी नाही आली ना तुमच्याबरोबर. आज्जी तर आर्यन दादाकडे पण नाही आणि आत्याच्या पूर्वीताईकडे पण नाही. खूप दिवसात ती भेटलीच नाही मला.
आबा तुम्हाला एकटं वाटत असेल तर येऊ का मी तिकडे. आपण पूर्वीसारखं खूप खेळू, अंधळी कोशिंबीर, पकडापकडी. मुलामुलींच्या, वस्तूंच्या, प्राण्यांच्या नावांची अंताक्षरी पण खेळू. हल्ली माझ्याशी खेळायला कुणीच नसतं.
आजोबा, मम्माने आज काय काय बनवलं माहिती आहे. मम्मा म्हणाली तुझे आजोबा येणार आहेत, तुमच्या आवडीचे सांगून सगळं माझ्या पण आवडीच बनवलं मम्माने.
आज्जी खरचं सांगत होती, 'मम्मा-पप्पा खूप लाड करतात माझे, माझी खूप काळजी घेतात. दिवसरात्र, मम्मा आपल्या बाळांचा विचार करते, म्हणून मग आपण मोठ्ठ झालो की मम्मा-पप्पाची खूप काळजी घ्यायची, आबा तुम्ही नेहमी म्हणायचात, 'मी मोठा झालो ना की, मी पण मम्मा पप्पाची खूप काळजी घेईल. त्यांना त्यांच्या आवडीचं जेवण बनवून देईल. प्रॉमिस पक्क प्रॉमिस."
रियानचं बोलणं, निखिल पडद्याआडून ऐकत होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रुंच्या धारा बरसत होत्या. ज्या गोष्टी या एवढ्याशा जीवाला उमगल्या होत्या त्या आपल्याच आईवडिलांच्या बाबतीत त्यांच्या पोटच्या पोराला उमगू नये. त्याला त्याचीच लाज वाटली.
निखिलला आठवलं, बाबांच्या आजारपणात, बाबा सतत खोकत रहायचे. रात्री खोकला जरा जास्तच जोर धरायचा. वाफारा दे तर छाती शेक. रात्रभर आईची स्वयंपाक घरात खाडखुड सुरु असायची. नेमकी किर्तीची झोप खोळंबली की मग ती खूप चिडचिड करायची.
खूप औषध केले, मात्र गुण येतच नव्हता. अखेर रियानला पाळणाघरात ठेवावं लागलं. आई आता पूर्णवेळ बाबांकडे लक्ष द्यायची, त्यामुळे आईची स्वयंपाकघरात मदत होतं नव्हती. मग कीर्तीची चिडचिड व्हायची, कीर्ती भांडे आपटायची, नाही नाही ते बोलायची, वैताग वैताग आला होता नुसता.
आईबाबांना दादाकडे नेऊन द्यायचं म्हटलं तर वहिनीही ठेवून घ्यायला तयार नव्हती. 'आमच्या संसाराची घडी नीट बसली आहे म्हणे, आम्हाला आता नकोय कुणाचीच लुडबुड.' ताई झाली सासूरवाशीण, अखेर एक निर्णय घेतला....
निखिल ढसाढसा रडू लागला. काय झालं? किर्ती बेडरुममधून बाहेर आली. अरे काय झालं? कशाला रडतोयस?
"अग हे आपलं इवलसं रोपटं, ज्याला आपण संस्कारांच खतपाणी घालून, चांगला माणूस बनवायला निघालोय आणि स्वत: मात्र कसे वागतोय!
हे आपलं छोटसं कोकरू, आपला शेवटपर्यंत सांभाळ करण्याचं वचन देवून बसलाय, त्याच्या आबांना आणि आपण." तो पुन्हा रडू लागला.
"आपल्या लेकराच्या भवितव्यासाठी मेहनत करतो, दिवस रात्र एक करतोय, त्याचं भविष्य secure व्हावं म्हणून झटतोय. आईवडील म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना, ज्यांनी आपल्या आयुष्याचा कण अन् कण आपल्यासाठी वेचला त्यांनाच आपण दुर्लक्षित करतोय.
लाज वाटतेय गं! आज खरचं लाज वाटतेय. साग्रसंगीत जेवणाचा थाट केला, मरणोपरांत सगळे सोपस्कार पार पाडले. पण जिवंतपणी काय देतो आहोत आणि काय दिलं. साधं त्यांच्या आवडीचं खाऊ शकतील एवढी मुभा आपल्याकडून त्यांना न मिळावी.
तू एक परकी, पण मी तर त्यांच्या पोटचा पोरगा होतो ना! असा कसा मी वहावलो गेलो?? आपल्या संसाराचा विचार करताना, त्यांना असा कसा विसरु शकतो, मुळात माझ्यामधून मी त्यांना वजाच कसा करु शकतो??
आपलं हे कोकरू डोळ्यासमोर नसलं की, मन कससं होतं. आठ वर्षाच्या आपल्या पोटच्या पोराचा एवढा जिव्हाळा आणि ज्यांनी दिवसरात्र खस्ता खालल्या, एकवेळ स्वत: उपाशी राहून मला भरवलं.
माझ्या भविष्यासाठी, माझ्या चांगल्यासाठी, मी एक चांगला माणूस बनावा यासाठी आयुष्यभर झटले आणि त्यांच्याप्रती माझं कर्तव्य, हे पात्र पुजण्यापुरतं मात्र!" निखिल रियानजवळ गेला, त्याला पकडून खूप रडला..
"अरे पण ते आपल्या मर्जीने, कुणालाच काही न सांगता गेले, कीर्ती सारवासारव करत बोलत होती." निखिलने तिच्याकडे डोळे वटारुन पाहीलं.
"गप्प बस, त्यांना बाहेर पडण्यासाठी भाग तर आपणच पाडलं ना!" त्याला ओरडून सांगायचं होतं, पण तो गप्पच बसला. आता त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग पण नव्हता.
किर्तीलाही आता अपराधी असल्यासारखं वाटलं. आपल्या नव-याने आपल्यावर प्रेम करावं त्याने आपल्या इच्छा अपेक्षा जपाव्या, मात्र त्या जपताना, त्याने त्याच्या आईवडिलांना दूर लोटावं हे कित्ती चूकीचं होतं, तिला उमगलं.
आपल्या लाडक्या लेकाला रियानला, उदया त्याची बायको आणि आपल्यात कोण्या एकाची निवड करायची वेळ आली तर! विचार करुनच तिच मन सुन्न झालं.
लग्न होऊन मी सासरी आली, ज्यांनी आपला कर्तृत्ववान लेक मोठ्या मनाने माझ्या पदरात टाकला आणि त्यांची ही अशी दयनीय अवस्था माझ्यामुळे. तिच्या या अपराधासमोर, रीतिभातीला मान देत, तिने केलेला साग्रसंगीत स्वयंपाकाचा थाट तिला अगदीची शुल्लक वाटला.
तिची नजर सास-यांच्या फोटोकडे गेली अपराधीपणाच्या भावनेने तिची नजर शरमेने झुकली. तिचीच तिला लाज वाटली..
"चल निघतोय मी, यायचं असेल तर तू ये, नाहीतर नाही आलीस तरी चालेल, पण उशीर झालाय पहिलेच, मी निघतोय" म्हणत डोळे पुसतच त्याने कारची चावी घेतली, सोबत रियानला घेतलं. आता तो निघाला होता. वृद्धाश्रमात राहाणा-या त्याच्या आईला आणायला.
कित्ती खरयं ना!! कमी जास्ती प्रमाणात, अनेक घरात ही अशी परिस्थिती बघायला मिळते.
आपल्या वागणुकीचा, बोलण्याचा वयो वृध्द आईवडिलांवर सासू सासऱ्यांच्या मनावर काय परिणाम होईल असा विचार कुणी करतच नाही. नकळत ते खूप खूप दुखावले जातात.
गेल्यानंतर मात्र त्यांच्या नावाचा साग्रसंगीत स्वयंपाक, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडदान करतो, घास टाकतो..
पण खरचं, जीवंतपणी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहणे त्यांची काळजी घेणे. त्यांची सेवा करणे, त्यांचं हवं नको ते बघताना, मान तृप्त होईल तेवढं, खाऊ पिऊ घालले, एवढं पुरेसं नाही का!! खरंच विचार करायला लावणारा विषय..
सगळेच मुलगा सून वाईट असतात. किंवा सगळेच आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. असं माझं मुळीच म्हणणं नाही. हिंदू धर्म प्रथा परंपरांच्या विरोधात मी मुळीच नाही. तो आपल्या संस्कारांचा विषय. पण म्हाता-या आईवडीलांच्या चेह-यावर आपल्या लेकराबाळांच्या नातवासुनांच्या गोतावळ्यात दरवळणारं सुखं समाधानाचं निर्व्याज हसू. त्यांच्यासोबत निरंतर सोबत रहावं, हे त्या संस्कारांच एक भाग नसावा का?
आईवडील ही कोप-यातली अडगळ नाही तर हळव्या मनाच्या कोप-याचा खूप महत्वपूर्ण हिस्सा असावा. उशीर होण्यापूर्वी कर्तव्यपूर्तीची जाणीव. हेच संस्कारांचे फलित. बाकी सगळेच सोपस्कार फक्त..
©® शुभांगी मस्के
सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
