©® सौ.हेमा पाटील
"अरे यार,अपना तो खुदका फंडा है ! मैं तो अपने मर्जी की मालिक ! कोई रुठे या खुश हो मुझे फर्क नहीं पडता " हे अर्पिताचे नेहमीचे वाक्य ऐकून मनालीने डोक्यावर हात मारुन घेतला.
"तू तो कभी सुधरेगी नहीं "|
हे ऐकून अर्पिता हसली व म्हणाली, "वत्सा,तू पण माझे तत्वज्ञान समजून घे, आयुष्यात सुखी होशील "
यावर काही न बोलता मनालीने तिला कोपरापर्यंत हात जोडले व दोघींनी पुढ्यात आलेल्या सुप्रसिद्ध वैशालीच्या स्पेशल डोशावर ताव मारायला सुरुवात केली.
दोघीही कम्प्युटर इंजिनीअरिंगच्या लास्ट ईयरला होत्या.दोघींचेही एकाच प्रतिथयश साॅफ्टवेअर कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये थर्ड ईयरला असतानाच सिलेक्शन झाले होते. शिक्षण पूर्ण होण्याच्या आतच हातात जाॅब असल्याने त्या अगदी रिलॅक्स होत्या.
विशाल त्यांचा क्लासमेट होता व अर्पिता आणि मनालीचा तो क्लोज फ्रेंड होता.
बऱ्याचदा हे त्रिकुट सोबत असायचे, पण आज विशाल नव्हता आणि त्यामुळे त्याच्याच विषयी मनाली अर्पिताला सांगत होती की, त्याच्या नजरेतून अन् वागण्याबोलण्यातून जाणवते की तो तुझ्या बाबतीत सिरीयस आहे. अन तू मात्र त्याच्या मनाचा अजिबात विचार न करता त्याला कसेही बोलून त्याची, त्याच्या निर्मळ भावनांची चेष्टा करत असतेस. यावर अर्पिताने वरचा आपला नेहमीचा फंडा सांगितला होता...
तिच्यासाठी आयुष्य हे मौजमजा करण्यासाठी आहे, फक्त स्वतः साठी जगण्यासाठी आहे. कुठे यात हे प्रेम अन् जोडीदार आणायचे? मस्त जाॅब पटकवायचा,सगळे जग फिरायचे,अन् ऐशमध्ये रहायचे हे तिने कधीच मनाशी ठरवून टाकले होते.
आज्जी,मम्मी किचनमध्ये थोडेतरी कामचलाऊ स्वयंपाक शिक म्हणून मागे लागायच्या पण ही ढम्म म्हणत नसे. साधा कुकरही कधी लावत नसे.
चुकून कधी हिने चहा केलाच तर तो पिणे ही सर्वांना शिक्षाच वाटे. आज्जी कितीदा तरी चहा साखरेचे प्रमाण सांगायची,पण ते ही बहाद्दर कुठले लक्षात ठेवायला !
मनाली मात्र अगदी दुसरे टोक होती. स्वयंपाकघरात तर ती मम्मीला मदत करायचीच,पण त्यासोबतच ती रोजच्या स्वयंपाकासोबत विविध प्रकारचे पदार्थ करण्यातही एक्स्पर्ट होती.
अर्पितासाठी ती नेहमी डब्यातून असे काही वेगळे बनवले की आणायची. अनेकदा विशालही चव चाखायला असायचा. दोघेही मुक्तकंठाने मनालीच्या सुगरणपणाची प्रशंसा करत.
लास्ट ईयर बघता बघता संपले,अन् मस्तपैकी सुट्टी एन्जॉय करत असतानाच कंपनीचे कन्फर्मेशन लेटर दोघींच्याही हाती पडले. पासपोर्ट काढण्यासाठी दोघींनीही एकाच वेळी अर्ज केला होता,एकाच दिवशी दोघींचा इंटरव्ह्यू झाला,अन् पासपोर्ट पोस्टाने रिसिव्ह झाला.
महिन्याभरात कंपनीत जाॅईन होण्यासाठी आॅफर लेटर हाती पडले, अन् अर्पिता एकदम खूश झाली. तिची अपाॅइंटमेंट लंडन येथे झाली होती. कंपनीला तिथे रिक्वायरमेंट होती. जणू दैव तिच्यावर खुश होते.
मनालीला पुण्याच्याच शाखेसाठी अपाॅइंट केले होते. मनाली हैदराबाद ला जावे लागले नाही म्हणून खुश होती,कारण बाकीच्या मैत्रिणींची हैदराबादला प्लेसमेंट झाली होती.
बघता बघता अर्पिताचा लंडनला जाण्याचा दिवस जवळ आला.
ती तर खरेदी अन् पॅकिंग यातच जाईपर्यंत बिझी होती. मनालीही तिच्या मदतीला जात असे. खरेदीही दोघींनी मिळूनच केली होती. आई,आज्जी महिनाभरात थोडेतरी स्वयंपाकघरात लक्ष दे,तुलाच तिथे उपयोग होईल असे दाताच्या कण्या करुन सांगत होत्या पण अर्पिताने ते मनावर घेतले नाही.
मी कशाला त्रास करुन घेऊ किचनमध्ये राबण्याचा ? आजकाल सगळे विकत मिळते...
मम्मी व आज्जी यावर न्यू जनरेशन म्हणत गप्प बसत.
एअरपोर्टवर मनाली सोबतच विशाल व इतर गृपमधील मित्रमैत्रिणी अर्पिताला निरोप देण्यासाठी आले होते.
गृपमधील फक्त अर्पिताच आऊट ऑफ इंडिया चालली होती.काहीजणांना तर जाॅबही मिळाला नव्हता,त्यात विशालही होता...
विशाल खूप अस्वस्थ आहे हे मनालीच्या लक्षात आले,पण विशालने कधीच स्पष्टपणे आपल्या मनातील भावना अर्पितासमोर व्यक्त केल्या नव्हत्या.
तो जाॅबची वाट पाहत होता, पण दुर्दैवाने अर्पिताचा जाण्याचा दिवस उजाडला तरी त्याच्या हाती एकाही कंपनीचा काॅल नव्हता.
त्यामुळे तो उदास होता.अर्पिताच्या टेक ऑफ घेतलेल्या विमानाकडे तो बराच वेळ हताशपणे पहात बसला. मनालीने त्याच्या खांद्याला धरून हलवले, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ते मनालीला दिसू नयेत म्हणून तो खाली वाकला व आपल्या शुजची लेस बांधू लागला.
विशालने कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरीही मनालीने ते अनमोल मोती ओघळताना पाहिले होते.तिला फार वाईट वाटले,पण अर्पिताचा स्वभाव तिला चांगलाच माहित होता.
चार दिवसांत मनालीचा जाॅब ही सुरु झाला.ट्रेनिंग पिरियड असल्याने कामाचे फारसे टेन्शन नव्हते.पण ती सिरीयसली सगळे समजून घेण्याचा प्रयत्न करत होती.तिचा स्वभावच होता तो !
विशाल,अर्पिता व अन्य गृपमधील फ्रेंड्स शी रोजच फोनवर बोलणे होई.
काॅलेजमध्ये असताना जे बाॅंडिंग तयार झाले होते,ते रोजच्या संपर्कामुळे अधिक घट्ट झाले होते, पण आता रोजच्या भेटीगाठी कुणालाच शक्य नव्हत्या.
आठवणी दाटून यायच्या पण हळूहळू कामाच्या व्यापात तेही कमी कमी होत गेले. मोबाईलवर संपर्कात तर सगळेच होते,पण त्यात पूर्वीची एनर्जी नाही हे समजत होते. यंत्रवत फोनवर बोलणे किंवा मेसेजेस सुरु असत.
विशालने जावा डाटा एन्ट्री च्या कोर्सला अॅडमिशन घेतले. विशाल,मनाली अन् अर्पिताचा कधीकधी विडिओ काॅल व्हायचा.
तिघे तीन ठिकाणांहून एकत्र असल्याचा फिल घ्यायचे.
अर्पिता एकदम खुश होती.दर शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी ती निसर्गरम्य परिसरात फिरायला जायची.
तेथील फोटो आवर्जून गृपवर टाकायची. आपल्या प्रिय मैत्रिणीला जे हवे होते ते उपभोगता येतेय याचा मनालीला आनंद व्हायचा,पण त्यानंतर तिला विशालच्या त्या अनमोल मोत्यांची आठवण व्हायची अन् तिला वाईट वाटायचे...
विशाल ते फोटो पाहून फक्त एक सुस्कारा सोडायचा. कारण मनातील भावना त्याने अर्पितापाशी कधीच उघड केल्या नव्हत्या.
अन अर्पिताचा स्वभाव चार वर्षांत त्याने ओळखला होता.
कोर्स पूर्ण झाला की विशालला जाॅब मिळाला.
त्याच्या सेलिब्रेशनसाठी त्याने गृपवर रविवारी आपण सारे एकत्र येऊयात का अशी नोट टाकली. पण एव्हाना सगळेजण आपापल्या कामात एवढे बिझी झाले होते की, मनाली सोडता कुणीच येण्यासाठी उपलब्ध नव्हते.
मनालीला त्याने विचारले, कुणीही आले नाही तरी तू तरी येशील ना ! मनाली पटकन म्हणाली, नक्कीच येणार ! नात्यांचे महत्व मनाली जाणतही होती अन् नाती सांभाळण्यासाठी ती कायमच प्रयत्नशीलही असायची.
रात्री बुक केलेल्या टेबलवर सूप घेत घेत ते दोघे अर्पिताविषयी बोलत होते. ते दोघेही अर्पिताला खूप मिस करत होते.
मनालीने अर्पिताला काॅल ही केला,पण तिने रिसिव्ह केला नाही. मेनकोर्स मागवताना विशालने मनालीकडे मेनूकार्ड दिले.
पण तिने तूच मागव काहीही असे सांगितले. यावर विशालने ज्या डिश आॅर्डर केल्या , ते सगळेच्या सगळे अर्पिताचे आवडते पदार्थ होते,अगदी रुमाली रोटी ही...
ये दिल की लगी है..या मुघले आझम मधील गाण्याने तिच्या मनात फेर धरला, विशालच्या हृदयात आजही अर्पिता खोलवर भरुन राहिली आहे याचा तिला पुनः प्रत्यय आला.
पुढ्यात आलेल्या जेवणाचा आस्वाद घेताना आज एक वर्ष होऊन गेले तरीही विशालच्या मनावरील अर्पिताचे गारुड अजूनही तसेच टिकून आहे हे लक्षात आल्याने मनाली अस्वस्थ झाली.
अर्पिताने निवडलेल्या रस्त्याला परतीचा मार्ग नाही हे मनाली ओळखून होती,तसेच आपल्या मैत्रिणीला ही ती चांगलेच ओळखत होती.
पण संवेदनशील विशालने आता यातून बाहेर पडले पाहिजे असे तिला प्रकर्षाने वाटले.पण आपण काय करणार?
विशालने तर आपल्याजवळही कधी अर्पितावरील प्रेमाची कबुली दिली नाही,तर आपण यात कसा हस्तक्षेप करु शकतो असे उलटसुलट विचार तिच्या मनात फेर धरत होते.या विचारांसोबतच दोघांचे जेवण आटोपले व विशालला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मनाली बाहेर पडली.
काळ कुणासाठीच थांबत नाही. भलेबुरे सगळे सोबत घेऊन तो आपल्या गतीने चालतच असतो. मध्यंतरी एकदा अर्पिता भावाच्या लग्नासाठी पंधरा दिवस भारतात येऊन गेली.
तेव्हा मनाली नेमकी तिच्या प्रोजेक्ट साठी कंपनीतर्फे यु.एस.ला सहा महिन्यांसाठी गेली होती, त्यामुळे दोघींची भेट झाली नाही.
विशाल अर्पिताला भेटण्यासाठी बंगलोरहून आला होता,पण ती भेट जुजबीच झाली. मनालीला फार वाईट वाटले की, आपण तेथे असतो तर काहीतरी घडले असते...पण नियतीचीच इच्छा तशी नसावी बहुतेक!
मनाली यु.एस.ला असतानाच मोहितशी तिची ओळख झाली. मोहितही पुण्याहून एक वर्षाच्या प्रोजेक्ट साठी आला होता.
दोघेही पुणेकर असल्याने परदेशात आपले जवळचे कुणीतरी भेटल्याचा फिल दोघांनाही आला. मनाली प्रथमच एवढ्या मोठ्या कालावधीसाठी घरापासून एवढी दूर आली होती, त्यामुळे होमसिक झाली होती, मोहितची अवस्था ही वेगळी नव्हती.
लंच,डिनर व ब्रेकफास्ट कंपनी थ्रू होता. पण रोज रोज ते बेचव,अळणी पदार्थ ब्रेडसोबत खाऊन मनालीला आठपंधरा दिवसांतच कंटाळा आला.
तिच्या रहाण्याच्या ठिकाणी गॅस होताच..मग तिने इंडियन स्टोअर जवळपास कुठे आहे हे सर्च केले व रविवारी ती तिकडे गेली.
तिथे गव्हाचे पीठ उपलब्ध आहे हे पाहून तिला खूप आनंद झाला गरजेच्या अन् उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टी घेऊन ती स्टोअरच्या बाहेर पडत होती तर ऐ..हाय मनाली ! ऐकू आले.
समोर पहाते तर मोहित ! त्याचीही अवस्था मनालीसारखीच झाल्याने तो ही तिथे काही इंडियन मिळतेय का हे पहाण्यासाठी आला होता.
तो काॅलेजमध्ये असतानाच आईने त्याला थोडाफार स्वयंपाक बनवायला शिकवले होते. पोळी,भाजी,आमटी,भात तो बनवू शकत असे.
मनालीच्या मदतीने त्यानेही तिथे खरेदी केली अन दोघेही मनालीच्या रुमवर आले.
मनालीला सोडून तो निघणार एवढ्यात मनाली म्हणाली,थांब मोहित,मी काहीतरी बनवते,खाऊनच जा.
नेकी और पूछ पूछ..तोही थांबला .
मनालीने गरमागरम चपात्या,डाळीचे वरण,बटाट्याच्या काचर्या असे साधेसेच जेवण बनवले व दोघांनाही वाढून घेतले.
खूप दिवसांनी पुढ्यात आलेल्या भारतीय जेवणाच्या वासाने मोहित खुश झाला व मनालीच्या हातच्या चविष्ट जेवणाने तृप्त झाला. जेवल्यावर अन्नदाता सुखी भव ! हा आशिर्वाद द्यायला विसरला नाही.
या प्रसंगामुळे त्या दोघांमधील औपचारिकता दूर होऊन ते अधिक मोकळेपणाने बोलू लागले.
दर शनिवारी रविवारी आलटून पालटून एकमेकांच्या घरी जेवण बनवणे ही नित्याचीच बाब झाली.
अन या संपर्कामुळे एकमेकांविषयी अधिक माहिती समजली. एकमेकांचे गुण-दोष , स्वभाव एकमेकांना समजत गेले.दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडू लागला होता.
एकमेकांची सवय झाली होती. दोघांनाही आपण एकमेकांना आवडत आहोत हे समजले. पण आवडणे म्हणजे प्रेम नव्हे असे मनाली समजत होती.
आणि अशा अवस्थेतच तिच्या प्रोजेक्टचे सहा महिने संपत आले. पुढच्या आठवड्यात तिला भारतात परतायचे होते.तिचे तिकीटही आले होते. तिच्या मात्र एका डोळ्यात हसू अन् एका डोळ्यात आसू होते.
भारतात कधी परत जातोय असे तिला झाले होते,पण तिला आता मोहितपासून दूर जाण्याचा विचारही त्रास देत होता.
आपण प्रेमात पडलो आहोत का? असे मनालीला वाटू लागले. पण तसे काही नसावे. इथे परदेशात होमसिक झाल्यानंतर मोहित भेटला, त्यामुळे आपण अधिक जवळ गेलो पण त्याच्याही वागण्याबोलण्यात कधीच तसे जाणवले नाही असे म्हणत तिने आपल्या मनाची समजूत काढली.
कारण विशाल अन् अर्पिताच्या अधुर्या प्रेमकहाणीची ती साक्षीदार होती. त्यामुळे मोहितच्या मनातील भाव आपल्यापासून लपून राहिले नसते असे तिला वाटले.
मनाली जाणार म्हणून मोहितही अस्वस्थ झाला होता.
त्याला समजले होते की, आपल्याला मनाली आवडते.आपली लाईफ पार्टनर अशीच असावी हे आपले स्वप्न मनाली पूर्ण करु शकते.
पण मनालीला आपण आवडतो का हेच त्याला कळत नव्हते.
समोरासमोर मनालीला विचारण्याचे धाडस आपण केलेच पाहिजे, नाही तर एकदा ती इंडियाला गेली की,ते शक्य नाही हे समजून तो संध्याकाळी मनालीकडे गेला. पण तिच्याशी याबाबत बोलण्याचे त्याचे धाडस झाले नाही .
अशातच मनालीचा जायचा दिवस उजाडला.तिला एअरपोर्टवर सोडायला मोहित गेला, तेव्हा...
खूप विचार करून त्याने एक पत्र लिहिले होते ,मनाली,मला तू फार आवडतेस.माझी लाईफ पार्टनर होशील का? हे पत्र अन् एक गुलाबाचे फुल त्याने तिच्या हातात ठेवले.
तिने ते पर्समध्ये ठेवले व मोहितला बाय करुन ती विमानाकडे रवाना झाली. सीटवर बसल्यावर तिने पर्समधील ते पत्र काढले व उघडले,ते वाचून तिला क्षणभर काय करावे तेच सुचेना.
आपण हे पत्र एअरपोर्टवर असतानाच का उघडले नाही याचा तिला राग आला.
पण दुसऱ्याच क्षणी ती सीटवरुन उठली व विमानाच्या दाराकडे निघाली. माणसे आत येत होती,अन् ही वेगाने पत्र हातात धरून बाहेरच्या दिशेने जात होती.
ती बाहेर पडत एअरपोर्टवर आली, जिथे मोहितला तिने बाय केले होते, तर तिच्या अपेक्षेप्रमाणे मोहित तिथेच खुर्चीवर डोके खाली घालून बसला होता.
तिने हळुवारपणे त्याच्या केसांवरुन हात फिरवला.अचानक झालेल्या स्पर्शाने चमकून कोण आहे हे पहाण्यासाठी मोहितने तोंड वर केले,तर समोर मनाली उभी होती.
अन मनालीला त्याचवेळी मोहितच्या गालांवर ओघळलेले अश्रू दिसले. ते अनमोल मोती आपल्या बोटांनी टिपत तिने ते पत्र त्याच्या हातात ठेवले व त्याने दिलेल्या गुलाबाच्या फुलावर आपले ओठ टेकवले अन् त्याला म्हणाली,तू इतकाही उशीर केला नाहीस की,मी कधीच परतू शकले नसते....
मोहित याचा अर्थ न कळून तिच्याकडे पहात राहिला अन् तिने ते गुलाबाचे फुल त्याच्या समोर धरले...दोन वेडे जीव एका गुलाबाच्या सुवासासोबत मनाने एक झाले होते..
त्यांची कथा तर सुरू झाली होती , पण... त्याचवेळी तिच्या मोबाईलवर अर्पिताचा फोन आला ,
'मनाली ,तुला एक गुड न्यूज द्यायची आहे , विशाल आणि मी एकमेकांच्या सोबतीने आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे...मी भावाच्या लग्नाला गेले होते तेव्हा विशाल खास मला भेटायला बेंगलोर हून आला होता. तिथे असताना तुझे बोलणे मी कधीच सिरीयसली घेतले नव्हते ,पण आता त्याला भेटल्यावर त्याच्या डोळ्यात मला जाणवली ती ओढ..ते माझ्यावरचे प्रेम!
आजवर मला माझ्या पलिकडील काहीच दिसत नव्हते,पण परदेशात इतके दिवस एकटी राहिले तेव्हा कॅंपॅनियनची गरज जाणवली अन् तेव्हा विशालचाच चेहरा नजरेसमोर आला.
गेले सहा महिने आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत ,अन् आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे हे सर्वात आधी तुलाच कळवतेय.
एकाचवेळी मनालीच्या डोळ्यांत हसू आणि आसू आले,ते लपवण्याचा तिने अजिबात प्रयत्न केला नाही ...
इति हेमा उवाच
©® सौ. हेमा पाटील.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
