देवता


©® राधिका जोशी.




एरवी काहीसा साधा भासणारा पत्रकार भवनचा भव्य हॉल आज मात्र अगदी नव्या रुपात झळाळून गेला होता. सगळीकडे सुगंधी फुलांच्या आणि लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या माळा लटकत होत्या. 
हॉलच्या मध्यभागी, छतावर विराजमान असणारे मोठे झुंबर त्याच्या पूर्ण तेजानिशी लखलखत होते, ज्याचा वापर एरवी फार क्वचितच केला जायचा. पं
डीत शिवकुमार शर्मा यांच्या संतुरच्या स्वर्गीय सुरांनी, सगळं वातावरण कसं भारुन टाकलं होतं.
आज झाडून सगळ्या वर्तमानपत्रांचे पत्रकार प्रतिनिधी हजर होते. नेहमीसारखी ठराविक पठडीतली परिषद आज नव्हती. सगळ्यांची उत्कंठा ताणून धरणारंच निमित्त आज होतं.

पुरातत्व विभागाचा अगदी तरुण, डॅशिंग अधिकारी, निखिल आणि त्याच्या टीमने उत्तरप्रदेशातील, दुर्गम भागातील एका जीर्ण, पडक्या विहिरीतून, खोल गाडली गेलेली अतिशय दुर्मिळ मूर्ती हस्तगत केली होती. निखिलचा पुरातत्वशास्त्राचा अभ्यास जबरदस्त होता. शिवाय कुठलीही रिस्क घेताना तो अजिबात मागेपुढे बघत नसे. त्याच्या अचूक अंदाजाचा आणि निडर स्वभावाचा त्याच्या टीममधल्या लोकांना नेहमी फायदाच होत होता. 
अंकुश, चेतन आणि संजना असे तिघे त्याच्याबरोबर काम करत होते. निखिल त्यांचा टीम लीडर होता.

आत्ताची त्यांची मोहिमही अजिबात सोपी नव्हती. एक तर त्या इतक्या पडझड झालेल्या विहिरीत काही सापडेल असं निखिल सोडून कोणालाही वाटत नव्हतं. 
बाकीचे टीम मेंबर्स आणि निखिलच्या वरचे अधिकारी, सगळ्यांना निखिलचा हा निर्णय तद्दन मूर्खपणाचा वाटत होता. पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. 
ढगफुटीसदृश झालेला पाऊस, क्षणाक्षणाला ढासळणारं विहिरीचं बांधकाम, आळीपाळीने सगळ्यांना सणकून भरलेला ताप या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता सतत बारा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही मूर्ती त्यांना सापडली होती. 

बऱ्याच मूल्यांकनानंतर आज सर्वांसमोर ती मूर्ती आणण्यात येणार होती.
आत्ता हॉलच्या मध्यभागी ती मूर्ती एका सुशोभित टेबलावर विराजमान होती. साधारण दीड फूट उंचीची पितळेची वाटणारी ही मूर्ती कुठल्यातरी देवी-देवतांची वाटत होती. 
तिच्या एका हातात कमळ आणि एका हातात त्रिशूळ होता. 
काळाच्या खुणा उमटल्या असल्या तरीही त्या मूर्तीत अशी काही चुंबकीय शक्ती होती, की नजर परत-परत तिच्याकडेच वळत होती.

एवढ्यात निखिल आणि त्याची टीम हॉलमध्ये प्रवेशली. निखिलच्या डोक्याला बँडेज बांधलेलं पाहून सगळे आपसांत कुजबुजायला लागले. तेवढ्यात निखिलने बोलायला सुरुवात केली.
"नमस्कार पत्रकार मित्रमैत्रिणींनो! आज आवर्जून सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आभार. ही जी मूर्ती आम्हाला उत्खननात सापडली आहे, ती माझ्या अभ्यासानुसार दहाव्या शतकातील, राजा हर्षवर्धनच्या काळातील आहे. नक्की कुठल्या देवतेची आहे त्याचा स्टडी करणं चालू आहे. पण लवकरच ते मी शोधून काढीन. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याचं मूल्य किती आहे त्याच्याशी मला कर्तव्य नाही, पण ही मूर्ती आपल्या ऱ्हास पावलेल्या पुरातन संस्कृतीची एक निर्देशक आहे. त्यामुळे ती अमूल्य आहे. माझा पूर्ण अहवाल तयार होईपर्यंत ती आमची जोखीम राहील. नंतर...."

अचानक, निखिलच्या दिशेने त्याच्या डोक्यावरचं झुंबर वेगाने आवाज करत खाली आलं. 
काय घडतंय त्याचं आकलन व्हायच्या आत एका तरुणीने निखिलला बाजूला ढकललं. तोपर्यंत ते झुंबर खाली कोसळून त्याचा चक्काचूर झाला होता. 
निखिलसकट सगळे अवाक होऊन नुसते पहात उभे राहिले असताना एक धोतर घातलेला म्हातारा माणूस अचानक तिथे प्रविष्ट होऊन विचित्र हातवारे करत ओरडायला लागला, "कोप, कोप झालाय त्या देवतेचा. इतकी वर्षं निद्रिस्त असलेल्या देवतेला तुम्ही जागवलंय, तेसुध्दा तुमच्या स्वार्थासाठी. आता अनर्थ होणार." निखिलच्या बँडेजकडे निर्देश करत तो पुढे बोलायला लागला, "डोक्यावर मोठी दगडी चिरा कोसळून जखम झाली तरी तुम्ही तिच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलंत. आता विनाश अटळ आहे."

निखिल अक्षरशः बधीर झाल्यासारखा उभा होता. कितीही डॅशिंग असला तरी मृत्यूचं इतकं जवळून दर्शन कोणालाही हादरवून टाकणारच ना. 
चक्रावून टाकणारी अजून एक बाब म्हणजे, त्याच्या डोक्याला झालेली जखम कशामुळे, ते टीम मेंबर्स सोडून कोणालाच माहिती नव्हतं. ते या माणसाला कसं काय समजलं? इतरवेळी अगदी फटाफट आणि योग्य निर्णय घेणारा निखिल आत्ता मात्र खरंच अवाक झाला होता.
एवढ्यात सिक्युरिटीचा माणूस पुढे धावला आणि त्याने त्या आगंतुक धोतरवाल्याची जवळपास उचलबांगडी करुन त्याला बाहेर काढलं.

आता सगळे भानावर आले आणि निखिलपाशी धावले. एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती सुरु झाल्यावर निखिलने हातानेच सगळ्यांना थोपवले. 
उत्खननाच्या सुरुवातीपासून ते त्याच्या डोक्याला झालेल्या जखमेपर्यंत सगळा प्रवास त्याने सर्वांसमोर उलगडून दाखवला. अर्थातच त्यात लपवून ठेवण्यासारखं काही नव्हतंच. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या मूर्तीचं मूल्य बरंच असू शकेल अशी शक्यता त्याने वर्तवली. त्यामुळे ती मूर्ती सर्वार्थाने अनमोल होती. 
लवकरच निखिल तिचा अभ्यास पूर्ण करुन तिला आपल्या गव्हर्नमेंटच्या ताब्यात देणार होता.

हळूहळू सगळे पत्रकार अल्पोपहाराचा आस्वाद घेण्यासाठी पांगले. 
निखिलला आता उत्सुकता होती ती, मगाशी त्याला बाजूला ढकलून त्याचा जीव वाचवणारी तरुणी कोण ह्याची. तिचा चेहरा त्याने पाहिला असल्याची शक्यता अजिबात नव्हती.
त्यामुळे त्याने त्याच्या टीम मेंबर्सना मग जवळ बोलावलं.
सगळे त्याच्याजवळ येऊन त्याला मगाशी काही इजा वगैरे झाली नाही ना ह्याची चौकशी करायला लागले.

निखिलने त्यांना विचारलं, "तुमच्यापैकी कोणी त्या मुलीला पाहिलंत का? मी तिचे साधे आभारही मानले नाहीत. काय चाललं आहे त्याचं आकलन होईपर्यंत ती कुठे गेली कळलंच नाही."
संजना त्याला म्हणाली, "तिच्या गळ्यातलं आयकार्ड..मला वाटतं, नवभारत टाईम्सचं होतं. माझ्या शेजारीच बसली होती ती. पण अगदी निरखून तिचा चेहरा किंवा आयकार्ड काही मी पाहिलं नाही.
अचानक तिला तुझ्या दिशेने धावलेलं पाहिलं.आता तिला आठवायचा प्रयत्न करते आहे, पण का कोण जाणे, तिची धूसर प्रतिमाच डोळ्यापुढे येतीये."

अंकुश मग म्हणाला, "मी पण तेच सांगणार होतो. काही केल्या तिचा चेहरा नजरेसमोर येतच नाहीये. खरंतर तो चेहरा विसरण्यासारखा नाहीच. अतिशय रेखीव, एखादं शिल्पं असावं अशी होती ती. त्यामुळे अधूनमधून माझं लक्ष आपोआप तिच्याकडे जात होतं."
चेतन अंकुशला चिडवत म्हणाला, "मुलींवर बारीक लक्ष ठेवायची कॉलेजमधली तुझी जुनी सवय अजून टिकून आहे तर."
"त्याला इलाज नाही बाबा, आदतसें मजबूर."
अंकुशनेही नाटकी आविर्भाव करत प्रत्युत्तर दिलं.

"तुम्ही मला भेटायला उत्सुक आहात का?"
अशी, अतिशय मंजुळ आवाजात विचारणा झाली. क्षणभर मंदिरातल्या घंटा किणकिणल्याचा भास झाला सर्वांना. मागे वळून पाहिल्यावर निखिलचा जीव वाचवणारी ती तरुणी उभी असलेली दिसली. 
निखिल घाईघाईने पुढे झाला आणि अगदी मनापासून तिचे आभार मानले. 
तिच्या अद्वितीय सौंदर्याने सगळ्यांवर जणू मोहिनी घातली होती. सगळे एकदम चिडीचूप उभे होते. तिनेच आपणहून बोलायला सुरुवात केली, "मी आदिती. नवभारत टाईम्समध्ये चीफ रिपोर्टर आहे. आजचं हे सेशन आमच्या सगळ्यांच्या न्यूजपेपरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असणार होतं. आता तर झुंबराची घटना इतकी सनसनाटी ठरणार आहे की झाडून सगळ्या पेपरमध्ये, तिखटमीठ लावून छापली जाणार आहे. निखिल सर, मी सांगते, आता तुम्हाला त्या मूर्तीपेक्षाही जास्ती प्रसिध्दी देतील सगळे."

निखिल अगदी मनापासून म्हणाला, "छे, छे! मला कुठल्याही प्रसिद्धीचा हव्यास नाही. पुरातन संस्कृतीचे अवशेष शोधून त्यांचा अभ्यास करणं, ही माझी पॅशन आहे. आपला संपन्न वारसा, जो काळाच्या ओघात खोल कुठेतरी लुप्त झालाय, तो शोधून त्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी, केवळ हाच माझा उद्देश आहे."
आदिती म्हणाली, "आपल्या आकलनापलीकडच्या निसर्गातील काही काही शक्ती, ज्या निद्रिस्त आहेत, त्यांना उगीचच डिवचू नये, अश्या मताची मी आहे. माझे वडील इतिहाससंशोधक होते. त्यांचे बरेच संदर्भग्रंथांचे ठोकळे आमच्या घरी आहेत. सुरुवातीला मला, त्यांचे अभ्यासाचे विषय खूप रुक्ष वाटायचे. पण ते आम्हां घरातल्या लोकांना खूप मनोरंजक पद्धतीने त्यांच्या कामाविषयी सांगायचे. मी हळूहळू त्यांचे ग्रंथ वाचायला लागले आणि मला या विषयात थोडी रुची उत्पन्न झाली. त्याच आधारे मला असं वाटतं, काही गुपितं ही तशीच अलवार जपावी. तेच हिताचं आहे."

खरंतर निखिलला तिचं हे म्हणणं अजिबात पटलं नव्हतं, पण तो डिबेट वगैरे करायच्या मनःस्थितीत होता कुठे? आदितीच्या गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात तो कधीच हरवून गेला होता. 
संजनाच्या हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिच्या संतापाचा पारा झर्रकन वर चढला. ती मनोमन निखिलवर बेहद्द प्रेम करत होती. अजून तिने आपल्या प्रेमाची कबुली त्याला दिली नव्हती. शिवाय त्याच्या मनाचा कलही तिला समजत नव्हता. पण आत्ता त्याचं असं हरवून जाणं तिला खूप दुखावून गेलं. 
तिला मग हळहळ वाटत राहिली, की झुंबराची एवढी जीवघेणी ठरु शकणारी बाब आपल्या लक्षात आधी आली असती आणि आदितीच्या ऐवजी आपण धावलो असतो, तर निखिलच्या नजरेत कदाचित आपल्याविषयीचं प्रेम दिसण्याची शक्यता निर्माण झाली असती. 

पण विचार करताना तिला एकदम जाणवलं, आदिती जेव्हा निखिलच्या दिशेने धावली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असे भाव होते की जशी काही ही घटना तिला अपेक्षितच असावी. ती पळण्याच्या तयारीतच असावी असा काहीसा फील येत होता. या घटनेमागे काही गडबड तर नसावी?
संजनाने मान झटकून हे सगळे विचार बाजूला सारले. तोपर्यंत निखिल आणि अदितीने एकमेकांच्या फोन नंबर्सची देवाणघेवाण केली होती आणि आदिती सगळ्यांचा निरोप घेऊन निघाली होती.
दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात मूर्ती, झुंबर आणि निखिल.. बास, एवढीच चर्चा होती. 

झुंबर पडलं, हा खरंच अपघात होता का घातपात? निखिलच्या डोक्याची जखम आणि कालची घटना, यांचा काही संबंध आहे का? त्याला दगाफटका करण्याचा तर कोणाचा विचार नाही?
या आणि अश्या अनेक चर्चांना ऊत आला होता. पण खुद्द निखिलला यात अजिबात रस नव्हता. 
एकीकडे त्याचा मूर्तीविषयक अभ्यास जोरात चालू होता तर दुसरीकडे आदिती आणि त्याच्या गाठीभेटी पण जोरात चालू झाल्या होत्या. 
दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. संजना मात्र पार निराश झाली होती. एकाच टीममध्ये असल्यामुळे रोज निखीलशी बोलणं तर होत होतं. पण आता ती पूर्वीसारखी मनमोकळेपणाने त्याच्याशी बोलत नव्हती. 

तिचा तर कामामधला इंटरेस्ट पण कमी व्हायला लागला होता. निखिलला मात्र याची गंधवार्ताही नव्हती इतका तो कामात बुडून गेला होता. 
त्याच्या अभ्यासानुसार मूर्तीच्या हातात जे कमळ होतं, त्याच्या सगळ्या पाकळ्या भरीव आणि अस्सल सोन्याच्या होत्या. आत्ता मूर्ती इतकी काळवंडलेली होती की ही बाब कोणालाही अजिबात खरी पण वाटली नसती. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिचं मूल्य सहज कित्येक कोटी डॉलर्सच्या घरात गेलं असतं. 
असा चोरटा व्यापार करणाऱ्या स्मगलर्सना मूर्तीची इत्यंभूत माहिती नक्कीच मिळाली असणार. त्यामुळे आता तिला खूपच जपावं लागणार होतं.

सध्या निखिलला एक नवीनच डोकेदुखी झाली होती. तो त्या मूर्तीच्या संदर्भात जी काही माहिती रिसर्च करुन पेनड्राईव्हमध्ये कॉपी करुन ठेवत होता ती फाईल, कशी कोणास ठाऊक पण करप्ट होत होती. 
बॅकअपची फाईलसुध्दा गायब व्हायला लागली होती. त्यामुळे सगळ्या मेहनतीवर पाणी फिरायचं. एक्स्पर्ट टेक्निशिअन बोलवूनसुध्दा प्रॉब्लेम सुटला नाहीच. त्यामुळे निखिलचा रिसर्च सध्या मंदावला होता.
आदितीबरोबर एका कॉफीशॉपमध्ये बसलेला असताना त्याने ही बाब तिच्या कानावर घातली तेव्हा ती त्याला थोडीशी चाचरतंच म्हणाली, "निखिल, मी तुला कधीपासून सांगण्यासाठी धीर एकवटतीये. अर्थात हा माझा फक्त अंदाज आहे. पण तुझे टीम मेंबर्स मला तेवढे प्रामाणिक वाटत नाहीत. 

एकतर, कुठल्याही उत्खननाच्या मोहिमेचं सगळं श्रेय तुला मिळतं, अर्थातच तुलाच मिळायला हवं, पण ते कुठेतरी त्यांना खटकत असावं असं वाटतं. कदाचित.. तिघांपैकी कोणी मूर्तीच्या चोरट्या व्यापारातसुध्दा सामील असू शकेल."
" छे,छे! काहीतरीच काय तर्क लढवतेस आदिती. असं कोणी करत असेल अशी शंकासुध्दा घेऊ नकोस. सगळे अगदी जीवाला जीव देणारे आहेत."
" हे बघ, मला जे जाणवलं ते मी बोलले. शिवाय आपलं एकमेकांवरचं प्रेम बघून संजना दुखावली गेलीये. कारण तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. या अश्या गोष्टी आम्हां बायकांना लगेच जाणवतात आणि प्रेमात दुखावली गेलेली माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात. मी तुला फक्त सावध केलं. जरा लक्ष ठेव त्यांच्या हालचालींवर इतकंच."

निखिल घरी आला तो चांगलाच अपसेट होऊन. 
अजिबात पटत नसलं तरी आदितीवर अविश्वासही तो दाखवू शकत नव्हता. ती उगाच कशाला असं सांगेल? तिचा काय फायदा त्यात? खरंच काही तथ्य असेल तिच्या बोलण्यात? अश्या विचारांचं नुसतं काहूर माजलं होतं त्याच्या मनात.
दुसरे दिवशी अंकुश आणि चेतन त्याच्याकडे त्याच्या कारची किल्ली मागायला आले. मूर्तीच्या संदर्भातलंच काम होतं. तसे ते नेहमीच, काम असेल तेव्हा त्याची गाडी घेऊन जायचे. इतके दिवस निखिललाही त्यात गैर काहीच वाटत नसे. पेट्रोल अलाऊन्स त्यांच्या डिपार्टमेंटकडूनच मिळायचा. पण कालचं बोलणं आठवून निखिल त्या दोघांशी नेहमीसारखा बोलू शकला नाही. 

न बोलताच त्याने फक्त गाडीची किल्ली त्या दोघांना दिली. ते दोघेही घाईत असल्यामुळे लगेच निघाले. थोड्याच वेळात अदितीचा फोन आला म्हणून त्याने उचलला. पलीकडून ती गंभीर आवाजात बोलत होती, " निखिल एक वाईट बातमी आहे. आमच्या रिपोर्टरकडून मला समजली. चेतन आणि अंकुशच्या गाडीचा अपघात झालाय आणि दोघेही जबर जखमी झालेत. त्यांना सिटी हॉस्पिटलला हलवलंय."
" काय? निखिल जोरात किंचाळलाच.
" हे बघ, तू शांत रहा आणि लगेच आमच्या नवभारतच्या ऑफिसला ये. मग आपण दोघेही हॉस्पिटलमध्ये जाऊ. आमच्या ऑफिसजवळच झाला अपघात. त्यामुळेच मला लगेच बातमी कळली."

" आलो लगेच", एवढं कसंबसं बोलून निखिलने फोन कट केला. सुन्न झाला होता तो. आज आपण त्यांच्याशी साधं बोललोही नाही. कशाची शहानिशा न करताच त्यांना वाईट ठरवून मोकळे झालो, याचा त्याला पश्चाताप व्हायला लागला. 
हातापायातलं त्राणच गेल्यासारखं त्याला झालं होतं. तो जायला निघणार एवढ्यात पुन्हा मोबाईल वाजला. अनोळखी नंबर होता. त्याने उचलला, तेव्हा पलीकडचा माणूस म्हणाला,
" मी इन्स्पेक्टर सावंत बोलतोय. तुम्हाला आत्ता सिटी हॉस्पिटलला लगेच यावं लागेल. तुमची सहकारी संजना हिच्यावर विषप्रयोग झालाय. चॉकलेटमधून तिला विष दिलं गेलंय. तिच्या शेजारच्यांनी तिला ताबडतोब इथे आणल्यामुळे लगेच उपचार झाले.

त्यामुळे आता जीवावरचा धोका टळला आहे. ती आत्ता शुद्धीवर आल्यावर तिनेच तुमचा नंबर मला दिला आणि तुम्हाला बोलवून घ्यायला सांगितलं."
" ओ गॉड! हे काय चाललंय? कोण असं माझ्या टीम मेंबर्सच्या जीवावर उठलंय? पण तिला ती विषारी चॉकलेट्स दिली कोणी?"
" संजनाला एक कुरिअर आलं होतं. त्यामध्ये ही चॉकलेट्स होती. सेंडर्स ऍड्रेस तिच्या जिवलग मैत्रिणीचा होता. तुमच्या मोहिमेला जे यश मिळालं त्याबद्दल तिचं अभिनंदन म्हणून मैत्रिणीने हे पाठवलं होतं. संजना, तुला सरप्राईझ! असा त्यावर मेसेजही लिहिला होता. संजनाने लगेच तिला कॉलही केला होता पण कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही.

संजनाने उत्सुकतेने पॅकेट फोडलं तेव्हा आतमध्ये तिच्या आवडीची 'डेअरी मिल्क सिल्क' चॉकलेट्स होती. त्यामुळे तिने लगेच ती खाल्ली आणि थोड्याच वेळात बेशुद्ध पडली. 
सुदैवाने कुरिअर घेताना तिने दार उघडं ठेवलं होतं, ते तसंच राहिलं होतं. तिचे शेजारी त्याच सुमारास बाहेरुन आले होते. त्यांनी तिची अवस्था पाहून लगेच इथे ऍडमिट केलं."
" मी लगेच येतो तिथे. माझे अजून दोन मित्र पण तिथेच ऍडमिट आहेत. आत्ताच त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी मला समजली. मी तिकडेच यायला निघालोय."

" काय सांगता? ते दोघे तुमचे मित्र आहेत? त्या अपघाताची चौकशीपण मीच करतोय. डॉक्टरांशी आत्ताच माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलंय, सुदैवाने दोघांच्याही डोक्याला वगैरे फार गंभीर दुखापत झालेली नाहीये. त्यामुळे तसा धोका नाही, पण फ्रॅक्चर मात्र बऱ्याच ठिकाणी आहे. या तुम्ही लवकर इकडे. मी थांबतो इथेच."
"लगेच येतो. बरं, तुम्ही संजनाच्या त्या मैत्रिणीला अटक केली आहे का? हे मी तुम्हाला सांगायला नको, पण संजनाकडून तिचा पत्ता सहज मिळेल तुम्हाला."
" तिच्याशी आमचं फोनवर बोलणं झालंय. ती चॉकलेट्स तिने पाठवली नाहीयेत. ती ऑफिसच्या कामासाठी तीन-चार दिवसांपूर्वी दिल्लीला गेली आहे. आम्ही तिच्या ऑफिसमध्ये जाऊन तशी खात्री करुन घेतली आहे.

एकतर असं करण्यामागे तिच्याकडे कुठलंही मोटिव्ह नाही. दुसरं म्हणजे, संजनाने तिच्याबद्दल पूर्ण ग्वाही दिली आहे. त्या चॉकलेट्सवर स्मार्ट बझारचा बारकोड आहे. तो स्कॅन केल्यावर कालची तारीख आणि इथून दोन चौक अलीकडे असलेल्या आउटलेटचा पत्ता दिसला. तिथे आम्ही चौकशी केली असता समजलं की त्यांनी काल शॉपमधून कोणालाही घरी कुठलंही कुरिअर केलेलं नाही. म्हणजेच प्रत्यक्ष तिथे जाऊन खरेदी केलेलं चॉकलेट नंतर संजनाला पाठवलं गेलंय, जे तिच्या मैत्रिणीला दिल्लीहून शक्य नाही. तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे तुमच्या मित्रांचा जो अपघात झाला, तिथे जी दुर्घटनाग्रस्त गाडी होती, त्याचे ब्रेक्स मुद्दाम फेल केलेले स्पष्ट दिसत होते. तुमच्या डोक्यावर झुंबर पडता पडता वाचलं, ही घटनाही ताजीच आहे. त्यामुळे या सगळ्यामागे घातपाताचा प्रकार असावा असा संशय मला येतोय. हे सगळे तपास आम्ही करुच. बरं, तुम्ही या इकडे. मग बाकी बोलू."

निखिलने ऑफिसची जी कार होती तिच्या किल्ल्या घेतल्या. तो गाडीत बसला आणि गाडी सुरु करणार एवढ्यात जोरदार करंट बसल्यासारखा हात मागे घेतला. अचानक मणामणाचं ओझं आपल्या खांद्यावर येऊन विसावल्याची जाणीव त्याला झाली.
काल संध्याकाळी आदितीबरोबर कॅफेमध्ये बसला असताना तिने कशासाठीतरी तिची पर्स उघडली होती. तेव्हा बाकीचे कागद तिने थोडा वेळ टेबलावर ठेवले होते आणि ती पर्समध्ये काहीतरी शोधत होती. त्यावेळी सहज निखिलने ते हाताळले असता, त्यात स्मार्टबझारचं बिल त्याला दिसलं होतं. फक्त डेअरी मिल्क सिल्क चॉकलेटची खरेदी केल्याचं त्याने त्या बिलावर पाहिलं होतं. ते एकदम त्याला आत्ता आठवलं. 

'म्हणजे.... आदिती? या सगळ्यामागची सूत्रधार आदिती आहे? पण का? ती मुद्दामहून आपलं मन मित्रांबद्दल कलुषित करत होती. म्हणजे मूर्ती हस्तगत करण्याच्या कामी तर तिला नेमलं नसेल? आपल्याबरोबर प्रेमाचं नाटक करुन मूर्ती लंपास करायचा तर तिचा डाव नसेल?' . आता तिच्याकडून सत्य वदवून घेतल्याशिवाय तो मागे हटणार नव्हता. तिच्या सुंदर चेहऱ्यामागचा खरा चेहरा तो आज जाणून घेणार होता.
एकाएकी त्याला संजनाची प्रकर्षाने आठवण यायला लागली आणि इतके दिवसात न जाणवलेली एक गोष्ट मनाच्या पृष्ठभागावर आली. त्याचं संजनावर मनापासून प्रेम होतं. 

त्यांच्या उत्खननाच्या प्रत्येक मिशनमध्ये तो तिला जपत होता ते केवळ टीम लिडरचं कर्तव्य म्हणून नव्हतं. आता त्याला तिला भेटण्याची अगदी घाई झाली होती. आदिती प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून लगेच संजनाकडे जायचं त्याने ठरवलं.
नवभारतच्या ऑफिसमध्ये तो पोहोचला आणि अदितीला त्याने कॉल केला. पण कनेक्ट होऊ शकला नाही. म्हणून त्याने आत शिरल्यावर जे पहिलं क्युबिकल होतं, तिथे बसलेल्या स्टाफमेंबरकडे आदितीची चौकशी केली. त्याने आश्चर्याने विचारलं,
"कोण आदिती? इथे आदिती नावाची कोणी एम्प्लॉयी नाही. आडनाव काय तिचं? साधारण पत्ता सांगू शकाल का?"
हे ऐकल्यावर तर तो हतबुद्ध झाला.

'अरे, आपल्याला आदितीचं साधं आडनाव माहिती नाही? ती कुठे रहाते, तिच्या घरी कोण असतात, कसलीच चौकशी आपण केली नाही? एवढी भूल कशी पडली तिच्या सौंदर्याची आपल्याला?' त्याच्या मोबाईल मधला तिचा फोटो त्याने त्या माणसाला दाखवला. अजूनही चार-पाच लोकं तिथे जमली होती. पण कोणीच तिला ओळखू शकलं नाही. निखिलने तिला मग कॉल केला, तेव्हा 'हा नंबर अस्तित्वात नाही' असं ऐकायला मिळालं. आता मात्र निखिलचा धीर सुटला. त्याने सरळ हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे सावंतांच्या कानावर हे सगळं घालण्याचं त्याने ठरवलं.
तो गाडीपाशी आला. एकप्रकारच्या बधीर अवस्थेतच तो आत बसला.

" हॅलो निखिल!"
शेजारुन अचानक आवाज आल्यावर तो प्रचंड दचकला. आदिती...
" तू? तुझी हिंमत कशी झाली गाडीत येऊन बसायची? का वागलीस अशी? आज माझे मित्र तुझ्यामुळे मरणाच्या दारात उभे आहात. तुझा मूर्तीचा हव्यास इतका मोठा आहे की त्यापुढे तू तुझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला चिरडून टाकतेस. अजून किती लोकं आहेत तुझ्याबरोबर? बोल, बोल काहीतरी. आता का गप्प?"
निखिलचा उद्वेग पाहून आदिती हसली.
" निखिल, किती बिनडोकसारखा विचार करतो आहेस. मला तुम्हाला सगळ्यांना संपवायचं असतं तर कधीच संपवलं असतं. झुंबर तुझ्या डोक्यावर कोसळताना तुला बाजूला ढकललं नसतं. 

त्या तिघांना एका फटक्यात मारणं तर मला मुळीच अवघड नव्हतं. पण मला तुम्हाला मारायचं नव्हतंच.
फक्त, पुन्हा या वाटेला तुम्ही जाऊ नये इतपत मृत्यूच्या गडद छायेचा अनुभव तुम्हाला द्यायचा होता."
"कुठल्या वाटेला जायचं नाही आम्ही? आणि का? केवळ तुझी इच्छा म्हणून? हे सगळं मूर्तीमुळे मिळणाऱ्या कोट्यवधी डॉलर्ससाठीच ना?"
"माझ्यालेखी त्या डॉलर्सची किंमत शून्य आहे. मी तुला मागे बोलले होते, काही अनाकलनीय शक्ती या निसर्गात आहेत, आजच्या प्रगत शास्त्राच्याही आवाक्यापलिकडच्या. या निद्रिस्त शक्ती सुप्तावस्थेत आहेत तोपर्यंत त्यांचा मानवाला काहीही त्रास होत नाही. पण तुमच्या क्षुद्र, स्वार्थी हेतूसाठी तुम्ही त्यांना जागवलंत, तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणारच.

तुम्ही चौघांनी नेमकं हेच केलं. त्या मूर्तीला तुम्ही तिच्या जागेतून बाहेर काढून तिच्या निद्रावस्थेचा भंग केलाय. त्याची बरी-वाईट फळं तर मिळणारच ना? तुझ्या डोक्यावर दगडी चिरा कोसळण्यापासून ते संजनाच्या विषप्रयोगापर्यंत, आणखीन काय पुरावा हवा तुला?"
"ऑल हंबग! सध्याच्या हायटेक जगात कसल्या आल्यात निद्रिस्त शक्ती? आणि तुला सगळं हे कसं काय समजलं?"
" हे असं." हे बोलताना आदितीने आपले दोन्ही हात बाजूला पसरले आणि निखिलच्या डोळ्यांसमोर पाहता-पाहता ती अदृश्य झाली. निखिल आ वासून बघत राहीला.
तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने यंत्रवत तो घेतला. पलिकडून त्यांच्या विभागाचा एक सहकारी घाबऱ्या-घाबऱ्या बोलला," निखिल सर, बंद काचेच्या कपाटातून मूर्ती आपोआप माझ्यासमोर गायब झाली.

समाप्त
वरील कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. कोणतीही अंधश्रध्दा पसरवण्याचा मानस अजिबात नाही.

©® राधिका जोशी

सदर कथा लेखिका राधिका जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा वाचत राहण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने