सुरावट



©® मृणाल शामराज.







सकाळ उमलून आली हॊती. आसमंततला ओला, कोवळा अंधार बाजूला सारून ती लुसलुशीत उन्हाची कोवळी तिरिप अंगणभर पसरू पहात हॊती. 
मोठ्या बांच्या कुशीत दुलाईच्या आड पहुडलेली रावी उगीचच कुस बदलत हॊती.
"बेटा, उठ आता.. बघ सकाळ झाली."

"बां, असं ग काय. अजून उजाडलंय कुठे?"

"अगं, डोळे उघडून बघ तर जरा.."

आता उन्हाची तिरिप तिच्या अंगावर आली हॊती.त्या कोवळ्या उन्हाची उब अंगाला लपेटून तिनं बां च्या मांडीवर मान घुसळली.

बां नी रावीच्या डोक्यावर मायेनी हात फिरवत म्हटलं.."कान्हा केव्हाच उठला आहे बघ. वाट बघतोय ना तुझी.."
कान्हाच नावं घेताच रावी तडकन उठून बसली. 
दडदड पायऱ्या उतरीत ती देवघराकडे गेली.
बां बघत होत्या. आई, वडिलांविनाची पोरं ही.तरुण मुलगा, सुन गेले. या कोवळ्या लेकराकडे बघून आपण सारं दुःख विसरलो. आता ही वेल फोफवली आहे. तिला योग्य आधाराची गरज आहे. 

बघू आज मुरारीबाप्पाना बोलवून घेवू. पंचक्रोशीतली चांगली घराणी, तिथली उपवर मुलं त्यांना माहिती आहेत.
राधेकृष्ण, राधेकृष्ण..म्हणत त्या उठल्या.
अगं, अंघोळ करून देवघरात जा, म्हणेपर्यंत रावी आत पोचली हॊती.
त्या देवघरात कोंदलेल्या अंधारात समयांच्या प्रकाशात ती शामल शांत कृष्णमुर्ती उजळून निघाली हॊती. 
 ते लोभस रुप नजरेत साठवून घेतांना रावीचे डोळे भरून आले. ही वंश परंपरागत चालत आलेली मुर्ती..तिची पुजा रावी लहानपणापासून पहात आलेली. 

वेडच लागलं होतं त्याच तिला. तासनतास ती मुर्ती बघत राहायचा ध्यासच लागला होता तिला. त्याचा तो शामल वर्ण, कोरीव डोळे, मोहक हास्य आणि ती त्याची वेळूची बासरी ती मुग्ध होऊन जाई.
दुपारी कथा सांगायला बुवा येतं. ओसरी भरून जाई.
भागवत ऐकताना ती कृष्णमय होई. 
तो कान्हाच्या हातातल्या न ऐकलेल्या पाव्याचे सूर तिच्या कानात गुंजत रहात. तिला कळत नव्हतं ही कसली हुरहूर वाटते आपल्याला. कुठले सूर ओढून नेताहेत मला..कुठे... का ही ओढ..

बां ना वेगळीच काळजी हॊती. 
ही तरणी पोरं.. इतकं देखणं रुप.. पण कधी नटणं नाही, फार कुणी मैत्रिणी नाही.
दिवसभर कान्हा.. कान्हा.
त्याला सुंदर हार करणं.. छान कपडे घालणं.. त्याच्याशी तासनतास बोलत राहणं.. तोच तिचा सखा.. तोच सोबती.कसं व्हावं हीचं?
तिला असं जगण्याची जणू सवय झाली हॊती.तिला कान्हाच्या हातातल्या वेणूचे स्वर्गीय सूर ऐकू येतं.

बां म्हणायच्या, "खुळी झाली आहेस तु रावी."
रावी फक्त मंद हसायची.
आणि एकदिवस खरंच ते दिव्य सूर तिच्या कानावर आले.

"बां.. बां.. ऐक ना.. तुला ऐकू येतंय का ग काही?"

बां नी लक्ष देऊन ऐकलं.. "हो, कुठून तरी दुर सूर ऐकू येताहेत."

तिनं चाहूल घेतली. दुर नदीच्या काठावर असलेल्या त्या आम्रवनातून येणारे सूर तिला तिकडे ओढत होते.
ती वेडावून गेली,धुंद झाली त्या स्वरांनी.स्वतःला नेमकं काय होतंय हॆ तिला कळत नव्हतं.

तिनं कळशी उचलली आणि वेगाने ती बाहेर पडली. बां ना ही नवल वाटलं, आता ही पाणी आणायला का चालली?
ती झपझप चालत नदीच्या वाटेला लागली. एक दगडी उतरण उतरून ती पायवाटेला लागली. 
नदीच्या काठाला लागून पसरलेल्या आम्रवनात जशी ती पोचली तसे सूर अजूनच जवळ वाटू लागले. 
तिची ओढणी तिनं सावरली.पायातले पैंजण नाजूकसा नाद करत होते. आसावल्यासारखी ती चालतच हॊती. 

आता ते सूर कानाशी रुणझुण करू लागले.समोरच असलेल्या झाडाच्या खोडावर तिची नजर स्थिरावली. 
एक शामल सुंदर, देखणा तरुण झाडावर रेलून पावा वाजवण्यात मग्न होता.त्याच उपरणं खांद्यावरून घसरलं होतं. 
दंडावरच तुळशीपत्र त्यामुळे उठून दिसतं होतं.त्याची तंद्री मोडू नये म्हणून ती कळशी तशीच हातात घेवून स्थिर उभी राहिली. हवेत एक प्रकारचा ताजेपणा भरून राहिला होता.त्याची लांबसडक बोट अलगद त्या पाव्यावरून फिरत हॊती. 

ती त्या स्वर्गीय स्वरात भान विसरली.
कुठलं तरी सुखं शिगोशिग मिळालेल्या तृप्ततेनी तिनं डोळे मिटून घेतले.
अलगद कळशी बाजूला ठेवून तिची कोमल पाऊले थिरकू लागली. पैंजणाचे ते नाजूक नुपूर कोमल नाद करू लागले. त्यालाही एक क्षण कळेना हा नाद कसला. त्यानी पावा वाजवणं थांबून तिकडे बघितलं.
त्याचे ते काळेभोर डोळे... ती बघतच राहिली.

"कोण तू..?"

"मी रावी .. हिराबांची नात."

"इकडे काय करतेस?"

"तुझ्या सुरांनी ओढून आणलं रे मला.
किती दिवस झाले, मला ह्याची ओढ लागली हॊती.काय आहे असं या सुरात.. दिवसरात्र मला तेच ऐकू येताहेत.. सांग नां तू कोण आहेस?"
तो मधुर हसला.

"ओळखलं नाहीस का ?
अगं मी तोच आहे.दिवसरात्र माझ्याशी बोलतेस आणि ओळखलं नाहीस मला.."

"अरे.. तू कसा इथे येऊ शकशील? तुझं नावं काय ?"
ती अविश्वासानी म्हणाली.

परत तेच मधुर हास्य.

"सांग नां खरंच का तू कान्हा आहेस !
अरे पण मला ऐकू येणारे ते सूर..

"हो, मी तोच आहे.. आणि सूर ही तेच आहेत."

हा असा रोखून बघत मधुर हसत हसत वाऱ्याच्या झुळकीसारखा निघून गेला .

रावीला कळत नव्हतं. हॆ स्वप्न आहे का सत्य..
ती वळली. तिच्या लक्षात आलं कळशी राहिली. ती घेण्यासाठी ती पुढे गेली. आणि पाहिलं तर तो पावा तिथेच होता. ती हरकली.

स्वतःलाच स्वतःवर उधळत घरी परतली.

बां नी तिच्याकडे विस्फारलेल्या नजरेनी पाहिलं. 
ती हसत बां ना चिकटली.
"काय ग..?"

"बां, आज ना मला कान्हा भेटला. अगं, हॆ बघ."

"अरे, हा तर आपल्या कान्हाचा आहे."
दोघी देवघरात गेल्या.
तर कान्हाच्या हातात पावा होता.. अगदी तसाचं.


"खुळी आहेस झालं. चल आता. आणि हो, उदया वडोदऱ्याहून पाहुणे येणार आहेत, तुला बघायला."

"बां.. नकॊ ना."

"अगं, मी पिकलं पान. माझ्या डोळ्यासमोर तुझं सगळं झालं की मी तुझ्या बाबाच्या शब्दातून मोकळी झाले."

तसंच झालं. रावी कोठारीच्या घरी पसंत पडली. 
एवढ्या मोठ्या नांदत्या घरात छोटी बहू म्हणून मिरवू लागली. 
घर कसलं गोकुळच होतं ते. 
ही सगळ्यांची लाडकी बहू, झाली. शांत, समंजस, नाजूक, गोड आवाजात बोलणारी.
नवरा रमणची तर जीव की प्राण हॊती.
तो पण पावा वाजवायचा, पण त्याला फक्त तीच सुरांसाठी असं वेड होणं खटकायचं.

सासू, सासरे, पण तिच्या इतर सदगुणांकडे बघून असू दे अल्लड आहे, म्हणून दुर्लक्ष करायचे आणि रावी..
तिने सासरी येतांना तो तिचा कान्हा तिथून आणला होता.
ती काम आटोपलं की त्याच्याशी गुज करत बसे. 
ते आम्रवनातले सूर तिला बेचैन करत. 
ते सूर परत ओढून तिला तिथे नेत. तिथे अनुभवलेले हळुवार क्षण तिला बेचैन करत.तिचं मन हळवं होई. डोळ्यात पाणी येई. रमणला हॆ सारं तिनं सांगितलं होतं.

अशा आपल्या निष्पाप, अबोध बायकोची मग रमण गोड शब्दात समजूत घाले. 
सुरेल असा पावा वाजवे. रावी त्यात रमून जाई.
असा दोघांचा संसार छान चालला होता. त्या संसार वेलीवर छानसं फुलं उगवलं. 
 जेव्हा ते बाळ पहिल्यादा तिनं हातात घेतलं आणि डोळे भरून पाहिलं तर तेच शामल सुंदर रुप, तसेच काळेभोर कमळासारखे डोळे आणि लांब सडक बोटं, कुरळे, कुरळे केस आणि दंडावर तसंच तुळशीपत्र.

अधिरेपणानी तिने त्याला परत पाहिलं तेच रुप..तेच हसू..
तोच कृष्ण सावळा तिला पालवू लागला.
"कान्हा माझा कान्हा.. " बाळाला तिनं घट्ट कुशीत घेतलं.
एका कोवळ्या भावनेनी तिचे डोळे भरून आले. ती तृप्त नजरेनी त्याला पहात हॊती. 
तिला वेड लावणारे ते सूर त्या निर्मळ हास्यातून तिला गवसले होते. आणि तो शामल सावळा तिच्याकडे बघून मधुर हसत होता.. धुंद, मिस्कीलपणे .. आम्रवनात जसा हसला तसा..

©® मृणाल शामराज

सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा वाचत राहण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' फेसबुक पेजला फॉलो करा.






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने