हृदयी प्रीत जागते

©️®️ सीमा गंगाधरे 





"शुभमंगल सावधाssssन " ऐकलं आणि मीरा आणि शरूने हुश्श केलं. 
मुहूर्ताची वेळ कधीची टळून गेली होती.  मुहूर्ताची वेळ मिळावी म्हणून मीरा आणि शरू  घरातून खूप लवकर निघून मुंबईपासून दूर असलेल्या या गावात आल्या होत्या. 
लग्न लागले आणि वाजंत्री वाजू लागली तशी जमलेली मंडळी आपापसात गप्पा मारू लागली.

मीरा शरूच्या म्हणजे तिच्या बहिणीच्या नात्यातल्या एका लग्नाला आली होती. 
लग्न लागल्यावर ती अशीच आजूबाजूला बघू लागली. 
इतक्यात शरूच्या ओळखीचे गृहस्थ पुढे आले आणि शरूला म्हणाले,"वहिनी तुम्ही इथे कुठे."
शरु त्यांना म्हणाली, " मुलगी आमच्या नात्यातली आहे. ह्यांना वेळ नव्हता म्हणून मी माझ्या बहिणीला घेऊन लग्नाला आले. तुम्ही कसे इथे" .  
ते गृहस्थ म्हणाले," नवरा मुलगा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. शरद काय म्हणतोय.  बर्याच दिवसात आमची भेट झाली नाही. माझं घर इथे जवळच आहे.  जेवायला अजून वेळ आहे.  मंडपात खूप गरम होतंय. चला थोडा वेळ वाऱ्यावर बसा."
शरूने मीराला विचारलं जाऊया का थोडा वेळ यांच्या घरी.  तसेही दोघी कंटाळलेल्या होत्या म्हणून त्या थोड्या वेळासाठी त्यांच्या घरी गेल्या.

त्यांचं घर म्हणजे एक सुंदर टुमदार बंगला होता. 
बंगल्याची रंगसंगती खूपच आकर्षक होती. बंगल्याचं 'बिल्वदल' नाव खूपच छान होतं.
पुढील भागात सुंदर फुलझाडे आणि शोभेची झाडे लावलेली होती. 
ओसरीवर आयताकृती मोठा सागवानी लाकडाचा झोपाळा होता.  त्यावर एक साठीच्या घरातली स्त्री बसली होती.  या दोघींना बघून ती उभी राहिली. 
घरात प्रवेश करताना ते गृहस्थ म्हणजे अजय त्या स्त्रीला म्हणाले, "आई या माझ्या मित्राच्या पत्नी शरू वहिनी आणि ही त्यांची बहीण मीरा."

आईने त्या दोघींचे स्वागत केले.  अजयने त्यांचा पुतण्या शेखरला शहाळी फोडायला सांगितली आणि या दोघींना बसायला सांगितलं.  शहाळ्याचं पाणी प्यायलावर ते या दोघींना म्हणाले चला तुम्हाला आमचं घर दाखवतो. 
घर खूपच मोठं होतं. खाली एकूण पाच खोल्या होत्या आणि वर चार खोल्या.  सगळीकडे सुबक मांडणी केलेली होती. 
नंतर ते सगळे खाली आल्यावर अजय म्हणाले, " इथे मागे आमची घराजवळची वाडी आहे." 

मागे गेल्यावर दोघींनी पाहिलं तर एक पिळदार शरीराचा टी-शर्ट घातलेला तरुण शहाळी सोलत होता. तो खूपच देखणा होता शहाळी  फोडताना होणाऱ्या हालचालीमुळे त्याचे केस चेहऱ्यावर येत होते मागे जात होते. 
त्याच्याकडे पहात रहावसं  वाटत होतं.
त्याचं मीराकडे लक्ष जाताच दोघेही आश्चर्याने उद्गारले, "तुम्ही!'
अजयने त्या तरुणाला म्हणजे शेखरला विचारलं तुम्ही ओळखता का दोघं एकमेकांना. 
अजय म्हणाला, "मित्राच्या लग्नात ओझरती ओळख झाली होती."
शेखर मीराकडे आणि अनिमिष नेत्रांनी बघतच राहिला. मीरा मोरपंखी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती.
तिने सरळ रेशमी केस मोकळे सोडले होते. फिकट गुलाबी  लिपस्टिक लावली.  हलकासा मेकअप केला होता. 

अजय शेखरला म्हणाला, "अरे ह्या दोघींना आपली मागची वाडी तरी दाखवून आण."
इतक्यात शरू म्हणाली, " माझे पाय दुखतात. मी आत मध्ये बसते तुम्ही दोघे जाऊन या." ‌
शेखरला आनंद झाला. मीरा बरोबर एकत्र चालताना शेखरच्या मनात आलं की  ही साथ अशीच युगायुगांची असू दे देवा.
वाडी पाहता पाहता मीरा शेखरला म्हणाली," तुमची वाडी खूप सुंदर आहे. खूप छान छान फुलझाडे आहेत.  झाडांची निगराणी पण खूप छान पद्धतीने राखली आहे. वाडीत खूप थंड वाटतय."

"ही आमची घरा मागची छोटीशीच वाडी आहे. घरापासून दहा मिनिटं अंतरावर मोठी वाडी आहे तिथे आम्ही भातशेती, आंब्याची झाडं, सीजनल भाज्या असं सगळं लावतो.‌ एकदा वेळ काढून या ती पण दाखवेन तुम्हाला."
"हो नक्कीच मला आवडेल बघायला.  तुम्ही नोकरी करून हे सगळं करता का?"
"मी आधी नोकरी करत होतो परंतु आता पूर्णवेळ हेच काम करतो.  तुमच्या मैत्रिणीच्या भावाच्या ऑफिसमध्येच मी नोकरीला होतो.  अशी अचानक तुमची भेट होईल असे स्वप्नातही वाटलं नव्हतं."

"मलाही असं कधीच वाटलं नव्हतं." वाडी बघून झाल्यावर मीरा घरात आली नंतर शरू आणि मीरा त्या सर्वांचा निरोप घेऊन लग्न घरी आल्या. निघताना मीराची नजर शेखरकडे गेली.
शेखर तिच्याकडेच पाहत होता. दोघांची नजरानजर झाली आणि ती नजर बरंच काही सांगून गेली. 
जेवून‌ निघाल्यावर घरी यायला त्यांना संध्याकाळ झाली.  

शेखर मीराचा विचार करत होता.  त्याचा मित्र राजेश  त्याच्या बहिणीला भेटायला गेला होता तेव्हा शेखर सुद्धा त्याच्याबरोबर होता.  तेव्हाच पहिल्या प्रथम त्याने मीराला  पाहिलं आणि ती  त्याच्या मनात भरली होती. 
त्याने राजेशला तसं सांगितलं होतं म्हणूनच राजेशने स्वतःच्या लग्नात मीराला पण बोलावलं.  मीराची आणि शेखरची त्याने सहेतुक ओळख करून दिली होती.  मीराला पण शेखर आवडला होता.  तिच्या मैत्रिणीने म्हणजे रेखाने मीराला शेखर तुला लग्नाच्या दृष्टीने कसा वाटतो हे विचारलं होतं. 
त्यावेळी मीरा रेखाला म्हणाली, "शेखर मुंबईत कुठे राहतो ?"
रेखा म्हणाली, "त्याचं मुंबईत घर नाही पण मुंबई पासून दूर गावाला खूप सुंदर घर आहे.  शेतीवाडी आहे. तसे ते सधन आहेत."

" हो पण मला रोज असं अपडाऊन करायला जमणार नाही आणि नोकरी सोडून जाणं मला काही पसंत नाही." त्यामुळे त्यांचं लग्न जुळेल असं काही राजेशला आणि शेखरला वाटलं नाही.  शेखरची इच्छाशक्ती खूप प्रबळ होती म्हणूनच आज अचानक जवळजवळ सहा महिन्यांनी त्यांची भेट झाली होती.  दोघेही एकमेकांचा  विचार करत होते. दोघांच्याही हृदयात प्रीतलहरी झंकारत होत्या. 

त्यानंतर पाच सहा दिवसांनी मीरा ऑफिस मधून निघून घरी जाण्यासाठी बस स्टॉप वर आली.  तिथे शेखर आधीच उभा होता पण मीराचं लक्ष नव्हतं त्यानेच तिला हाक मारली.  त्याला पाहून मीरा मनोमन मोहरली.
मीरा म्हणाली, "तुम्ही आता इथे कसे!"
"ऑफिसमध्ये थोडं काम होतं म्हणून आलो होतो. "
बसमध्ये दोघेही शेजारी शेजारी बसले.  बस प्रवासात त्यांचा ओझरता स्पर्श एकमेकांना होत होता.  दोघांच्याही शरीरावर रोमांच फुलत होते. त्यांच्या अशाच अवांतर गप्पा झाल्या मग दोघेही ट्रेनने आपापल्या घरी गेले.  

पुन्हा दहा पंधरा दिवसांनी असाच शेखर खाली बसस्टॉप वर भेटला. 
मीराच्या लक्षात आले की तो मुद्दामच बसस्टॉप वर उभा राहतो.  मीराला सुद्धा त्याचं असं उभं राहणं मनोमन आवडू लागलं होतं.
असं चार-पाच वेळा झाल्यावर पुढल्यावेळी शेखर मीराला म्हणाला, "तुला थोडा वेळ आहे का?  आपण इथे जवळच्या कॅफेमध्ये बसून जरा गप्पा मारूया. मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. "
"ठीक आहे थोडा वेळ थांबेन मी."  कॅफेमध्ये गेल्यावर शेखर तिला म्हणाला,
"मला तू खूप आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्याशी लग्न करशील का?"

"माझ्या घरी पण माझ्या लग्नाचा विषय चालू आहे पण मला मुंबईत राहणाऱ्या मुलाशीच लग्न करायचं आहे .मला लग्नानंतर पण नोकरी करायची आहे आणि एवढ्या लांबून रोज जाणंयेणं मला शक्य नाही."
" मीरा अगं तुला नोकरी सोडण्याची गरज पडणार नाही. आमच्या गावात आपल्या घरापासून दहा मिनिटे अंतरावर तुमच्या बँकेची शाखा उघडली आहे.  आपण तुझी बदली करून घेऊ आणि तुला जितकी वर्ष नोकरी करायची किती वर्ष तू नोकरी करू शकतेस."
मीराला हे ऐकून खूप आनंद झाला पण तिथे तिने तसं दर्शवलं नाही.  
ती म्हणाली, " मी विचार करून सांगेन." 
घरी गेल्यावर मीराच्या आईने तिच्यावर बॉम्ब टाकला.  

आई म्हणाली, "अग मीरा उद्या माझ्या मैत्रिणीचा मुलगा सुहास तुला बघायला येणार आहे. तो इंजिनियर झालाय आणि मी त्याला त्याच्या लहानपणापासून ओळखते.  खूप चांगला मुलगा आहे. मुंबईतच छान घर आहे."
" आई मला इतक्यात लग्न नाही करायचं."
" ते काही नाही आता तुझं लग्नाचं वय झालं आहे आणि हा मुलगा पण खूप चांगला आहे."
आई ऐकत नाही बघितल्यावर मीराने ठरवलं बहिणीला विश्वासात घेऊन सगळं सांगायचं.  त्याप्रमाणे तिने शरूला फोन केला. आणि तिला सर्व हकीगत सांगितली. शरूने तिला आश्वासन दिले तू काही काळजी करू नको मी आईशी बोलेन. तो मुलगा ज्याला आपण लग्नाच्या ठिकाणी पाहिलं तो पण खूप चांगला आहे.मीराला थोडं बरं वाटलं.

तिथे शेखरची आई पण त्याच्यासाठी मुली बघत होती.  त्यांच्या मते गावातील एखादी मुलगी बघितली तर ती शेतीच्या व्यवहारात थोडे लक्ष घालू शकेल आणि शेखर व त्याच्या दादाला हातभार लागेल. 
शेखरला मात्र मीराशीच लग्न करायचं होतं.  मीरा आणि शेखर दोघांच्याही मनाची घालमेल चालली होती.
मीरा सुद्धा रात्री झोपताना विचार करत होती शेखरवर आपलं सुद्धा प्रेम जडलं आहे आणि त्याचेही आपल्यावर प्रेम आहे आणि तो खूप समजूतदार आहे.  
अशावेळी फक्त गावी राहावं लागणार म्हणून आपण नकार द्यायला नको.  बँकेची शाखा सुद्धा त्याच्या घराजवळ आहे.  शरूने आईशी बोलून तिला समजावून द्यायला हवं तर ती तयार होईल.

शरूने समजावल्यावर पण आई काही तयार होईना.
मीराने विचार केला की पुढच्या वेळी शेखर भेटेल तेव्हा आपण त्याला सगळं सांगून बघू असे ठरवून रात्री कधीतरी मीराला झोप लागली. नंतर शेखर जेव्हा भेटला तेव्हा  मीराने शेखरला सारी परिस्थिती समजावून सांगितली. 
ती त्याला म्हणाली, " तू  नोकरी करत असताना जसे मुंबईमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होतास तसे आता राहू नाही का शकणार.  नंतर आपण आपला स्वतःचा फ्लॅट घेऊ." 
" मी नोकरी करत होतो तेव्हा दादा आणि बाबा दोघं वाडीचे काम बघत होते.  बाबा गेल्यानंतर दादावर सगळा भार पडतोय म्हणून मला गावीच राहावं लागेल.  तुझी गावी राहायला तयारी नसेल तर हरकत नाही आपण आता इथेच थांबूया."  

मीरा त्याला थांबवत पटकन म्हणाली, " नाही नाही आता मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार. आईने विरोध केला तरी मी तुझ्याशीच लग्न करेन."
दोघांच्याही घरून त्यांच्या लग्नाला विरोधच होता.  शेखरने ठरवलं होतं की आपण लग्न तर करूच पण घरच्यांच्या संमतीनेच लग्न करायचं.  मीरा शेखरला म्हणाली , "जर आपल्या घरच्यांनी संमती दिली नाही तर आपण पळून जाऊन लग्न करूया."
शेखर तिला म्हणाला, " अग वेडी पळून जाऊन लग्न करून आपण आपल्या घरच्यांना दुखवून काहीच साध्य करू शकणार नाही.  मला खात्री आहे की थोडे दिवस वाट बघावी लागेल पण आपल्याला लग्नासाठी घरून संमती नक्कीच मिळेल."

मीराच्या आईने लग्नाचा विषय काढताच मीरा आईला म्हणाली, "अग आई शेखर खूपच चांगला मुलगा आहे.  तुम्ही एकदा त्याला भेटून त्याच्याशी बोलून तर बघा. " मीराच्या बाबांना ते पटले.
ते आईला म्हणाले,"अग असं जबरदस्तीने लग्न करून कोणी सुखी होणार नाही त्यापेक्षा तिच्या  पसंतीने लग्न करून ती आयुष्यात सुखी तरी होईल."  आई जरा नाखुष होती.  तिच्या मैत्रिणीच्या मुलाशी मीराचं लग्न झालं असतं तर त्या दोघींचे संबंध अजून घनिष्ठ झाले असते असं तिला वाटत होतं.

इथे शेखरच्या घरी शेखरच्या आईने गावातल्या मुलीशीच लग्न कर असा तगादा लावला होता. 
शेखर आईला म्हणाला," मी गावातल्या मुलीशी लग्न केलं तरी ती तुझ्याशी जुळवून घेईल याची तुला खात्री आहे का.  त्यापेक्षा मीराला आता मी खूप चांगलं ओळखतो. ती नक्कीच तुला लेकीप्रमाणे सुख देईल आणि तुझ्या मनातील तुला मुलगी नसल्याचे दुःख कायमचं निघून जाईल.  शेखरच्या वहिनीने पण आईला समजावलं.  
हो ना करता दोघांच्याही घरचे लग्नाला तयार झाले. 
शेखर मीराला म्हणाला, " तू तुझ्या आई-बाबांना घेऊनच आमच्या घरी ये म्हणजे त्यांनाही आमची वाडी वगैरे दाखवता येईल.  इथे निसर्गाच्या सानिध्यात त्यांना आनंदच मिळेल." 

त्याप्रमाणे एक दिवस मीरा तिचे आई-बाबा आणि तिची बहीण शरू शेखरच्या घरी आले. 
घर आणि शेखरला पाहून मीराचे आई-बाबा खुष झाले.  त्यांना आपल्या मुलीच्या पसंतीचा अभिमान वाटला.  
शेखरच्या आईला पण मीरा आवडली.
अशा तऱ्हेने दोन अनोळखी जीव ज्यांनी कधी विचारही केला नव्हता की आपण वैवाहिक बंधनात अडकू ते एकत्र आले. 
एका ओझरत्या भेटीतच दोघांची मनं जुळली होती. 
दोघांच्याही मनात एकच गाणं गुंजत होतं,
" भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची ".

©️®️ सीमा गंगाधरे 

सदर कथा लेखिका सीमा गंगाधरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

धन्यवाद.!!!

📝

माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने