दिल- ए- नादान

©® सौ.हेमा पाटील





ऐ दिल- ए- नादान ऐ दिल- एक नादान
आरजू क्या है जुस्तजू क्या है
हम भटकते है क्यूॅं भटकते है
दश्त- ओ- सेहरा में
ऐसा लगता है मौज प्यासी है
अपने दरिया में ऐसी उलझन है
क्यूॅं ये उलझन हैं |

कानात हेडफोन लावून गाणी ऐकत असताना हे गाणे लागल्यावर ती आणखीनच अस्वस्थ झाली.
जीवाची अस्वस्थता कमी व्हावी, दुखावलेले मन कुठेतरी गुंतले की बरे वाटेल,मनाची हुरहूर कमी होईल असे वाटल्याने तिने मोबाईल वर गाणी लावली होती व शांतपणे बसून गाणी ऐकत होती .

ती शांतपणे गाण्यांचा आनंद घेत गाणी ऐकतेय असेच तिच्याकडे पाहिले तर वरवर दिसत होते.प ण तिच्या अंतरंगात जी खळबळ माजली होती ती इतरांना कशी कळणार!

हे गाणे लागले अन् तिला आपलेच रुप या गाण्यात दिसले.
मनाची चाललेली तगमग तिला सहन होत नव्हती. प्रेम म्हणजे सर्वात सुंदर भावना असे म्हणतात.पण या प्रेमाचा आविष्कार जीवनात अनुभवताना सर्वांनाच गुलाबी मखमली पायघड्यांवर चालण्याचा अनुभव येत नाही.
काही जणांच्या आयुष्यातील प्रेमाचा मार्ग हा काटाकुट्यांतून जाणारा असतो. खूपदा हृदयात अनेक काटे टोचतात, मनावर ओरखडे उमटतात. पण तरीही एकला चलो रे हा मार्ग सोडणे जमत नाही.परिणाम माहित असतो.

या प्रेमाच्या वाटेवर चालताना पदरात काहीही पडणार नाही याची स्पष्ट जाणीव असते.पण व्यवहारी विचार करुन प्रेम केले जात नाही ना! क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा..असा एक प्रेमाचा क्षणही कुणाकुणाच्या आयुष्यात नसतो. प्रज्ञा आज तसेच काहीसे अनुभवत होती....

काॅलेजला असताना मैत्रिणींच्या घोळक्यातून चालत असताना मुलांनी तिच्यासाठी मारलेले टाॅन्ट तिला ऐकू यायचे. मैत्रिणींकडे तिची चौकशी केली जायची. खूपदा काही निमित्त काढून बोलण्याचे प्रयत्न केले जायचे. मैत्रिणींच्या कडूनही त्यांच्या भावाबद्दल विचारले जायचे. पण तिने कधीच कुणाला प्रतिसाद दिला नाही.
आपले घर ते काॅलेज अन् अभ्यास हेच तिचे आयुष्य होते.पण अभि तिच्या आयुष्यात आला आणि तिचे आयुष्यच बदलून गेले.

अभिशी तिची भेट हा केवळ अपघात होता.अभि ना तिच्या काॅलेजला होता ना तिच्या ओळखीतला...पण योगायोगाने घडलेली भेट प्रज्ञासाठी मात्र अविस्मरणीय ठरली.
एका सकाळी प्रज्ञा काॅलेजला निघाली होती.काॅलेज घरापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर असल्याने ती दररोज चालतच काॅलेजला जात असे.तर अशीच ती जात असताना पुढील चौकात सिग्नल लागला होता.सिग्नल लागलेला असल्याने ती बिनधास्तपणे रस्ता क्रॉस करत होती.
पण अचानक रों रों करत एक स्पोर्टस बाईक अगदी वेगाने आली आणि सिग्नलचा विचार न करता पुढे निघाली. त्यावेळी पादचारी रस्ता क्रॉस करत होते. त्यापैकी एका शाळकरी मुलीला या बाईकचा धक्का बसला व ती मुलगी खाली पडली.

पण बाईक अजिबात न थांबता बुॅंग आवाज करत डोळ्यांचे पाते लवतेय न लवतेय तोपर्यंत निघूनही गेली.त्या मुलीच्या पायाला मार लागला होता. प्रज्ञा धावत तिच्याकडे गेली.तोपर्यंत एका तरुणाने तिला उचलले होते व आपल्या कारकडे तो निघाला होता.प्र ज्ञाही त्यांच्या पाठोपाठ तिकडे वळली.त्या मुलीला गाडीत ठेवत त्या तरुणाने इकडेतिकडे पाहिले. ती मुलगी खाली पडली तेव्हा गोळा झालेला माणसांचा घोळका पांगला होता.

फक्त एक तरुणी आपल्या गाडीजवळ उभी आहे हे त्याला दिसले.गाडीत बसा असे त्याने प्रज्ञाला सांगितले.प्रज्ञा त्या मुलीजवळ गाडीत बसली.जवळच उजवीकडे समर्थ हाॅस्पिटल आहे हे तीने त्या तरुणाला सांगितले.त्याने तिकडे गाडी वळवली.

हाॅस्पिटलजवळ गेल्यावर त्याने पुन्हा त्या मुलीला उचलून घेतले व दवाखान्याच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. प्रज्ञा मागोमाग आली.डाॅक्टरांसमोर टेबलवर तिला झोपवून त्याने काय घडले ते शांतपणे थोडक्यात सांगितले. डाॅक्टरांनी काळजीपूर्वक तपासले.उलटी आल्यासारखे वाटतेय का विचारले.डोक्याला मार लागला का विचारले.पण तसे काही नव्हते.पायाला घोट्याच्या वर बारकेसे फ्रॅक्चर झाले होते.

पायाला फ्रॅक्चर करेपर्यंत त्या तरुणाने त्या मुलीला पालकांचा फोननंबर विचारला व तिच्या घरी फोन करून घडलेली घटना सांगताना घाबरु नका ती अगदी व्यवस्थित आहे हे आवर्जून सांगितले व दवाखान्याचा पत्ता सांगितला. प्रज्ञा शेजारी उभी राहून हे सगळे पहात होती.

पंधरावीस मिनिटांत तिची आई व बहिण आले. ते येताच तो तरुण म्हणाला,"मी आता निघतो.मला आॅफीसला जायला वेळ होतोय". तिच्या घरच्यांना आभार मानण्याची संधीही न देता तो बाहेर पडला.

पण बाहेर पडताना प्रज्ञाला म्हणाला," चला मॅम ..तुमचा फार वेळ घेतला मी..चला तुम्हांला सोडतो".
ती यंत्रवत त्याच्या मागोमाग बाहेर पडली. गाडीत बसताना ते म्हणाला, " मॅम, पुढे बसा.नाहीतर मी तुमचा ड्रायव्हर आहे असा पहाणारांचा समज होईल".
ती पुढे बसली तेव्हा तुम्हाला कुठे सोडू असे त्याने विचारले.तिने आपल्याला पुढच्या चौकात सोडा असे सांगितले. पुढचा चौक येईपर्यंत त्याने तोंडातून एक शब्दही काढला नाही,की तिच्याकडे पाहिलेही नाही. 

पुढच्या चौकात त्याने गाडी थांबवली.ती उतरल्यावर तो तिला धन्यवाद म्हणाला.यावर प्रश्नार्थक नजरेने तीने त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला,"अहो, मगाशी त्या मुलीसोबत कुणीतरी महिला असणे आवश्यक होते.जमलेला घोळका मिनिटभरात पांगला होता,पण तुम्ही आलात"! यावर ती फक्त हसली.
त्यानेही ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला नाही.ती तिच्या काॅलेजच्या दिशेने चालू लागली.त्याची गाडी पुढे गेल्याचे तिने पाहिले. एक परोपकारी अन् सुसंस्कारित तरुण अशी तिच्या मनाने त्याची नोंद घेतली.

मध्यंतरी काही दिवस गेले.
मास्टर इन सोशल वर्क चे पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना प्रोजेक्ट साठी प्रत्यक्ष फिल्डवर जावे लागते.तिच्या काॅलेजमधून प्रोजेक्ट साठी तिची निवड एका कंपनीत झाली होती.आज तिला तिकडे जायचे होते त्यामुळे तीने पप्पांना आॅफीसला जाताना तिला त्या पत्त्यावर सोडायला सांगितले.
पप्पांनी कंपनीचे नाव वाचून सांगितले,की "या कंपनीने मार्केटमध्ये चांगले नाव कमावले आहे".
तिला कंपनीच्या गेटपाशी सोडून पप्पा पुढे गेले. तीने आत गेल्यावर एच.आर.ला आपली सगळी कागदपत्रे दाखवली. एच.आर.ने तिला कुठे बसायचे काय काम करायचे, कंपनीच्या प्राॅडक्ट बाबत थोडक्यात माहिती सांगितली. कंपनीच्या मालकांचे नाव श्री.अभिराम फडके आहे हे तिने पाटीवर वाचले.

असाच एक महिना उलटला.ती आठवड्यातून दोन दिवस कंपनीत फिल्डवर्क करण्यासाठी जात असे.कामगारांना काही समस्या आहेत का? अन् असल्यास त्या सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत हे तिचे काम होते.बाकी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी तिचा संबंध येत नसे.
असेच एकदा ती कंपनीच्या गेटपासून आत चालत जात असताना मागून एक कार आली म्हणून ती जरा बाजूला झाली. पण कार तिला क्राॅस करुन पुढे जाऊन थांबली.
ती चालण्याच्या नादात कारपासून पुढे आली तर "अहो मॅडम"असा मागून आवाज आला म्हणून तिने वळून कारकडे पाहिले.आतील तरुणाला तिने लगेच ओळखले.तो तोच तरुण होता ज्याने अॅक्सिडेंट झालेल्या मुलीला तत्परतेने दवाखान्यात नेले होते.

ती गाडीजवळ आली.तो तरुण म्हणाला,"इकडे कुठे मॅडम"?यावर तिने सांगितले की, "मी या कंपनीत फिल्डवर्क करण्यासाठी येतेय".
"अच्छा"! असे तो म्हणाला.
"आपण इथे काम करता का"? असे तिने विचारले.त्यावर त्याने होकारार्थी मान डोलावली. 
ती भेट तेवढ्या बोलण्यावरच संपली. पण दुसऱ्या दिवशी कंपनीचे वार्षिक अहवालाचे टेबलवर असलेले पुस्तक सहजच चाळताना तिला त्या तरुणाचा फोटो दिसला आणि त्याखाली नाव होते.. श्री.अभिराम फडके... 
अच्छा! हे या कंपनीचे मालक आहेत तर ! पण वागण्याबोलण्यात किती साधेपणा! परोपकारी वृत्तीचा अनुभव तर तिने घेतलाच होता. गेल्या महिनाभरात कामगारांना कंपनीत काय अडचणी आहेत का हे त्यांच्याशी संवाद साधत समजून घेत असताना त्यांच्या तोंडून आपल्या मालकांच्या बद्दल कृतज्ञतापूर्वक उल्लेख येत होता. इथे काहीही अडचणी आल्या तरी साहेब स्वतः लक्ष घालतात असे कामगार सांगत होते.

महिन्यातून एकदा एच.आर.,कामगार व स्वतः मालक अशी मिटींग होते. त्या मिटींगमध्ये ज्या काही अडचणी असतील त्यांचा परामर्श घेतला जातो व सोडवण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येतात. आज मिटींग अटेंड करण्यासाठी एच.आर.ने तिला थांबायला सांगितले.
तिने घरी फोन करून आज यायला वेळ होईल हे सांगितले.
मिटींगमध्ये कंपनीच्या मालकांना कामगारांशी बोलताना ती लक्षपूर्वक ऐकत असताना तिच्या लक्षात आले की, कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांविषयीही मालकांना सखोल माहिती आहे. 
मुलांच्या फी ची अडचण असेल किंवा मुलीचे लग्न, कंपनीकडून बिनव्याजी कर्ज मिळते. कामगारांच्या पूर्ण कुटुंबाच्या आरोग्यविम्याचे पैसे कंपनी भरते.तसेच दरवर्षी कंपनीच्या वर्धापनदिनी सर्व कामगारांना सहकुटुंब सहभागी होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण असते.आणि कामगारही आपल्या कुटुंबासोबत आनंदाने येतात.

हे सर्व ऐकून प्रज्ञा भारावून गेली. मिटींग संपल्यानंतर सर्वजण पांगले. ती ही बाहेर पडली.एवढ्यात अभिराम सरांनी तिला बोलावले आहे असा शिपायाने निरोप दिला म्हणून ती आॅफीसकडे वळली.
अभिराम सर बाहेर पडण्याच्या तयारीत होते.ते म्हणाले," आज उशीर झाला आहे,चला तुम्हांला मी घरी सोडतो".यावर ती म्हणाली,"नको सर, जाईन मी".
यावर सर म्हणाले," अहो, घरात येणार नाही मी.घरापाशी सोडतो. काळजी करू नका,चहा प्यायला आत येणार नाही मी"..
यावर ती खळखळून हसली.दोघेजण कारकडे गेले.

आत बसल्यावर तिने आपण कुठे रहातो ते सांगितले.
मगाशी मनात घोळत असलेला प्रश्न तिने विचारावा का यासाठी अंदाज घेत सरांना विचारले,"सर ,एक शंका आहे.विचारु का"? यावर जरुर विचारा असे सरांनी सांगितले.
"आपण कामगारांवर एवढा खर्च करता.यामुळे आपल्या कंपनीचा प्राॅफीट कमी होत नाही का"?
यावर त्याने जे उत्तर दिले ते ऐकून ती अधिकच प्रभावित झाली.

सर म्हणाले," कामगारांच्या जीवावरच तर कंपनीचा फायदा होतो ना! मग ते कामगार तृप्त,शांत असावेत असे मला वाटते. नाहीतर काम करत असताना कुटुंबाचा,पैशांचा,कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीच्या काळजीचा ताण त्या कामगारांच्या मनावर येतो व काम तितक्या वेगाने केले जात नाही. 
मुद्दामहून केले नाही तरी अजाणता कामाकडे दुर्लक्ष होते. त्यांच्या समस्यांचे निराकरण केल्यामुळे ते बिनघोरपणे कामात लक्ष घालू शकतात. उलट माझ्यावरील विश्वासाने अधिक जोमाने कामे करतात.याचा फायदा कंपनीलाच होतो. तेवढ्याच वेळात जास्त काम होते.मग हा होणारा फायदा मी त्यांच्यावरच खर्च करतो.

दुसरा मुद्दा असा की,कामगारांची काळजी घेतली जात असल्याने इथे कामाला लागलेल्या पैकी कुणीही नोकरी सोडून जाण्याचा विचार करत नाहीत,उलट एका कुटुंबासारखे सगळेजण एकमेकांशी प्रेमाने वागतात.त्यामुळे नवीन नेमणूका व त्यांचे ट्रेनिंग यावरील कंपनीच्या खर्चातही बचत होते.आणि महत्वाचे म्हणजे कंपनीत एकमेकांत हेवेदावे, शत्रुत्व कधीच उदयाला येत नाही. कामगारांच्या कष्टाच्या जीवावर मिळालेल्या पैशातून सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही अनाथाश्रमाला दरवर्षी देणगी देतो. कंपनीतून मिळणाऱ्या फायद्यातून आपण स्वतः मोठे व्हायचे हा माझा हेतू नसला तरीही दरवर्षी मलाही भरपूर पैसा मिळतो. मग आणखी काय हवे"?

हे उत्तर ऐकल्यावर ती अधिकच भारावून गेली. "सर तुम्ही ग्रेट आहात.असा विचार जर सर्वांनी केला तर आपला देश कुठल्याकुठे पोहोचेल". 
यावर सर म्हणाले, "आपल्यापासून आपण सुरवात करायची". 
तोपर्यंत आपण घराजवळ पोहोचलोय हे प्रज्ञाच्या लक्षात आले.तिने सरांना गाडी बाजूला घ्यायला सांगितले व दोन मिनिटे घरी चला असा आग्रह तिने केला.
सर येतील असे तिला वाटले नव्हते,पण ते गाडीतून उतरले व तिच्या मागोमाग चालू लागले.पप्पा बाहेरच खुर्चीवर बसले होते. सरांनी तिथे येताच तिच्या पप्पांना नमस्कार केला. तिने ओळख करून दिली आणि ती आत गेली. आईला चहा ठेवायला सांगून ती पाण्याचे तांब्याभांडे घेऊन आली तर दोन तीन मिनिटांतच अगदी जुनी ओळख असल्यासारख्या दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या.

चहा, बिस्किटे घेऊन ती आली.चहा छान झाला आहे असा अभिप्राय द्यायला सर विसरले नाहीत.
अचानक सरांनी विचारले," तुम्ही आधी नाशिकला रहात होता का" ? यावर हो असे पप्पांनी सांगितले तेव्हा प्रज्ञाकडे वळून सर म्हणाले,"पल्लवी करंदीकर तुमची मैत्रीण होती का"? 
यावर ती म्हणाली,"अय्या, सर तुम्हाला कसे माहीत"? यावर सर म्हणाले,"तिचा मामेभाऊ शिक्षणासाठी तिच्याकडे रहात होता..आठवते का"?
"हो.. अभि..आठवते ना" असे प्रज्ञा म्हणाली."तोच मी अभि! अभिराम फडके".
यावर आश्चर्यचकित होऊन प्रज्ञा डोळे मोठे करून अभिकडे पाहू लागली.
त्यावर सर म्हणाले," मी ही तुम्हांला ओळखले नव्हते.आत्ता तुमच्या मम्मीपप्पांना पाहिल्यावर लक्षात आले".
यावर पप्पांनी सांगितले,"आता जेवूनच जायचे".

पण यावर सरांनी सांगितले की,"आज नाही.परत नक्की येईन.पण मला बालपणी जशी अभि म्हणून हाक मारायचात तशीच आजही एकेरी हाक मारा.अन तू ही..मी पण तुला मनी असेच आजपासून संबोधणार.. चालेल ना"?
यावर खळखळून हसत तीने मान डोलावली.
पुढच्या रविवारी तुम्ही सर्वांनी आमच्या घरी यायचे असे सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देऊन अभिने सर्वांचा निरोप घेतला. प्रज्ञा अभिच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमातच पडली होती. बालपणीच्या आठवणी तिच्या मनात रुंजी घालत होत्या. असा असाधारण युवक तिने प्रथमच पाहिला होता. पुढच्या रविवारची ती अतिशय आतुरतेने वाट पाहत होती. 

एकदाचा रविवार उजाडला अन् त्याने दिलेल्या पत्त्यावर प्रज्ञा व मम्मीपप्पा जाऊन पोहोचले. बेल दाबली तर एका सात-आठ वर्षाच्या मुलाने दार उघडले. 
यांना पाहून तो आत बघून म्हणाला,"बाबा, तुमच्याकडे कुणीतरी आलेय".
आतून अभि बाहेर आला आणि त्यांना घेऊन आत आला.आत बसल्यावर प्रज्ञाने हाॅलचे निरिक्षण केले.अगदी साधेपणाने सजावट केली असली तरीही उच्च अभिरुची जाणवत होती. तो छोटा मुलगा येऊन अभिजवळ बसला. "हा माझा मुलगा अनिकेत"! अशी अभिने ओळख करून दिली. 

प्रज्ञा गोंधळून गेली होती.अभिकडे तिचे मन ओढ घेत होते,पण अभिला मुलगा आहे हे तिला आत्ताच समजले होते. थोड्यावेळाने डायनिंग टेबलवर ताटे मांडली व सर्वजण जेवणासाठी उठले.अजूनपर्यंत अभिची पत्नी बाहेर आली नव्हती. आता आत गेल्यावर ती दिसेल असे वाटून प्रज्ञा आत गेल्यावर इकडेतिकडे पहात होती.पण आत जेवण वाढण्यासाठी असणारा आचारी सोडता कुणीच नव्हते.

पप्पांनी विचारले," याची मम्मी कुठे आहे"? यावर "ती या जगात नाही "असे अभिने सांगितले.
ते ऐकून सर्वांनाच फार वाईट वाटले.पण त्याबद्दल अनिकेतसमोर जास्त चर्चा नको म्हणून कुणीच पुढे काही विचारले नाही. जेवण झाल्यावर अभिचा बंगला त्याने फिरवून दाखवला. बंगल्याभोवतीची सुंदर बाग पाहून प्रज्ञा वेडावून गेली.
अखेर आमच्याकडे या असे आग्रही आमंत्रण देऊन मंडळी माघारी फिरली.
आजवर प्रेमाची बाधा न झालेल्या प्रज्ञाला अभि त्याच्या गुणांमुळे आवडला होता.ती अगदी नकळतपणे त्याच्या प्रेमात पडली होती.पण आज त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या मुलाला भेटल्यावर अभि आपला होईल का अशी शंका तिच्या मनात आली.पण तिचे मन मात्र त्याच्याकडे झेपावत होते.

कंपनीत नेहमीसारखेच फिल्डवर्क सुरु होते. कधीतरी अभि दिसायचा. कधीतरी वाॅटसअपवर एखादा मेसेज यायचा,एवढेच! आजही ती गाणी ऐकत असताना अभिचाच विचार तिच्या मनात होता...
एवढ्यात मोबाईलवर रिंग झाली.अनोळखी नंबरवरुन फोन आला होता.तिने फोन घेतला.खरंतर ती अजिबात कुणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती.ए दिल एक नादान हे गाणे ऐकताना ती त्यात डुंबून गेली होती.

पलिकडून आवाज आला," हॅलो प्रज्ञा ! ओळखलंस का मला"?
प्रज्ञा म्हणाली, "नाही.कोण बोलतंय"?
"अगं मी पल्लवी! बघ विसरलीस मला"!
"अय्या तू! आज कशी आठवण झाली गं माझी? अन् माझा नंबर कुठून मिळाला"?
"विसरलीस? अभिने दिला. अभिकडे आलेय मी.आणि आत्ता पाच मिनिटांत तुझ्याघरी येतेय.अभि सोडतोय मला"..
"अरे व्वा! ये.मी वाट पहातेय".बालपणीची मैत्रीण इतक्या वर्षांनी भेटणार म्हणून तिला खूप आनंद झाला.

तेवढ्यात बाहेर हाॅर्न वाजला म्हणून ती धावतच बाहेर गेली.गाडीतून उतरणाऱ्या पल्लवीला मिठी मारत तिने आपला आनंद व्यक्त केला.अभिने गाडीतूनच सांगितले की,"मला वेळ होतोय.मी उतरत नाही".यावर मान डोलावत प्रज्ञा पल्लवीला घेऊन घराकडे वळली.
पूर्ण दुपारभर मैत्रिणींच्या गप्पा सुरू होत्या.ना त्यांचे जेवणाकडे लक्ष होते ना घड्याळाकडे ! चार वाजता जेंव्हा काकू चहा घेऊन आल्या तेव्हा पल्लवी भानावर आली.

ती काकूंना म्हणाली,"काकू मी आज अभिच्या वतीने इथे एका महत्त्वाच्या कामासाठी आले आहे.त्याने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.कारण त्याच्या वतीने मीच घरातील मोठी व्यक्ती आहे.त्याचे आईवडील तो लहान असतानाच गेले होते. त्यामुळे त्यानंतर तो आमच्याकडेच रहात होता हे तुम्हाला माहीत आहेच! मी आज प्रज्ञाला त्याच्यासाठी मागणी घालायला आले आहे.त्याला प्रज्ञा मनापासून आवडली आहे".
हे ऐकल्यावर प्रज्ञाला अचानक आपण सुखाच्या शिखरावर विराजमान झालो आहोत असेच वाटले.
तिचे मन अभिकडे झेपावत होतेच! पण आई म्हणाली," पण अभिचे आधी लग्न झाले आहे ना..त्याचा मुलगा अनिकेत भेटला आम्हाला"!

यावर पल्लवी म्हणाली," म्हणजे अभिने तुम्हाला काहीच सांगितले नाही तर..अहो, अभिच्या कंपनीत कामाला असलेल्या देशमाने या दांपत्याचा अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी हा पाच वर्षांचा अनिकेत बचावला.त्याचा सांभाळ करणारे कुणीच नसल्याने अभिने त्याला रितसर दत्तक घेऊन आपल्या घरी आणले.सर्वांना तो आपला मुलगा अशीच अनिकेतची ओळख करुन देतो.पण त्याची एक अट आहे बरं का! लग्न होऊन येणाऱ्या मुलीने अनिकेतला आपला मुलगा मानले पाहिजे".
हे ऐकल्यावर प्रज्ञाच्या मनातील अभिची प्रतिमा अधिकच उंचावली.
तिने होकार देण्याचे मनोमन ठरवले.आज तिच्या मनात, "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे " ही गाण्याची ओळ फिरुन फिरुन येत होती...

इति हेमा उवाच
©® सौ.हेमा पाटील.
सदर कथा लेखिका सौ.हेमा पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

धन्यवाद.!!!



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने