उर्मी (भाग २)



उर्मी भाग २
लेखिका- सोनाली शिंदे



दुसऱ्या दिवशी रविवार होता. ऊर्मी दुपारी माझ्या घरी आली. दारातूनच ओरडत, " हे स्यमी काय करतेस ग, आज माझ्याबरोबर बाजारात येशील का तिथं कपड्याचा सेल लागलाय."

      माझी आई मध्येच ऊर्मी ला म्हणाली, " अग हे स्यमि म्हणजे काय ग." 

  ऊर्मी म्हणाली, " आहो काकू मी समीक्षा ला स्यमी म्हणते, शॉर्टकट नाव मला भारी कुल वाटतं."

माझ्या आईन माझ्याकडे बघून भुवया उंचावल्या आणि स्वयंपाक घरात निघून गेली. आई ने आतून आवाज दिला " समीक्षा ऊर्मी ला चहाला आत घेऊन ये".  

     मी ऊर्मी ला घेऊन गेले, ऊर्मी ने आज थ्री फोर्थ टॉप घातला होता, अन् त्यात आई ने तिला पाट बसायला दिला, थ्री फोर्थ जीन्स ची असल्यानं तिला काय पाटावर बसता येईना, हे तिच्या हाव भावा वरून मला समजलं.

    " अग ऊर्मी वेडी का तू एवढा छान थ्री फोर्थ टॉप घातलाय अन् तू काय खाली पाटावर बसणार". थांब जरा, ही घे खुर्ची तू निवांत बसशील".

     आई ने माझ्याकडे डोळे मोठे करून बघितलं. कारण आईला तश्या मॉडर्न कपड्यांचा फारच राग.

ऊर्मी ने चहा पित पित मला घेऊन जाण्याची विनंती केली. आईने थोडे आडे वेडे घेत हो म्हटल. " फार वेळ करू नका वेळेत घरी या". अस बोलली. 

     ऊर्मी ला मी पुढं हो म्हटल मी आलेच कपडे बदलून, ऊर्मी ही बोलली " हो तू आवरून माझ्या घरी ये मी आईकडून थोडे पैसे घेते". ऊर्मी गेली, आणि इकडे आईने माझी शाळा घेतली.

     " अग समीक्षा कशीय ग ही ऊर्मी, कसे कपडे घातलेत बघितलं ना, तू रोज तिच्यासोबत ये जा करतेस, उद्या तू ही अशा कपड्यांसाठी हट्ट करशील." आई ला मी समजावत बोलले.  

  " अग आई तुला ती जशी वाटतेय तशी ती नाही, ती मनाने खूपच निर्मळ आहे, आणि जशी आत तशीच बाहेरही". आम्ही आमच्या आवडी निवडी जपतो, लादत नाही. आणि राहिला प्रश्न तिच्या सारखे कपडे घालण्याचा, जर समजा तुझी एखादी साडी मला खूपच आवडली, किंवा बाबांचा शर्ट आवडला तर काय कॉलेजला कधी मी बाबांचा शर्ट किंवा तुझी आवडलेली साडी अधूनमधून घालून गेले अस झाल का? मग ऊर्मी चा एखादा ड्रेस मला भावलाच तर काय मी तो लगेच घालून मिरवेन? 

     आई तेलाने कितीही ठरवलंच की त्याला पाण्यात मिसळायचं तरी ते शक्य होत का? दोंघाची अस्तित्व वेगवेगळी आहेत. आणि दोघंही आपल्या जागी महत्वाचे, तेव्हा असे विचार करणं सोड."

एवढं सगळं ऐकून आईने माझ्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवला, आणि म्हणाली " खरंच खूपच समजूतदार झाली आमची समीक्षा". आई ला पटलं.

     आई ने मला थांबवलं आणि साखरेच्या डब्यात ठेवलेले पैसे माझ्या हातावर ठेवले आणि बोलली.

   "सेल मधे एखादा ड्रेस या बजेट आवडला तर नक्की तुझ्यासाठी घे".मी आनंदाने बाहेर पडले.

    सेल मध्ये ऊर्मी ने स्वतः ला हवे असलेले बरचसे कपडे खरेदी केले, आणि आपली कॉलेजची आठवडा भराची सोय ही. माझ्या पॅटर्न मधले एकही ड्रेस मला सेल मध्ये बघायला मिळाला नाही, मी आई ने दिलेले पैसे तसेच घरी माघारी आणले.

     कॉलेज घर, पाणीपुरी पार्टी  करत  करत कधी आमचं पदवी च शिक्षण पूर्ण झालं आम्हालाच कळलं नाही.

   कॉलेज संपलं होत थोड्याच दिवसात दोघींच्या ही घरी स्थळ बघण्याचे कार्यक्रम सुरू झाले. ऊर्मी शॉपिंग ला मला बोलवायला आली की समजायचं हिला या आठवड्यात कोणतरी मुलगा पाहायला येणार.  

    थोड्याच महिन्यांच्या कालावधीत ऊर्मी च आणि माझं पुढेमागे लग्न झालं. संसार सुरू झाले, ऊर्मी तिच्या संसारात आणि मी माझ्या संसारात रमून गेले. अधून मधून कॉलेज, गप्पा, पाणीपुरी चा कट्टा आठवणीत सरकून जायचं. आणि मी अस्वस्थ होयचे. आणि आपल्या मनातलं कोणाला तरी कळाव आणि अचानक फोन ची रिंग वाजवी..




......फोन ची रिंग वाजली,  मी घाईने फोन उचलला 

"हॅलो कोण बोलतय" मी दबकत विचारल. 

" हे स्यामी कशी आहेस ग, काय आठवण येते का नाही मैत्रिणीची.

" अग ऊर्मी तू" मी क्षणभर विसरलेच की मी सासरी आहे, आणि मोठ्याने फोनवर जवळ जवळ किंचळलेच. 

" अग कुठ आहेस तू ऊर्मी, आणि कशी आहेस. मला भेटायचे तुला." 

" अग हो तेच सांगायला फोन केलाय" मी आठवडाभरा साठी माहेरी येणार आहे तू पण ये ना, तुझ्या सासरी विचारून खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही." आणि एक ना आधी आपण आपल्या पाणीपुरी  च्या कट्ट्यावर जायचं, स्टँडवर थांब तिथूनच जाऊ.

खूप दिवस मी माहेरी गेलीच न्हवते त्यामुळं घरात कोणीच आढेवेढे घेतले नाहीत, परवानगी मिळाली आणि माझी वेगाने आवराआवर सुरू झाली.  

अखेर 'अहो' नी मला स्टँड वर गाडीत बसवलं आणि ते गेले. गाडीत बसल्यावर मला माहेरच्या आधी आमची छोटीशी पाणीपुरी पार्टी ची फार उस्तुकता होती, कारण त्याच ठिकाणी आम्ही आमचे खट्टे, मिठ्ठे प्रसंग एकमेकींशी शेअर केले होते.

     प्रवास झपाझप उरकला कधी कळलं च नाही, माझी गाडी माहेरी स्टँडवर येऊन थांबली.मी माझं सामान घेऊन उतरले आणि सावलीत जाऊन ऊर्मी ची वाट पाहू लागले, अजून तिला येयला वेळ होता.  

मनात म्हटल जुनी उशिरा येण्याची हीची सवय काय अजून गेली नाही, कशी असेल ऊर्मी, तिचे कपडे, नटन, मुरडण मी तिला आठवून कल्पनाच करत होते तेवढ्यात एक चारचाकी गाडी माझ्या समोर येऊन थांबली. त्या गाडीतून एक उंचपुरी, केस वाढवलेली,भरजरी कलाकुसर केलेला सलवार कुडता घातलेली एक तरुणी खाली उतरली, आणि मी तिच्याकडे पाहतच राहिले. ती दुसरी कोणी नसुन ऊर्मी च होती, तिची ही प्रतिक्रिया सारखीच होती, कारण मी माझे  केस थोडे कापले होते, त्यावर एक छोटा क्लचर लावला होता. आणि कपडे म्हणावे तर लेगिंस आणि टॉप. दोघी एकमेकींच्या समोर येऊन एकदम किंचाळलोच " अग तू अन् अशी" अगदी दोंघीच एकच वाक्य. मी ऊर्मी ला पहिले मिठीच मारली.  

    दोघी ही अगदी भावूक झालो. मी तिला सावरलं. 

ऊर्मी बाकी सगळं जाऊ दे मला आधी पाणीपुरी खायचीय. आपण बाकीचं तिकडेच बोलू.

आम्ही रिक्षा केली आणि निघालो, रिक्षात अगदी रिक्षचालकाचे कान किटले असतील आमची चपर चपर ऐकून. अखेर आमचा कट्टा आलाच.

सामान उतरून घेतलं आणि आम्ही पाणीपुरी वाल्याकडे आलो. यावेळी मी पाणीपुरी ची ऑर्डर दिली.

" भैया दो पाणीपुरी, एक मिठी, एक मिडीयम".

" ऊर्मी ने मला चिडवत म्हणाली, अरे वा स्याम् सुधारणा झालीय चांगलीच तुझ्यात."

" हो ना कॉलेजात तुझ एकल नाही, पण भारतीय नारी लग्नानंतर नवऱ्याच एकावच लागतंय." अहो ना मी अस राहिलेलं आवडत.सुरुवातीला मला थोड जड गेलं, केस तर मी जिवावर दगड ठेवून कापले, पण वाद होण्यापेक्षा बदल स्वीकारणं मी योग्य समजल."

    " पण ऊर्मी तुला अस बघणं खूपच शोकिंग आहे माझ्यासाठी, तू तर कधी कोणासाठी बदलली नाहीस, आणि एकदम एवढा बदल, सगळं ठीक आहे ना तिकडे."

   "सगळं ठीक आहे , स्यम नवरा राजकारणात आहे, सतत मोठमोठ्या लोकांच्या भेटी असतात घरी, त्यातून माझ्याकडे काही सामाजिक संस्थांची पण काम असतात मग एकतर साडी किंवा सलवार कुडता, यातच वावरावं लागतं, पण आणि आम्ही दोघच कुठ बाहेर गेलो तर मी माझे जुने स्टाईल चे कपडे पण घालते. पण सोशल मीडिया वर पोस्ट नाही करत. पण बऱ्याचदा मी अशीच असते, पण याचा अर्थ असा नाही, मी अजुनही माझ्या मनातला फॅशन शो जगते, स्वतः वर अजुनही तेवढंच प्रेम करते. मी पण बदल स्वीकारला च की पण तो फक्त बाह्य बदल, जस तू स्वीकारला.  

  आपली मन अजून तशीच आहेत स्याम, नाहीतर एवढ्या दिवसांनी पाणीपुरी च्या आवडी पण बदलल्या असत्या.' अजून तुझी पाणीपुरी मिडीयम च आहे आणि माझी तिखी.

    पाणीपुरी मूळची पोकळ च असते स्यम. त्यात कोणत्या प्रकारचं पाणी भरायच हे त्या पाणीपुरी बनवणाऱ्या वर अवलंबून नसतं. ते असतं खाणाऱ्या वर. म्हणजेच पाणीपुरी च्या ठेल्याचा मालक हा पाणी पुरी वाला नसतोच तो असतो खाणारा.  

    आज इतक्या दिवसांनी पाणीपुरी च्या पाण्याची खरी चव बराचवेळ माझ्या जिभेवर रेंगाळत राहिली ती कायमचीच.
समाप्त.

©️ सोनाली गुलाब शिंदे

सदर लेख लेखिका सोनाली शिंदे यांचा आहे. त्याचे कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी तो स्वेच्छेने सदर लेख ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेला आहे. तसं त्यांचं संमतीपत्र आमच्याकडे आहे याची नोंद घ्यावी. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल साभार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने