आम्ही पाहिलेला वाघ 🐅🐅
© स्मिता मिलिंद
२००२ च्या दिवाळी सुट्टीत आम्ही तिघे .. मी नवरा आणि मोठा मुलगा .. सौख्यद् .. मध्यप्रदेशमधे फिरायला गेलो.
बांधवगढ अभयारण्यात जाण्यासाठी पहाटे ५:४५ ची पहिली सफारी घेतली. open जिप्सीमधे आम्ही तिघे आणि ड्रायव्हर आणि गाईड असे पाच जण. 🏞🌄
थंडीचे दिवस, हवेत गारठा, धुके, पहाट शांतता, अंधुकसा प्रकाश, नुकतचं कुठे उजाडायला सुरुवात झालेली. जंगलाचा विशिष्ठ वास आणि गुढसा आवाज.
आम्ही भारावलेल्या, अधीर अवस्थेत. ' आवाज करायचा नाही, अन्यथा प्राणी पळुन जातात. ' ही सूचना पाळत होतो. हरणे चितळ ससे ई. प्राणी, पक्षी दिसत होते. वाघ दिसण्याची ओढ लागलेली. वाघ तर मुख्य आकर्षण.
साधारण एक तासाने गाईडला त्याच्या वॉकी टॉकी वरुन सूचना मिळाली. एका वाघाने काल रात्री रानम्हैस मारली आणि आत्ता तो तिला खातोय. आमची गाडी तिकडे वळली. तिथे ४/५ जिप्सी आधीच रांग लावुन उभ्या.
झाले काय होते कि तो वाघ आत दाट झाडीत होता. तिथे गाड्या जात नव्हत्या.
आमच्या डाव्या बाजूला बराच आत. दाट झाडी असल्याने तिथे हत्तीवरून जावे लागत होते. त्या हत्तीच्या सवारीसाठी रांग होती. त्या पायवाटेवर सर्व गाड्या थांबलेल्या. आमचा नंबर अगदी शेवटी ४/५ वा होता.
आमच्या मागे फक्त जंगल आणि पायवाट ... एकदम शांत गुढसे...
एकच हत्ती आळीपाळीने सर्वांना नेणार होता. आम्ही वाट बघत होतो.
सौख्यद ४/५ वर्षांचा. त्याला सू सू आली. छोटाच होता तो. गाईडला विचारले. दोन मिनिटे खाली उतरु का? त्याने नकार दिला. जंगलात असे उतरायला परवानगी नसते. त्यात धोका असतो. मुलाला या गोष्टीचे गांभीर्य कळण्याची शक्यता नव्हती. त्याची घाई चाललेली, "आई दोनच मिनिटे, पटकन जाऊन येउ. ते बघ तिथे bushes आहेत. त्या मागे जाऊन मी लगेच येतो." शेवटी गाईडने कशीबशी परवानगी दिली. म्हणजे पर्यायच नव्हता त्याला. 😛😛
आम्ही उतरणार इतक्यात पक्षी आणि माकडे ओरडायला लागली. गाइड म्हणाला, " जेंव्हा माकडे अशी ओरडतात तेंव्हा वाघ आसपास असतो. मग तुमचा नंबर आला आणि वाघ गेला तर, संधी हुकेल." आम्ही न उतरण्याचा निर्णय घेतला. आणि वाट बघत थांबलो.
आता पक्षी आणि माकडांचा आवाज जास्तच वाढला होता. आम्ही काळजीत....वाघ निघुन गेला तर...
५/१० मिनिटांनी मागे नजर गेली. तर ज्या झुडुपांबद्दल सौख्यद बोलत होता तिथे पायवाट ओलांडताना उभा राहुन, वाघ आमच्याकडे बघत होता.
नि:स्तब्ध, मंत्रमुग्ध, भयचकित, अत्यानंद सगळ्या भावना एकवटून आल्या होत्या आमच्यात. आणि मुख्य म्हणजे तो वाघ तिथेच सू सू करत होता. 😳😨🥵😨
त्याचे ते दर्शन झळाळती त्वचा. अंतराचा ठाव घेणारी, खिळवुन ठेवणारी नजर. दमदारपणे पावले रोवुन स्वतःचे अस्तित्व दाखविणारा दिमाख. जंगलाचा स्वामी असल्याचा थाट. केवळ ६/७ मीटर वरुन, मधे कोणताही अडथळा नसताना त्याचे झालेले दणदणीत दर्शन.
काय नव्हते त्या नजरेत. मी इथला अनभिषिक्त सम्राट असल्याचा दिमाख. ' हे कोण अनाहुत आलेत माझ्या राज्यात' म्हणून तपासणी करणारे सोन्याचे डोळे. प्रत्येक श्वासागणिक थरथरणारी पट्टेदार त्वचा. किंचित बाकदार शेपटी. फुगीर घट्ट मखमली पंजे. वाऱ्याबरोबर येणारा, जंगली पशुचा उग्र दर्प.
आम्ही दिग्मुढ नि:स्तब्ध. त्याची शोधक नजर, सावध पवित्रा.
त्या जगात फक्त आम्ही सहाजण होतो. आम्ही पाच आणि तो सरदार ... एकमेकांना अजमावत, जोखत. तो नक्की काय विचार करत असेल. नुकतीच क्षुधाशांती झालेली, त्याची तृप्तता. मग माघारी परतताना राज्याचे केलेले निरीक्षण.
त्याच्या दृष्टीने तर आम्ही क:पदार्थच असु. पण आमच्यासाठी तर जगच थांबले होते. मधे कोणताही अडसर नाही, त्याला कोणतेही बंधन नाही आणि आम्हाला कोणतेही सरंक्षण नाही. आणि हा दणकटपणे आमच्या समोर, एका झेपेच्या अंतरावर आडवा उभा राहिलेला, पायवाट ओलांडताना थबकलेला.
आमची विचारशक्ती बहुतेक बंदच पडली होती. नक्की काय भावना होत्या काय माहिती. काळ थांबणं, म्हणजे काय हे समजले होते. त्याच्या नजरेने जखडलो होतो आम्ही सर्व. ती नजरेची धग अनुभवत त्यातच अडकलो होतो. हे असेच सर्व थांबावे. आम्ही इथे, तो हि इथेच. एकमेकांना बघत. साठवत होतो नजरेत ... त्याचं असणं, दिसणं, बघणं.... कसे वर्णन करता येइल त्या काळाचे.
थोड्या वेळाने आमच्या पुढे असणाऱ्या पर्यटकांना समजले आणि ते गाड्या वळवुन मागे येउ लागले. त्या आवाजाने त्याचे लक्ष विचलित झाले. आमच्या वरची ती जादुई नजर काढून त्याने आजूबाजूला पाहिले. आणि तो तशीच दमदार पावले टाकत दिमाखात, तोऱ्यात निघून गेला. आणि मग आम्ही भानावर आलो. त्या गारुडामधुन, जरा सावरलो. गाडीतच सिटवर बसलो. पाणी प्यायलो. थोडावेळाने आम्हाला वाचा फुटली.
आम्हाला काय मिळाले ते आमच्या लक्षात आले. त्याच बरोबरीने किती मोठे संकट टळले याचे भान आले.
जर आणि तर .... सौख्यदला घेउन आम्ही त्याच झुडुपाजवळ जाणार होतो. तीच वेळ साधणार होतो. जमिनीवर आम्ही समोरा समोर, शेजारी शेजारी. गाडीतून उतरण्यासाठी बाहेर टाकलेले पाऊल परत माघारी घेतलेले. काय घडले असते. जर आणि तर .....
तो ड्रायव्हर आणि गाईड, संमिश्र भावना होत्या त्यांच्या. " सांगत होतो ना आम्ही, उतरु नका, ते या साठीच. म्हणून परवानगी नसते. काहीही प्रसंग येऊ शकतो."
त्या बरोबरच,
"तुम्ही खूप भाग्यवान आहात. वाघाचे, ते ही सर्वात मोठ्या, लांब वाघाचे दर्शन तुम्हाला इतक्या जवळून आणि इतक्या वेळ मिळाले. ते हि पहिल्या सफारीत. काही लोकं यासाठी २/३ दिवसात ५/६ सफारी घेतात. तरी असा वाघ कोणालाच बघायला मिळत नाही." मी हात जोडले .. 🙏🏻🙏🏻
पुढे गेल्यावर, हत्तीवरून जरा झाडीत जाऊन, एका वाघिणीला बछड्यांसोबत पहुडलेले पाहिले. तो दिवस आमच्यावर दैवी खैरातीचा होता.
नंतर परतताना आम्ही सर्वजण हा प्रसंग आठवुन खूप हसत होतो. सौख्यदला चिडवत होतो. 'वाघाबरोबर सू सू केली असती बघ तु'. ते दोघे म्हणाले, " आम्ही हे कधीच विसरु शकणार नाही." आणि आमच्या तर मनावर हा प्रसंग कायमचा कोरला गेलाय. देवाचे शतशः आभार..... 🙏🏻🙏🏻
© स्मिता मिलिंद 🍁
सदर लेख लेखिका स्मिता मिलिंद यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
