©®राधिका कुलकर्णी
ती वीजेच्या गतीने दाराच्या बाजूला लपून हातात काचेचा तुकडा पकडून उभी राहीली.
बाजेवरचे पांघरूण असे काही ठेवले की जणू त्यात कोणी झोपलेय असा भास व्हावा.
पत्र्याच्या दरवाजाला एक अगदी सुक्ष्म छिद्र पडले होते त्यातुन तिला बाहेरचे स्वच्छ दिसत होते परंतु बाहेरच्याला मात्र काहीही दिसले नसते.
ह्याचाच फायदा घेत तिने बाहेर कोण आहे ह्याचा अंदाज घेतला.एक आडदांड देहयष्टीचा पुरूष मगाचच्याच स्त्री बरोबर तिथे आलेला दिसत होता.
ती स्त्री खाणाखूणातच आत नविन सावज असल्याचे सांगत होती.
त्याने खिडकीतुन तशी खात्री पटताच त्या बाईला शंभराच्या पाच नोटा दिल्या तशी ती त्या मगाच्या पाेराला हाताशी पकडून तिकडून निघुन जाताना दिसली.
आता तिला ह्या धटिंगणापासुन स्वत:ला वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावणे आवश्यक होते.तिने एक मिनिट डोळे मिटून आई जगदंबेची मूर्ती डोळ्यापूढे आणली.
मनानेच तिचे स्मरण करत लढायला सज्ज झाली.हलक्या हाताने दरवाजाचे कुलूप उघडल्याचा मग करकर करत कडी उघडल्याचाही एका पाठोपाठ आवाज आला.
तिने सावध पवित्रा घेत श्वास रोखला.दार आतल्या बाजूकडे लोटले गेले तसे ती त्या दाराआड लपली गेली.हा ही तिच्यासाठी आणखी एक फायदाच होता.
त्याने आत पाय ठेवताच काचा पायात घुसुन तो जागीच कळवळला.
दोन क्षण डोळ्या पुढे अंधारी आली तसा तो लंगडत लंगडत विरूद्ध दिशेच्या भिंतीचा आधार घेत सरकला.हिच संधी साधुन पुर्ण ताकदीनिशी कालिंदीने त्याला धक्का मारला.
तो कोलमडून खाली पडला तसे वेगाने ती बाहेर पडली.खाेलीचे दार लावायचा प्रयत्न करताना तिचाही नकळत त्या काचकुऱ्यावर पाय पडला.
अंगातुन अचानक सणक गेली आणि ती वेदनेने विव्हळली.पण आता वेळ दवडून चालणार नव्हता.तिने कसेबसे दार पूढे करून तिकडून पळ काढला.पायातुन रक्त वहात होते पण त्याची तमा न बाळगता ती पळत सुटली.पाठीमागे वळून पाहता तो धटिंगण गूंडही तिच्या मागावर येत होता.
सगळा जीव मूठीत घेऊन ती पळत त्या झाडापाशी पोहोचली.रस्त्यावर चीटपाखरू नव्हते.अशा निर्जन रस्त्यावर ती त्याच्या सहजपणे तावडीत सापडू शकणार होती.काय करावे ?
हा विचार करत असतानाच तिचे वर झाडाकडे लक्ष गेले.तिला एक युक्ती सुचली.ते एक जूने विस्तिर्ण बुंधा असलेले वडाचे झाड होते.खूप घनदाटही होते.
लहानपणीचा सूरपारंब्या खेळताना कित्येकवेळा झाडावर चढायचा सराव आता तिच्या उपयोगी पडणार होता.
ती पटकन परकाराचा कासोटा बांधुन झाडावर चढली आणि खालुन सहजी दृष्टीस पडणार नाही अशा फांदीवर सर्व शरीराला आडवे पसरून जमिनीकडे तोंड करून पडून राहीली.
दुडक्या चालीने लंगडत लंगडत तो माणूस झाडापर्यंत पोहोचला.
दूरवर नजर फिरवुनही त्याला पोरीचा मागमूसही दिसेना तसा तो शंका येवून झाडाकडे निरखून पाहू लागला.
पण झाडावरही काहीच नसल्याची त्याची खात्री पटली तसा तो आल्या पावली माघारी फिरलेला कालिंदीने बघितला त्याबरोबर तिने समाधानाचा सुस्कारा सोडला.
तिचा जीव भांड्यात पडला हे संकट विनासायास टळल्याचे पाहून.
आई जगदंबेचे मनोमन आभार मानत ती हलकेच खाली उतरली.मगाच्याच खळग्यातल्या पाण्याने पायाची जखम धुतली. परकराच्या किनारीचा एक लांब पट्टा कापून पायाला पट्टी बांधली आणि ती रस्त्याने चालू लागली.
चालताना प्रत्येकवेळी तीव्र वेदना शरीरभर दौडत होती त्यामुळे तिची चालही पहिल्यापेक्षा मंदावली होती पण आता तिला कुणाच्या पाठी येण्याचे भय नव्हते म्हणुन ती निश्चिंत मनाने हळुहळू मार्गक्रमण करत होती.
बरेच अंतर चालुन थकल्यावर तिने सहज मागे वळुन बघितले तर काय….!! मगाचाच तो गूंड तीव्र गतीने तिचा पाठलाग करत होता.
म्हणजे झाडावर कोणी नाही असे भासवत पलटणे हा त्याचा डाव होता तर..!!
आपण खाली उतरून रस्त्याला लागलो की त्याला मला पकडणे जास्त सोपे जाणार होते…
आपण किती भ्रमात राहीलो..!!
आता काय करायचे..!! तिला काही सुचत नव्हते.
जीवाच्या आकांताने ती रस्त्यावर पळत सुटली.
लहान वय,शेलाटा बांधा त्यात एकदम चिकण रस्ता तिला पळायला सोपे जात होते.
तिचा पळण्याचा वेग त्या गूंडाला मॅच करताना बरीच दमछाक होत होती परंतु हातात आलेले सावज असेच सोडून द्यायची त्याची मुळीच तयारी नव्हती त्यामुळे तोही वेगाने पळत होता.
दोघांमधील अंतर कमी कमी होत होते.कालिंदीला आपला अंत जसजसा जवळ दिसू लागला तसा तिने शेवटचा प्रयत्न म्हणून देवीचा गजर करत धावायला सूरवात केली.
पायातल्या जखमेतून भळभळा रक्त वाहू लागले तरीही ती पळत होती.पळत होती…..अतिरक्तस्रावाने तिला डोळ्यापूढे अंधारी येवू लागली.
ती हेलकांडत रस्त्याच्या मध्यभागातून पळत असतानाच चक्कर येऊन पडली.
तो माणूस आता काही अंतरावर तिच्या नजरेच्या टप्प्यात तिला दिसू लागला पण तिच्यातले जगण्याचे त्राण संपले होते.एका क्षणाला तिने डोळे मिटले ते कायमचेच..…….!!
जेव्हा परत शुद्धीवर आली तेव्हा ती कुठल्यातरी मोठ्या लांबलचक हॉलवजा आयताकृती खोलीत एका बेडवर पडलेली होती.
तिच्या हाताला सलाईन लावलेले आणि अंगावर हॉस्पीटलचा निळा अॅप्रन चढवलेला दिसत होता.पायालाही मलमपट्टी केलेली दिसत होती.
तिला काहीच समजत नव्हते.हे स्वप्न आहे की सत्य हेही तिला कळत नव्हते.तिने स्वत:चिमटा काढून सत्यात असल्याची खात्री केली.तिला रस्त्यावर चक्कर येऊन पडल्यानंतरचे काहीच आठवत नव्हते.
मग ही कोणती जागा आहे?
मला इकडे कोणी आणले?
मी त्या गूंडाच्याच तावडीत तर नाही ना सापडलेय?
कदाचित त्यानेच मला इस्पितळात नसेल ना आणले.?हे सगळे काय आहे?
मी कुठे येऊन पोहोचलेयऽऽऽ?
तिच्या डोक्यात हजारो प्रश्नांनी जाळे विणायला सुरवात केली.आसपास कोणी नाहिये हे पाहून इथुन पळ काढलेलाच बरा….!
तिने तटातट सलाईनची सूई उपसुन फेकली आणि पळुन जाणार इतक्यात समोरच्या टेबलवर तिची नजर पडली.
समोरच्या टेबलावर तिने पोलक्यात खोचलेल्या देवीचा फोटो व्यवस्थित चिकटवुन त्याला हार घातला होता.त्यापुढे एक मंद दिवा जळत होता.
ते पाहून आपण सुरक्षित जागी पोहोचलोय ह्याची तिला खात्री पटली परंतु आपण त्या बेशुद्धावस्थेत इकडे कसे पोहोचलो,कोणी आणले आपल्याला इकडे?हे प्रश्न तिला स्वस्थ बसु देईना.तिने हलकेच जमिनीवर पाय टेकवला आणि चालत चालत हॉलच्या दरवाजापाशी पोहोचली.
दरवाजापाशी एक वृद्ध स्त्री स्टूलवर बसली होती.हिला चालत आलेली पाहताच ती घाईने उठत तिला म्हणाली,"अहो काय करताय तुम्ही!!!असे बेडवरून उठुन कूठे चाललात? मॅडम पाहिल्या तर रागावतील ना मला.चला जागेवर जाऊन पडा."
तिने हाताला धरून तिला बेडवर झोपवले आणि लगेच लगबगीने कुणालातरी तिला शूद्ध आल्याचे सांगीतले.
त्याबरोबर एक मध्यमवयीन स्त्री हिरवीगार साडी,हिरव्या बांगड्या,कपाळावर भव्य लाल कुंकू,गळ्यात मंगळसुत्र जणू साक्षात जगदंबेचेच रूप….!! अॅप्रन चढवून तिच्याजवळ आली.हाताने मनगटावरची नस तपासत विचारत होती,"हम्म्ऽऽऽ..कसे वाटतेय आताऽऽ??
ती जरा दबक्या स्वरातच म्हणाली,"मला बरे वाटतेय आता….पणऽऽऽ मी इथे कशी काय आलेय मॅडम? तुम्ही कोण आहात?"
त्यावर मंद स्मित करत ती बाई उत्तरली,"अग्ं पोरीऽऽऽ काल तू रस्त्यावर बेशुद्ध पडलीस आणि माझी कार त्याच रस्त्यावरून चाललेली असताना मी तूला पाहिले.मी एक डॉक्टर आहे म्हणुन गाडीतुन खाली उतरून तुझ्याकडे येतच होते की एक आडदांड मनुष्य तुझ्याजवळ येऊन तूला उचलून नेऊ पहात होता.
मी जोरात ओरडले तसा तो सटपटला आणि घाबरून तूला तिकडेच सोडून पळून गेला.मग मीच तूला गाडीत घालून माझ्या क्लिनिकमधे आणले.
तु बेशूद्ध होतीस म्हणुन तूला सलाईन चढवून वाट पहात होते कधी शुद्धीवर येतेस.चला आता काळजी मिटली.आता तू आराम कर आणि जोवर पूर्ण ईलाज होऊन तू बरी होत नाहीस तोवर इकडून बाहेर पडायचा विचारही करायचा नाही,काय समजले??"
तिने मानेनेच होकार दिला आणि ती निश्चिंतपणे बेडवर पडून राहीली.मॅडमनी तिला बोलता बोलताच एक इंजक्शन दिले ज्यामुळे तिला परत गाढ झोप लागली.
कालिंदीला कानावर कसलातरी अगम्य गोंगाट ऐकू येत होता.पण डोळे इतके जडावले होते की ते उघडवत नव्हते तिच्याच्याने.
महत्प्रयासाने तिने डोळे उघडले.आजूबाजूला नजर फिरवली तर कोणीच दिसत नव्हते.डोके प्रचंड गरगरत होते.तरीही बळ एकवटून ती चालत चालत वॉर्डच्या बाहेर आली.
ह्यावेळी दरवाजावर कोणीच पाळत ठेवुन नव्हते.सकाळची वेळ होती. बाहेर वॉर्डला लागुनच एक केबीन दिसत होती.ती चालत चालत केबीनपाशी पोहोचली.एक तरूण मुलगी डॉक्टरचा व्हाईट कोट घालून खुर्चीत बसुन काहीतरी पेपर्स चेक करत होती.
त्या मुलीचे निरीक्षण करत असतानाच एक नर्स दारात येऊन तिला म्हणाली,"आे पेशंटबाईऽऽ यहाँ क्या कर रही हो आप आपका बेड छोडकर? "
नर्सच्या बोलण्याने त्या तरूणीने मान वर करून कालिंदीकडे बघितले आणि ती टणकन् जवळजवळ उडी मारतच आपल्या खुर्चीतुन उठून तिच्याजवळ आली आणि म्हणाली,"थँक गॉड आपको होश आया..। अब कैसा लग रहा है आपको?"
कालिंदीला त्यातुन काहीच अर्थबोध होईना.
त्या तरूणीच्या चेहऱ्याचे बारकाईने निरीक्षण केल्यावर तिला जाणवले की रात्री भेटलेल्या डॉक्टरीणबाईंशी हिचा चेहरा बऱ्यापैकी मिळता जुळता दिसत होता.
तिने सहजच अंदाज लावला कदाचित ही त्यांचीच मुलगी असेल पण काल आपल्याला इकडे आणले तेव्हा ही इकडे नसेल म्हणुन असे विचारत असेल असा अंदाज करत ती त्या तरूण डॉक्टरच्या समोरच्या खुर्चीत बसली.म्हणजे तिनेच कालिंदीला समोर बसवले.
त्या डॉक्टरच्या तरूणीच्या चेहऱ्यावर अजूनही कुतूहल दिसत होते.तिला बहुतेक कालिंदीला बरेच काही विचारायचे असावे पण ती बेशुद्धीत असल्याने विचारणे शक्य झाले नव्हते.
मग तिने घसा साफ करत विचारले,"क्या नाम है तुम्हारा?कहाँ रहती हो?तूम ऐसी बेहोशी कि हालत मे यहाँ तक पहुँची कैसेऽऽऽ?"
शेवटचा प्रश्न ऐकुन कालिंदी आश्चर्यचकीत झाली.तिला तर डॉक्टरीण बाईंनीच सांगीतले होते की त्यांनीच तिला इकडे आणले मग हिला माहित नाही का मी इकडे कशी आले.?ही असे का विचारतीय?
कालिंदीच्या चेहऱ्यावर जमा झालेले प्रश्न पाहून त्या डॉक्टर तरूणीलाही काहीच उलगडा होईना.
मग स्वत:ला सावरत तिने पून्हा विचारले,"बाकी सब रहने दो,पहले ये बताओ,अब तुम्हे कैसा लग रहा है?"
कालिंदीने मान हलवून इशाऱ्यातच सांगीतले की आता मी ठिक आहे.तरीही मगाचच्या प्रश्नाने कालिंदी गोंधळली होती.
मनाशी काहीतरी ठरवून तिने तरूण डॉक्टरशी बोलायला सूरवात केली,"डॉक्टर मॅडम माझे नाव कालिंद.काल मला तुमची आईच इकडे घेऊन आली.मी रस्त्यावर बेहोश पडले असताना त्यांनी मला बघितले आणि इकडे दाखल केले.काल रात्री त्या मला चेक करायलाही आल्या होत्या.एक झोपेचे इंजेक्शन दिल्यामुळे मला गाढ झोप लागली ते आत्ता सकाळीच जाग आली.सकाळी मात्र तुम्ही दिसल्या त्यांच्या ऐवजी.पण चेहरा सारखाच असल्याने मी ओळखले की तूम्ही त्यांची मुलगी आहात.
कालिंदीचे बोलणे ऐकून त्या तरूणीचे डोळे तरळले पाण्याने तरीही प्रचंड आश्चर्य भरलेले त्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते.तिला काहीच टोटल लागत नव्हती.
एवढीशी मुलगी इतक्या धिटाईने किती धादांत खोटी स्टोरी रचून सांगतेय ह्याचे तिला आश्चर्य वाटत होते.
परंतु आपल्या मनातला हा गोंधळ सध्या मनातच दाबून ठेवत तिने शांततेने विचारले,"बर मग सांग बघुऽऽ...माझी आई तूला चेकअप करायला आली तेव्हा साधारण किती वाजले होते?तिने काय कपडे परीधान केले होते सांगू शकशील?"
कालिंदीने लगेच सांगीतले,"होऽऽ होऽऽ..का नाही..,अगदी व्यवस्थित सांगू शकेन.डॉक्टर मॅडमनी हिरवीगार साडी नेसली होती.
हिरव्या बांगड्या घातल्या होत्या.कपाळावर लाल कुंकू आणि अगदी देवीसारखे तेज होते चेहऱ्यावर.त्यांनीच मला तपासुन सांगीतले की कसे त्यांनी मला इकडे आणून माझ्यावर उपचार केले.
आता त्या तरूणीचा संयम सुटत चालला होता.तिने तिच्या मागच्या शोकेसमधे असलेली एक फोटो फ्रेम समोर धरत विचारले,"ह्याच होत्या का त्या?"
त्यावर कालिंदीने लगेच सांगितले,"होऽऽऽ..ह्याच की त्या.."
"काल मला ह्यांनीच रात्री तपासले.आणखी एक वृदध नर्स पण होती,दारात राखण करत.तिनेच मला जाण्यापासून रोखले.मग मॅडमला बोलावुन आणले.मॅडमनी माझे ठोके चेक केले आणि चेक करता करताच सगळी कहाणी ऐकवली.नंतर जे इंजक्शन दिले त्यामूळे मला गाढ झोप लागली…"
ती मूलगी सून्न होऊन रडत होती.ती का रडतेय? हे अजुनही कालिंदीला उमगत नव्हते…
शेवटी धीर एकवटून तिने विचारलेच,"डॉक्टर मॅडम किती वेळचे बघतेय तूम्ही सारख्या रडत आहात,काय झालेय?मी खरं तेच सांगतेय.तुम्ही का रडताय मला कळेल का मॅडम?"
त्यावर आपले डोळे पुसत तिने टेबलवरच्या ग्लासमधले पाणी पिले.जरा स्वत:ला शांत करत बोलायला सुरवात केली,"हे बघ कालिंदी बाळ,तु खूप लहान आहेस वयाने.मला समजत नाहीये तूला कसे सांगू पण तूला सांगीतलेच पाहिजे नाहीतर खूप मोठ्ठा घोळ होईल."
आता कालिंदीचा चेहरा प्रश्नांकित झाला.
असे काय घडलेय की ते डॉक्टर बाईंना सांगणे इतके अवघड चाललेय आणि त्या सतत रडताहेत..!!
पण मनातले विचार मनातच ठेवत तिने ती तरूण डॉक्टर काय सांगतेय ते ऐकण्यासाठी तयार झाली.
तरूण डॉक्टरने घसा साफ करत बोलायला सुरवात केली.
"हेऽऽ बघ कालिंदी,,पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू इकडे काल आलेली नाहीएस.तू दवाखान्यात अॅडमिट होऊन आज आठ दिवस झालेत.तू जवळपास बेशूद्धावस्थेत आमच्या क्लिनिकच्या पायऱ्यांवर मरणासन्न अवस्थेत पडलेली पाहून आम्ही तूला अॅडमिट करून घेतले.तुझ्या जगण्याच्या आशा खूपच कमी होत्या.त्यातल्या त्यात चोवीस तास तर खूपच क्रिटीकल होते.परंतु जेव्हा मी सकाळी राऊंडला येऊन तूला बघितले तर तूझ्या तब्येतीत खूपच फरक पडलेला होता.तो बदल कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हता.
पण तब्येत ठिक असुनही तू शुद्धीवर येत नव्हतीस म्हणुन मला चिंता वाटत होती की तू काय कायमची कोमातच राहणार की काय पण आज तूला अचानक शुद्ध आली आणि तू तुझ्या पुर्ण सेंन्सेस मधे माझ्या केबीनपर्यंत चालत आलीस हे एक मिरॅकलच आहे वैद्यकशास्त्राच्या अभ्यासा नूसार.
तुझ्यावर खरच आई जगदंबेचीच कृपा आहे म्हणुन तु वाचलीस आणि पून्हा चालती फिरती झालीएस..really you are blessed by God.!!! "
कालिंदीला हे काहीच समजत नव्हते.काल तर तिला डॉक्टरीणबाईंनी तपासले होते आणि ही काय म्हणतीय की मी आठ दिवसापासुन बेशुद्ध आहे.ही नक्की काय भानगड आहे..??
चकीत व्हायची पाळी आता कालिंदीची होती.
ती लगेच म्हणाली,"जर तुम्ही म्हणताय ते खरे असेल तर त्या रात्री मला ज्या बाई डॉक्टर म्हणुन भेटल्या त्या कोण होत्या.?"
त्यावर त्या मुलीचे डोळे पून्हा डबडबले.मग घसा खाकरतच ती पूढे बोलू लागली,"त्या बाई माझीच आई आहे हे खरय पण ती आता ह्या जगात नाही.."
ते ऐकुन कालिंदी शॉक होऊन जागेवरच थिजली.विस्फारल्या डोळ्यांनी जवळजवळ ओरडतच तिने विचारले," म्हणजेऽऽऽऽ????"
"हे कसे शक्ययऽऽऽ?"
"त्यांनीच तर माझ्यावर उपचार केले,झोपेचे इंजेक्शन दिले?मग ते सगळे खोटे होते का?"
त्यावर मुलीने पूढे सांगायला सुरवात केली.
"नाहीऽऽऽ..तुम्ही खोटे नाही बोलत आहात.पण ते म्हणतात ना "देव तारी त्याला कोण मारी" तसे देवच आत्म्याच्या रूपात तुम्हाला वाचवायला आला.खरी घटना अशीय की...तुम्ही जिथे चक्कर येऊन पडलात त्याच जागी महिन्यापूर्वीच माझ्या आईचा कार अॅक्सिडेंटमधे मृत्यु झाला.
त्यावेळी तिच्यासोबत आमची एक सिनियर स्टाफ नर्स पण होती.चालत्या गाडीने अचानक पेट घेतल्याने त्या दोघी जागीच मरण पावल्या.तूम्हीही नेमक्या त्याच जागी मरणासन्न अवस्थेत पडल्या असाव्यात.
माझी आई खूप सेवाभावी डॉक्टर होती म्हणुन कदाचित मृत्यु नंतरही तिने तुमची मदत करून तुम्हाला आमच्या नर्सिंग होममधे पोहोचवले.तुमच्यावर योग्य ते उपचार केले ज्यामुळे आज तुम्ही जीवंत आहात….."
आता दोघींच्याही डोळ्यांना अखंड धारा लागल्या.
डॉक्टर मुलीने कालिंदीला जवळ घेत गच्च मिठी मारली.कारण ह्या लहानग्या मुलीला तिच्या आईने मरणानंतरही दर्शन दिले होते.तिची आपल्या पोटच्या मुलीगत सेवा-सुश्रृषा करून तिचा जीव वाचवला होता.
कदाचित आईचे उर्वरीत कार्य मुलीने पूर्ण करावे ही इच्छाच तर तिचा आत्मा प्रगट करत नसेल ना..!!!
कालिंदीचीही स्थिती काही वेगळी नव्हती.ज्या देवीवर राग करून तिने फ्रेम फेकली त्याच देवीने डॉक्टरच्या रूपात तिला दर्शनही दिले आणि तिचे प्राणही वाचवले होते.ह्यावर काय बोलावे…!तिची तर मतीच गूंग झाली होती.
ह्या घटनेनंतर कालिंदीची देवीवरची श्रद्धा शंभर पटिने वाढली कारण देवीने आत्म्याच्या रूपात दर्शन देऊन फक्त तिचे प्राणच वाचवले नव्हते तर त्या पोरक्या जीवाला ह्या जगात मायेचे छत्र मिळवून दिले होते.
डॉक्टर ताईंने नंतर कालिंदीला लिगली अॅडॉप्ट केले.बहिणीच्या मायेने तिचा सांभाळ केला.तिला वाढवले,शिकून मोठे केले आणि आज कालिंदी एक निष्णात न्युरोसर्जन म्हणून नावारूपास आली होती. ताईंच्या बरोबरीने ती ही हॉस्पीटलचा कारभार जातीने पहात होती…!!
आजही देवीचा तोच फोटो तिच्या चेंबरमधे अग्रस्थानी शोभा वाढवत होता.ती रोज मनोभावे श्रद्धेने त्या फोटोची पूजा करते अाणि आपल्या आईची आठवण म्हणुन जपलेले गोमतीचे लॉकेटही गळ्यात घालुन मिरवत असते.
खरेतर डॉक्टरांना सर्जरी करताना कोणतेही धातूसदृश आभूषणे घालण्यास मनाई असते पण कालिंदी मात्र कोणत्याही महत्त्वाच्या सर्जरीजच्या वेळी आवर्जून ते लॉकेट देवीचा आशीर्वादस्वरूप आपल्या जवळ बाळगून असते.
आजवर कित्येक क्रिटीकल केसेस तिने ह्या आशीर्वादाच्याच जोरावर लिलया पार पाडल्या होत्या.पंचक्रोशीत तिच्या नावाचा एक सेवाभावी तरूण डॉक्टर ह्या नावाने दबदबा होता..
त्या लहानशा नर्सिंगहोमचे आता एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधे रूपांतर करून कालिंदीने त्याच हॉस्पीटलमधे एक स्पेशल सेवा दल(Special care unit) स्थापन केले जिथे गोरगरीबांना विनामुल्य उपचार मिळू शकतील.कोणताही गरीब व्यक्ति पैशाअभावी डॉक्टरी सेवेला मूकू नये ह्या मनिषेतुन तिने ह्या सेवादलाची निर्मिती केली होती..
आणि त्या सेवादलाचे नाव होते अर्थातच…..
"सप्तश्रृंगी राखीव सेवा दल"
(Saptshrungi special care unit)
~~~~~~~~~~~~(समाप्त)~~~~~~~~~~~~~~~~~~~
©®राधिका कुलकर्णी.
ही कथा पूर्णपणे काल्पनिक असुन फक्त मनोरंजन हेतुने ह्याचे लिखाण केले आहे.जगात सर्वत्र नकारात्मकतेचे वातावरण पसरलेले असताना कथेच्या माध्यमातून जर काही सकारात्मक विचार जनमानसात पोहोचवता आला तर त्यात आपलाही हातभार लागावा ह्या हेतुने ह्या कथेची निर्मिती केली आहे.कुणाचाही दूरान्वयेही संबंध येत असल्यास तो एक निव्वळ योगायोग असेल.
आपल्या प्रतिक्रीया जरूर कळवा.लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन..
सदर कथा लेखिका राधिका कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल साभार
