देव तारी.... ! ( भाग १)

© राधिका कुलकर्णी


सप्तश्रुंगी मल्टीस्पेशालिटी स्पेशल केअर युनिटमधे आज खूपच धावपळ लगबग चाललेली होती.डॉक्टर्स आणि नर्सेसचा एक मोठ्ठा जथ्था तिकडे जमा झाला होता.

स्पेशल केअर युनिटच्या बाहेर काही अंतरावर बरेच न्यूज रिपोर्टर्स तसेच वेगवेगळ्या न्युज चॅनेल्सचे लोक एक महत्त्वाची बातमी कव्हर करण्यासाठी जमले होते.

डॉ.कालिंदींच्या एका स्टेटमेंटसाठी ते कितीतरी वेळचे अधीरतेने ताटकळत बसलेले होते.हॉस्पीटल सिक्युरीटीने मोठ्या मुश्कीलीने त्या सगळ्यांना थोपवुन धरले होते.

ह्या सगळ्या चहलपहलचे तसेच खास कारण होते.

एका रोड अॅक्सिडेंट केसमधे अवघ्या बारा वर्षाची एक चिमुरडी बेशुद्धावस्थेत स्पेशल सेवा दलात अॅडमिट झाली होती.वरवर पाहता कुठलीच जखम झालेली दिसत नसली तरी एम आर आय रिपोर्ट्स मधे मेंदूत रक्तस्राव होऊन एक गाठ तयार झाली होती ज्यामूळे मेंदूला आॅक्सिजनचा पुरवठा करणारी नस दबली जाऊन मेंदुतील नसा कमकुवत होण्याचा धोका निर्माण झालेला होता.

वेळीच ऑपरेशन करून जर ती रक्ताची गाठ काढली गेली नाही तर जसजसा गाठीचा आकार वाढत जाईल तसतसा मेंदूला आॅक्सिजन पुरवठा बंद होऊन मेंदू मृत पावण्याची शक्यता होती.

आणि एकदा का मेंदू मृत पावला की ती व्हेजिटेबल स्टेटमधे कनव्हर्ट होईल.म्हणजे जोपर्यंत हार्टबीट्स चालू आहेत तोवर फक्त शरीर जीवंत राहील पण त्यात कोणतीही संवेदना राहणार नाही आणि ह्या इतक्या क्रिटीकल स्टेजवर इतक्या लहान वयातील मुलीवर पहिल्यांदाच मेंदुसारख्या जटील अवयवाची शस्रक्रीया होणार होती.

त्यासाठीच साऱ्या मिडीयाचे लक्ष ह्या बातमीवर अधोरेखित झाले होते.न्युरोस्पेशालिस्ट डॉ. कालिंदी ही शस्त्रक्रिया विनामूल्य करणार हे कळताच ह्या बातमीला अजुनच वलय प्राप्त झाले होते.

श्वास मुठीत धरून सारेच जण पूढे काय घडणार ह्याची वाट पहात होते.आॅपरेशन थिएटर पुर्णपणे सुसज्ज करून पेशंटलाही योग्य बंदोबस्तात आॅपरेशन टेबलवर घेतले गेले होते.

डॉ.कालिंदी नेहमीप्रमाणेच आॅपरेशनच्या आधी आपल्या केबीनमधे गेल्या.जिर्ण जूनाट झालेल्या त्या सप्तश्रुंगीच्या फोटोला स्पर्श करून डोॆळे मिटुन नमस्कार केला.

आपल्या गळ्यातील लॉकेटवर एकवार नजर फिरवली.त्या लॉकेटला दोन्ही डोळ्यांवर स्पर्शुन ते आपल्या साडीच्या कनवटीत लपवले आणि ती लगबगीने आॅपरेशन थिएटरमधे प्रवेशली.

सात तासाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर कालिंदी आॅपरेशन थिएटरमधुन समाधानी मुद्रेने बाहेर आली.आॅपरेशन किट व्यवस्थित बाजूला करून काहीशा थकव्याने ती आपल्या चेंबरमधे येऊन बसली.

गुंतागुंतीच्या इतक्या अवघड शस्त्रक्रीयेनंतर ती रक्ताची गाठ काढण्यात जरी तिला यश मिळाले असले तरी अजुन आठ्ठेचाळीस तास पेशंटला शुद्ध येणार नव्हती.आणि पेशंट शुद्धीवर आल्यानंतरही काही विशेष तपासणी नंतरच हे समजणार होते की आॅपरेशन कितपत यशस्वी झालेय.त्यामुळे आज जरी जीवाचा धोका टळला असला तरी पेशंटच्या सुस्थितीबद्दल अजुनही साशंकताच होती.

पहिल्यांदा ती मुलगी जेव्हा हॉस्पीटलला अॅडमिट झाली तेव्हा कालिंदीला तिला पाहून आपल्याच भूतकाळाची पाने पून्हा उलगडली जाताहेत असा भास झाला…..

कालिंदी अधिरतेने मुलीच्या शुद्धीवर येण्याची वाट पहात होती.अखेरीस ती जीवघेणी प्रतिक्षा संपून नर्स धावत धावत वर्दी देत आली की त्या पेशंटची हालचाल होतेय.कालिंदी लगबगीने पेशंटजवळ गेली.

मुलीने प्रयत्न पुर्वक डोळे उघडले.बाकीचे सर्व पॅरामिटर्स नॉर्मल असल्याची ग्वाही देताच कालिंदीने पेशंटचा हात हातात घेत एक हलकेसे स्मित करत विचारले,"हाऊ आर यु यंग लेडी?"

त्यावर मुलीने फक्त स्मित केले.

कालिंदीला उगीचच शंका आली हिला आपले बोलणे समजलेय नाऽऽ…?

भीतीची एक पुसटशी लहर तिच्या शरीरातुन दौडून गेली.पण चेहऱ्यावर तेच ठेवणीतले स्मित झळकवत तिने पुन्हा विचारले,"काय कसे वाटतेय?आणि काय नाव गं तुझे..you are really brave girl…!!"

त्यावर पुन्हा एक फिकटसे हसु पसरवत ती मुलगी म्हणाली,"थँक्स मॅडम!"

तिला विचारलेल्या प्रश्नांची ती देत असलेली अचूक उत्तरे ऐकुन सर्जरी पुर्णत: यशस्वी झाल्याची खात्री पटली तसा तिने निश्वास टाकला.बाकीही सर्व संवेदना जागृत आहेत का ह्याची रबरी हॅमरने प्रत्येक जागी हलकेसे हॅमरींग करून कमी किंवा जास्त तीव्रतेच्या सर्व संवेदनांची यथायोग्य तपासणी करता करताच तिने उत्सुकतेनेच तिचे नाव पून्हा विचारले, "नाव काय गंऽऽऽ तुझे?" 

"गोमती….!"

गोमती नाव ऐकताच कालिंदी हादरली.

आता खरोखरच भूतकाळाची पुन्: पुनरावृत्ती होत होती..

कालिंदी नकळतपणे पंचवीस/तीस वर्षे मागे गेली……………………!!!

(पंचवीस/तीस वर्षापूर्वी…………………)

कालिंदी खिन्न मनाने खोपट्यात शिरली.वाळल्या आश्रुंनी देवीमायच्या फोटोपुढे एक पणती प्रज्वलीत केली.हात जोडून आईच्या चेहऱ्याकडे ती दीनवाणे पहात राहिली.

गोमती आणि पांडू दोघांचा प्रेमविवाह.

गोमतीची आई सप्तश्रुंगीवर घोर श्रद्धा.

म्हणुन पहिली मुलगी झाल्यावर देवीचा प्रसाद मानून तिने मुलीचे नावही कालिंदी ठेवले.

कालिंदी आणि गोमती दोघी मायलेकी.बाप पांडू विहीरीचे खोदकाम करायचा.एकदा सुरूंग लावताना तो फुटून त्यात तो जागेवरच मेला.

गोमतीच्या संसारालाही त्या घटनेने सुरूंग लागला.

तिच्यावर आभाळ कोसळलं.लहानग्या कालिंदीला कसे वाढवायचे एकट्याने ह्या विवंचेनेने तिला खायला सुरवात केली.नवऱ्याचे दिवसपाणी उरकले तसे ती ही मोलमजूरीच्या शोधात बाहेर पडली.

फिरून फिरून शेवटी बिल्डींगच्या बांधकामावर वीटा उचलायचे काम मिळाले.

तिकडेच कालिंदी इतर कामगारांच्या पोरांसोबत खेळायची आणि गोमती दिवसभर मजूरी करत रहायची.

असे तसे दिवस चालले होते.बांधकामावर मजूरी पण चांगली मिळायची त्यामुळे खायची आणि रहायची समस्या तरी सुटली होती.कालिंदी हळुहळू मोठी होत गेली तसे तिने तिला शाळेत घातले.

असेच दिवस महिने वर्ष उलटत आता कालिंदीही बारा वर्षाची झाली.सरकारी शाळेत सातवी शिकत होती आणि अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव सगळ्या जगावर पसरला.लॉकडाऊन लागले आणि सगळी कामे बंद पडली.खायप्यायचे हाल होऊ लागले.

गोमतीवर पुन्हा एकदा जगण्याचे संकट ओढवले.गरीबांना जगण्यासाठी कसला कोरोना अन् कसले काय!!

दिवसभर गोमती कामासाठी गावभर वणवण भटकू लागली.कोणी काही खायला देईल का म्हणुन हात पसरू लागली.पण कोरोनामुळे घाबरून लोक भिकाऱ्यालाही दारात उभे करेनासे झाले.तरीही गोमती गल्लीबोळात फिरून फिरून टाकलेले,फेकलेले खाद्य पदार्थ गोळा करून पोटाची आग शमवू लागली.

अशातच मग एक दिवस खूप ताप भरला.

आपल्यामुळं लेकराला काही होऊ नये म्हणुन ती कालिंदीला आपल्या जवळही येऊ देईना.

तशातच तिला खोकलाही लागला.कालिंदीने घाबरून रडत रडत शेजारच्या आजरा मावशीला सांगितले.तिने ताबडतोब पोरीला आपल्याकडेच रहायला सांगून पोलीसला फोन केला.अँब्युलन्स आली.

गोमतीला किटधारी लोक हॉस्पीटलला घेऊन गेले.तिची तपासणी केल्यावर तिला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.सगळी आळी सील झाली.

सगळ्यांची कोरोना टेस्ट झाली.कालिंदीचीही झाली.कालिंदीची टेस्ट निगेटिव्ह आली पण तिला पंधरा दिवसाचे क्वारंनटाईन लागले.

अशातच बातमी कळली की गोमती कोरोनामुळे गेली.कालिंदीला आईच्या प्रेतालाही स्पर्श करता आला नाही.

गोमतीचा आई सप्तश्रुंगीवर भयंकर विश्वास अन् श्रद्धा.मरतेवेळी तिचे लॉकेट ज्यात सप्तश्रुंगीचा फोटो होता तेवढीच आठवण कालिंदीला परत मिळाली.

पंधरा दिवस संपल्यावर परत आपल्या खोपटात येऊन तिने देवीच्या फोटोपुढेच आई समजून दिवा लावला.अश्रुही सुकून गेले होते.काय करावे,कुठे जावे?? काहीच माहित नव्हते.

ज्या देवीची मायने इतक्या मनोभावे पूजा केली तिनेच माझ्या मायला असे माझ्यापासुन दूर करून ह्या पाशवी जगात एकटे सोडले..काय करू देवा..?

आता कूठे जाऊ मी?

ना नात्याचं ना गोत्याचं.कोरोनासारख्या संकटात आपले आपले सूद्धा परके झाले तर माझ्या सारख्या अनाथ दुबळ्यांना कोण वाली..???

मनातल्या विचारांनी कालिंदीला रडू फुटले.देवीच्या फोटोकडे एकटक पहाता पहाताच तिला झोप लागली.

जेव्हा जाग आली तेव्हा रात्र झालेली.बाहेर मिट्ट काळोखात ढगांचे प्रचंड गडगडाटी नाद ऐकु येत होते.विजांचा लखलखाट.वाऱ्याचा प्रचंड जूंजू करणारा आवाज.खोपटाचे काड्यांचे दार त्या वाऱ्याने करकरून हलत होते.कुठल्याही क्षणी मुसळधार पाऊस सूरू होण्याची लक्षणे दिसत होती.कालिंदी जीव मुठीत धरून दरवाजाला एक मोठा दगड लावुन बाजेवर चढुन बसली.

हातात देवीचा फोटो गळ्यात देवीचे लॉकेट घालून मनोमन देवीचे स्मरण करत हातपाय दुमडून रात्रभर बाजेवर शरीराचं मुटकुळं करून बसुन राहीली.थोड्याच वेळात पावसाने रौद्र रूप धारण करत थैमान घालायला सुरवात केली.ढगांचा प्रचंड गडगडाट कानाचे पडदे फाडून टाकेल की काय असे वाटत होते.मधेच कडाडणारी वीज कोसळून सगळे जळून भस्मसात होईल इतक्या प्रखर प्रकाशाने आसमंत उजळून निघत होता.त्या क्षणभरातल्या प्रकाशात बाहेरचे रौद्र रूप जीव घाबरवत होते.

रात्रभर कालिंदी कशीबशी बाजेवर स्वत:ला सावरून बसली.

मधेच डोळा लागायचा तर लगेच त्या गडगडाटी आवाजाने ती दचकून जागी व्हायची.हळुहळू पावसाने वेग धरला आणि पाण्याचा एक ओहोळ दरवाज्याच्या फटीतून आत येताना दिसला.ही संकटाची हलकी चाहूल होती.पुढे निसर्ग काय रूप घेऊन उभा राहतोय ह्याची ती नांदीच होती जणू.

जीव मूठीत धरून थरथरत कालिंदी बाजेवर पहाट व्हायची वाट पहात होती.ह्या पावसाच्या राक्षसी अवतारापुढे तिचे खोपटे कितपत तग धरून राहील ह्याची शाश्वतीच देता येत नव्हती.

मनातल्या मनात देवीचे नामस्मरण करत ती स्वत:चे मनोबल वाढवायचा प्रयत्न करत स्वत:च स्वत:ला उभारी देत होती.इतक्यात कसलातरी कर्णबधीर आवाज झाला.काहीतरी मोडून पडल्याच्या प्रचंड आवाजाने कालिंदीने छताकडे पाहिले.

बाहेरच्या वादळी वाऱ्याने घराजवळच्या जून्या जिर्ण झाडाची मोठी फांदी तुटून कालिंदीच्या झोपडीवर कोसळली आणि त्या धक्क्याने भिंतीचा एक कोपरा हादरला.

प्रचंड मोठी भेग पडली होती भिंतीला.

आता त्या भेगेतुनही पाणी झिरपताना दिसत होते.संकट आले की सगळीकडून एकत्रच येते तसे कालिंदीचेही झाले होते.ज्या घरात माय बरोबर काही समाधानाचे क्षण घालवले तेच घर आज तिचा घास घेऊ पहात होते.

तिने फक्त आपल्या मायच्या माईवर श्रद्धा ठेवून पहाट व्हायची वाट पहात डोळे गच्च मिटून घेतले.ग्लानीतल्या डोळ्यांना कधीतरी पून्हा जाग आली तेव्हा थोडासा पहाटेचा प्रकाश फटफटताना दिसू लागला.

हिंम्मत करून कालिंदीने पाय जमिनीवर टेकवले तसे अंगावर शहारा आला.खाली गुडघ्याइतके पाणी जमा झालेले.

त्या थंड पाण्याने तिच्या अंगावर शहारा आला. पावसाचा जोर आता जरा कमी झाला होता.

मनाचा निग्रह करत देवीचा फोटो छातीशी घट्ट पकडून ती दरवाजापाशी आली.हलकेच दरवाजाचा दगड बाजूला सारला त्याबरोबर ते दार आपोआपच मोडून पडले आणि भलामोठा पाण्याचा लोंढा घरात शिरला.अचानक शिरलेल्या पाण्याने कालिंदीचा तोल जाता जाता राहीला.

कसेबसे स्वत:ला सावरत ती झोपडी बाहेर आली तर दूर दूर पर्यंत सर्व जलमय झालेले.रोजची पायवाट देखील दिसेनाशी झालेली.कुठे रस्ता आणि कुठे खड्डा हेही सांगता येऊ नये इतका तो सगळा भाग पाण्याने वेढलेला होता.

पण आता कालिंदी जवळ घर सोडण्यावाचून पर्यायही नव्हता.घरात बसुन तशीही जलसमाधी मिळणारच होती त्यापेक्षा बाहेर पडून मार्ग शोधला तर कदाचित जगण्याची आशा तरी होती.असे नाही तसे मरायचेच आहे तर निदान जगण्याचा प्रयत्न करून तरी मरू ह्या विचाराने कालिंदीने मन घट्ट करून त्या चिखलातून वाट काढण्यास सुरवात केली.

प्रत्येकवेळी उचलेले पाऊल पायवाटेवर पडेल की एखाद्या खड्ड्यात जलसमाधी घेईल ह्याची पुसटशी कल्पनाही नसताना ती फक्त देवीचे नामस्मरण करत एक एक पाऊल पूढे चालत होती.अखेरीस त्या जलमय खाचखळग्यांतुन वाट काढत ती हमरस्त्याला येऊन पोहोचली.गुडघ्यापर्यंत सर्व अंग चिखलमय झालेले.हमरस्त्यावरून कुणीकडे जावे हेही समजत नव्हते.तिला मागे कधीतरी माय बोललेले शब्द आठवले.

गोमतीच्या तोंडी सतत सप्तश्रुंगी देवीचे नाव एेकुन एकदा कालिंदीने उत्सुकतेनेच मायला विचारले होते,"काय गं मायऽऽ,जिचे दिन-रात ध्यान करतीस ती राहते तरी कुठे?"

त्यावर गोमतीने ह्याच रस्त्याकडे बोट करून सांगितले होते."ह्या रस्त्याच्या डावीकडं गेलं की आई सप्तश्रुंगीचं ठाणं लागतयां, पनं जायला पैक कुटं हाय आपल्याजवळ..आता तिलाच माझी दया.असलं नशीबात तर घेईन बोलवून एक ना एक दिस.."

'असं नाही तसं तिने गोमतीला बोलवून घेतलच आपल्याकडं…!!'

कालिंदीला मायचे ते शब्द पून्हा कानात घुमले तसे तिने आपल्या डाव्या हाताने चालायला सुरवात केली.

झपझप पावले टाकत कालिंदी पायी वाट कापत होती.चालता चालता दम लागला तशी ती एका झाडाखाली थांबली.दोन दिवसापासुन पोटात अन्नाचा कण नव्हता तरीही ती जगण्याच्या ओढीने अंतर कापत होती.

कालच्या पावसाने ठिकठिकाणी पाण्याची खळगी तयार झाली होती.झाडाखालीही पाण्याचा भला मोठा खळगा तयार झालेला. कालिंदीने ओंजळीने त्यातले वरवरचे नितळ पाणी पिऊन पोटाची खळगी भरली आणि मग अंगावरचा सर्व चिखल त्यात साफ केला.ओल्या झालेल्या कपड्याने शरीराला कापरं भरलं होतं पण त्या सगळ्याची तिला कुठलीच तमा नव्हती.ह्या उभ्या संसारात ती एकटी,असहाय्य होती.आधारासाठी कोणीच नव्हतं एक गळ्यातल्या आईच्या श्रद्धेशिवाय.

मन पेटून उठलं होतं कालिंदीचं.आपली माय जिचे दिवसरात्र नाव घेत राहीली.कसेही दिवस दाखवले तरी देवीवरची तिची श्रद्धा जराही कमी झाली नाही की तिने त्याची तक्रार केली नाही त्या देवीने काय केले तिच्यासाठी?

आधी नवऱ्याचा आधार काढून घेतला.नोकरी करता वणवण करायला लावली.इतके कष्ट देऊनही मन भरले नाही म्हणुन की काय तिचा अशा रोगाने जीव घेतला की माझ्या मायचे शेवटचे दर्शन बी मला मिळू दिले नाही.आणि आता मला अनाथ पोरके करून राहत्या घरातुनही मला ह्या जगात वणवण भटकायला सोडून दिले.माय जिला पुजते ती खरच देव आहे की राक्षस? हे मला तिला तिच्या ठाण्यावर जाऊनच जाब विचारायचाय.नाहीतरी ह्या निर्दयी जगात माझ्यासारख्या एकट्या दुकट्या मुलीचे जगणे मुश्कीलच आहे पण मरण्याआधी मायची इच्छा मीच पूरी करून हे जग सोडेन.

विचारांच्या ह्या तंद्रीत असतानाच तिला झाडाजवळ हालचाल जाणवली.तिने कानोसा घेत झाडाच्या मागच्या दिशेने बघितले तर एक लहानसा मुलगा तिच्याकडे अगदी आशेने बघत होता.तिने त्याला खुणेनेच जवळ बोलावले तसा तो जवळ आला.

भीतभीत तिच्या जवळ येताच तिने त्याला विचारले "कोण तू?इकडे एकटाच काय करतोय?"

त्याबरोबर त्याने मुसमुसायला सुरवात केली.

तिने त्याचे भरले डोळे पुसत विचारले,"काय झाले का रडतोएस तु,काय नाव तुझे?"

त्यावर त्याने रडत रडतच सांगीतले,"ताई,माही माय लय बिमार हाय.तिला बघायला कोण बी न्हाय.तु माझ्या मायला सोबत बसतीस का?तर म्या डागदरला घेऊन येईन."

तिला काहीच समजेना.तो इतका लहान मुलगा डॉक्टर कुठुन आणणार? पण आपले हाल आठवल्यावर तिला त्या मुलाची दया आली.

तिने त्याला मदत करायचे ठरवले.तिने यायची तयारी दाखवताच त्याचा चेहरा खुलला.

ती त्याच्या मागून तो जिकडे जाईल तिकडे जात राहिली.मधुन मधुन तो ती येतेय ना हे बघत भरभर पूढे जात होता.तिला तो रस्ता नवा असल्याने त्याच्या इतक्या वेगाने चालता येत नव्हते पण तो थोडे अंतर चालून ती येईपर्यंत थांबायचा आणि अंतर कमी झाले की लगेच भराभर पूढे जायचा.

अखेर दूरवर तो एका झोपडीवजा पत्राच्या खोलीपाशी थांबलेला तिला दिसला.किती अंतर ती आत चालत आली हेही तिला आता आठवत नव्हते.जवळ जवळ म्हणत ती बरेच आतपर्यंत चालून आली होती.

त्या खोलीच्या बंद दाराजवळ तो वाट पहात उभा राहिला.ती जवळ पोहोचताच त्याने दार उघडून खुणेनेच तिला आत जायला सांगितले.

तिने दारातुन डोकावुन बघितले तर एका बाजेवर खरोखर एक स्त्री झोपल्यासारखी दिसत होती.ती त्या स्त्रीच्या जवळ जाऊन वाकुन तिला पाहतच होती की वीजेच्या गतीने त्या बाजेवरील स्त्री उठुन उभी राहीली.

काही कळायच्या आत कालिंदीला जोरदार धक्का देत तिने त्याच बाजेवर पाडले.धक्का इतका जोरदार आणि आकस्मित होता की ती कोलमडून त्या बाजेवर पडली.ती सावरून उठेपर्यंत ती स्त्री खोली बाहेर पडली आणि तिने बाहेरून दरवाजा बंद केला.

खिडकीतुन मगाचचा तोच मुलगा केविलवाण्या नजरेने तिच्याकडे बघत होता.कालिंदीला त्याच्या नजरेत एक असाह्यता जाणवली.

कदाचित पोटासाठी तो कुणासाठी तरी हे काम करत असावा.त्याच्या निरागस चेहऱ्याचा वापर करून असेच मुलींना फसवुन पूढे त्यांचा काही गैरवापर करणारी टोळीही असु शकण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

ती आता जास्तच घाबरली.पूढे काय संकट वाढून ठेवलेय हे तिलाही माहित नव्हते.इतक्या वेळ हातात धरलेल्या देवीच्या फोटोवर तिची नजर पडली.तिला प्रचंड संताप आला.देव देव म्हणतात तो जगात आहेच कुठे?माझ्यावर इतकी संकटं कोसळुनही फक्त मायवरच्या प्रेमापोटी मी इतक्यावेळ तिच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणुन जीवाच्या पार जपत हा फोटो संभाळला पण त्या देवीनं मला काय दिले तर अजून एक संकट.

आता मी ह्या दगडाला नाही पूजणार.रागाने तिने तो फोटो जमिनीवर फेकला.तसे त्या फ्रेमचे तुकडे झाले.फ्रेमची काच खळ्ळकन आवाज करत फुटली.

तिने घरभर निरीक्षण केले पण तिला स्वसंरक्षणार्थ काहीच सापडले नाही.मग जमिनीवरच्या काचेकडे लक्ष गेले.तसे तिने पटकन जाऊन त्यातला एक अणकूचीदार काचेचा निमूळता तुकडा स्वत:जवळ बाळगला.

बाकी काचांचा तिथल्याच बाजेच्या पायाखाली ठेचून बारीक बारीक काचकूरा तयार केला.अलगदपणे परकराच्या घोळाने ढकलत ढकलत त्याला दरवाजाजवळ पसरून ठेवले.जेणेकरून जो कोणी दार उघडून आत येईल तो त्या काचेवर पाय ठेवुन जखमी होईल.तेवढी संधी साधून तिला पळ काढता येईल.प्लॅन तर मस्तच बनला होता.

आता ती शांततेने खिडकीतुन हलकेच बाहेरचे निरीक्षण करू लागली.झाड कोणत्या दिशेला आहे,पळ काढताच कोणत्या दिशेला जायचे ह्याचा ती मनातल्या मनात आराखडा तयार करू लागली.एव्हाना दिवस चांगला वर आला होता.तिची तगमग वाढत चालली होती.तासाच्या वर होऊनही खोलीकडे कोणीही फिरकलेले दिसत नव्हते.पुन्हा तिची नजर त्या तसबिरीकडे गेली आणि अचानक तिला जाणीव झाली.

अशी नाही तशी देवी माझ्या पाठिशी आहेच म्हणुन तर ऐनवेळी मला ह्या काचेचे शस्त्र म्हणुन वापरायची तिने बुद्धी दिली.तिने पून्हा देवीचा त्यातुन वेगळा झालेला कागद कपाळावर टेकवला आणि त्याची घडी करून आपल्या पोलक्यात सरकवली.

तेवढ्यात दाराशी हलकी चाहूल जाणवली.

क्रमशः

भाग २ इथे वाचा

©® राधिका कुलकर्णी

सदर कथा लेखिका राधिका कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल साभार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने