कप ऑफ टी

 


 

 कप ऑफ टी 

© वैदेही जोशी

"तुम्हाला भीती वाटत नाही? "

त्याने नंदिताला प्रश्न विचारला..

सहप्रवासी एकदम असा काही प्रश्न विचारेल याचा तीला अंदाज नव्हता..

ती शांतपणे त्यांच्याकडे पाहत म्हणाली" का वाटावी मला भीती?...मी काही चुकीचे वागतेय का?"

नाही....तस नाही...पण तुम्ही बिनधास्त अशा...माझ्याबरोबर गप्पा मारताय....तशी फारशी ओळख नाही आपली.....

किंवा अस तोंडओळख असताना...तुम्ही....'"

नंदिता हसत म्हणाली..

नाही..मुळात माझं काम असच आहे...जिथे ओळख काढून माझ्या सगळ्या गोष्टींची मला माहिती द्यावी लागते..तास दोनदोन तास माझ्या या सगळ्या प्रोडक्ट बद्दल सांगाव लागत...

मग..घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे?

आणि तुम्ही घरच्या किंवा समाजातील लोकांना विचिर करून म्हणत असाल...

तर ते मी माझ्या नजरेतून पहा अस म्हणेन...कारण...त्यांच्या नजरेतून आपण कधीच आपल्याला बघू नये अस लहानपणापासून शिकत आलेय मी...


नंदिताचे बोलणं ऐकून त्याचा थोडा धीर चेपला...आपण चुकीच्या व्यक्तीबरोबर नाही..ही त्याची खात्री पटली...अन् मग तो खूप काही बोलत होता...

आपले गावं..शेतीवाडी...घरची माणसं...नोकरी....सगळ्या विषयी....

थोडावेळ गेला अन् नंदिताने आपले शेताला उपयुक्त असणारे सगळे प्रॉडक्ट त्याला सांगितले...नवीन आलेल्या कीडनाशका संदर्भात नीट माहिती दिली....

त्यांच्याकडे कोणती उत्पादन घेतात  हे ही विचारले...


हातातल्या सगळ्या प्रॉडक्टची माहिती देऊन झाल्यावर नंदिताने विचारले....

चहा घेउया?

 मला मस्त चहाची तलफ आली आहे...वातावरण ही छान आहे...


तो थोडा संकोचला...

असे नव्हते कि तो बायकांशी कधी बोलला नाही..पण..का कुणास ठावूक नंदिताशी बोलताना..त्याला थोड अवघडलेपण आले होते..

नंदिताने त्याची ही अवस्था जाणली ...ती म्हणाली...

"  मिस्टर..सोपानराव..जाधव..तुम्ही अवघडून जाउ नका...रिलँक्स बसा...

"  

थोडा वेळ शांततेत गेल्यावर...

नंदिताने सुरुवात केली...

तुम्ही खूप वर्ष करत असाल ना शेती?

आधी खूप जमिन होती का?

वडील..आजोबा...देखिल हेच करायचे का? सोपानराव..एकूण किती उत्पन्न निघते हो शेतीतून?


 सोपान एकदम म्हणाला...तस कधी सांगू नये ...आस आबा म्हणतात...

आणि..तुम्ही मला सोपानराव नका म्हणू...नुसते सोपान म्हणा...

" असं कसं?

 तुम्ही अनुभव आणि वय दोन्ही गोष्टीनं मोठे आहात..."  नंदिता म्हणाली...

पण..नको...तुम्ही नुसते सोपान म्हणा...

तो पुन्हा म्हणाला...

नंदिताला ही चटकन कळेना...पण ठीक आहे...

"सोपान...तुम्ही ...नोकरी आणि शेती याचा कसा काय मेळ घालता? "


तसा सोपान हसला...म्हणाला...हे सगळं माझ्या मेहनतीवर आणि आबांच्या पुण्याईवर कमावलय....

पिढीजात नाही काही...

जे हाय..ते आमच्या कष्टाची भाकरी आहे...नशिबाच्या गोष्टी सगळ्या..."

 नंदिताने हसत विचारले...अहो...कष्ट केले कि सगळं मिळतच कि...नशीब कशाला लागत?"


सोपान थोडा गंभीर झाला..

नाही...तुम्ही म्हणताय ते खरं आहे...कष्ट खूप केले..शिकलो...शेती वाडी वाढवली जोडीला नोकरी केली...पण नशिबान साथ दिली म्हणून...नाहीतर....

एकेकाळी अन्नाला महाग होतो...तेव्हा आमच्या गुरूजीनी आम्हाला सांगितले...समजावले....म्हणून आज हे दिवस बघतोय..."

 नंदिता त्यांच्या साऱ्या बोलण्याकडे नीट लक्ष देऊन होती...

आपल्या आयुष्यात किती जणांचे कसे कसे वाटे असतात...किती जणांच्या मदतीने आपण घडत असतो...हे कधी लक्षात येत नाही चटकन...


बोलता बोलता सोपान थांबला...

आज गुरुजी हवे होते हे सगळं बघायला...खुश झाले असते...


सोपानचा आवाज नकळत ओलावला...नंदिताने त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपले...एखादी गोष्ट आतपर्यंत टोचावी..तस काहिस जाणवल  तीला...

ती म्हणाली...

"तुम्हाला बोलावस वाटत असेल...तर..तुम्ही माझ्यापाशी बोलू शकता...

तुम्हाला मोकळ वाटणार असेल तर।..हं"


सोपान ने चटकन तीच्या कडे पाहिले..आणि कका कुणास ठावूक...ती एकदम आपली वाटावी अशा स्वरात तो म्हणाला..."गुरुजी...आता राहिले नाहीत.." त्यांच्या नसण्याचे पण दुःख नाही...पण ते ज्या मनस्थितीत गेले त्याचे वाईट वाटतय....

का....काय झालं?  

नंदिताने सहज प्रश्न केला..

सांगतो...आमच्या भागात पंचक्रोशीत एकच शाळा...सगळी मुलमुली इथेच या शाळेत येऊन शिकायचे...अर्थात सगळी वेगवेगळ्या जातीची..धर्माची बुध्दीची..परिस्थितीची...आशीच मुले होती...गुरुजींनी किती पिढ्याना आपल्या चांगल्या संस्कार आणि शिस्तीने मार्गी लावले...

खूप वर्ष ही सेवा मनोभावे ते करत होते..पगार होताच हो...पण पुर्वीच्या काळी... तुम्हाला तर माहितीच आहे...त्याकाळी लोक पैशाला जास्त महत्त्व देत नव्हते...गुरुजी ही तसेच होते..

माझ्यासारखे कितीतरी विद्यार्थी त्यांनी वेळप्रसंगी आपल्याकडचे पैसे घालून मोठे केलेत...

पण सगळेच कुठे सारखे असतात?

 किती वर्ष हे अविरत चालू होतं....

माझ्या पुढे मागे असलेल्या मुलांच्यातही कुणी ढ वर्गातले होतेच की....

असाच एक गुंडवृत्तीच्या मुलाला गुरुजींनी वेळप्रसंगी काठीचा धाक दाखवून योग्य मार्गाला आणायचा प्रयत्न केला होता...

पण वृत्ती बदलत नाही...


दिवस असेच जात होते..

गुरुजी आता रिटायरमेंटला आले होते...शेवटी आपल्या कर्तव्यातुन मोकळे होताना ताठ मानाने व्हावे एवढीच इच्छा होती त्यांची...


पण...नशीब...मी म्हणतो ना..ते हेच...परिस्थिती कधी कसा 

उपहास करेल नाही सांगता येत...

आपण आपले कर्म करत जातो...पण पुढे काय हे कुठे माहिती असते? आपण ठरवतो तस थोडच होतं?

नियतीच्या योजनेत काही वेगळच असत़...तीच्या लेखी हिशोब इथेच पुरा करायचा...माणूस संपुन त्याची राख ही उडून जाते...काही राहत नाही...मग मन उद्विग्न होते...


गुरुजींच्या बाबतीत असच झालं होतं...रिटायर्मेंटनंतर समाधानाने पुढील आयुष्य कंठायच इतकेच तर अपेक्षिल होत त्यांनी..

पण....

ज्या दिवशी त्यांचा निवृत्तीचा सत्कार होता..त्या दिवशी ते खूप बेचैन होते...

घरची मंडळी त्यांना म्हणत होती...कि राहु दे बर वाटत नसेल  जाऊ नका....


पण ते ही त्यांना पटत नव्हते...

शेवटी सत्काराला गेले....

सत्कार कसाबसा स्विकारला...आणि खाली मानेने डोळ्यात पाणी भरून आले..

तसेच घरी आले...


कारण...

कारण....आजवर ज्या मुलाला त्याच्या वाईट वृत्ती.... गूंडप्रवृत्तीसाठी त्यांनी विरोध केला होता..त्याच्याशी तत्वाने वाद घातला होता....त्याच्या दुश्कृत्यासाठी शिक्षा केली होती...

तोच  राजकीय पक्षाचा मान्यवर प्रमुख पाहुणा म्हणून व्यासपीठावर त्यांच्या शेजारी बसला होता...त्याच्या हस्ते त्यांचा सत्कार होता.....



चांगल्या गोष्टीचा सत्कार...असा?

आयुष्यभर तत्व संभाळून संस्कार केले...त्याचे मोल मातीत मिसळले गेले....



हा परिस्थितीचा न्याय?

 हे कुठले नशिबाचे दान?


 ही बोच..सल...हा उपहास गुरुजींना सहन होणारा नव्हताच...अखंड आयुष्य भर ज्यांनी सज्जन सत्य सगुणांची उपासना केली.....

त्यांचा हा उपहास.....


आणि व्हायचे तेच झाले....

गुरुजी निवृत्तीनंतर...

जगाचा ही निरोप घेऊन गेले....



सोपान काही क्षण बोलायचा थांबला...त्याचा दुखावलेला स्वर नंदिताला ही जाणवला...


ती ही काही वेळ गप्प बसली....

खुणेनीच

टपरीवरच्या चहावाल्याला चहा सांगितला...


सोपानने चहा घेतला...त्याला ही खूप बर वाटलं..


माणसाचे मन सतत कशा ना कशाने भरत असतेच....ते वेळीच हलके..रिकामे व्हावे लागते...त्यासाठी फक्त समोर  शांतपणे चहाच्या वाफेसारखं विरून जाणार  ...ऐकून घेणारं हवं...."


नंदिता म्हणाली...सोपान...तुम्ही प्रॉडक्ट घ्या अथवा नका घेऊ....

पण कधी वाटलं तर भरून आलेल्या मनाला रिकामे करायला...मला चहा प्यायला नक्की बोलवा"


 तीच्या या वाक्यावर सोपान मनापासून हसला....

मनात काय ठरवल त्याने माहीत नाही....

पण नंदिताला म्हणाला....चहा घेताना असं कुणी बरोबर असेल तर मन किती भरलं तरी...हरकत नाही...."


नंदिताने सहज विचारले....

मग...पुन्हा बोलवणार ना....चहा घ्यायला?


 दोघे ही मनमोकळे हसत आपापल्या पुढच्या कामाना निघून गेले....



😊


© वैदेही...



सदर कथा /लेखन माझे म्हणजेच वैदेही जोशी यांचे असून मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "माझी लेखणी” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे / लेखाचे हक्क माझ्याकडे राखीव असून माझ्या परवानगीशिवाय ते कुठेही वापरू नये.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने