भूमिका
© वैदेही जोशी
" अहो...जरा सावकाश चाला...मला इतकं भराभर नाही चालवत आताशा..." गिरीजावहिनी म्हणाल्या.
हं...चालवत होता तेव्हा तरी कुठं चालत होतीस? आता तर काय.. तेल लावुन गुडघे चेपत असतेस.." सदानंद काका म्हणाले..
" हो हो...तरुणपणी वेळ होता का तुम्हाला? माझ्या बरोबर फिरायला? पोस्टाची नोकरी म्हणजे सरकारी जबाबदारी...असं म्हणून वाहून घेतलं होतं..आपण..आठवतंय ना?"- गिरीजा वहिनींनी पलटवार केलाच...
बरं बरं.,चल बसू तीथं दगडावर....
असं म्हणत सदाकाका दगडापर्यंत पोचले सुध्दा.
हा त्या दोघांचा नित्यक्रम होता. रोज संध्याकाळी चालत चालत देवळापर्यंत जाऊन यायचे..पुढे मागे पुढे मागे चालत चालत जोडी फिरायला म्हणून बाहेर पडायची..
दगडावर बसत बसत वहिनी म्हणाल्या.." आज जरा जास्तच दमल्यासारख वाटतंय..का कुणास ठाऊक..
खरं रोज एवढं तर येतोच की आपण.."
सदाकाका त्यांच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाले "तुझ्या मनात नव्हतं ना आज येयच म्हणून असेल..."
तसंच अगदी नाही काही..काही होतं ना घरात म्हणून..मी नव्हते येणार..तसं सगळे करते ललिता पण तरी..
"हो.... त्याबाबतीत आपण नशीबवान... आपल्या सहाजणांचे कुटुंब.. गुण्यागोविंदाने एकत्र.." सदाकाका म्हणाले.
गिरीजा वहिनी म्हणाल्या..."हो...हे मात्र खरं.. आजुबाजुला बघितले कि आपल्या सुखाची जाणीव होते.. भरलेल्या घरात पडले.. तेव्हा आई म्हणाली होती.. माणसं भरपूर आहेत हो घरात..बघ विचार कर...आताच सदानंद रावांना नाही म्हणू शकतेस तू... नंतर म्हणू नकोस..माझं मत विचारले नाही म्हणून..."
सदाकाका एकदम म्हणाले.." गिरीजा... आपल्या संसाराला ४५ वर्ष झाली..इतर मध्यमवर्गीय संसारा प्रमाणेच आपलाही संसार सगळे टक्के टोणपे खात..चढ उतार पहात फुलला...वाढला....पण काही गोष्टी काळाच्या ओघात राहूनच गेल्या ग..बोलायच्या..
हं....वहिनीनी हुंकार दिला..
ए...आज देवळापर्यंत नको जाऊया...तसंही इथं कोण येत नाही आपल्या गप्पा ऐकायला..आपण आज इथंच बसू... गप्पा मारत..चालेल? सदाकाका नी विचारलं
विचाराता आहात की सांगताय?- वहिनींनी हसत विचारलं
"विचारतोय... तुझ्या शब्दांच्या बाहेर कधीतरी गेलोय का मी?" हसत हसत सदाकाका म्हणाले..
हो..ते ही खरंच म्हणा...कारण तुम्हाला माहिती असतं असं विचारल्यावर मी तुमच्या मनासारखच वागते... नाही का?
सदाकाका मनापासून मोठ्यांनी हसले...
वहिनींच्या हात हातात घेत म्हणाले...बोल...मगाशी काय म्हणत होतीस?
आई म्हणाली भरपूर माणसं आहेत..विचार कर..
मग तू काय केलंस? सदाकाका नी प्रश्न केला
विचार करुन सांगते म्हटलं.. दोन दिवसांनी रामाच्या देवळात सासुबाईंना भेटायला गेले..
दररोज न चुकता सासुबाई रामाच्या देवळात येतात माहित होतं.. त्यांना भेटले..बोलले मगच हो म्हटलं..."
"काय?... काय ..म्हणालीस? तू तेव्हा आधी माझ्या माईशी बोलली होतीस?" आणि मला हे आज समजतंय... इतक्या वर्षात पत्ता लागू दिला नाहीस..
हो...कुंतीला शाप मी मोडीत काढला.. आजपर्यंत कुणालाच बोलले नव्हते...अगदी माझ्या आईला सुध्दा..."
गिरीजा..काय बोललीस माईशी?
मी नाही..त्याच बोलल्या..घरातले सगळे तुमची आजी पहात होत्या न ..म्हणजे सुधाक्का.. आज्जे सासुबाई...
त्यांना सहज पटव...मग सगळं नीट होईल..
अहो.. जास्त नाही..पण सातवी पर्यंत शिकले आहे मी..
देवळातच सासुबाईंना म्हटले.." माई.. .संसार करताना चुकले तर संभाळून घ्याल ना? तुमच्या प्रेमात वाटेकरी नाही होणार..ते वाढावं म्हणून जोडीला साथीला येते.."
माई खूष झाल्या..त्यांचा सदा कायम त्यांचाच राहील याची खात्री पटली त्यांना..मग काय... सगळं सहजपणे जमलं"
सदाकाका..आश्चर्याने बघत होते..
गिरीजा वहिनी हसत होत्या".. बघताय काय? खरंच सांगतेय...आठवून सांगा बघू.. माझं आणि माईंच भांडण कधी झालं होतं?" उलट... तुम्ही माझ्याशी भांडलात की मी माईंच्या खोलीत जाऊन बसायची..
सदा काकानी.. होकारार्थी मान हलवली...
मग अनेक प्रसंग त्यांना आठवत गेले...बदली झाली म्हणून एकटाच निघालेल्या मला..माईने गिरीजाला बरोबर न्यायला लावलं.. मुकुंदा झाला तेव्हा वेळेवर आलो नाही म्हणून दोन तास बाळाला दाखवलच नाही...असे छोटे-मोठे प्रसंग...माई नेहमी गिरीजाच्या बाजूने उभी राहिली होती.
सदाकाका गप्प म्हणून गिरीजा वहिनी हसत म्हणाल्या...." आता काय आठवायच बरं..मागच .. झाले ते झालं..संसार सुखाचा..झाला.होतोय...आता कितीशी शिल्लक राहीली...आणि आम्हा बायकांची गुपीत जाणून घेऊन तूम्ही काय करणार?"
गिरीजा..माझ्या बायकोला मी ओळखतो... असं म्हणताना मला गर्व असायचा..कि तुझ्या सगळ्या गोष्टी मला ठाऊक आहेत..पण...पण..तसं नव्हतं..हे आत्ता कळतंय.."
"अहो.... अजून तरी सगळं कुठे बोललेत मी...?" मिश्किल हसत वहिनी म्हणाल्या..
" म्हणजे..सदाकाका नी विचारले
सुधाक्कांचा माझ्यावर किती जीव होता...हे नाही का आठवत?.. खरंतर कडक खाष्ट बाई म्हणून त्यांचा नाव लौकीक होता..हो कि नी? पण मला मात्र त्या नेहमी संभाळून समजावून सांगत....
हो हो...सदाकाका विचारमग्न ..पण प्रतिसाद देत म्हणाले..सुधाक्का च्या समोर उभं रहाण्याची कुणाची हिंमत नव्हती..गडी माणसांपासून आजोबांपर्यंत सगळे घाबरुन असायचे..एकदम करारी आणि कडक बाई...त्या म्हणतील तसंच झालं पाहिजे हा शिरस्ता...
पण गिरीजाला मात्र....
आपण आपल्या जबाबदारीत...कामाच्या व्यापात आपल्या बायकोच्या या कुठल्याच प्रसंगात कसल्याच उपयोगी पडलो नव्हतो...एकेक वर्ष डोळ्यासमोरून तरळून गेली...
हं...आठवतय का.... मागच्या ४५ वर्षांचा इतिहास...? गिरीजा वहिनी नी विचारले...
सदाकाका..एकदम गप्प विचारात पुन्हा एकदा..
किती सहजपणे संसार केला ..सुखी आयुष्य जगलो... अभिमानाने सगळ्या गोष्टी मिरवल्या..कर्तव्य पूर्ण केली...जीवनाची इतिकर्तव्यता झाली...अशा समजित होतो मी...पण आज गिरीजा जे सांगतेय ते ते सारं माझ्या अवतीभोवती घडलेलं आहे.प्रत्यक्ष नसलो तरी मी तीथं होतोच की!
गिरीजा...सांग ना सुधाक्काला काय सांगितलस ग...नव्याने घरी आलीस तेव्हा...?
"काही नाही हो....सुधाक्कांच्या जवळ जाऊन बसले..त्यांचा हात हातात घेतला..म्हटलं..सुधाक्का.. तुमच्या हिंमतीवर..कष्टावर आणि प्रेमावर हे घर उभं राहीलं..तुमची नातं सुन म्हणून मी हा तुमचा वंशवेल वाढेल..फुलेल...याची काळजी मी घेईन.. माझ्या पदरी कोण जन्म घेईल माहित नाही..पण त्याला तुमचे संस्कार देईन..माईंच्या प्रेमाचा आदर करेन.. माझ्या अस्तित्वाला जपून हा कुटुंब वृक्ष जोपासेन त्यासाठी तुमचे आशीर्वाद मायेने माझ्याबरोबर असू देत..
मग काय...त्या दिवसापासून बाकीचे तुम्ही जाणता..."
व्यक्ती तितक्या प्रकृती.... सगळ्याच घरात असं असतं असं मी मुळीच म्हणणार नाही... माझ्या नशीबी होतं..म्हणून मी नशीबवान...नाहीतर संसाराच्या प्रत्येकाच्या कथाव्यथा वेगळ्या !!हे काय मी तुम्हाला सांगायला नको...."
सदाकाका...आता मात्र खरंच मौनात गेले....
मनाशीच विचात्र करायला लागले...."संसार....आम्हा दोघांचा हे बरोबर...पण तो खरा केला कुणी?"
गिरीजा वहिनी दगडावरून उठत म्हणाल्या...
" तो दगड स्थीर रहावा म्हणून माती..पाणी हवा सगळेच आपापल्या भूमिका चोख पार पाडतात... सदानंद रावं...
संसाराच ही तसंच.... बरोबर ना? चला उशीर होईल..
नव्या पिढीचा दगड भक्कम बनावयचाय..."
© वैदेही
सदर कथा /लेखन माझे म्हणजेच वैदेही जोशीचे असून मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "माझी लेखणी” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे / लेखाचे हक्क माझ्याकडे राखीव असून माझ्या परवानगीशिवाय ते कुठेही वापरू नये.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
