मधु इथे चंद्र तिथे ( भाग २)

 


मधु इथे चंद्र तिथे (भाग २)


©® परवीन कौसर

राधा उदास नजरेने खिडकीतून बाहेर पाहू लागली तोच एयर होस्टेस आली आणि त्यांना काय हवे काय नको हे विचारु लागली.नेहाने तिला आणि राधाला हवे असलेले जेवण सांगितले.लगेचच त्यांचे जेवण आले.समोर प्लेट ठेवल्यानंतर राधाला त्यामधील जिन्नस पाहून एकदमच डोळ्यात पाणी आले कारण प्लेटमध्ये असलेला प्रत्येक पदार्थ रमेशच्या आवडीचा होता.

माय लेकी येऊन पोहोचल्या.नेहाने आपल्या साठी रहाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी कॅब बुक केली आणि दोघीही गाडीत बसून निघाल्या.राधा बाहेर बघत होती. तिला बाहेरचे रम्य वातावरण खुप आवडले.

दोघीही नेहाला दिलेल्या घराजवळ आल्या." काय गं नेहा किती सुंदर घर आहे हे.मोठेच्या मोठे." राधा बाहेरुन घर बघून म्हणाली.

" हो आई .चल आत जाऊन आपले सामान ठेवून फ्रेश होऊया.मग मी जेवणाचे बघते काय आणि कसे करायचे."

दोघीही फ्रेश होऊन आपापल्या बॅगा कपाटात ठेवत होत्या तोच दारावरची बेल वाजली.

नेहाने दार उघडले. तर समोर एक महीला हातामध्ये जेवणाची पाकिटे आणि पुष्प गुच्छ घेऊन उभी होती.

नेहाने प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि काही बोलणार तोच तीच म्हणाली कि तुम्हाला राहाण्या बरोबर जेवणाचीही सोय केली आहे.आणि हो तुम्हाला काही हवे असेल तर मला या नंबरवर फोन करा.  Have a nice day.  म्हणून ती गेली.

    दोघींनी जेवण केले.नेहाने येऊन पोहचलेचा मेसेज राहुलला केला.आणि थोड्या वेळाने फोन करेन असेही सांगितले.

   " आई मी जरा माझे काम करते तु आराम कर. नंतर आपण बाहेर फिरायला जाऊ. " नेहा म्हणाली.

   राधाने होकारार्थी मान डोलावली.आणि ती आत खोलीमध्ये जाऊन खुर्चीवर बसून खिडकीतून बाहेर पाहू लागली.दिवस हळूहळू मावळू लागला होता.आता राधाला रमेशची खुप आठवण येत होती.   रमेशची कामावरून घरी येण्याची वेळ ही.आल्या आल्या चहा लागतो. नंतर चहा बरोबर पेपर घेऊन निवांत पणे वाचत बसणे. पेपर वाचून झाल्यावर जरा बाहेर फेरफटका मारायला जायचे आणि येताना घरी काहीतरी मुलांसाठी खायला आणायचे हा त्यांचा रोजचाच कार्यक्रम. 

   " आई ..ये आई ..झोपली का गं" नेहाच्या आवाजाने राधा एकदम दचकली.

   " अं...

न...

... नाही ग"

  " चल जरा बाहेर जाऊन येऊ.मग उद्या पासून माझे काम सुरू झाले कि वेळ मिळेल किंवा नाही हे सांगता येणार नाही"

  दोघीही बाहेर पडल्या.जरा थंडीचे वातावरण होते." अगं नेहा बाबांचे स्वेटर बाहेर काढून ठेवायला विसरलेच बघ मी.आता त्यांना मिळणार कसे? काय गं मी वेंधळी.कशी काय विसरले बघं.स्वेटर, कानटोपी एकाच बॅगेत ठेवली आहे.हे बघं घरी गेलो कि फोन करु आणि सांगू त्यांना." राधा एकदम कळकळीने सांगत होती.

    घरी आल्यावर नेहाने फोन केला आणि रमेशला स्वेटर कोठे ठेवला आहे आईने हे सांगितले.नंतर फोन राधाला दिला.

  ‌"" हैलो..

राधा काहीच बोलेना.

  " हैलो अगं राधा...

....राधाचा आवाज जडच झाला." हो..

...कसे आहात तुम्ही.जेवलात का? औषधे घेतली न."

  न जाणे दोघे काय बोलणार होते आणि काय बोलत होते.दोघेंहीं एकमेकांचीं काळजीपूर्वक चौकशी करत होते.

   रोज रात्री नेहा रमेशला फोन करायची.मग रमेश आणि राधा जरा वेळ बोलायचे.

   नेहा सकाळी लवकर आपल्या कामाला जायची.मग राधा आपले काम झाले की बाहेर तिथल्या तिथे फिरायला जात होती.

  एकदिवस ती अशीच फिरायला गेली आणि तिथे तिच्या समोर एक वयस्कर जोडपे दिसले. दोघेंही हातात हात घालून हळूहळू चालत होते.त्यामध्ये पुरुषाच्या हाती काठी होती आणि हे दोघे बोलत बोलत चालत होते.इतक्यात त्या महीलेचा पाय स्लीप झाला आणि ती पडणार होती तोच तिच्या नवऱ्याने तिला हातातील काठी बाजूला सारून थरथरत्या हाताने सावरले.आणि ती महीला पडता पडता वाचली.

  हे दृश्य पाहून राधाच्या डोळ्यात पाणी आले आणि तिला रमेश ची तीव्र आठवण आली.

    ती एक एक करुन दिवस मोजत होती.तिच्या खोलीतील खिडकीतून सुर्यास्त होत असलेला अगदी मनोहर दृश्य दिसत होता.ती रोज संध्याकाळी न चुकता सुर्यास्त पहात होती.

   तिला सुर्यास्त आणखीन रमेशच्या आठवणीत नेत होता.तिला आपले लग्नाचे नवीन दिवस आठवत होते.

    रमेश कामावरून घरी आला कि ही दोघे बाहेर फिरायला जायची.मग रमेश रोज राधाला मोगऱ्याचा गजरा घेऊन द्यायचा.

   कितीतरी चढती उतरती संसारात झाली पण दोघेही एकमेकांना साथ देत संसाराचा गाडा पुढे नेत होती.

   काही उन्हाळे असे आले कि खुपचं चटके देऊन गेले तर काही पावसाळे असेही झाले कि त्यामध्ये काहीतरी वाहुनी गेले.पण या नंतर थंडी गोडी गुलाबी अशी आली कि नवनवे पालवी फुटली.

   कसे ही ऋतु येवो कसे ही प्रसंग येवो दोघांनी खांद्याला खांदा लावून अगदी प्रेमाने आपुलकीने आपले घरटे उभे केले होते.आपल्या आनंद निवासी आनंदी हा परीवार होता.

   जशी स्थिती राधाची तशीच इकडे रमेशची होती.त्याला घरात काहीतरी कमी आहे असे भासत होते. कोठेतरी आपण राधा विना अपुरे आहोत असे जाणवत होते.आता जरा तो इतका सा बोलत ही नव्हता.कामावरून आला कि पेपर वाचत वाचत तिथेच झोपी जायचा.रविवारी जरा आपल्या मित्रांच्या बरोबर बाहेर जायचा इतकाच काय तो विरंगुळा.

   मग कधी कधी मित्र चिडवायचे" दो हंसों का जोडा बिछड गया रे"

   यावर रमेश त्यांना काही बोलत नव्हता फक्त आपले डोळे पाणावलेले लपविण्याचा प्रयत्न करत होता.

   बघता बघता तीन महिने संपूर्ण होत आले.आता नेहाचा प्रोजेक्ट पण संपूर्ण झाला होता आता निघायची तयारी.

  " नेहा ऐक ना इथे खुप छान स्वेटर मिळतात . तुझ्या बाबांना घेऊ गं.आणि हो हातात धरायची काठी पण छान आहे मला आवडली ती ही घेऊ. तुझे बाबा घड्याळ आवडीने घालतात ते ही घेऊ'

  " अगं हो हो चल तुला काय हवं ते घे बाबांना.आणि तुला काय नको का गं."  

   " छे गं मला काय नकोय बाई.तुझ्या बाबांनी सगळं घेऊन दिलंय बघं."

    दोघीही माॅलमध्ये गेल्या. राधा इतक्या आवडीने सगळ्या वस्तू खरेदी करत होती हे पाहून नेहाला खुप बरे वाटले.तिने तिच्या नकळत तिचे फोटो घेतले. प्रत्येक वस्तू घेताना त्यावर हात फिरवत मग नकळत डोळे बंद करून रमेशला आठवत घेत असलेल्या तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा प्रेमाचा झरा अखंड वाहु लागला होता.

   हे पाहून नेहा मनात म्हणत होती कि प्रेम हे काय फक्त तरुण मुला मुलींनीच करायचे का? आणि  विरह हा फक्त तरुणांना होतो का? तर नाही असे मुळीच.प्रेम हे प्रेमच असते.त्याला वय नसते त्याला बंधन नसते.आणि खरे प्रेम करणाऱ्यांनाच विरह छळतो.

   .......

.....आज या दोघी परत मायदेशी परतणार होत्या.राधाने रमेशने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घेतलेली साडी नेसली होती.आणि नेहाला ती निघण्यासाठी गडबड करत होती.

  " नेहा झाले का नाही तुझे.चल लवकर वेळ होईल.आणि जरा वेळ झाला कि फ्लाईट चुकेल."

    दोघी एयर पोर्ट वर आल्या.आजपासुन तीन महीन्या पुर्वी याच एयर पोर्ट वर राधा निस्तेज चेहऱ्याने निर्जीव वस्तू सारखी बसलेली होती तिच आज अगदी आनंदाने एका लहान मुली प्रमाणे कुतूहलाने इकडे तिकडे पहात होती.

  दोघींही विमानात बसल्या.ऐयरह़स्टेसने जेवणासाठी काय हवंय विचराताच राधा ने पटपट काय हवे नको ते सगळे सांगितले.

   आणि जेवताना हसतच म्हटले" हे बघं तुझ्या बाबांची आवडती भाजी.तुला माहीत आहे का ही मी भाजी लग्ना आधी खात नव्हते.माझी नावडती भाजी होती ही पण नंतर यांना आवडते म्हणून मी माझी आवड बदलली."

   ती बोलत होती तर तिचा चेहरा खुलला होता.

    जेवण झाल्यानंतर राधा खिडकीतून बाहेर पाहू लागली आणि कापसासारखा दिसणाऱ्या ढगाकडे पाहून लाजून हळूच गाली मंद हसु लागली.आणि मनात म्हणत होती" आता मधु चालली चंद्राकडे"...

   ......

.... विमान उतरले.राधाची उतरण्याची घाई सुरू झाली.कधी एकदा उतरते आणि रमेशला पहाते असे झाले होते.आपले सगळे सामान घेऊन या दोघी एयर पोर्ट च्या बाहेर आल्या.

   राधा भरभर चालत होती.तिच्या चालण्याचा वेग आणि मनाची एकाग्रता वाढत होती.आणि शेवटी...

....समोर उभा असलेला रमेशला पाहून राधाचा जीव भांड्यात पडला.ती एकसारखे रमेश ला बघतच राहीली.तीन महीन्याचा विरह आज संपला होता.आणि तीन महीन्यांनी मधु चंद्राची भेट झाली होती.

  आता मधु आणि चंद्राचा विरहकाळ संपला होता.

 

समाप्त...

©® परवीन कौसर...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने