अपराध वेड्या मनाचा ( भाग १)




अपराध वेड्या मनाचा ( भाग १)

© पल्लवी घोडके-अष्टेकर

रिया आणि आलोक चा 14 वर्षांचा सुखी संसार व त्यांच्या वृक्ष वेलीवर बहरलेले एक ११ वर्षांचे फुल, म्हणजेच त्यांची मुलगी आर्या. 

वरवर पाहता संसार तसा सुखाचा होता, एक आलिशान बंगला, घरात नोकर-चाकर, सासू-सासरे,चारचाकी गाड्या व दोघांनाही भक्कम पगाराची नोकरी. सुखी संसार म्हणजे रिया व आलोकचा संसार अशी सगळ्यांची धारणा होती. म्हणजे सर्वांना तसं दिसत होतं. 

रियाही खुश होती,मुलगी रिया सारखीच दिसायला सुंदर व बुद्धीने तल्लख होती. सासू-सासरे प्रेमळ होते, आलोक उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत होता तसेच निर्व्यसनी व कष्टाळूही होता त्यामुळे त्याच्या संसारात कशाचीच कमी नव्हती.
पण तरीही काहीतरी कमी असण्याची जाणीव रियाला नेहमी होत असे. पण नेमकं काय कमी आहे हे तिला सांगता येत नसे. 

रियाच्या आयुष्यात आणखी एक महत्वाची व्यक्ती होती तिची जिवाभावाची लाडकी मैत्रिण अल्पना. रिया प्रत्येक गोष्ट अल्पनाशी शेअर करत. 

अल्पना रियाच्या सासू-सासरे,आर्या, आलोक,सगळ्यांनाच अगदी घरच्या सारखी वाटे. 

अल्पना व रियाची मैत्री लग्नापूर्वीचीच होती.दोघींचेही काम वेगळे होते. पण विचार जुळले,आवडी-निवडी सगळं जुळून आलं व त्यांची मैत्री अधिक घट्ट जमली.दिवसातून तीन-चार मेसेज, एखादा तरी फोन नक्की होत. जवळपासच राहत असल्याने भेटीगाठीही वारंवार होत.

रियाच्या ऑफिसमध्ये बॉस ची पोस्ट गेल्या महिनाभरापासून रिकामी होती आणि ती मिळवण्यासाठी ऑफिसमधल्या लोकांनी प्रयत्नांची शिकस्त केली होती. पण कुणाच्याही वाट्याला यश आलं नव्हतं. 

कंपनीने चंदिगडच्या ब्रांचच्या एका व्यक्तीस या पोस्टसाठी सहा महिन्यांसाठी नियुक्त केले होते. जेव्हा ही बातमी वरिष्ठांकडून कळाली तेव्हा सर्वांचे चेहरे पडले होते पण रियाला मात्र आनंद झाला होता. तिच्या कामाचा ताण आता हलका होणार होता.
गेल्या महिनाभरात घराकडे लक्ष नाही अशी सूचना अलोक कडून कितीतरी वेळा तिला मिळाली होती.

ऑफिस,घर,आर्याचा अभ्यास,घरातल्यांचे बर्थडे,एनिवर्सरी,आलोकच्या बढतीच्या पार्ट्या सगळ्याने घरात नोकर चाकर असूनही त्याची दमछाक होत होती.

आलोकला तर अजिबात वेळ नसे. नशा लागल्या प्रमाणे तो काम करत. घरी असला तरी सतत फोन किंवा लॅपटॉप चालूच असे. तो सगळ्यांमध्ये असूनही नसल्यासारखा तिला भासे. 

तिने ही गोष्ट अल्पनाला बोलून दाखवली होती. पण बिनधास्त अल्पुने, "तुमच्यात सेक्स होत नाही का?" असा हसून प्रतिप्रश्न केला. "तसं नाही गं……" "म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, उगाच मनात शंका आणू नकोस,मला नाही वाटत जिजाजींच बाहेर काही प्रकरण असेल, कामात असतो तो बिचारा, "वर्कोहोलिक" आहे ग...आणि त्याला कोण पटणार आहे या वयात? केस पाहिलेस का त्याचे?" अल्पना असे बोलून तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये रियाला टाळी देऊन मोठ्याने हसत, "अच्छा…. मी येते मला लेट होतोय." म्हणून निघून गेली.

रियाचे सहजच अलोक कडे लक्ष गेले, त्याचे बारीक कापलेले चंदेरी केस पाहून तिला उगाचच हसू आले.

व्यवसायाने इंटेरियर डिझायनर असलेल्या रियाला रंग संगतींच खूपच knowledge होतं. तिच्या कामात ती अगदी perfect असे. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा तिला अजिबात चालत नसे.तिच्या ideas डिझाईनमध्ये उतरवण्यात ती अगदी माहीर होती. तिचं तिच्या कामावर मनापासून प्रेम होतं.

आज नवीन बॉस येणार असल्याने तिची सकाळपासूनच धावपळ सुरू होती. नाश्त्यासाठी टेबलवर बसूनही तिचं लक्ष नाश्त्यात नव्हतं. तिने सुंदर चिंतामणी रंगाची साडी नेसून त्यावर अगदी परफेक्ट मेकअप केला होता. 

वेळेत किंवा वेळेच्या थोडे आधीच ऑफिसमध्ये पोहोचण्याचा तिचा प्लान होता. आलोकने रियाला तिच्या विचारातून जागं करत कॉफी मागितली. 

कॉफी देत असताना चुकून आर्याचा हात लागून रियाच्या साडीवर कॉफी सांडली. त्यावर काय करावं न सुचून रियाचे डोळे डबडबले. आलोकने रियाकडे पाहिले,पण तेवढ्यात त्याचा फोन वाजला व तो तिकडे busy झाला.
मेकअप मध्ये फार बदल करायला नको या अनुषंगाने तिने parpul कलरचा ड्रेस घातला व घाईतच निघाली. जाता-जाता अजून आर्याला सुद्धा ड्रॉप करायचे होते.मदतीसाठी तिने आलोक कडे पाहिले पण no use,तो त्याच्या कामात होता.

ऑफिसला पोचली तेव्हा तिला चक्क ३५ मिनिटे उशीर झाला होता.

आता पहिल्याच दिवशी बॉसला कारणं द्यावी लागणार म्हणून तिला स्वतःचाच राग आला. 

ती घाईतच केबिनमध्ये गेली. तो ३५-३६ वर्षाचा, जवळपास सहा फूट उंचीचा, अतिशय रुबाबदार व कमनिय बांध्याचा तरुण होता. गव्हाळ रंग,बोलके डोळे, मधुर हास्य व फ्रेंच बियर्ड त्याला अगदी शोभून दिसत होती. 

रियाला पाहताच तो खुर्चीतून उठला,त्याने हात पुढे करत "Miss Riya,right?" असा प्रश्न केला. 

रियानेही हसून हस्तांदोलन करत "Mrs.Riya." असे correction केले.

 "Do you mind if I call you Riya?"तिला बसण्याचा इशारा करत त्याने प्रश्न केला. 

रियाने थोडेसे संकोचून होकारार्थी मान हलवली. Um…I am sorry…….. I'm late today……" रिया चाचरत बोलली. 

"Oh!it's ok,no problem."त्याने म्हणताच रियाला जरा हलके वाटले.

मग पुढचे २ तास ते गेल्या महिनाभरातल्या ऑफीसच्या कामाबद्दल बोलत होते. 

रियाने सगळे Updates त्याला दिले. रियाचे काम,perfection व dedication पाहून तो impress झाला.

कॉफी पीत असतांना पुन्हा दोन थेंब कॉफी तिथल्या documents वर रिया कडून सांडली,तिने बॉसच्या लक्षात येणार नाही असा प्रयत्न करत तिच्या डिझाईनर स्टोलने पटकन टिपण्याचा प्रयत्न केला. 

पण तिला थांबवत त्याने Tissue box रिया पुढे धरला. "

I am sorry actually…….." तिला मध्येच थांबवत "It's ok, पेपर खराब झाला असेल तर एक प्रिंट नक्कीच काढता येईल." असे म्हणत तो डोळे मिचकावत मिश्कील हसला. 

रिया केबिनमधून बाहेर पडतांना "by the way nice earrings" ऐकताच ती थबकली.

"Sorry?"- Riya

"But I think, साडीवर ते जास्त सूट झाले असते, पण…….Anyways it's suits you."

अशी Compliment तिला आजवर कुठल्याही पुरुष सहकार्याने कधीही दिली नव्हती. 

थोडसं शरमून "Thank you!" म्हणत रिया बाहेर पडली.

निशांत ऑफिसमधल्या प्रत्येकालाच नावाने हाक मारत असे. 

दुसऱ्या दिवशी केबिन मध्ये मीटिंग संपल्यावर, "सर मी तुम्हाला या वीक मध्ये दोन-तीन डिझाइन्स बनवून देते, मग तुम्ही त्यातून एक निवडा" - रिया.

"पहिली गोष्ट माझं नाव निशांत आहे आणि दुसरी गोष्ट मला दोन-तीन नव्हे एकच डिझाईन हवंय,तुझं बेस्ट डिझाईन तू मला दे, मला नाही वाटत आपल्याला त्यात काही बदल करावे लागतील."

हे सगळं रियासाठी अगदीच नवीन होतं,ती काहीच बोलली नाही. 

संध्याकाळी अल्पुकडे मात्र ती निशांतचं भरभरून कौतुक करत होती.

काही दिवसानंतर हळुहळु निशांतचा स्वभाव, कामाची पद्धत, मस्करी, सगळ्यांनाच आवर्जून दिलेल्या कॉम्प्लिमेंट्स, रियाच्या लक्षात येऊ लागल्या.

त्याच्याबरोबर काम करतांना मनावर कुठलाही तनाव तिला जाणवत नसे. 

कामाची गोडी अजूनच वाढत होती.

"तू लहान-मोठ्या सगळ्यांनाच असे नावाने का हाका मारतोस?" असे एकदा सहजच निशांतला रियाने विचारले. 

त्यावर त्याने एक किस्सा रियाला हसून सांगितला, तो ऐकून रिया अगदी पोट धरून हसली होती. तो एकटक तिच्याकडे पाहत होता, मग हलकेच हसून म्हणाला, "तुला कोणी सांगितलं का, की तू हसतांना खूपच सुंदर दिसतेस?"

रियाने डोळे मोठे करत, "मी तुझ्या पेक्षा वयाने मोठी आहे माझ्याशी flirt करू नकोस." अशी त्याला प्रेमळ धमकी दिली.

रिया आता हळूहळू तिच्याही नकळत निशांत च्या सहवासात रमू लागली होती. 

त्यांच्या बॉस आणि एम्प्लॉयी नात्याचे रूपांतर मैत्रीत कधी झाले तिला कळलंच नाही.

क्रमशः

©® पल्लवी घोडके-अष्टेकर.


सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने