आईचं खादाडपण अन बाळाची दैना









आईचं खादाडपण अन बाळाची दैना

© शितल ठोंबरे
तृप्तीच पहिलंच बाळंतपण….त्यात सीझर झालेलं… त्यामुळे तृप्तीची आई तृप्तीची खूपच काळजी घेत होती… तिच्या खाण्यापिण्याच्या पथ्याच काटेकोर पालन करीत होती…


जेवणाची, नाष्ट्याची वेळ ठरलेली असायची… जेवणातही तृप्ती ला भरपूर दूध यावं...टाके लवकर भरून यावेत… यासाठी योग्य असाच आहार तिला देत असे… मेथीची भाजी, वरण, ज्वारीची भाकरी, पाया सूप… मधल्या वेळात भूक लागलीच तर खारीक खोबरं, डिंकाचे लाडू सारं काही तृप्तीच्या दिमतीला असे...


पण तृप्तीला मात्र या सगळ्याचा कंटाळा आला होता… कारण तृप्ती नंबर 1ची खादाड होती… झोपेतून उठल्यावर असो की रात्री झोपण्या आधी… रिकामं पोट असो की टम्म भरलेलं… तृप्ती कधीही काहीही खाण्यास तयार होई….


त्यातही हॉटेल मधले चमचमीत पदार्थ ती खूपच मिस करीत होती…आईच्या मागे लागायची….


'रोज रोज हेच काय देतेस जेवायला... मला कंटाळा आला आहे… हे खाऊन… काहीतरी चमचमीत बनव न आई '.... तृप्ती त्रागा करीत म्हणाली


तृप्तीचं खाण्यावरच प्रेम आईला माहित होतं… पण आता यावेळी तृप्तीच्या खाण्यापेक्षा बाळाची तब्येत महत्वाची होती… तृप्तीच्या उलट सुलट काहीही खाण्याचा परिणाम थेट बाळावर होईल….म्हणून आईने तिला समजविण्याचा प्रयत्न केला…


पण खादाड तृप्तीला काहीच समजून घ्यायचं नव्हतं...आपल्या जिभेचे चोचले कसे पुरावता येतील याचाच ती विचार करत होती…


कधी कधी तर तिला बाळाचा ही राग यायचा की….बाळामुळे तिला तिच्या खाण्यावर कंट्रोल करावं लागत आहे..


तृप्तीच्या चुलत भावाचं लग्न होतं… बाळ लहान असल्याने तृप्ती लग्नाला जाऊ शकली नाही… पण तृप्तीच्या आईला जाण भाग होतं… बाळाला आणि तृप्तीला घरात एकटं ठेवणं आईच्या जीवावर आलं होतं…


पण तृप्तीनेच आग्रह केला…आणि आईला म्हणाली 'घरचं लग्न आहे… तू नाही गेलीस तर सगळ्यांना वाईट वाटेल… आणि मला सर्वात जास्त की माझ्यामुळे तुला जाता येईना… ते काही नाही तू जा मी माझी आणि बाळाची काळजी घेईन '


तृप्तीचं आणि बाळाचं सारं काही आटपून तृप्तीची आई तृप्तीला सर्व नीट समजावून लग्नाला गेली…


इकडे बाळ झोपलं आणि तृप्तीला रान मोकळं झालं… आज तिला घरात कोणीचं टोकणार नव्हतं… तिच्या मनातील काहीतरी चमचमीत खाण्याची सुप्त इच्छा पुन्हा तिव्रतेने जागृत झाली…


आई ला यायला संध्याकाळ होणार होती… बाळ झोपलं आहे… तोवरच काहीतरी बनवून खायला हवं या विचाराने ती किचन मध्ये शिरली…


भरभर दोन कांदे कापले… बेसन पीठ काढलं… तिखटाला हात थोडा सैल सोडत… भजी तळुन घेतले… गरमागरम गरम भजी खाताना तोंडाला चटका बसत असला तरी… तो चटका तिला हवाहवासा वाटत होता…


बाळ झाल्यापासून गेल्या एक महिन्यात ती या सगळ्याला मुकली होती… पण आज तिने कांदाभजी वर अगदी मनसोक्त ताव मारला…


पोट भरलं पण मन भरले नव्हते… कांदाभजी संपले तशी ती उठली… बाळ अजून शांत झोपलं होतं… त्याच्या बाजूला जाऊन शांत झोपी गेली….


जिभेचे चोचले पुरावल्याने ती जाम खुश होती… अर्धा तास झाला असेल तिचा डोळा लागून….बाळाच्या रडण्याचा आवाज आला तशी ती जागी झाली… बाळाला भूक लागली होती…


तृप्तीने बाळाला मांडीवर घेतलं… आपलं दूध त्याला पाजल….दूध पोटात जाताच बाळ शांत झालं...आणि पुन्हा झोपी गेलं….


बाळ झोपलं आहे तोवरच  तृप्ती जरा फ्रेश झाली...बाळ उठल की त्याला घेऊनच बसावं लागेल… त्यात आई ही घरी नाही…


ती स्वतःसाठी चहा बनवायला किचन मधे जाणार तोच बाळ उठलं ते ही रडतच… तृप्तीने बाळाला जवळ घेतलं… पण बाळ रडतच होतं…


त्याला भूक लागली असेल म्हणून… दूध पाजण्याचा प्रयत्न केला पण बाळ दूध तोंडात घ्यायला ही तयार होईना….


बाळाचं रडणं वाढतचं होतं… बाळ रडून रडून लालेलाल झालं...तृप्तीला काय करावं समजेना… बाळाचं असं एकसारखं रडणं पाहून तृप्ती ही रडकुंडीला आली… तिने आईला फोन केला…


तृप्तीची आई तातडीने तिथून निघाली… पण अजून तासभर तरी लागला असता घरी पोहचायला… बाळाचं रडणं फोनवर ही ऐकू येतं होतं…


तृप्तीच्या आईने तातडीने आपल्या मैत्रिणीला सुजा ला फोन केला ती त्यांच्याच सोसायटीत राहतं होती… तिला घरी जायला सांगितले…


तृप्ती आणि बाळाला घेऊन तातडीने दवाखान्यात जा मी तिथेच पोहचते… असे सांगितले


सुजा ही लगबगिने तृप्ती आणि बाळा जवळ पोहचली… त्या दोघांना घेऊन जवळच्याचं चाईल्ड स्पेशालिस्ट कडे गेली…


दवाखान्यात गर्दी होती… पण बाळाचं रडणं पाहून आधी तृप्ती आणि तिच्या बाळाला आत सोडलं… डॉक्टरांनी बाळाला चेक केलं…


बाळाचं पोट फुगलं होतं आणि कडक ही झालं होतं… त्यामुळेच बाळ इतकं रडत होतं…


डॉक्टरांनी तृप्तीलाच विचारले… तुम्ही काही वेगळं खाल्लं होतं का??...


कारण बाळ अंगावरच दूध पीत आहे म्हटल्यावर तुम्ही जे काही खाणार ते दुधावाटे बाळालाही मिळणार...जें काही खाल्लं असेल ते प्लिज स्पष्ट सांगा


तृप्तीचा नाईलाज होता… तिला भज्यां बाबत खरं सांगावंच लागलं….


डॉक्टरांनी तृप्तीला नीट समजावले… तिच्या खाण्यापिण्याचा परिणाम बाळावर कसा होतो….बाळा साठी ते कसं हानिकारक आहे…बाळ महत्वाचं आहे की तुझं खाण्यावरच प्रेम असा प्रश्न करताच तृप्तीला रडूच कोसळलं...


तृप्तीला आता तिची चूक समजली होती...आपल्या खादाड पणामुळे आपल्या बाळाच्या जीवावर बेतलं असतं… हा विचार करूनच तिला स्वतः चीच लाज वाटू लागली….


बाळाचे पापे घेत… ती बाळाला म्हणाली ' माफ कर मला मी खूप वाईट मम्मा आहे न… पण यापुढे तुला त्रास होईल असं मम्मा काहीच करणार नाही मम्माच प्रॉमिस आहे तुला….'


डाक्टरांनी औषध दिल्याने बाळ मात्र तिच्या कुशीत शांत पहूडलं होतं…


तेवढ्यात तृप्तीची आईही दवाखान्यात हजर झाली आपल्या लेकीचे प्रताप ऐकून तिने तर कपाळालाचं हात लावला….



(कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पण लेखिकेच्या नावासहित )


©®शितल ठोंबरे (हळवा कोपरा )


सदर कथा शितल ठोंबरे यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने ती ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. तसं त्यांचं संमतीपत्र आमच्याकडे आहे याची नोंद घ्यावी. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना कृपया नावासहितच  शेअर करा.

धन्यवाद.!!!

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने