सुहृद
© अपर्णा देशपांडे
शांत , स्थिर पाणी , त्यावर मावळतीची केशरी गुलाबी छटा , पाण्याची हलकी खळखळ , सगळं कसं निरामय . आकाशात परतीचे प्रवासी सूर्याला त्याची वेळ संपल्याचे खुणावत होते . नदीकाठी मोठाले खडक एखाद्या व्रतस्था सारखे निश्चल .
तिथेच एका खडकावर पार्थ सुन्न बसलेला . जणू युगानुयुगे ह्या सृष्टीचा तोही एक हिस्सा . निसर्ग हा बघणाराच्या नजरेत असतो आणि पार्थ ला आज तो अतिशय उदासवणा वाटला . गेले अनेक दिवस तो रोज संध्याकाळी इथे येऊन बसत असे . मनात प्रचंड गोंधळ , आणि डोळ्यासमोर अंधार . पुढे वाट दिसत नसतांना चालावे लागणे ही अगतिकता तो अनुभवत होता ......
सानिया ने किती बेदरकारपणे सांगून टाकले होते .....मला तुझ्याशी मुळीच संसार करायचा नाहीये ....माझ्यावर कुठलाच हक्क दाखवायचा नाही .....काही तास आधी जरी बोलली असती तरी किती मोठा अनर्थ टळू शकला असता ....अक्षता पडल्या , आणि ती कानात कुजबुजली ....किती सहज ....खेळतांना कानगोष्टी सांगाव्यात इतक्या सहज पणे ....आपण म्हणालो ...सानिया , पूर्ण आयुष्य पडलंय चेष्टा करायला ..तर..फटकन म्हणाली , ...चेष्टा तर तुम्ही सगळ्यांनी केलीय माझी .....
पार्थ खडकावरून उठला . त्याला वाटले , अंधाराचा ही एक रंग असतो . त्यात प्रकाशाची तिरीप मिसळली की बदलणारा .
नाहीतर कुठल्याही रंगाला खाऊन टाकणारा . आपल्याही आयुष्यात असा दुसऱ्या रंगावर हावी होणारा अंधाराचा रंगच आहे . आधी मम्मी पप्पांच्या रुपात , आणि आता सानियाच्या .
पार्थ चौथीत असेल . शाळेतून घरी आला , दप्तर जागेवर ठेवले आणि
" मॉ s s म ! " अशी हाक मारली . आई स्वयंपाक घरात नव्हती . तो घरभर आईला शोधत फिरला . दामू काका होते , वीणा मावशी होत्या , पण आई नव्हती .
" मावशी , मॉम कुठाय ? "
" मॅडम सांगून गेल्यात की त्या आता येणार नाहीत . "
" म्हणजे ? आजीकडे गेलीय का ? यु . एस ला ? " त्याचा भाबडा प्रश्न .
इतक्यात पप्पांचा फोन आला .
" पार्थ बेटा , ममा कंपनीच्या कामाने गेलीये . येईल काही दीवसांनी हं , तू मावशी बाईंकडून सगळं करून घे
हा . " ........ .
पार्थ रोज तिची वाट पाही . तासनतास बाहेर पोर्च मध्ये गेटकडे डोळे लावून बसे . कधी मागील तळ्याच्या काठावर बसून राही . एक वीणा मावशीच होती , जीच्याकडे तो त्याच्या इवल्याश्या जगातील गोष्टी सांगत असे . मावशीला पण त्याचा खूप लळा लागला होता . दोन महिन्यात मॉम आली . एक मोठी कार बाहेर थांबली होती . इवलासा पार्थ धावत तिच्याकडे गेला . मॉम ला घट्ट मिठी मारली आणि बाहेर कार जवळ उभे एक अंकल दिसले , तशी त्याची पकड ढिली झाली .
" सगळे बोलतात ते खरे आहे मॉम? तू पप्पांसोबत आता कधीच नाही रहाणार ? "
" पण मी तुला न्यायला आलेय पार्थ , माझ्यासोबत चल बेबी , " रेवा म्हणाली .
पार्थ ने धावत जाऊन वीणा मावशींना पकडले .
काही दिवसातच पप्पां नि दुसरं लग्न केलं होतं ....त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण मात्र पूर्ण केले.
पार्थ खूप शिकला . मोठा माणूस झाला . त्याच्या आयुष्यात एकच व्यक्ती कायम सोबत होती , वीणा मावशी ! आई वडिलांच्या प्रेमाला तो कायम भुकेलाच राहिला .
स्टार इंडस्ट्री च्या मालकांच्या मुलीशी , सानियाशी त्याचे लग्न ठरले . त्याच्या सावत्र आईच्या नात्यातील कुणी होते ते . लग्न लागेपर्यंत सानियाने एका शब्दाने पार्थला विरोध केला नाही , मग लग्न लागल्याबरोबर लगेच का सांगितले तिने ?....आधीच ठरवून ठेवले होते का ? ...............
........ " पार्थ , माझ्या ' पॅरेन्ट्स ' नि माझ्यावर लग्नाची सक्ती केलीये . मी आधीच एका बरोबर ' लिव्ह इन ' मध्ये रहातीये . मला तुझ्याशी काही वैर नाही , तुही माझा राग करू नकोस . मी जातेय . मी त्यांच्यावर सूड उगवलाय , त्याचा तू बळी ठरलाय इतकंच . आय एम सॉरी ! पण नो वे , मी जातेय . " ....हे सगळं आता आठवत होतं त्याला ...आठवणी तरी कशा , चिकट जळमटासारख्या....
******
" पार्थ बाबा , कुठे गेला होतास ? "
" तळ्याकाठी . "
" स्वीडन वरून मोठ्या साहेबांचा फोन येऊन गेला . तुला विचारत होते . नवीन मॅडम पण बोलल्या . "
"......"
" पार्थ , "
" मावशी , आपल्या आयुष्यात आनंद कशात आहे हे कसं ओळखायचं ? "
" माझ्या आयुष्यातील आनंद तर तूच आहेस बेटा . ...तुझ्या बाबतीत म्हणशील तर तुला इतरांसाठी काम करूनच आनंद मिळतो ...आठवतं ? किसन ड्रायव्हर चा बबलू ? तुझे सगळे खेळणे तू त्याला दिले तेव्हा , मग दामू काकांच्या मुलीला आजारपणात तुझी सगळी पिगी बँक देऊन टाकली होतीस ....तेव्हा इतकं कधीच इतकं खूष नाही बघितलं तुला . मोठे साहेब एकदा तुला अनाथाश्रमात भेट द्यायला घेऊन गेले होते , तेव्हा दोन दिवस तू कुणाशीच बोलला नव्हतास . शेवटी साहेब पुन्हा तुला तिथर घेऊन गेले . थंडीचे ब्लॅंकेट वाटले सगळ्यांना , वह्या पुस्तके दिली , तेव्हा कुठे शांत झाला होतास तू .
तळ्याकाठी बसलेला असतांना त्याच्या मनात जो अंधार होता , गोंधळ होता , तो शांत झाल्यासारखे वाटले त्याला . अचानक वाट सापडावी तसे ... ....त्याचा निर्णय झाला होता .
पार्थ , मॅनेजर दळवी आणि आर्किटेक्ट आशिष एका मोठ्या जमिनीवर उभे होते .
" आशिष ह्यातली पूर्ण एक एकर जमीन आपल्याला ह्याकरता वापरायचिये . लवकरात लवकर प्लॅन बनवा . .....पार्थ भराभर सूचना देत होता .
स्वीडन वरून पप्पा फक्त चौकशी करायचे . मॉम ने मनाविरुद्ध पप्पांशी लग्न केलं , जे टीकलं नाही . मग दोघांनि आपला आनंद दुसरीकडे शोधला . सानिया ने आपल्या आईवडिलांवर सूड उगवतांना आपला बळी दिला ....मग इतक्या अशाश्वत जगात शाश्वत काय आहे ? ह्याचे आपल्या परीने पार्थ ने उत्तर शोधले होते .
वर्षभरात अर्ध्या एकरात प्रचंड मोठे अनाथाश्रम उभे राहिले , ""सुहृद'' !!. उरलेल्या भागात भव्य संस्कार आश्रम उभा केला होता . प्रचंड मोठा शामियाना घातला होता . आजूबाजूला भरपूर हिरवाई होती . भरपूर वृक्षारोपण केले होते . साधी पण आकर्षक सजावट केली होती .
दामू काका आणि वीणा मावशी च्या हातून दोन्ही विभागाचे उद्घाटन करून त्यांच्या प्रेमाची अंशतः परतफेड केल्यासारखे वाटले त्याला .
भरकटलेल्या तरुणांना तिथे योग्य दिशा दाखवण्यासाठी मोठी ज्ञानी मंडळी आली होती . समाजातील अनेक मोठी मंडळी , डॉक्टर , शिक्षक आणि समाजसेवक आले होते . आजूबाजूचे लोक हे भव्य कार्य बघायला आले होते . गाड्यांचा ताफा लागला होता .
" पार्थ , बघ कोण आलंय . " मावशी म्हणाल्या .
" मॉम ! " त्याने नमस्कार केला .
भरल्या डोळ्यांनी रेवा सगळे बघत होती .
" पार्थ , मला कधी माफ करू शकशील ? "
" मॉम , निदान माझ्या भोवतालच्या वर्तुळात तरी विवाह एक बंधन न होता एक समर्पित सहजीवन व्हावे यासाठी मी आयुष्य वेचेन . ह्यासाठी मोफत समुपदेशन केंद्र आहे इथे .
शेकडो अनाथ मुलांचा सांभाळ होईल , अगदी प्रेमाने . पुन्हा कधी कुणी एका ' पार्थ ' ला जन्माला घालून दुसरीकडे आपला आनंद शोधणार नाही , नक्कीच .
पार्थच्या डोळ्यात 'सुहृद' चे प्रतिबिंब दिसत होते.
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करू नये.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

मस्त शेवट. छान कथा.
उत्तर द्याहटवाThank you so much Neelima.
हटवा