देहधर्म

 © सुतेजा फडके



"किती छान झाला नाही कार्यक्रम?"

"बोलावलेल्या सर्व नातलग,आप्तेष्ट,मित्रमंडळींनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली."

"खूप वर्षांनी इतके पाहुणे घरी आले.माई,आबा यांच्या आजोळपासून ते आपल्या माहेर पर्यंत कोणीच सुटलं नाही."

"महेश,तुझं इतकं छान नियोजन होतं म्हणून झालं बरं का सगळं व्यवस्थित."

"अरे अशोक दादा,मी एकट्याने काही केलेलं नाही, तुम्ही सर्वांनी तितकीच खंबीर साथ दिलीत म्हणून झालं सगळं."

माई कौतुकानं आपल्या लेकी,सुना,मुलं यांचं संभाषण ऐकत होत्या..

आज आबांची पंच्याहत्तरी आणि माई आबांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस सर्वांनी मिळून अगदी दणक्यात साजरा केला होता.

अगदी दोन दिवस आधीपासूनच कार्यालय घेऊन येणाऱ्या पाहुण्यांची छान सरबराई केली होती.

फक्त निलू,आबांची सर्वात छोटी मुलगी येऊ शकली नव्हती..तिला नववा महीना असल्यामुळे रिस्क नको म्हणून अनिलराव एकटेच आले होते.

माईंना तेवढी एकच उणीव जाणवली..बाकी सगळा कार्यक्रम अगदी दृष्ट लागण्याजोगा झाला..

आबांबरोबरच माईंचीसुद्धा तुला,शांती हौसेने केली.

माई म्हणाल्या सुद्धा,"माझी मेलीची कशाला पाहिजे तुला न बिला."पण त्यांचं कुणी ऐकलं नाही..मनातून त्या खूप आंनदी झाल्या.

वामनराव जोशी संपूर्ण पंचक्रोशीत आबा म्हणून परिचित होते..पोस्टमास्तर म्हणून त्यांनी आपली नोकरी प्रामाणिकपणे केली.

सांपत्तिक स्थिती चांगली असल्यामुळे राहणीमानही व्यवस्थितच होते..माई आणि आबा एकमेकांना साजेसे जोडपे होते.

नेहमी हसतमुख राहणाऱ्या वासंतीबाई उर्फ माई आल्या गेल्याचं प्रेमानं आणि अगत्यानं करत..आबासुद्धा नडलेल्याला मदत करायला मागेपुढे कधी पाहत नसत.

दोघांनीही आपल्या मुलांना शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कारही दिले..अशोक आणि महेश दोघेही चांगले शिकले.

अशोक इंजिनिअर झाला.पुण्यात चांगल्या कंपनीत लागला.पुण्यात तीन बेडरूमचा फ्लॅट घेऊन तो तिथं स्थायिक झाला.

महेशसुद्धा पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये लेक्चरर झाला.

दोन्ही मुली,सुनीता आणि नीला शिकल्या.. सुस्थळं पाहून त्यांची लग्न लावून दिली.आपापल्या सासरी त्या सुखी होत्या.

सुनीताच्या घरचा केटरिंगचा मोठा बिझनेस होता.ती त्यात मदत करत होती..निलू एका कोचिंग क्लास मध्ये जॉब करत होती.

एकंदरीत माई आबांना कशाचीच चिंता नव्हती.वयोमानानुसार काही प्रकृतीच्या कुरबुरी चालू रहायच्या.

माईंपेक्षा आबा एवढ्यात जास्त थकले होते.बी.पी.,शुगर यांनीं शरीरात ठाण मांडले होते..माई त्यामानाने अजून आपली तब्येत राखून होत्या.

" ए,चला.आता गप्पा बास झाल्या.कुणाला भूक कशी आहे ते सांगा,म्हणजे काहीतरी करूया आणि विश्रांती घेऊया.."सीमा म्हणाली..

"वहिनी,मला अजिबात भूक नाही."

"मलासुद्धा भूक नाही."

"ऐक सीमा,जेवणं उशिरा झाल्यामुळे तशी कोणालाच विशेष भूक नाहिये. चहाची तल्लफ मात्र आलीय आता..फक्कड चहा होऊन जाऊदेत.".असं अशोकने म्हणताच जवळपास सर्वांनी त्याची री ओढली.

अपवाद होते आबा..त्यांना भूक लागली होती.आताशा त्यांना असंच व्हायचं..सारखं तासा दोन तासांनी खा खा व्हायची..आताही त्यांना तसंच झालं होतं.

म्हणावं वाटत होतं,"अरे बाबांनो,तुम्ही चहा बिहा प्या काय ते!,पण मला काहीतरी द्या खायला.."पण सगळ्यांच्या पुढे काही म्हणायची त्यांची हिंमत झाली नाही.

माईंनी आबांकडे पाहिले..त्यांना आबांची भूक माहिती होती..चहापाणी झाले की त्यांच्यापुरते एक थालीपीठ लावूया असं त्यांनी ठरवलं.

का कुणास ठाऊक पण कार्यालयातून आल्यापासून पायात गोळे आल्यासारखे झाले होते..जागेवरून उठावं असं वाटत नव्हतं.. जरा जळजळल्यासारखं होत होतं..

"मला चहा नको गं, सरबत हवंय." असं सांगून त्या थोडया आडव्या झाल्या.

सर्वांचं चहापाणी झाल्यावर सुनीता सरबत घेऊन आली..तिनं माईंना उठवलं..

"माई,दमलीस ना गं.. सरबत घे म्हणजे थोडं बरं वाटेल तुला."

माई थोड्या अनिच्छेनेच उठल्या.. सरबताचा ग्लास तोंडाला लावला आणि त्यांचं सगळं अंग थरथरू लागलं..काय होतंय कळेना..एकदम उलटी आल्यासारखं वाटायला लागलं.

"माई,अगं असं काय करतेस? सरबत नकोय का तुला?"

माईंना बोलताच येईना.त्या असहाय पणे मुलीकडे पाहू लागल्या.. अचानक त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला..

"महेश,दादा,अरे माई बघा कशी करतेय?" सुनीता घाबरून ओरडली तसं सगळ्यांचं लक्ष तिकडं गेलं.

आबा ताडकन उठून माईंजवळ आले. "वसू,अगं काय होतंय तुला?..आपण दवाखान्यात जाऊया..घाबरू नकोस." असं म्हणून माईंच्या डोक्यावरून हात फिरवू लागले..

अशोकने ताबडतोब डॉ.ना फोन लावला..त्यांना यायला सांगून तोही माईंजवळ आला..महेश म्हणाला,"काय झालं रे अचानक माईला?सकाळी किती खुशीत होती!"

तितक्यात माई आचके देऊ लागल्या..आणि अचानक शांत  झाल्या..

महेशने छाती चोळण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रतिसादच देईनात..

डॉक्टर आले..

त्यांनी सर्वांना बाजूला केलं..तपासलं..अशोकला बाजूला घेऊन सांगितले,"गेल्यात या."

अशोक कडे सर्वांची नजर लागली होती.त्याचे डबडबलेले डोळे जे सांगायचे ते सांगून गेले.

कोणाचाच विश्वास बसत नव्हता..सगळं अचानक घडलं होतं.. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं..

दिवसभर आंनदात असलेलं घर शोकात बुडून गेलं..

आबांना कसं सांगावं हा प्रश्न सर्वांना पडला..

मन खंबीर करून अशोकने आबांना ही बातमी सांगितली..

वीज कोसळली त्यांच्यावर..

जिच्या संगतीने आयुष्याची पन्नास वर्षे आनंदात घालवली ती आपली सहधर्मचारिणी अशी अचानक साथ सोडून कशी जाऊ शकते? कधी आजारी सुद्धा पडली नाही..मी असा बी.पी.,शुगरचा पेशन्ट.. माझी किती काळजी करायची..सर्वांची काळजी करायची..मला संसाराचं ओझं कधी वाटलंच नाही..आता मी काय करू?

"आबा,सावरा स्वतःला.."असं महेश म्हणाला खरं, पण तोही आतून तुटला होता..तोच काय घरातल्या प्रत्येकाची तीच गत झाली होती..कोणी कोणाला सावरायचं हाच प्रश्न होता..

वाऱ्याच्या वेगाने बातमी सगळीकडे पसरली..कोणाचाच विश्वास बसत नव्हता.. सकाळी समारंभाला येऊन गेलेले  लोक आता सांत्वन करायला येऊ लागले..

सगळेच दुःखात होते..अनिलराव आणि सुनीताचे पती विजयराव यांनी नातेवाईकांना कळवायला सुरुवात केली..

या सर्व घडामोडीत रात्र झाली..

दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले.. 

माईंच्या अचेतन देहाजवळ सगळे बसून होते..

आबांना खाली बसता येत नसल्यामुळे ते खुर्चीत बसले होते..

बसल्या बसल्या त्यांना आपला भूतकाळ आठवत होता..

माईंबरोबरचा सुखी संसार आठवत होता..

आणि त्याचबरोबर आठवत होतं माईंचं सुगरण असणं..

किती चव होती त्यांच्या हाताला..आबांची आवडनिवड त्यांना अचूक माहिती होती..त्यांचं खाण्याचं वेड..त्या अगदी प्रेमानं वेगवेगळे पदार्थ करून त्यांची आवड जपायच्या..

हे काय होतंय आपल्याला..

आता लक्ष पोटातल्या भुकेनं वेधून घेतलं.

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

आबा अस्वस्थ झाले.खुर्चीतून उठून येरझऱ्या घालू लागले..  काही सुचेना..

अशोकने आबांना त्यांच्या खोलीत नेले.

"आबा,तुम्ही थोडी विश्रांती घ्या.सकाळी पुन्हा दगदग होणार आहे.."

"अरे पण माई..."

"आबा,आम्ही आहोत सगळे तिथे..तुम्ही त्याचा विचार नका करू.."

उद्या अंत्यसंस्कार आहेत म्हटल्यावर हळुहळू सगळे पांगले..फक्त घरचे आणि शेजारचे काही लोक इतकेच राहीले..

इकडं आबांचं लक्ष कशातच लागेना..या कुशीवरून त्या कुशीवर असं कुशी बदलून देखील पहिली.

पोटाची आग काही स्वस्थ राहू देईना..एकीकडे भुकेमुळं होणारी जीवाची तगमग आणि दुसरीकडे दुःखापेक्षा भुकेची जाणीव प्रबळ झाल्या मुळे वाटत असलेली शरम या दुहेरी कात्रीत ते सापडले होते.

त्यांना स्वतःचा संताप येत होता..पण दुसऱ्याच क्षणी मन भुकेकडं वळत होतं.

ते पलंगावरून खाली आले,पुन्हा फेऱ्या मारू लागले.. माईंच्या सहवासातले क्षण आठवू लागले,पण ...

भुकेने जीव कासावीस व्हायला लागला..

त्यांनी बाहेरच्या खोलीत डोकावून पाहिलं..

त्यांची मुलं आपल्या आईच्या देहाजवळ बसून तिच्या आठवणी काढत होती..सुना मूक रुदन करत होत्या..जावई शांतपणे बसून होते..

आबांनी मनाशी काहीतरी योजले आणि ते त्याच पावली माघारी वळून आत गेले..

अनिलरावना तहान लागली म्हणून ते स्वयंपाकघरात आले आणि तिथलं दृश्य पाहून ते तिथेच थबकले..

खाली बसता न येणारे आबा खाली फरशीवर बसले होते..आणि काहीतरी खात होते..पाठमोरे असल्यामुळे नक्की काय खात होते ते समजत नव्हते..

अनिलराव तसेच बाहेर आले आणि त्यांनी विजयरावांना हळूच खुणावून बोलावले.

महेशच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही..विजयराव हळूच उठून अनिलरावांबरोबर आत गेले..त्यांनी  आबांना पाहिले.

दोघेही मधल्या खोलीत येऊन बोलू लागले..हे दोघे कशाला आत गेले हे पाहण्यासाठी महेश त्यांच्या पाठोपाठ आत गेला.

तो स्वयंपाकघरात गेला.आबांना तसे पाहून तो थेट त्यांच्यसमोर जाऊन उभा राहिला..पाहतो तर काय?

आबांनी एका वाटीत पाणी घेतलेले आणि बसून ते त्या वाटीतल्या पाण्यात बुडवून मारी बिस्किटं खात होते.

महेश त्यांच्यसमोर मटकन बसला..त्यानं आबांचा हात धरून त्यांना अडवले.

"आबा,अहो काय करताय?.."

आबांनी माहेशकडे पाहिलं आणि त्यांच्या हातातलं बिस्कीट गळून पडलं.ते जागच्याजागी गदगदू लागले.

हात जोडून ते म्हणाले,"पोरा,माफ कर मला...मी नालायक आहे..तुमची आई मेलीय आणि मला हे हे असलं खायचं सुचतय.. शरम वाटतेय माझी मलाच..कळतंय रे मला माझं चुकतंय.."

"आबा अहो..."

"माहितीय मला,तुला काय म्हणायचय ते!हेच म्हणणार आहेस ना,वेळकाळ काही आहे की नाही?

मला कळतंय,माझी सुखदुःखाची सोबती मला एकटं टाकून कधीही परत न येणाऱ्या दूरच्या प्रवासाला निघून गेलीय..अशा वेळी मी हे असं वागून तुमचा संताप ओढवून घेतोय..मला माफ करा रे.

म्हातारपण फार वाईट असतं बाळांनो..मी हे मुद्दाम नाही करत..पण काय करू?ही भूक मोठी वाईट गोष्ट आहे..नाही सहन करू शकलो मी..देहधर्म नाही सोडता आला मला..मी अपराधी आहे वसुचा,तुमचा..."

असं म्हणून आबा ओंजळीत चेहरा लपवून ढसाढसा रडू लागले..

महेशलाही रडू आवरेना...

खरंच आपल्या कुणाच्याही लक्षात कसं आलं नाही की,आबा संध्याकाळपासून उपाशी आहेत..आणि शुगरमुळे ते जास्त वेळ उपाशीही राहू शकत नाहीत..

"आबा,आम्हाला माफ करा..आमच्या लक्षात यायला हवे होते, पण ..असो..उठा बरं तुम्ही.."

त्यानं आबांना हात देऊन उठवलं..खुर्चीत बसवलं..चहाचं आधण ठेवलं..

"अरे काय करतोस हे? बाहेर..

त्यांना थांबवत महेश म्हणाला,"आबा,असुदे..कुणी काही म्हणणार नाही..चला.तुम्ही चहा आणि ही बिस्किटं घ्या.."

आबांनी त्याला हात जोडले..त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा अखंड सुरू होत्या.. महेश आपल्या हाताने त्यांना बिस्कीट भरवत होता  आणि भरवता भरवता तो ही रडत होता...


© सौ.सुतेजा फडके

वाशीम


सदर कथा लेखिका सुतेजा फडके यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क  त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने