शो मस्ट गो ऑन

 शो मस्ट गो ऑन....

© नेहा बोरकर देशपांडे



'डोळे उघडले , तरी उघडल्यासारखे वाटत का नाहीयेत? सगळीकडे काळोख का वाटतोय? एकप्रकारचा कसलातरी वास येतोय.... किती वाजलेत? परी कुठे आहे? 'अमेय..... अमेय.... आवाज क्षीण येतोय का?  कोणीच जवळ नाहीये का? 

अगं मधुरा, जाग आली का तूला? थांब हं,मी डॉक्टरांना बोलावते.... आई, तू कधी आलीस?

 थांब हो, सगळं सांगते, डॉक्टर आलेत, ते तपासतील हं, अगं, पण अचानक डॉक्टर घरी कसे येतील? 

'मधुरा, शांत हो बाळा, तू हॉस्पिटलमध्ये आहेस.....

ओहहहहह........

डॉक्टर तपासतं असतानाच अमेयचा आवाज आला....
अमेय व डॉक्टर बोलू लागले पण हळूहळू तो आवाज विरत गेला... बहुतेक थोडे लांब गेले असावेत.... माझ्या बद्दलच  बोलत होते.....  ते लांब गेल्यावर आई जवळ येऊन बसली. 

मधुरा, आता कसं वाटतंय गं, अगं दोन दिवस  तुला शुद्ध नव्हती .काल शुद्धीवर आलीस,..पण काही बोलाण्याच्या परिस्थितीत नव्हतीस हो..... आज तुझा आवाज ऐकून किती बरं वाटतंय..... 

परी घरी आहे.

अगं, येईल नंतर..... रामाची कृपा हो.... 
 
चार दिवसांपूर्वीची घटना मला डोळ्यासमोर दिसू लागली.....  मी आणि परी संध्याकाळी गाडीवरून घरी येत होतो....नेहमीसारखीच खूप गर्दी ,ट्रॅफिक....सगळं सवयीचं असलं तरी त्या दिवशी आपल्याला नेहमीसारखा विश्वास नव्हता, असं आज वाटतंय. 

परी काहीतरी सांगत होती.... गाडीला वेग फार नव्हताच... तेवढ्यात शेजारून एक बाईकवाला अतिशय वेगात अगदी जवळून पुढे निघून गेला...आणि काही कळायच्या आतच आपला  तोल गेला आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला आपली गाडी झुकून आपण रस्त्यावर फेकलो गेल्याचं आठवतंय....डोक्यावर जोरात फटका बसल्याचेही आठवतंय....

पण पुढे काय झालं? परीला काही झालं नाही ना? 'अरे देवा ,..... आपल्याला उठता का येत नाहीये? इतका अशक्तपणा .....छे....काही म्हणता काही कळत नाहीये.... हा काळोख का संपत नाहीये? मेंदूला तर मार लागला नसेल ना! डोळ्यासमोर  अंधार आहे म्हणजे ....

आपले डोळे गेले का? छे..छे... असं कसं होईल? दिवसभरात किती अपघात होतात... त्यांच का कुठे असं होतं.... नाही नाही.... तात्पुरती अंधारी असेल .... किती प्रकारची औषध, उपचार उपलब्ध आहेत.... मी उगीच काहीतरी विचार करतेय.....


पण अमेय आणि डॉक्टर काय बोलत होते? 
कोण होता बाईकवाला ...

त्याच्यामुळेच आपण आज या परिस्थितीत आहोत....

काय घडलंय ते सांगायला कोणीच का येत नाहीये? 

अमेयययय..... जोरात हाक मारली...

'आलो ,आलो....अगं... आता तुला सोडून कुठे जात नाही हं..... डोक्यावरून प्रेमळ हात फिरवत अमेय म्हणाला....

 'मला खरं खरं सांग ना.... काय झालंय नेमकं.....

 हो ...हो सांगतो गं मधु.... तुझा आणि परीचा अपघात झाला ते आठवतंय का?

'अरे,हो.... परी... परीला काही झालं नाही ना?'

 'अगं,  हळूहळू शांत हो बघू आधी.... 

परी एकदम व्यवस्थित आहे....

तिला काहीही झालं नाहीये... तिनेच मला तुझ्या पर्समधून मोबाईल  घेऊन मला फोन केला....

सुदैवाने मी त्या दिवशी घरी यायलाच निघालो होतो, फोनवर तिने तुमच्या अपघाताबद्दल सांगितले ....

 मला काही कळेचना..... तरी तिला सावरत म्हटलं ,येतोच हं बाळा,

 'म्हटलं खरं तिला.... पण तिथे कसा पोचलो ते माझं मलाच आठवत नाहीये..... मी पोहचलो....तोपर्यंत आजूबाजूच्या लोकांनी अॅब्यूलन्स बोलावली होती....तु बेशुद्धच होती....मला बघताच परी रडायला लागली... तोपर्यंत धीर धरून होती गं शहाणी.....

'हो, ना रे,...  मला बघायचं आहे तिला.... घेऊन का आला नाहीस?... कधी येईल आता?

तेवढ्यात तिच्या हातांवर उष्ण कढत थेंब पडले.... अश्रुंचेच... आणि अमेयचा अस्फुट हुंदका ऐकू आला..... 

तो अस्फुट हुंदका आणि ती पाच मिनीटांची जीवघेणी शांतता मला सर्व काही सांगून गेली......

 मला आलेली शंका खरी होती.....

 झालेल्या अपघातात अंधार माझा नवा सोबती असणार होता........ 

एक वर्षापुर्वीचा हा दिवस मला अगदीच काल घडल्यासारखा आठवत होता.... 
आणि आज परीने तो साजरा करायला स्वतः घरी केक केलाय..... 
खरंच साजरा.... 
कसा ते सांगते ना......
पुढच्या दोन दिवसांत मी घरी आले.... 
पंधरा वीस दिवस घरात सारखी माणसं..... 
काळजी घेणारे, सहानभुती दाखवणारे, जवळचे,लांबचे, तेवढ्यात मानभावीपणा करणारे अगदी सगळ्यांचे स्वभाव जवळून पाहता आले. 

थोडे दिवसांत सगळे पांगले ....

मग मी, परी,अमेय उरलो....

 आता कसोटीच वेळ येऊन ठेपली...

ऑफिसमध्ये जायला उशीर होणं, परीचा अभ्यास, स्वयंपाक, बाई लावली होती...तरी पण सगळ्या गोष्टी सांभाळणं कठीण होत होतं.... मी घरात असून कशातच नसायचे. सुदैवाने माझी दृष्टी सोडून मी तंदुरुस्तच होते.... आता अशक्तपणाही कमी झाला होता. त्यामुळे माझी घरात काय आणि कशी मदत होईल याचाच मी विचार करायचे.... 

आतापर्यंत नेहमी इतरांच्या उपयोगी पडल्यामुळे म्हणा किंवा माहिती नाही, पण शेजारच्या काकूंची सुन जी अंधशाळेत शिक्षिका होती ती स्वतःहून माझ्या मदतीला धावून आली.

 घरातला वावर आत्मविश्वासाने करण्या इतपत तीने मला शिकवण्याची जबाबदारी घेतली.

अमेय तरी एक मुलगी मदतनीस म्हणून ठेवली होती. 

परी शाळेतून दुपारी यायची. पण तीचं बालपण हरवल्यासारखं झालं होतं..

"आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावयाचे आई", अशीच तिची अवस्था झाली होती आणि ती निभावतपण होती. 

अमेयपण सगळं स्वतः करायला लागला होता.... माझ्यावाचून सगळं घर चार-पाच महिन्यांत पूर्वीसारखं चालू लागलं, हे मला सुखावणारं होतंच, पण दुखावणारही.... 

मी हळूहळू ब-याच गोष्टी शिकतही होते... पण तरीसुद्धा हातातून काहीतरी निसटून जातंय... असं वाटतं होतं... वरवर दाखवत नसले तरी आतून मी तुटत चालले होते...

एक दिवस अमेय दुपारीच ऑफिसमधून घरी आला, बॅंकेचं काम आहे म्हणाला, त्यासाठीची कागदपत्रे त्याला मिळत नव्हती. 

त्याची खूप शोधाशोध चालू होती. 

अपघातापूर्वीचे दिवस आठवले... महत्त्वाचा काहीही असंल तर अमेय, परी मला सांगूनच ठेवायचे... 

अमूक अमूक इथे ठेवलं आहे... परत त्यांनी कधीही मागितले तर मी सांगायचे....

 ते आठवलं आणि भरून आलं... मी काहीशी अपराधीपणाने ऊभी होते... 

काहीतरी बोलायचं म्हणून बोलले, 'कधी ,कुठे ती कागदपत्रं ठेवली आहेत ते आठवतंय का?'

'अगं ,ते आठवलं असतं तर शोधाशोध केली असता का? तुझं काय आहे मध्येच? बस एका ठिकाणी..... 

चिडून तो म्हणाला... गेल्या चार पाच महिन्यांत त्याने लक्षपूर्वक सांभाळलेला संयम सुटला...

 मी गप्प..तो गप्प.. 

दहाच मिनिटांनी जवळ येऊन तो म्हणाला ,सॉरी गं राणी, खरंच.... पण खूप महत्त्वाची आहेत कागदपत्रे आणि आजच ती बॅंकेत जमा करायची आहेत.... 

तुमचा अपघात व्हायच्या आदल्या दिवशी  ती घरी आणली होती, त्यानंतरच्या गडबडीत माझ्याकडून ते काम राहून गेलं गं... आज ते काम करायचेच आहे...

'अरे, अमू,ती कागदपत्रं का? आधी का नाही सांगितले, त्याच्या आदल्या दिवशी तू ऑफिसमधून आलास आणि ती कागदपत्रं टिव्ही युनिटच्या खालच्या खणात ठेवलीस...

 बेडरूममध्ये आणलीच नव्हतीस...तिथे बघं..  मला अचानक ते आठवलं... 

तोपर्यंत अमेय तिथे जाऊन कागदपत्रं घेऊनसुद्धा आला....

 आणि मला कवेत घेऊन म्हणाला... 'तुझ्या शिवाय मी अधुराच आहे गं मधुराणी....', 'तुसी छा गये डार्लिंग.'..... आता हे काम नसतं ना तर'.....

' पुरे ,पुरे...जा आता काम कर, माझा आनंद गगनात मावेनासा झाला.... 

आनंदाश्रूंचा पाऊस सुरू झाला..... बॅंकेत जाणं गरजेचं असल्याने अमेय नेहमीसारखं कानात गोड कुजबुज करून बाहेर पडला... 

कित्येक दिवसांनी काय महिन्यांनी मी पहिल्यांदाच इतकी आनंदी झाले होते.... 

आता पुर्वीसारखंच सगळं सुरू झालं...  

सगळं सतत मला सांगून ठेवणं.... 

देवाने दृष्टी काढून घेतली.... तरी आधीची स्मरणशक्ती अजूनच तल्लख केलीये याचा प्रत्यय त्या प्रसंगानंतर वारंवार येऊ लागला....
 
परी तर माझी परीक्षा घ्यायची...'आई, या या गोष्टी इथे इथे ठेवल्या आहेत.... तर आता तू सांग..मी कुठे काय ठेवलं आहे? 

आज पण केकची रेसिपी आठवून परीला सांगितली ...तिने केक केलाय.... 

आम्ही तिघे परत एकत्र आलोय.... म्हणजे होतोच... तरी नव्याने... 

मधला चार सहा महिन्यांचा काळ हिमतीने लढलो, 
लढतोय .... अजूनही पण समाधानाने.... 

म्हणतातचं ना... #शो_मस्ट_गो_ऑन.


©® नेहा बोरकर देशपांडे. 

सदर कथा लेखिका नेहा बोरकर देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने