गर्लफ्रेंड

 गर्लफ्रेंड 

© धनश्री दाबके 


यंदाचा प्रेमदिवस रविवारी आल्याने तो फार आनंदात होता. कारण रविवारी तो आणि त्याची गर्लफ्रेंड दिवसभर एकत्र असणार होते. रविवारच असल्याने त्याला ऑफिसचे टेंशन नव्हते. पण तिने मात्र त्याच्यासोबत वेळ मिळावा म्हणून बरेच पापड बेलले होते. संक्रातीचे हळदीकुंकू शनिवारी ठेवण्यासाठी तिच्या सासूबाईंना मनवले होते. मुलं आता मोठी होती तशी पण तरीही आई बाहेर जाणार म्हंटल्यावर त्यांना लहानपणाचा ॲटॅक आल्याशिवाय राहायचा नाहीच. त्यामुळे ह्याला 'हे' आणि त्याला 'ते' असे त्यांच्या आवडीचे पदार्थ ती सकाळीच करुन ठेवणार होती. घरातलं सगळं सगळ्यांच्या मनाजोगतं केल्यावरच तिला बाहेर पडता येणार होतं. तरी एक बरं होतं रविवारी नवरोबालाही दिवसभर बाहेर जायचं होतं. त्यामुळे त्या फ्रंटवर काही टेंशन नव्हतं.

तो चातकासारखी रविवारची वाट बघत होता. पण शिद्दतसे काही चाहल्यावर मदतीला येणारी कायनात फक्त शहारुखकडेच येत असावी कारण कोरोनामुळे दोन वेळा पुढे ढकलेलेले त्याच्या ब्रॅंचचे ऑडिट नेमके ह्याच आठवड्यात फायनल झाले. आधीच महत्त्वाचे ऑडिट  आणि त्यात हा ब्रॅंचचा हेड त्यामुळे त्याचे शनिवार, रविवार दोन्हीही दिवस ऑफिसला जाणे निश्चित झाले. तिच्याबरोबरचा खास दिवस मग अर्ध्यावर आला. तीही त्यामुळे हिरमुसली. पण त्याचा नाईलाज होता. 

त्याने टीमला बोलावून घेतले. ऑडीटच्या आधी पूर्ण करायच्या कामांची यादी केली. रविवारी सगळ्यांनाच लवकर निघायचं होतं त्यामुळे त्या सगळ्यांनीच शनिवारी जास्त वेळ थांबून रविवारी लवकर सटकायच्या त्याच्या प्रपोझलला खुशीने मान्यता दिली. त्यात अपवाद होता फक्त ब्रॅंचच्या सिनिअर अकाउंटट मॅडमचा. मॅडमचा मुळातच प्रेमाबिमावर फारसा विश्वास नव्हता आणि हे व्हॅलेन्टाइन वगैरे तर त्यांना अजिबात झेपत नव्हते. त्यामुळे मॅडमला रविवारी दिवसभर थांबायलाही काहीच इश्यु नव्हता. 

ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी शनिवारी माना मोडून काम केले. रविवार असूनही सगळे सकाळी वेळेवर हजर झाले. हा तर वेळेच्या जरा आधीच पोचला. लंच अवर पर्यंत त्याने भराभर कामं उरकली. आता फक्त निघता निघता काही अर्जंट काम यायला नको आणि मॅडमच्या सेक्शनचं  तर अजिबात नको असा विचार करुन तो निघायची तयारी करायला लागला. 

तितक्यात मॅडमने " सर आत येऊ का? थोडं काम आहे"  म्हणत त्याने केबीनचे दार ठोठवले.

अरे..ह्या तर खरच आल्या की.... आपण जसा विचार करतो तसचं घडतं हे ऐकलं होतं. पण त्याची प्रचीती आजच यावी आणि तीही आत्त्ताच??? मनातल्या मनात तो चरफडला. पण चेहेऱ्यावर स्माइल आणून येस कम इन म्हणाला. 

मॅडम आल्या त्या एक मोठ्ठासा इश्यू घेऊनच. मग त्यावर  डिस्कशन सुरु झाले. तो वारंवार घड्याळ्यात बघत होता. ते  पाहून मॅडम हसून म्हणाल्याच " काय सर? तुम्हालाही जायचंय वाटतं डेटवर. नाही अगदी तरुणांनाही लाजवेल इतक्या उत्साहात दिसताय. आज छानपैकी तयारही होऊन आला आहात." आता यांना कसं सांगणार आणि काय सांगणार म्हणून तो नाही नाही असं काही नाही म्हणत बोलत राहिला. बराच वेळ लागतोय पाहिल्यानंतर  त्याने तिला मेसेज केला. ' एक डिस्कशन सुरु आहे. जरा वेळ लागतोय निघायला. समोर कोण आहे हे कळलच असेल तुला :) '

ती त्याच्या मेसेजची वाटच बघत होती. तिने लगेच रिप्लाय दिला. ' मॅडम असतील ना? सांग त्यांना अकाउंट्स सोडून  जगात इतरही कामाच्या गोष्टी असतात म्हणून. बाय द वे आजच्या दिवशी उशीर केला तर तो संत व्हॅलेन्टाइन रागावतो बर का. आणि हो अजून एक. बायको वाट बघत थांबते पण गर्लफ्रेंड थांबत नाही हा.  तेव्हा लगेच नीघ.'

त्याने कसेबसे ते डिस्कशन आटोपले आणि शेवटी एकदाचा निघाला. तिचा रिप्लाय पाहून मंद हसत तिला 'निघालो ग finally. नेहमीच्या स्पॉटला भेट'  असा मेसेज करुन त्याने गाडी सुरु केली. गाडी चालवता चालवता तो त्यांच्या प्रेमाच्या आठवणीत बुडाला. 

आज त्या दोघांचे थोडे थोडके नाहीतर एकवीसाव्या  व्हॅलेन्टाइन डेचे सेलिब्रेशन होते. साधारण एकवीस वर्षांपूर्वी ती त्याच्या आयुष्यात हातात चहाचा ट्रे घेऊन आली आणि तिला बघताचं मला इतक्यात लग्न नाही करायचे असं म्हणणाऱ्या त्याने पटकन होकार दिला. तिलाही तो भावला आणि महिन्याभरात साखरपुडाही झाला. ख्रिसमसला साखरपुडा आणि होळीच्या आसपासचा लग्नाचा मुहूर्त. मधल्या  दोन तीन महिन्यांच्या काळात लग्नाच्या खरेदीच्या आणि इतर तयारी निमित्तच्या भेटी, थोडे फिरणे आणि एक १४ फेब्रुवारी. दोघही अभ्यासू, नाकासमोर चालणारे म्हणजे हल्लीच्या काळानुसार अगदी बोअर कॉलेज लाईफ जगलेले असल्याने दोघांचाही तो पहिलाच व्हॅलेन्टाइन डे होता. जो नक्की कसा साजरा करायचा याचा संभ्रम मनात गोंधळ घालत होता. 

मग मित्रमैत्रिणींच्या सल्ल्यानुसार भेटींची खरेदी झाली आणि दोघांनीही ऑफिसमधुन हाफ डे घेतला. त्याने एका साध्याच पण चौपाटी जवळ असणाऱ्या रेस्टॉरंट मधे तिला बोलवले. आज तो सातव्या आकाशात होता. बरोबर सुंदर, सोज्वळ होणारी बायको आणि हा प्रेमदिवस जो त्याला अगदी खास करायचा होता. आणि तिला मात्र भयंकर टेंशन आले होते. तसे गेल्या दीड दोन महिन्यांपासून दोघांचे फोनवर बोलणे, फिरणे सुरु होते पण तरीही नाते अगदीच नवीन होते. एकमेकांच्या आवडीनिवडींची, सवयींची चाचपणी सुरु होती. नवीन नात्यातली हुरहूर आणि सगळं ठीक होईल ना ह्याची काळजी तिच्या मनात पिंगा घालत होती आणि त्यात हा प्रेमदिवस. जो तेव्हा आजच्या सारखा कॉमन नव्हता. फक्त मूव्हीज मधेच असायचा. त्यामुळे आज उशीरा .. म्हणजे ८ वाजेपर्यंत.. घरी यायची परवानगी मागतांनाचा आईचा चेहराही तिच्या मनात मधे मधे डोकावत होता. 

ह्या सगळ्या विचारांत ती त्याने सांगितलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोचली. तो वेळे आधीच आलेला होता. मग दोघांनी एकेमेकांना विश करत भेटी दिल्या. त्याची रसिकता आणि पारखी नजर तिला त्याने अगदी काळजीपूर्वक निवडलेल्या गिफ्ट मधून तिला जाणवली. हार्ट शेपच्या बॉक्समधली हार्ट शेपची तिला आवडणारी चॉकलेट्स व एक छान अर्थपूर्ण प्रेमसंदेश असलेले कार्ड. त्या प्रेमसंदेशात व्यक्त केलेल्या भावना त्याच्या डोळ्यातही तिला दिसल्या आणि ती अजुनच सुखावली. तिचे सगळे टेंशन क्षणात गायब झाले. मनातले आधीचे काय आणि कसं हे सगळे विचार पळून गेले आणि उरले फक्त दोघांमधले प्रेम. पुढचे मागचे सगळे विचार बाजूला सारुन दोघही त्या क्षणांमधे रमले.  तो तिला जवळच्याच चौपाटीवर घेऊन गेला. समुद्रकाठची नेहमीचीच हवा आज जरा जास्तच धुंद वाटत होती. त्याच्या बरोबर तिथल्या वाळूत चालतांना तिला सगळं अजुनच गुलाबी गुलाबी वाटतं होतं. वाळूत बसून दोघांनी समुद्रात बुडणारा सूर्य पाहिला. आजचा हा सुर्यास्त जरा जास्तच सुंदर भासला त्यांना. त्याने हळूच तिच्या कमरे भोवती हात टाकला. तिनेही लाजत  त्याच्या खाद्यावर मान टेकवली. आणि तो त्याच्या आवडीचे  गाणे म्हणू लागला.

शुक्रतारा... मंदवारा.. 

चांदणे पाण्यातूनी.... 

आज त्याचा आवाज तिला मूळ गायकापेक्षाही भावला. आणि तिच्याही ओठी... 

मी कशी शब्दात सांगू... हे शब्द नकळत अवतरले. 

आजची त्याच्याबरोबरची ही भेट कन्फर्म करायच्या आधीच तिने किती वाजता घरी पोचायचय हे सांगितले असल्याने शुक्रतारा आणि त्याचे चांदणे हे पाण्यात नसून फक्त गाण्यात होते. पण दोघांच्या मनात मात्र त्या चांदण्याचा मंद प्रकाश पसरला होता. आजची ही संध्याकाळ दोघांसाठी एक  खास आठवण बनली होती. 

पुढे लग्न झाले. मुलं झाली. आयुष्यातल्या जबाबदाऱ्या, चढउतार सगळे निभावतांना त्यांचे नाते अजुन अजुन बहरत गेले. घट्ट होत गेले. पण हा खास दिवस मात्र दोघांनी इतर सगळ्या प्रायोरीटीज बाजूला ठेवत प्रत्येक वर्षी साजरा केला. अगदी ह्याच पद्धतीने. ऑफिसमधून हाफ डे आणि मग चौपाटी. बदल झाला असेल तर तो इतकाच की आता प्रेम व्यक्त करतांना गिफ्ट्स ची गरज उरली नव्हती. हा फक्त दोघांचा असा हक्काचा अर्धा दिवस. हेच गिफ्ट सगळ्यात महत्त्वाचे होते. ती त्याला म्हणायची वर्षातल्या ह्या अर्ध्या दिवसासाठी मी पत्नी, सून, आई ही सगळी नाती बाजूला ठेवून मी फक्त तुझी गर्लफ्रेंड असते.

इतर वेळी ही आपली बायको आपल्यासाठी कितीही वाट बघत थांबेल पण आज ती फक्त गर्लफ्रेंड आहे ना तेव्हा मलाच आधी पोचले पाहिजे. ह्या विचारात त्याने गाडी हाकली आणि तिच्या आधी पोचला. थोड्याच वेळात ती आली आणि त्याच्याकडे पाहून गोड हसली. आजही  त्याला तेच चांदणे तिच्या डोळ्यात दिसले आणि त्यांचा आजचा २१ वा व्हॅलेन्टाइन डे खास करुन गेले.

©® धनश्री दाबके

फोटो : साभार गूगल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने