©® सौ. प्रभा कृष्णा निपाणे.
अंजली उद्या सकाळी बरोबर दहा वाजता मला बाहेर जायचे आहे. जरा लवकर उठ . अंजली म्हणाली, आई लवकर म्हणजे किती वाजता? रोज मी सहाला उठते.
बरं ! बर !
जास्त बोलू नको.
फार तोंड चालते तुझे !
नुसते उलट उत्तर देत असते. त्यापेक्षा जरा कामाकडे आणि घराकडे लक्ष दे.
उद्या माझा महिला दिनानिमित्त सत्कार आहे. मी महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी जे समाजकार्य करते त्यासाठी उद्या मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे.
तिथून मग पुन्हा एक कार्यक्रम नंतर हा सत्कार सोहळा.
रात्रीचे सगळे आवरून विचारातच अंजली झोपायला गेली. नवरा काहीतरी लिहित होता. अंकुश त्यांचा मुलगा झोपला होता.
अंजली नवऱ्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. नकळत तिची नजर तो लिहित असलेल्या कागदावर गेली. महिला सबलीकरण, सक्षमीकरण यावर नोट काढत होता. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने , तो सुद्धा या विषयावर त्याच्या ऑफिस मध्ये व्याख्यान देणार आहे असे समजले.
अंजली मनात म्हणाली,घरात असलेल्या स्त्रीचा सन्मान करण दोघा मायलेकांना कधी जमलेच नाही आणि हेच लोक बाहेर महिला दिनानिमित्त भाषण करणार. त्यांचा सत्कार होणार, किती विरोधाभास?
सासरे होते, ते नेहमी अंजलीच्या बाजूने बोलायचे. एकदा तर ते अंजलीला म्हणाले, बेटा तू सहन करते म्हणून या लोकांचे फावते. वेळीच यांना प्रतिउत्तर द्यायला शिक. नाहीतर कायम तुला गृहीत धरून तुझा पाणउतारा करत राहणार. आता मी आहे, प्रत्येक वेळी तुझी बाजू घेऊन ठामपणे तुझ्या पाठीशी उभा असतो.
पण किती दिवस तू असा माझा आधार घेत राहणार.?
उद्या माझे काही बरे वाईट झाले तर ???
अंजलीने सासऱ्यांच्या तोंडावर हात ठेवला. म्हणाली बाबा ! पुन्हा असे काही बोलू नका. काही होणार नाही तुम्हाला!
या गोष्टीला दोनेक वर्ष झाले असतील. एक दिवस सासरे गोविंदराव बाथरूम मध्ये पाय घासरून पडले.
डोक्याच्या मागच्या बाजूला जबरदस्त नळ लागला. मोठी खोक पडली. धपकन आवाज आला तशीच अंजली धावत गेली. दाराला आतून कडी होती.
दोघे मायलेक घरात नव्हते. तिने शेजारचे गणू काका, तिच्या सासऱ्याचे मित्र, यांना धावत जाऊन सांगितले. ते अजुन दोन माणसे सोबतीला घेऊन आले.
तोवर अंजलीने नवऱ्याला व सासूबाईंना फोन करून सगळी माहिती दिली. दोघेही ताबडतोब घरी आले. तोवर दार तोडून गोविंदराव यांना बाहेर काढले होते. त्यांच्या मेदुला जबरदस्त आघात झाला होता. ते बाथरूम मध्येच मृत झाले. अंजली धाय मोकलून रडू लागली. तिचा एकमेव आधार आज गेला होता.
अंजलीचे बाबा खूप गरीब होते. तिच्या सासूबाईंच्या भावानेच अंजलीने स्थळ सुचवले . त्याने आधीच सांगितले होते. मुलगी गरीब घरची आहे, B.Com. झाली आहे, कामसू आहे. तुझी सासू आजारी आहे, ही पोरं सगळ घर सांभाळून आजीला सुद्धा सांभाळेल खात्री देतो.
जेव्हा अंजली लग्न होऊन सासरी आली तेव्हा तिची आजेसासू खूप आजारी होती. तिला नातसून बघता यावी म्हणून नातवाचे घाईत लग्न केले.
अंजली आजीची खूप सेवा करायची. आजी अंजलीवर खूप खूष होत्या. म्हणायच्या तू आलीस म्हणून माझी इतकी सोय होते. नाहीतर कशाचा कशाला पायपोस नव्हता. कोणते खूळ डोक्यात घेऊन बसली तुझी सासू कोणास ठाऊक. सारखी बाहेर असते. कसेबसे जेवण बनत होते या घरात.
तू आलीस , घराला घरपण आले. म्हणूनच माझे आयुष्य थोडे दिवसासाठी का होईना वाढले.
चार महिन्याने आजींनी या जगाचा निरोप घेतला.
पण तिच्या सासूबाई उलट अंजलीला अपशकुनी, पांढऱ्या पायाची म्हणायला लागल्या. म्हणाल्या तू आलीस आणि आजीला खाऊन टाकले. चांगल्या हिडत्या फिरत्या होत्या.
विचारातच तिला झोप लागली. सकाळी उठली ती नव्या जोष्यातच . भराभर सगळे आवरले. चहा , नाष्टा केला. अर्धे अधिक जेवण बनवून ठेवले. फक्त पोळ्या तेव्हढ्या बाकी ठेवल्या. छान तयार झाली.
सासूला म्हणाली आई. ! निघायचे का ? सासू आ वासून तिच्याकडे पाहतच राहिली.
भानावर येत म्हणाली, कुठे निघायचे ठरवले तू? कुठे चालली इतक्या सकाळी ? आणि घरातले काम काय तुझा बाप येऊन करणार का ?
ती हसून म्हणाली, आई माझा बाप कशाला येईल हो ! तो बिचारा गरीब माणूस, तुम्हाला तर या घरात आलेला पण चालत नाही ! येतो बिचारा कधीतरी लेकीची आठवण आली की !
पाहुणचार केलेला आठवत नाही पण अपमान मात्र भरपूर होतो.
पुन्हा तितक्याच भोळे पणाचा आव आणत म्हणाली, आईं ! अहो असे काय करता ? सहा वर्ष झाले माझ्या लग्नाला . या सहा वर्षात तुम्हाला किती तरी पुरस्कार मिळाले. पण मी कधी त्या कौतुक सोहळ्यात प्रत्यक्ष सामील झालेच नाही.
आज मी येणारच. सगळे काम आटोपले. तुमच्या लेकाचा डबा तयार आहे.
खरतर आई मला त्यांच्या पण ऑफिसला जायचे होते. ते सुध्दा आज महिला सबलीकरण, सक्षमीकरण यावर भाषण करणार आहे.
पण दोन्ही ची वेळ एकच आहे. त्यामुळे मी तुमचा प्रोग्राम अटेंड करते. त्यांच्या ऑफिस मधला कधीतरी नक्की करेन.
सासू जरा चिडून म्हणाली काय चालवले तू हे अंजली? म्हणजे मी नाही समजले आई !
का ?
काय झाले ?
हे बघ हे असे माझ्या सोबत कार्यक्रमाला आलेल मला अजिबात आवडत नाही. तुझ्या सासऱ्यांना सुध्दा मी कधी नेले नाही. आजचा तर विषयच खूप वेगळा आहे.
ती ठामपणे म्हणाली, आई म्हणूनच मला यायचे आहे. शक्य झाले तर मला सुद्धा महिला, त्यांच्यावर होणारे कौटुंबिक अत्याचार यावर बोलायला आवडेल.
म्हणजे !
म्हणजे असे आई !
लोक या विषयावर मोठी मोठी भाषणे देतात. त्यात सर्वच आले. राजकारणी , तुमच्या सारख्या समाजसेविका . भाषण खूप मस्त ठोकतात. पण जागतिक महिला दिन साजरा करतांना आपल्या घरातील बायको, मुलगी, सून, इतर स्त्री नाती, यांना मात्र शुभेच्छा सुध्दा देत नाही.
आमच्या शेजारी एक काका होते समाजसेवक , मग राजकारणात उतरले. महिला दिनाच्या दिवशी खूप प्रोग्राम असायचे त्यांचे. पण घरी येताच कोणत्या न कोणत्या कारणावरून खुसपट काढून काकुंशी भांडायचे. कित्येक वेळा हात सुध्दा उगारला.
खरच अशा लोकांना महिलांवर बोलायचा अधिकार आहे ?
काकु म्हणायच्या काही नाही ग अंजली, पैस्याने विकत घेतलेले हे पुरस्कार आहेत.
लोक पण बरे , लायकी नसलेल्या लोकांना पुरस्कार देतात. सत्कार करतात. फार मोठी नव्हती मी. पण काकुंचे दुःख समजण्या इतपत मोठी नक्कीच होते.
काकु म्हणायच्या, तुझे बाबा गरीब आहेत. पण किती सन्मान करतात आपल्या बायकोचा आणि तुझा सुध्दा.
सासरी आले, तुमची पण अशीच समाजसेवा आहे. तुमचे पण सत्कार होतात. एकदा हा सोहळा डोळे भरून पाहायचा आहे. सोबत स्त्रीची व्यथा सुध्दा सांगायची आहे.
चला आई !
उशिर होतो आपल्याला !
सासू समजून चुकली, पूर्वीची अंजली ही नाहीच. आपण वेळीच आपल्यात सुधारणा करायला पाहिजे. नाहीतर ही महामाया कुठेही स्टेजवर येऊन आपला पाणउतारा करायला कमी करणार नाही.
सासूला तिची चूक कळली, म्हणाल्या अंजली ! मला माफ कर बेटा !
खरच मी आणि माझ्या लेकाने तुझा कधीच सन्मान केला नाही!
खरच तू वेळीच डोळे उघडले.
अंगणातील बागेत गेल्या, एक गुलाबाचे फुल तोडून आणले. अंजलीच्या हाती देत म्हणाल्या, अंजली महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! आज पासून पाहिले घरच्या गृहिणींचा सन्मान त्या नंतर बाहेरचे भाषणं आणि सत्कार.
माझे डोळे उघडल्या बद्दल मनापासून आभार..
अंजलीने सासूला कडकडुन मिठी मारली. आज तिच्या तोंडून आई ! शब्द बाहेर पडला. पण आजची आई ही हाक तिच्या सासूबाईंना खूप आपलेपणाची ,मायेच्या ओलाव्याची वाटली...!!!
©® सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण.
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
