"एक शिवजयंती अशीही" !!

© पल्लवी घोडके-अष्टेकर.



शिवजयंती जवळ आली होती, मंडळाच्या सभासदांचा उत्साह वाढत होता. ढोल-ताशे, चौकाची सजावट सगळंच नेहमीप्रमाणे होणार होतं.

तशी शिवजयंती ही काय वर्षातून एकदा येणाऱ्या सणाप्रमाणे नाही, पण शक्यतो अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकाप्रमाणे 19 फेब्रुवारीला बरेच मंडळ शिवजयंती साजरी करतात.

यावर्षी शिवजयंतीचा उत्साह जरा जास्तच होता, देशमुख काकूंचा मुलगा मागच्याच वर्षी फॉरेनहुन उच्च शिक्षण घेऊन परतला होता. 

त्याच्या मिश्कील व हेल्पफुल स्वभावामुळे तो मंडळाच्या मुलांमध्ये लगेच लोकप्रिय झाला.

फॉरेन वरून आलेला उंचपुरा, रंगाने गोरा, पिळदार शरीरयष्टी, नियमित व्यायामाची सवय, उच्च पदावरील नोकरी,चांगले राहणीमान या सगळ्यांमुळे तो मुलींचाही जिव्हाळ्याचा विषय होता .

मागच्या वर्षी तो भारतात परतला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवजयंती होती. ढोल-ताशांच्या व डीजे च्या आवाजाने त्याची झोपमोड झाली. 

बंगल्याच्या बाल्कनीत येऊन त्याने बाहेर पाहिले, शिवजयंतीचा खाली चाललेला प्रकार पाहून त्याने काकांना, "हे नेमकं काय चाललंय बाबा?" म्हणून प्रश्न केला. तेव्हा, "अरे याला शिवजयंती म्हणतात, वेलकम टू इंडिया!" असे म्हणत काका मोठ्याने हसू लागले.

तेवढ्यात हातात चहाचा मग घेऊन काकू बाल्कनीत आल्या. "काय रे शिव? काय झालं?" त्यांनी विचारले.

 "अग आई, हा सगळा काय प्रकार आहे?" त्याने डोक्यावर आठ्या आणत काकूंना विचारले. 

आधुनिक शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आता अशाच पद्धतीने साजरा होतो ह्या नवभारतात."काकू. 

"असा?" त्याने प्रश्न विचारताच काकांनी मिश्कील हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाले, "मग तुझी काय अपेक्षा आहे? शिव जन्माच्या वेळी शिवनेरीवर साजरा झाला होता तसा शिवजन्मोत्सव साजरा व्हायला हवा का?

नवीन पिढी नवीन विचार.शिवने काकूंकडे पाहिले, "शिक्षिका होते तेव्हा खूप समजावलं सगळ्यांना पण आता रिटायर झाले आहे, कुठलीही गोष्ट बदलायची असल्यास आपल्याला त्या गोष्टीचा भाग व्हावा लागतो शिव.अलिप्त राहून नाही चालणार."

शिवने चमकून त्यांच्याकडे पाहिले, "म्हणजे?"

 "शिवजयंती साजरी करण्याची पद्धत चुकीची असेल, पण त्यांचे महाराजांवर खूप प्रेम आहे हे लक्षात घे!" - काकू.

त्या दिवशी नंतर शिवही मंडळाच्या मुलांमध्ये मिसळला व मंडळाचा भाग झाला. 

गेल्या चार-पाच दिवसांपासून शिवजयंती ची तयारी चालू होती. 

शिव अध्यक्ष होता पण तरीही तो नवीन असल्याने मंडळातील इतर अनुभवी मित्र त्याला मदत करीत होते.नियोजनाबद्दल सूचना देत होते. 

महाराजांची मिरवणूक काढण्यासाठी ट्रॅक्टर,गुलाल, दुचाकी गाड्या,डीजे अशी सगळी तयारी करण्यास सुचवत होते. 

शिव मात्र काही बोलत नव्हता.

खरं तर यावर्षी मंडळाच्या अध्यक्षपदाच्या चर्चेच्या वेळी शिवने अनपेक्षितपणे हात वर करून अध्यक्ष होण्याची इच्छा दर्शवली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं.

पण परदेशातून आलेल्या आपल्या मित्रालाही देशसेवा करण्याची संधी द्यावी अशी भावना मनात येऊन मंडळातील तरुणांनी त्याला अध्यक्ष बनवले होते. 

शिवजयंतीला दोन दिवस उरले असतांना शिवने एक मीटिंग घेतली. 

त्यात त्याने मंडळातील सर्व तरुणांना आवर्जून शेरवाणी व शक्य असल्यास धोतर नेसण्याची विनंती केली तर तरुणींना नववारी साडी नेसण्यास सांगितले. मुलीही मोठ्या उत्साहाने तयार झाल्या.

शिवजयंतीच्या दिवशी त्याने चक्क ६.३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक ठेवला होता. 

इतक्या सकाळी कसं शक्य आहे?म्हणून काही मंडळींनी शंका व्यक्त केली,पण मी स्वतः सगळी तयारी करेल असे शिवने आश्वासन दिले.

त्याप्रमाणे तो सकाळीच ६.०० वाजता मंडपात हजर झाला.तो चक्क धोतर व कुर्ता घालून आला होता.कपाळावर चंद्रकोर व डोक्यावर फेटा त्याला अजूनच शोभून दिसत होता. 

अगदी ६.३० ला शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक सुरू झाला. 

हळूहळू मंडळातील इतर सदस्यही तेथे जमले. 

आज सर्वांनाच नवीन काहीतरी पाहायला मिळाले. 

अभिषेक झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सर्वांच्या हातून पुष्पवर्षा झाली. "जय भवानी!जय शिवाजी!" च्या गजरात अख्खा आसमंत दुमदुमला. 

गुलाल, ट्रॅक्टर, व डीजे वगळून ढोल ताशांच्या तालावर लेझीम खेळल्या गेल्या‌. 

शिवरायांचा जन्म दिवस म्हणून शाहिरांना बोलावून त्यांच्या कडून पोवाडे गायले गेले. 

शिवरायांच्या बालपणीच्या कथा व तरुण वयातील पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. त्यानंतर कार्यक्रमाबद्दल लोकांचा अभिप्राय व नंतर अध्यक्षीय भाषण.

आज शिवने ठरवलेल्या कार्यक्रमात कोणीही मंत्री-संत्री नव्हते मंडळातील लोकांना ही गोष्ट खटकली त्यांनी त्याबद्दल शिवला समजावले होते. पण ….तो त्याच्या भूमिकेवर ठाम होता. 

कार्यक्रमात शिवने २-३ वृत्तपत्राच्या पत्रकारांना मात्र आवर्जून आमंत्रण दिले होते.

अध्यक्षीय भाषण सुरु झाले व शिव बोलू लागला. "सर्वप्रथम आज ह्या कार्यक्रमाला कोणीही मंत्री किंवा कुणाही राजकारणी व्यक्तीस मी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले नाही याबद्दल मला क्षमा करा. 

पण आज मला इथे कोणतेही जातीय राजकारण किंवा कुठलेही भडकाऊ भाषण देणारे लोक नको होते म्हणून मी हे टाळले."त्याच्या बोलण्याने सर्वांच्याच डोक्यावर आठ्या पडल्या. 

तो पुढे बोलू लागला,"…...कारण शिवराय हे कुठल्याही जातीचे पुरस्कर्ते नव्हते, त्यांनी तर प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांसाठी स्वराज्याची उभारणी केली होती. 
हो, अगदी आपल्या मुस्लिम बांधवांसाठीही. आपल्या राजाने आपल्यासाठी काय काय केले ते शब्दात सांगणं अगदी अशक्य आहे.
त्यांनी घेतलेले कष्ट, स्वराज्य स्थापन करण्यासाठी व ते राखण्यासाठी केलेली धडपड, कोणत्या शब्दात मांडू? जिवाच रान केलं आणि सगळं आयुष्य या मातीवर बहाल केलं माझ्या राजाने. हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आता प्रश्न हा आहे की आपण काय शिकलो आपल्या लाडक्या छत्रपतींकडून?

मिरवणुका काढणे, गुलाल उधळून व दुचाकी गाड्यांची रॅली काढून वायुप्रदूषण करणे? 

डीजेच्या गोंगाटात नाच करणे व प्रचंड मोठ्या आवाजाने ध्वनिप्रदूषण करून शिवजयंती साजरा करणे? अशा प्रकारे आपली जयंती साजरा व्हावी असं महाराजांना तरी आवडेल का? 

औरंगजेबाप्रमाणे स्वतःचा जन्मदिवस साजरा न करणाऱ्या महाराजांच्या जयंती निमित्त मात्र मोठ मोठाले फ्लेक्स लावून आपण आपल्याच नावाचा उदो उदो करतो. 

कुणाची मिरवणूक किती मोठी व कशी या फालतू गोष्टीत वेळ व पैसा खर्च करतो. यापेक्षा पोवाडे व शिव पराक्रमाचे धडे अशा कार्यक्रमातून नवीन पिढीला दिले तर शिवराय अजून १००० वर्ष अमर राहतील. 

त्यांनी केलेले कार्य,त्यांचे संस्कार आपल्या नसानसात रुजतील. छातीवर व दंडावर शिवाजी गोंदून तो मनात कसा उतरेल? त्याचं चरित्र आपल्या मनात व बुद्धीत उतरवायचे असतील तर मिरवणुकीचे नव्हे तर त्यांनी केलेल्या कार्याचे अनुकरण करायला हवे. 

माझ्या बुद्धीला जे पटले व योग्य वाटले ते नुसते बोलून न दाखवता करून दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय. 

आज आपल्या राजाला साक्षी मानून आपण शपथ घेऊया की, बालपणापासून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शिवबाला आपण रूदयात बसुया. 

किशोर वयातच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध करणाऱ्या,बलात्काराचे हात-पाय तोडून शिक्षा करणाऱ्या, परस्त्रीवर मग ती कुठल्याही जाती धर्म व पंथाची असो वाकडी नजर टाकणाऱ्यास कडक शिक्षा करणाऱ्या माझ्या राजाचे अनुकरण करूया. 

प्रत्येक स्त्रीच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप न करता तिचे संरक्षण करण्याची शपथ घेऊ या. शरण आलेल्या अबला स्त्रीवर आपला अधिकार न गाजवता तिला मातेचा दर्जा देणार्‍या राजाला वंदन करून त्याने दाखवलेल्या मार्गावर कुठलाही भेदभाव मनात न ठेवता चालण्याचा प्रयत्न आपण केला तर ह्यावरून मोठे ते काय?

प्रत्येक मनात शिवराय बसले तर, माझा देश कधीही कुणापुढेही झुकणार नाही.प्रत्येक क्षेत्रात तो अव्वल असेल अशी मला खात्री आहे. जय भवानी!जय शिवाजी!" म्हणून तो शांत झाला व टाळ्यांचा एकच गडगडाट झाला.

अशा प्रकारे शिवजयंती साजरी व्हावी असे प्रत्येकाला एकदा तरी वाटलेलं असतं पण ते प्रत्यक्षात उतरवण्याची धमक मात्र प्रत्येकात नसते.

मिरवणूक व फ्लेक्स न लावता वाचलेल्या पैशातून आपण अनाथाश्रमात जाऊन तेथील मुलांना कपडे व पुस्तके वाटप करून दुपारी त्यांच्या बरोबर जेवून त्यांना शिवकथा सांगणार आहोत असे शिवने जेव्हा उपस्थितांना सांगितले तेव्हा मात्र देशमुख काकूंच्या डोळ्यात "मीही एक मावळा घडवला"असा अभिमान दाटून आला.

दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये "एक शिवजयंती अशीही!" या हेडिंग सह मंडळाची बातमी छापून आली व पुढच्या वर्षी आपणही अशा प्रकारे शिवजयंती साजरा करायची असे इतर मंडळांनाही वाटून गेलं.

© पल्लवी घोडके-अष्टेकर.

सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने