"अगं बाई, अशी परस्पर आवडतील का? न बघता? काय ते बोलणं?",
"अगं, तशीच नाही काही.... तिला "भावे", आडनाव असलं तर जास्त आवडेल असं ती म्हणते ना?
"काय ते एकेक खुळ! काय तर म्हणे एकदाच नाव बदलायची संधी असते तेव्हा मिळाली तर मिळाली",
असे मधुकरराव आणि संध्याताई बोलत होत्या तेवढ्यात बाहेरून सरोजिनी आली.
"ये, बेटा ये, मधुकरराव म्हणाले, तशी सरोजिनी लटक्या रागात म्हणाली, 'काय हो दादा, आणलीत का परत स्थळं? इतकी का मी नकोशी झाली आहे? एरव्ही हक्काने सरु हाक मारणारे दादा, 'बेटा', तेव्हाच म्हणायचे जेव्हा एखाद्या स्थळांसंदर्भात बोलायचे.
'सरे,फार बोलतेय हो!, बापाचं मन आहे ते, त्याला कन्यादान करायचं आहे हो, तुला एवढ्यात कळणार नाही हं, सांगते ते काय? असं तिथेच मागे झोपाळ्यावर वाती करत बसलेली आज्जी म्हणाली.
"सांगते ते काय",हा आज्जीचा खास शब्द होता,वाक्य संपताना हमखास म्हणायची ती. तिच्या शब्दाला तेवढाच मान ही होता.
ते ऐकताच सरोजिनी आपल्या लांबसडक वेणीशी खेळत, मान खाली घालून उभी राहिली,
तश्या संध्याताई म्हणाल्या, 'अहो, स्थळांची माहिती तरी सांगा,
हो,हो,सांगतो हं,पहिला 'मुकुंद भावे' नाव आहे, पुण्याचा आहे, आईवडील, मुलगा व त्याची बहीण, मुलगा इंजिनियर आहे, बहिणीचे लग्न झालं आहे. बाकी सगळं चांगले आहे.
आणि दुसरा सुद्धा 'मुकुंद भावे', च, हा पण इंजिनिअर आहे, नोकरीसाठी पुण्यात, याला वडील नाहीयेत, मोठा लग्न झालेला भाऊ, आणि आई, असे मिरजला रहातात.
पत्रिकाही जुळतात सरोजिनी बरोबर, इथे येऊन भेटणार आहेत येत्या शनिवार रविवारमध्ये ....
'अग्गो बाई, दोघांची नावं आणि आडनावं पण सारखीच का? म्हणजे आपली सरू 'भावेबाई' होणार तर!, संध्याताई म्हणाल्या.
"चल,काहीतरीच हं, आई तुझं, तू पण ना, सरोजिनी पटकन आत गेली. आणि बैठकीच्या खोलीत हास्य पसरले.
'मधु, लाग हो तयारीला, योग चांगला दिसतोय हं, सांगते ते काय!, इति आजी.
वाईच्या मधुकरराव जोशींची एकुलती एक कन्या म्हणजे सरोजिनी जोशी.
बेताची उंची, केतकी वर्ण, लांबसडक केस, चेह-याला साजेसे डोळे, सरळ नाक, मोहक हास्य. ती सुद्धा द्विपदवीधर होती.
लग्नानंतर नोकरीचीही तयारी होती.... म्हणूनच मधुकरराव पुण्यामुंबईची स्थळे आवर्जून बघत.
पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वीची कथा ..तेव्हा नुकतेच फोन आले होते, ते सुद्धा सगळ्यांकडे नाहीत. एसटीडी वगैरे रात्री नऊ नंतर यायचे.
दुस-या दिवशी रात्री शेजारी फोन आला, मधुकरराव बोलून आले, आणि म्हणाले ,' उद्या सकाळी पुण्याची मंडळी येतात गं,..
'आता बास, उशिर झालाय, असं म्हणत सरोजिनी आपल्या लाडक्या लेकीला राधिकेला थांबवत म्हणाल्या.... तिचा तेवीस वर्षाचा कोवळा चेहरा ओंजळीत घेऊन.... त्याच्या राधिकेला आज पहिलाच नकार आला होता.... आणि म्हणून बाईसाहेब रडत बसल्या होत्या.
'आई, असं कसं वागू शकतात लोकं? सरळ नाही ,योग नाही काय?' राधिका तणतणत होती घरात.
सरोजिनीने थोडा वेळ ऐकून घेतलं आणि म्हणाली,' तुला खूप आवडला होता का तो मुलगा?'
ईईईई काही काय? नाही गं आई? राधिका म्हणाली.
नाही ना मग कशाला चिडतेय तू? त्यांनी 'नाही',म्हटलं म्हणजे तू काही वाईट ठरत नाहीस..... आताची तुझी तणतण तुझ्या अहंकाराची आहे, इतकंच.
'काय गं आई, तुम्ही पुर्वी कसं सगळं सहन केलेत?', यावरून विषय निघाला होता आणि सरोजिनी आपल्या लाडक्या लेकीला स्वतःचीच कथा सांगत होती.
सरोजिनी म्हणाली , खरं तर तेव्हा आम्हाला हे वेगळं असं काही वाटायचं नाही, आजूबाजूला तसंच घडताना दिसायचं, आईवडीलांची इच्छा, त्यांचा आदर,मान ,ते आपल्या चांगल्यासाठीच करतात यावर ठाम विश्वास होता.
आज दिवस उजाडला तेव्हा पासून 'आई,पुढे काय झाले ते सांग म्हणून ,राधिका मागे लागली होती.
सगळं आवरून सरोजिनी सांगू लागली,
त्या रात्री खरं सांगायचं तर झोपच येईना...या आधीही दोन तीन कार्यक्रम झाले होते, पण यावेळी वेगळे वाटत होते... उगीच मी मनाशी "चि.सौ.का.सरोजिनी मुकुंद भावे", असं नाव मनाशी पुटपुटले, आणि चक्क लाजले.
मुकुंद भावे या नावाचा चेहेरा अज्ञात होता इतकंच... पण माझ्या मनात मात्र एक धुसर चित्र उभं राहिलं होतं.
सकाळी आईची लगबग चालू होती. मी उगीच इकडे तिकडे वेळ काढत होते, तर आजी बोलली,' सरे,आजचं यायची आहेत हो मंडळी!, आवरून तयार रहा.. मागाहून गडबड नको, सांगते ते काय!!
आजीची पहिली आणि शेवटची सुचना...
मग काय गेले तयार व्हायला. गुलबक्षी रंगाची साडी, वेणीवर आबोलीचा गजरा, ठेवणीतले गळ्यातलं कानातलं घालून तयार झाले. थोड्याच वेळात पुण्यातील मंडळी आली.
त्याचे आईवडील आणि तो .... "मुकुंद भावे", दादा आणि माझी आई, आजी बाहेर बसून बोलत होते.
मी आत होते, तेवढ्यात आई आत मला बोलवायला आली. 'सरोज ,चल लवकर, चांगली वाटतात हो मंडळी, मुलगा सुद्धा चांगला आहे हो," मी मला जमेल तेवढं शांत करत बाहेर आले.
थोडे बोलणं चालू असताना मी त्याला बघितलं..... गोरापान चेहरा, तरतरीतपणा, उंच असा तो मुकुंद... नाही म्हणायला जागाच नव्हती... पण का कोणास ठाऊक, माझ्या मनातील धुसर प्रतिमेशी मिळतीजुळती नव्हती.
मग आम्ही दोघे बोललो, खाणं झाल्यावर मंडळी गेली. फोन करतो म्हणाले ,त्यांच्या घरी फोन होता.
त्या रात्री शेजारी परत फोन आला कि, मिरजची मंडळी उद्या सकाळी येतात.
परत उद्या सकाळी तयार होणं आलं. दुस-या दिवशी सकाळी मी मोरपंखी रंगाची साडी नेसले , मोत्याची माळ, तशाच मोत्याच्या कुड्या, चंद्रकोर रेखली .
मिरजहून तो फक्त एकटाच आला. त्याच्या भावाला काम आलं होतं..त्याची आई व वहिनी आल्या नाहीत.
आई दादांनी कालच्यासारखीच तयारी केली होती. मी परत स्वतःला सावरत बाहेर आले.... आणि बघते तर माझ्या मनातील प्रतिमा जिवंत रूप धारण करून माझ्यासमोर बसली होती... माझा तर तिथल्या तिथेच या मुकुंद भावेला होकार होता.
त्याने माझ्याकडे पाहिलं आणि कुठेतरी त्याच्याही मनाची तार छेडली गेलीये असं वाटलं....
आई दादांच्या मते सुद्धा दोन्ही स्थळे उत्तम होती. आता कोणाचा होकार येतो एवढंच होतं आणि माझं मत ही होतंच महत्त्वाचं पण त्या मानाने कमीच.
दोनच दिवसांनी पुण्यातील मंडळींचा होकाराचा फोन आला.
आई दादा तर आनंदून गेले... मी मात्र मनातून मिरजच्या फोनची वाट पहात होते...
स्वतःहून फोन करण्याची पद्धत तर नव्हतीच.
आईने मला विचारले, "काय ,गं कळवूया ना होकार? त्यांनी लगेच कळवले आहे तर आपण वेळ काढायला नको", मी मान डोलावली, कसं सांगणार होतो आईला कि त्या फोनची वाट बघूया म्हणून..... नाहीच सांगू शकले.
त्यांचा नकार ही आला नाही आणि होकारही, दोन्ही गोष्टी अज्ञात राहिल्या ख-या.... या स्थळाशी सोयरीक झाल्याने आईदादांनी पण पुढे चौकशी केली नाही....
मग काय मी इथे आले पुण्यात.... म्हणजेच तुझ्या बाबांशी लग्न करून.
आता तुझ्याशी बोलताना मनात आलं ...काय झालं असेल तेव्हा काहीच न कळवण्यासारखं ? कधीतरी कळलं तर...
'आई, तुला खूप वाईट वाटलं होतं का गं? हाऊ यू हॅन्डल इट दॅट टाईम? '
अगं,तुमच्यासारखं आम्ही तेच तेच उगाळत बसत नव्हतो काही, आमच्या पिढीला संयमाचे व सहनशक्तीचे मोठे वरदान आमच्या मोठ्यांकडून लाभले होते आणि आहे.
'व पू' वाचतेस का? त्यांच एक वाक्य आहे, "निर्माण होणा-या भावना प्रकट करायच्या नाहीत हे अंगवळणी पाडून घेता घेता कातडीचे चिलखत कधी होते ते स्वतःलाही कळत नाही". प्रत्येकाचेच असं होतं असं नाही, त्या वाक्याचा पहीला भाग मात्र अगदी खरा...
माझं काही वाईट होतं नव्हतं, आता तुला सांगत होते ते हे कि तुला न आवडलेल्या मुलाने नाही म्हटलं तर इतकं चिडण्यासारखं काही नाही.
घडायच्या त्या गोष्टी घडतात.त्याचा स्विकार केला कि त्या सहज सोप्या होतात.
'बरं बाई, नाही चिडणार! इति राधिका..
'ए आई, आपण शोध घ्यायचा का त्या मुकुंद भावेचा?',
'ए आई, आपण शोध घ्यायचा का त्या मुकुंद भावेचा?',
'काहीतरीच काय गं?, झालं गेलं गंगेला मिळालं, आता काय त्याचं?
अगं, फेसबुकवर शोधते ना?
अजिबात नाही, नाही ते उद्योग, जरा चढ आवाजात सरोजिनी म्हणाली.
परत काही विषय न काढता राधिका खरंच फेसबुकवर शोधू लागली.
कोकणस्थ, भावेज्, अशा ग्रुपवर नाव टाकून शोधू लागली.
एका ग्रुपवर "सरोज भावे", याच नावाची एक मुलगी सापडली ,पुण्यातीलच ,सहा सात कॉमन मित्रमैत्रिणीही होत्या, त्यातल्याच एका कॉमन मैत्रिणीला फोन केला, थोडं इकडचं तिकडचं विचारलं, मग सरळ त्या "सरोज भावे" बद्दल विचारले.
त्या मैत्रीणीने सांगितले की अगं,मला पण फार काही माहिती नाहीये तिची, दहावीनंतर पुण्यात आली आहे, मिरजची आहे एवढंच.
'मिरज', ऐकल्यावर राधिकाला अजूनच उत्साह आला.
तिने सरळ बोलायचं ठरवलं, मेसेंजर वर...लागलीच मेसेज टाकला, त्या दुस-या मैत्रीणींचा संदर्भ दिला.
दोघीही भावेच असल्याने मेसेंजर वर बोलू लागल्या.
ती "सरोज माधव भावे" होती.ती ही पुण्यातच असल्याने शहरातील एका कॉफी शॉप मध्ये भेटायचे ठरले.
दुस-या दिवशी राधिकाने सरोजिनीला खरेदीच्या निमित्ताने बाहेर काढले, ते झाल्यावर त्या ठरलेल्या कॉफी प्यायला म्हणून आणलं.
आधीच ठरल्याप्रमाणे सरोज व मुकुंद भावे येऊन बसले होते.
राधिकाने ओळख करून दिली, हि माझी आई सरोजिनी मुकुंद भावे. सरोज म्हणाली ,हे माझे काका....मुकुंद भावे.
सरोजिनी व मुकुंद भावे अचानक गडबडून गेले, हे सगळं काय चालू आहे?
दोघींनी टाळी देत सर्व खुलासा केला आणि विचारलं की, त्या दिवशी वाईहून निघाल्यानंतर काय झाले?
थोडं थांबून, मुकुंद बोलू लागले, मला तेव्हाच 'हि' पसंत होती. बरोबर कोणी मोठं नसल्यामुळे लगेच सांगणं जमलं नाही.
घरी गेलो,आईला सांगितले, तिला हिचा फोटो पसंतच होता,त्यामुळे तीही कळवू म्हणाली.
माझा दादा कामासाठी बाहेरगावी गेला होता त्याचा तिथे अपघात झाला,त्यातचं तो गेला.
वहिनीचे दिवस भरत आलेले, ही बातमी कळल्यावर तर तिला त्रास होऊ लागला, आई तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली तर मी दादाचं पुढचं सगळं करण्यात गुंतलो .
खूपच विचित्र झालं होतं सगळं, काही कळेना, वहिनीला मुलगी झाली. पण वहिनीने दादाचं जाणं खुपच मनाला लावून घेतलं होतं, त्यामुळे पुढच्या महिन्याभरात तीही आम्हाला सोडून गेली, दादाची मुलगी म्हणून वाढवीन असा शब्द मी तिला दिला होता.
आई,मी आणि हि तान्हुली.
मी पुण्यातील नोकरी सोडून मिरजला आलो.
इतक्या दिवसांत मला माझा विचार करायला वेळच मिळाला नव्हता.
ह्या छोटीची नवीनच जबाबदारी होती, थोडं स्थिरस्थावर झाल्यावर आईने हिचं नाव काय ठेवूया विचारलं, तेव्हा मी 'सरोज' हेच नाव ठरवलं.
कितीही नाही म्हटलं तरी तुमचाच हसरा चेहरा होता डोळ्यासमोर , "आपल्या मनात,आपल्याला आवडत्या माणसाचे जे चित्र उमटलेलं असते, त्याला जन्म असतो,मृत्यू कधीच नसतो", 'व पू'चं वाक्य आहे नाही का? त्यानुसार मी हिचं नाव 'सरोज' ठेवलं.
पुढे माझं लग्न ठरताना हिला सांभाळून जमणार असेल तरच करेन सांगितले, पण मुली येईना.
एक स्थळ आलं ,योगिनी म्हणून.. तिला पूर्वी झालेल्या अपघातामुळे मुल होऊ शकत नव्हतं, त्यामुळे तिचंही लग्न होत नव्हतं.
परिस्थितीने आम्हाला अशा रितीने समोर आणलं होतं की दोघांनी एकमेकांना साथ द्यायचे ठरवले.
योगिनी नावाप्रमाणे होती,आई, छोट्या सरोजला आणि मला खूप सांभाळून घेतले. हिच्या पुढील शिक्षणासाठी पुण्यात आलो .
सरोजिनी, राधिका, सरोज शांतपणे ऐकत होत्या. मुकुंदने विचारलं, तुम्ही दोघींनी हे कसं ओळखलं?
सरोज म्हणाली, राधिकाने थोडक्यात माहिती सांगितली आणि एकदा आजीच्या पोतडीत फोटो बघितला होता, मागे नाव होतं, सरोजिनी जोशी म्हणून.
कसं कोण जाणे, लक्षात राहीलं होतं. राधिकाने थोडक्यात सांगितलं आणि यांचा फोटो दाखवला मेसेंजर वर, तेव्हा लक्षात आलं सगळं आणि असं भेटायचं ठरवलं.
तुम्हाला त्रास द्यायचा हेतू नव्हता काका...
अगं, असू दे... सरोजिनी म्हणाली. त्यांच्याही मनातील गोष्टी मोकळ्या झाल्या आणि माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली....... आता मनाचं आकाश निरभ्र झालं, नाही का?
'हो ना, मुकुंद म्हणाला... असं घडेल असं कधी वाटलं नव्हतं.
***
समाप्त
© नेहा बोरकर देशपांडे.
© नेहा बोरकर देशपांडे.
सदर कथा लेखिका नेहा बोरकर देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
