© राधिका कुलकर्णी
संजय सावनी पाटील. 18/20 वर्षाचा उमदा तरूण. वर्ण काळा परंतु स्वभावाने अत्यंत लाघवी आणि परोपकारी.
संजयच्या आईला मात्र रात्रंदिवस त्याच्या भविष्याचीच चिंता लागून राही.
त्याचा काळा वर्ण सतत त्याच्या नशिबाच्या आड येई. इतके चांगले गूण असुनही माणसांच्या दिसण्यावर लोकांचा इतका भर का असतो?? दोन्ही रंग देवानेच बनवलेत नाऽऽ, मग त्या परमेश्वराच्याच निर्मितीचा इतका तिटकारा का असेल लोकांना??
सावनी विचार करता करता अचानक भूतकाळात गेली.
सावनी नावाप्रमाणेच रंगाने सावळी तरीही दिसायला तरतरीत. कुणीही बघताच भूरळ पडेल अशी नाजूक शेलाटी सुंदर. गावच्या पाटलाच्या शेतावर काम करणाऱ्या लखोबाची नात.
सावनीला जन्म देऊन तिची आई मृत पावली तसे वडीलांनी पोरीला अपशकुनी ठरवत लखोबाकडे आणून सोडले. काही दिवस मामीने सांभाळ करून कळत्या वयाची होताच लखोबाकडे आणून सोडले.
लखोबालाही वयानुसार कुणीतरी बघणारे हवेच होत म्हणुन तिला स्वत:कडेच ठेवुन घेतले.
लखोबा सोबत मग तीही पाटलाच्या शेतात काम करू लागली.
पाटलाचा तरणाबांड पोर रंगरावाची नजर सावळ्या सावनीवर पडताच तो सावनीच्या सौंदर्यावर फिदा झाला. लग्न करीन तर लखोबाच्या नातीशीच असा त्याने हट्ट धरला.
पंचक्रोशीतील मातब्बर घराणी सोयरीकीसाठी तयार असुनही रंगरावाच्या हट्टापायी अखेर नाराजीनेच पाटलाने मुलाचे लग्न सावनीशी लावुन दिले.
लखोबाला वाटले चला पोरीने नशिब काढलं.
आतातरी तिचे भोग संपतील.त्या समाधानातच लखोबाने डोळे मिटले.
इकडे रंगराव सावनीचे नव्हाळीचे दिवस प्रेमात न्हाऊन निघत होते.
परंतु काही दिवसातच तिला जाणवले की रंगरावाची पत्नी सोडता तिला पाटलांच्या सूनेचा मान अजुनही मिळालेला नाही.
रोजच्या प्रमाणे स्नान उरकून ती देवघरात जायला निघाली तोच सावनीची सासू पुढ्यात येऊन दरडावल्या स्वरातच म्हणाली,"तु ह्या घरात फक्त रंगरावाला खुष करायला आलीस तेवढेच काम कर. पाटील घराण्याची सून बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तूला लागतील त्या सगळ्या गोष्टी माडीवरच पुरवल्या जातील.त्यासाठी खाली उतरून यायची गरज नाही."
डोळ्यातुन आग ओकणारी ती विखारी भाषा एेकुन सावनी काही न बोलताच रडवेल्या चेहऱ्याने परत माडीवर गेली.
जणू काही एखाद्या "ठेवलेल्या बाईगत" वागणूक तिला घरात मिळत होती.
रंगरावांना ह्या सगळ्याचे काहीच पडलेले नसे. काही सांगितले की, तो इतकेच म्हणायचा, "जाऊदे गंऽऽऽ एखादं मूल झाल ना की होईल सगळ नीट."
समजावतच रंगराव परत सावनीला आपल्या मिठीत आेढे.
सुरवातीला ह्या सगळ्यांनी मोहरणारी सावनी सततच्या त्याच त्या कृतीने कंटाळून गेली.
रंगरावांच्या स्पर्शाचीही शिसारी येवू लागली तिला. विरोध केलेला रंगरावांना मुळीच चालत नसे. मग तो बळजबरीनेच तिच्याशी संभोग करू लागायचा.
सावनीला आपले दु:ख सांगायला मायेच कोणीच नव्हतं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत ती त्या बड्या घरात दिवस कंठत होती. अशातच एक दिवस तिला बाळाची चाहूल लागली. रंगरावही आपण बाप होणार म्हणुन खूष झाला.
नाही म्हणायला बाळाचे आगमन होणार म्हणून की काय अधूनमधून सासू माडीवर येऊन तिला काय हवं नको ते विचारून जायची. पण बाकी परिस्थिती जैसे थे च होती.
यथावकाश नऊ महिने भरले. सावनीने एका गुटगुटीत मुलाला जन्म दिला पण मुलाचा रंग अगदी काळा.
जणू काळा कोळसाच. रंगरावांनी मुलाला पाहताच हे आपले नाहीच असे म्हणत तिच्या चारित्र्यावर शंका घेतली. एक दिवस घरच्यांच्या संमत्तीने तिला घराबाहेर काढली..
तिला तर आपले म्हणावे असे कोणीच नव्हते. काय करावे? कुठे जावे? विचार करत ती गावच्या भवानी मंदिरात पोहोचली.
देवीची काळी मूर्ती पाहून ती त्वेषानेच म्हणाली," बघ माते तुझाही रंग काळाच पण तुला मात्र लोक देवी म्हणुन पुजतात मग माझ्याच नशिबी हा वनवास का? आता मी ओली बाळंतीण इतक्या लहान लेकराला घेऊन कुठे जाऊ? काय करू माते.?? तूच मार्ग दाखव ह्यातुन."
सावनीने आपल्या डोळ्यांवाटे झरणाऱ्या आश्रुंचा अभिषेक देवीच्या पायावर घातला.
तितक्यात एक म्हातारी तिथे आली. तिने सावनीला पाहिले आणि म्हणाली,"पोरी, माझी एक छोटीशी मदत करतेस का?"
"काय ग माई? काय मदत हवीय तूला??." आपले अश्रु पुसत सावनीने विचारले.
त्यावर ती म्हणाली, "काय नाही ग. आज देवीला शंभर माळांचे तोरण घालायचा संकल्प केलाय मी. पण बसुन बसुन माझी पाठ आखडलीय. तु जर ह्या माळा करण्यात माझी मदत केलीस तर फार उपकार होतील तुझे. इथुन जवळच घर आहे माझे. तु येतेस का मदतीला.?"
सावनीला असेही कुठे जावे प्रश्न होताच.
बघु माईच्या रूपाने देवीच आपली सेवा घेऊ इच्छित असेल तर!!!
तिने कामाला होकार दिला.
बाईने मुलाला सांभाळले. तेवढ्या वेळात सावनीने तिचे हार ओवून पूर्ण केले.
बोलता बोलताच म्हातारीला सावनीची करूण कहाणी समजली.
म्हातारीकडे खानावळ होती. तिथे "भाकरी पोळ्या लाटायचे काम करशील का?" विचारले.
सावनीने हो म्हटलं. म्हातारीने आपल्याच जागेत तिला एक खोली रहायला द्यायचे कबूल केले.
देवीचीच कृपा मानून सावनीने काही दिवसातच कामाला सुरवात केली.
असेच दिवस पूढे जात होते. आता संजयचे शाळेचे वय झाले. त्याला शाळेत घातले. पण शाळेत सगळी मूले त्याला त्याच्या रंगावरून हिणवायची त्यामूळे त्याला शाळेचा तिटकारा वाटू लागला.
कशीबशी गाडी दहावी पर्यंत रेटली पण सततच्या तक्रारी,मारामारी,शिक्षकांनी केलेल्या शिक्षांचा परीणाम तो दहावीत फेल झाला. मग पूढे न शिकता त्याने मिळेल ते काम करून आईला मदत करायचे ठरवले.
पहाटे उठून पेपर टाकणे, दूध पोहोचवणे, भाजी विकणे अशी एक ना अनेक काम करत तो आईला मदत करू लागला.
खूप मेहनतीने एका हॉस्पिटलमधे त्याची तृतीयश्रेणी कर्मचारी म्हणुन नेमणूक झाली.
कोणतेही काम मन लावून करण्याच्या स्वभावामूळे लवकरच त्याने सगळ्या हॉस्पिटल वर्गाचे मन जिंकुन घेतले.
प्रशिक्षित नसुनही त्याने काही महिन्यातच नर्सिंगची सर्व कामे शिकुन घेतली.
तो हॉस्पिटलमध्ये सिस्टर्सच्या जोडीने "ब्रदर" म्हणून काम करू लागला.
एक दिवस साधारण पन्नास पंचावन्नचे एक गृहस्थ हॉस्पिटलमधे अॅडमिट झाले. त्यांची क्रिटिकल सर्जरी होणार होती. त्यासाठी रक्ताची गरज होती.
त्यांचा रक्तगट(B-)दुर्मिळ असल्याने कुठेच सोय होत नव्हती.सर्वांना आवाहन केले जात होते की आपल्या रक्ताची तपासणी करावी.
सगळे नातेवाईक रक्त तपासणी करत होते परंतु कुणाचेही रक्त त्यांच्याशी मॅच होत नव्हते.
रक्त न मिळाल्याने ते गृहस्थ चिडचिड करत होते. संजयची ड्यूटी त्यांच्याच स्पेशल रुममध्ये होती.
संजय त्यांच्या खोलीत गेला की हे गृहस्थ त्याचा विनाकारण राग राग करायचे. त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत संजय आपले काम मन लावून करे.
नेहमीप्रमाणे तो त्यांची रूम साफ करायला गेला तेव्हा त्याने पाहीले की ते रडत होते. त्याने आपुलकीने त्यांच्या जवळ जात विचारले, "काय झाले काका, तुमच्या डोळ्यांत पाणी का?"
आज पहिल्यांदाच तो गृहस्थ संजयशी बोलता झाला.
त्याने सांगीतले, "आजच डॉक्टर बोलताना मी ऐकले की जर उद्या पर्यंत रक्ताची सोय झाली नाही तर माझे ऑपरेशन होऊ शकणार नाही आणि मग माझ्या जगण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत."
त्यावर संजयलाही खूपच वाईट वाटले. कसेबसे सांत्वन करत तो म्हणाला,"तो वर बसलाय ना त्याला सगळ्यांची काळजी असते. नका काळजी करू. होईल सगळं ठिक.."
त्यांचे सांत्वन करून मनाशी काही विचार करतच तो डॉक्टरांच्या केबिनमधे गेला.
त्याला पाहताच प्रसन्न मुद्रेने डॉक्टरांनी विचारले,"काय रे आत्ता इकडे काय करतोस?"
त्यावर जरा चाचरतच तो डॉक्टरांना म्हणाला, "डॉक्टरसाहेब त्या 302 पेशंटचे रक्त मिळत नाही हे खरंय का?"
त्यावर डॉक्टरांनी चेहरा गंभीर करतच सांगितले, "कसं सांगू संजू, त्यांचा रक्तगट खूपच दूर्मिळ आहे. कुणाचाच रक्तगट मॅच होत नाहीये आणि जवळपासच्या कुठल्याच रक्तपेढीत त्यांचा रक्तगट उपलब्ध नाही."
त्यावर जरा विचार करून संजय म्हणाला, "डॉक्टर साहेब इतक्या जणांचे केले तसे माझेही रक्त तपासुन पहा. झालं तर झालं मॅच."
संजयचे वाक्य ऐकुन डॉक्टर भावूक होऊन म्हणाले, "ठीक आहे. जा तुझेही ब्लड सँपल दे. बघु काय रिपोर्ट येतो."
संजयने आपले रक्त तपासणीसाठी दिले आणि तो कामाला लागला. तीन तासांनी रिपोर्ट आला. त्यालाही प्रचंड उत्सुकता होती. तेवढ्यात डॉक्टरांचा निरोप आला.
तो डॉक्टरांच्या केबिनमधे गेला. त्याला बघुन प्रसन्न मुद्रेने पाठ थोपटत डॉ. म्हणाले, " संजू चमत्कार झाला. तुझा ब्लडगृप मॅच झालाय रे 302 च्या पेशंटशी.
आता त्यांचे ऑपरेशन नक्की होईल.
त्यावर संजयने लगेच सांगितले,"डॉक्टर त्यांना नका सांगू की मी डोनर आहे नाहीतर ते ऑपरेशन करायलाच नाही म्हणतील. प्लीज एवढे करा."
ठरल्याप्रमाणे ऑपरेशन सक्सेसफूल झाले.
आठवड्याने काकांना डिस्चार्ज द्यायची वेळ आली असताना संजू समोर आला तसे त्यांनी विचारले, "संजू तूला माहितीय का रे मला रक्तदान कोणी केले? तो जो कोणी असेल त्याचे आभार मानायचे आहेत मला."
त्यावर नकारार्थी मान हलवत संजय तिथुन बाहेर पडला.
काही दिवस लोटले अन् एक दिवस रात्र-ड्यूटी संपवुन संजू उशीरा घरी परतला. दोघे जेवायला बसतच होते की दारावर थाप पडली. 'एवढ्या रात्री कोण आले?' म्हणतच संजयने दार उघडले.
दारात एक अनोळखी इसम. संजयला पाहून त्याने प्रश्नार्थक नजरेनेच "संजू ब्रदर इथेच राहतात का?" विचारलं.
संजय उत्तरला," हो मीच तो. काय काम आहे आपले.?"
"आमचे शेठ तुम्हाला भेटू इच्छितात. आलोच मी त्यांना घेऊन." म्हणतच तो माघारी वळला.
संजय भांबावल्या नजरेने कोण असेल विचार करत असतानाच रूम नं.302 चे पेशंट गाडीतुन उतरताना दिसले. तसे त्यानेही धावत पूढे जाऊन आधार देत त्यांना घरात आणले.
एका खूर्चीत त्यांना बसवल्यावर ते बोलायला लागले, "काय रे संजू,त्या दिवशी मी तुला विचारले तर तु माहीत नाही म्हणालास. मी डॉक्टरांना खोदून विचारले तेव्हा त्यांनी तुझे नाव सांगितले. खूप अभिमान वाटला तुझा. त्या माऊलीला मला धन्यवाद द्यायचे आहेत, जिच्या पोटी इतका परोपकारी मुलगा जन्माला आला. त्यासाठीच मी तुझ्या घरी आलो. कुठेत तुझे आई वडील?? बोलाव त्यांना."
"साहेब मला फक्त आई आहे.वडीलांनी तर माझ्या रंगावरूनच मला नाकारले व माझ्यासकट आईला घराबाहेर काढले. आता माझी आईच माझे माता-पीता दोन्ही आहेत.थांबा मी बोलावतो तिला." भरल्या डोळ्याने संजू म्हणाला.
सावनी समोर आली..सावनीने त्यांच्याकडे क्षणभर निरखून पाहिले आणि नकळत तिच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या.
काकाही काही न बोलता फक्त आसवं गाळत होते.भूतकाळातल्या चूका वर्तमानात येऊन न्याय मागत होत्या. त्यांच्या एका चुकीमूळे दोन निष्पाप जीव हालापेष्टा सहन करत होते.
संजयला काहीच कळत नव्हते कि दोघेही बोलत नाहीत मग एकमेकांकडे बघुन रडताहेत का?
विचारांच्या भोवऱ्यातून स्वत:ला सावरत काकांनी संजयला घट्ट मिठी मारत सावनीला म्हणाले, "माफ कर सावनी ज्या मूलाचा रंग काळा म्हणुन मी तूला अव्हेरले त्याच काळ्या रक्ताने आज मला जीवदान दिले."
हे फक्त तुझेच संस्कार!!"
मग संजयकडे पहात म्हणाले,"पोरा जमल्यास ह्या बापाला माफ कर आणि त्याला प्रायश्चित्ताची एक संधी दे. चला आपल्या घरी चला. तुमच्याविना मी पण खूप एकटा पडलोय.निदान आयुष्याची सेकंड इनिंग तरी एकत्र लढू……!
" Everything that is black is not always bad !!"
~~~~~~~~(समाप्त)~~~~~~~~~~
©®राधिका कुलकर्णी.
📝 माझी लेखणी
फोटो गुगल साभार
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
