© अपर्णा देशपांडे
पवन घराच्या अंगणात अस्वस्थ पणे फेऱ्या मारत होता . किशन बी.ए चा रिझल्ट घेऊन अजून कसा आला नाही याची त्याला चिंता होती .
" बस की रे एका ठिकाणी . गुरुगुरु फिरतोय नुसता . कचेरीत नाही जायचं का आज ? " सुशीला बाई , पवनच्या मातोश्री स्वयंपाक घरातून ओरडल्या .
" डबा दे लवकर आज तिकडेच जेवतो . "
घाईघाईत पवन ने स्कुटर वर टांग टाकली , आणि कॉलेज कडे निघाला .
रस्त्यात दामू भेटला .
" दाम्या , काय झालं तुझं? "
" पास झालो !! बस का ? "
" आणि किशन ? "
" बसलाय डोक्याला हात लावून , तिसऱ्यांदा !! " नंतर दात विचकून हसला दामू .
त्याचं ही बरोबरच आहे म्हणा . दामू पहिल्या वर्षाला होता तेव्हा पासून किशनराव तिसऱ्या वर्षातच होते .
आता दामू बी.ए झाला देखील.
पण असं कसं झालं ? पवन ने जीवावर खेळून किशन ला कॉप्या पुरवल्या होत्या . त्यासाठी किती ठिकाणी सेटिंग लावली होती.
पहिली सेटिंग मालती मॅडम कडे.
कॉमर्स च्या काजळे सरांची आणि मॅडमची भेट घडवून आणण्या पासून ते अगदी त्यांच्या ब्युटीपार्लरचे बिलं भरण्यापर्यंत ! ....
कारण त्याच गार्डिंग ला असणार होत्या.
दुसरी सेटिंग पोलीस हवादलदार तुकाराम कडे.
किशन परीक्षेला बसे त्या खिडकीकडे 'कानाडोळा' करण्यासाठी .....
आणि तिसरी सेटिंग हर्षल तिवारी कडे .
गाईडचे नेमके कोणते पानं फाडून आत द्यायचे ज्यात उत्तरं असतील .....हे सांगण्यासाठी...
नाहीतर मागच्या वेळी कसली गडबड केली होती गध्याने ......
बाहेर येऊन म्हणाला ,
"पवन, तू लेका नुसतेच उत्तरं पाठवत होता मला . हे कोणत्या प्रश्नाचे उत्तर आहे हे कसं समजणार? "
पवन ने लोटांगणच घातले होते त्याला .
म्हणून ह्यावर्षी हर्षद कडून प्रश्न क्रमांक टाकून उत्तराचे पानं खिडकीतून आत पाठवले होते ...तरीही हा नापास कसा झाला ?
स्कुटर कशी बशी पार्क करून तो धावला .
किशन झाडाखाली बसला होता .
" काय रे किश्या , इथे बसलाय तू ! मी घरीच वाट बघतोय की ! "
" आता कोणत्या तोंडाने घरी जाऊ बे ? आधी माय हाणल अन रात्री दादा घराच्या बाहेर काढतील . "
" थांब , मी आलोच . " पवन ने किशन चे हॉल तिकीट खिशातून काढले आणि ऑफिसमध्ये गेला .
स्वतः परीक्षा क्रमांक कॉम्प्युटर मध्ये टाकून बघितले
.......किशन ....58% ....द्वितीय श्रेणी !!
आणि टुणकन उडी मारून पवन बाहेर आला . किशन गुढग्यात डोकं घालून बसला होता .
पवन ने पायातली चप्पल काढली .
ते बघितल्या बरोबर किशन ताडकन उठला .
" कुठल्याच कामाचा नाहीस तू !! जीव दे ज जीव . " म्हणून सटासट त्याला बदडायला सुरुवात केली.
"नापास झाला तू ?? हां ? ....नापास झाला म्हणे !!!.... अरे पास झाला न लेका !! साधा नंबर ही नीट बघत नाही हरामखोर !! थांब तुझं तंगडंच मोडतो " मग किशन पुढे आणि पवन मागे असे मैदानात धावायला लागले .
आणि धावत घावताच त्याने किशनला पकडून घट्ट मिठी मारली .
त्याचा फा.फे पदवीधर झाला होता .
म्हणजे निर्मला काकी तर आरतीचे ताट घेऊनच दारात उभ्या असतील याची खात्री होती त्याला .
*********
किशन आणि पवन हे लंगोटी यार .
पवन हा लहानपणा पासूनच स्मार्ट आणि तिकडंबाज तर किशन अभ्यास सोडून बाकी सगळ्यात एक नंबर !
विहिरीत पोहणे , उंच झाडावर सहज चढणे , वीस पंचवीस किलोमीटर सायकल चालवणे ....अगदी स्वयंपाक सुद्धा !! बाता मारण्यात , लांब लांब सोडण्यात तर किशन खूपच पटाईत .
चार टाळकी जमली की सुरू ...
सांगायची पद्धत अशी की समोरच्याला खरच वाटावं .
गावात उरूस असला की आजूबाजूच्या गावातील लोक येत असत .
त्यात एक होता भानुदास .
जागतिक फेकाड स्पर्धेत नक्की पहिला नंबर मारेल इतका थापाड्या .
कशी कुणास ठाऊक पण किशन आणि भानुदास ची गाठ पडली .
" काय पाहुणे , उरूस बघायला आलात न ? "
" नाही , ते डिस्कव्हरी चॅनेल साठी इथल्या उरुसाचा ''बाईट"" द्या म्हणून मागे लागले होते ते अमेरिकन , म्हटलं ह्यावेळी जाऊनच यावं . "
किशन नि मनात म्हटलं , ....लेका , कवडीची किंमत नाही तुझी , स्वतःच्या गावचा न्हावी सुद्धा तुला विचारत नाही , आणि अमेरिका म्हणे.
पण बोलतांना मात्र म्हणाला ,....
" वाह वाह भानुदास , छान झालं आलात मी देखील कालच डी.टी ला कळवलं , म्हटलं ,तू बिलकुल चिंता करू नको बाबा , उरुसाचा प्रसाद तुला पाठवतो , अन्या बरोबर. "
भानुदास च्या आ वसलेल्या तोंडाकडे पाहून म्हणाला ,
" डी टी म्हणजे आपला डोनाल्ड ट्रम्प रे !! आणि अनिल अंबानी , आपला अन्या !! ........जात येत असतो न सारखा , मग ....प्रसाद पाठवायचा ..त्याच्यासोबत ...हँ ! हँ ! हँ ! " भानुदास चा पडलेला चेहरा बघून त्याला भयंकर आनंद होत होता .
म्हणजे त्या थापांना ना शेंडा ना बुडखा , पण ठोकायचं , बस !
घरातील मंडळी देखील त्याच्या थापांना बळी पडत .
तर असे हे किशनराव चक्क इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी.ए झाले होते . 'इकॉनॉमिक्स' शब्द उच्चारता येत नसला म्हणून काय झालं , पदवी महत्वाची .
********
निकाल घेऊन घरी येतो तर निर्मला काकी खरच दारात ताट घेऊन उभ्या होत्या .
चौथी नंतर कधी आयुष्यात शाळा न बघायला मिळालेली माऊली , मुलाच्या ""एव्हढ्या""" यशाचे कौतुक नाही करणार का !!
" तू पण ये रे पवन समोर . तुझी पण केव्हढी मदत आहे याला ."
" त्याच्या मुळेच पास झालाय हा !! ओवाळायचं तर पवनलाच ओवाळा ."
पाठीमागून दादा ओरडले .
" काका , शेवटी उत्तर पत्रिकेवर किशननेच लिहिले नं !" पवन ने बाजू सावरायचा प्रयत्न केला .
" हो , साऱ्या खानदानावर कृपा केलीत हो s , या आत !! " दादा
" कारे पवन्या , आता तुझ्या कचेरीत लावून घे की याला ." आईची काळजी बोलली .
" काकी , तो करेल ना काम , काळजी करू नका , आपण करू नक्की काहीतरी . आपल्या मित्रा साठी काय पण!"
निर्मला काकी कडून पुरण पोळीचे जेवण , वरून परस दारात विड्याच्या पानांचा भरपूर मसाल्याचा गोविंद विडा असा भरपूर पाहुणचार घेऊन पवन आणि किशन बाहेर पडले .
" डिग्री मिळाली की फ्रेम करून लावायची रे पोरांनो " काकी मागून ओरडली .
तिच्या पोराने खानदानाचे नाव केवढे मोठे केले होते ना .
दादा मात्र आता ह्या पोराचे पुढे काय ह्या चिंतेत पट्ट्या पट्ट्याचा पायजामा वर करून पाय खाजवत बसले होते .
" तुझ्या नादात आज ऑफिस ची अर्धी सुटी पडली , पण हरकत नाही .
चल , तुझी साहेबांशी भेट घडवून आणतो ." पवन म्हणाला तसं किशन नि लगेच केस नीट केले , शर्ट इन केला आणि दोघे ऑफीसमध्ये पोहोचले .
********
मीना घारपुरे आज खूप रागात होती .
काल तिला न सांगता आईने त्या देशमाने कुटुंबाला घरी बोलावले होते .
कारण तेच !! देशमान्यांचा मुलगा वसंत , लग्नाचा होता .
मीना तशी दिसायला सुंदर ! आणि त्यात आता एका नामांकित फर्म मध्ये नोकरी !
कितीतरी मुलं तिच्या मागे असतांना ती काय वसंतशी लग्न करणार ?
पण आईच्या इच्छेसाठी ती भेटायला तयार झाली होती .
वसंत पेक्षा जास्त शिकलेली , त्याच्या पेक्षा जास्तं पगार असणारी पण.........आई ऐकेल तर ना !
पापांच्या मनात नव्हतं वसंतचं स्थळ , पण बघू , नंतर नाही म्हणता येईल असे म्हणून तेही गप्प बसले होते .
दुपारच्या जेवणाच्या सुटीत मीना समोरच्या कँटीन मध्ये एकटीच बसली होती .
समोरून पवनला येतांना पाहून तिला हायसं वाटलं .
तिच्या डेटा ट्रान्सफर चे काम पवन च्या गळ्यात बांधून तिला थोडा वेळ यु ट्यूब विडिओ बघता येणार होते .
पवन नं तिची किशन सोबत ओळख करून दिली , तसे आपले बोलके डोळे फडफडवत , हाताने केसांना विनाकारण झटका देऊन तिने हस्तांदोलन केलं .
नंतर पवन किशन ला साहेबांकडेही घेऊन गेला .
त्यानंतर पवन , किशन आणि मीना नेहमी भेटू लागले .
" पव्या , आता मला कळाले की तू ऑफिस ला इतका नियमित का जातोस ते . साल्या , मला सांगितलं नाहीस ! "
" अरे ती आत्ता जॉईन झाली आमच्या फर्म मध्ये , आधी नव्हती . तिचं काम मला सांगते , आणि स्वतः नेल पॉलिश कर , मोबाईल वर वेळ घालवत बसते . मला काय समजत नाही का ? .....पण आपलं स्त्री दाक्षिण्य आडवं येतं नं !"
" खोटं नको बोलुस . तुला आवडतेय ती . मी ओळखतो तुला लेका !........बघ तुझी हिम्मत नसल तर मी बोलतो तिच्याशी . बोलू ?"
" अजिबात नाही ! तिला देशमाने कडून पसंती आलीय , त्यामुळे तू बिलकूल मध्ये पडू नकोस . काही उपयोग नाही "
" अर्जुनाने लढण्या आधीच शस्त्र खाली टाकले होते . तसा तू .....आधीच हातपाय गाळलेस ! पण हा किशन आहे न , तुझा दोस्त . रुक्मिणी स्वयंवर तूच जिकणार अर्जुना ! "
" ए कॉपी मास्तर , रुक्मिणी नाही , द्रोपदी स्वयंवर !!" पवन ने दुरुस्ती केली .
त्यानंतर किशन आपल्या मैत्रीला जागायचा आटोकाट प्रयत्न करत पवन आणि मिनाची वारंवार भेट घडवून आणू लागला .
त्याच्या आई आणि दादा ची चिंता मात्र वाढतच होती . पोराला नोकरी नाही म्हणून दादा काळजीत होते .
मीना ने दोघांना वसंत बद्दल सांगितलं .
पुढच्या महिन्यात साखरपुडा आहे , पण आपल्याला त्याच्याशी बिलकुल लग्न करायचे नाही हे तिने सांगितले आणि पवन चा जीव हांड्यात , कढईत , पातेल्यात ,रांजणात असा कुठे कुठे पडला .
किशन चा कामाचा शोध चालूच होता .
सकाळी घरातून निघायचं आणि सगळ्या ऑफिसेस मध्ये जाऊन आपलं काम करून संध्याकाळी वापस !
तो असाच वापस घरी आलेला असताना पवन आला .
" का रे पवन्या , काय म्हणतात मीना वहिनी ?" किशन .
" खरच वहिनी म्हणायची वेळ येणारेय माझ्यावर . लग्न ठरलय तिचं ." पवन वैतागून म्हणाला . तो असा चिडला की किशन ला हसूच येई .
" काय सांगतोस ! पण आपल्याला तर बोलवणारच , काय आहेर द्यायचा ते ठरवून टाकू . "
" हो s s?" आम्ही इथे खिडकीला उलटे लटकून तुला कॉप्या पुरवणार ....तुझ्या त्या फडतुस डिग्री साठी फाटक्या लोकांचे पाय धरणार आणि तू? ........खाल्ल्या मिठा ला जाग जरा ! ........थांब ! ..मला फोन येतोय ...मिनाचाच आहे ."
त्यानंतर तिकडून मीना काहीतरी सांगत होती आणि इकडे पवनचा चेहरा बदलत होता .
" किशन , गडबड झाली लेका ! मीना आणि वसंत ने मगनलाल ज्वेलर्स कडून साखरपुड्याच्या अंगठ्या घेतल्या . येतांना वसंत साठी घेतलेली अंगठी तिच्याकडून हरवली .....ती रडतेय ..तिचे वडील खूपच रागीट आहेत ..आता कसं रे ?" आपत्कालीन संकट आल्यावर माणूस कसा हवालदिल होतो , तसा सूर होता पवन चा.
" जा न जा! हिंड आता गावभर अंगठी शोधत . अंगठी शोधायला तू , आणि तिच्या बोटात घालायला मात्र वसंत !!"
" आता इथेच बडबड करत बसणार का माझ्यासोबत येणार तू ?"
" मुझे तेरे ""कॉपी का कर्ज उतारना है ....चल बाबा ."
**********
मीना मुसमुसत बसली होती .
तिच्याकडे बघून पवन च्या हृदयाचं पाणी पाणी झालं .
त्याला बघून तर तिने आणखीनच गळा काढला .
पवन ने तिला खूप प्रश्न विचारले .
त्यावरून असे कळाले की .....
मगनलाल ज्वेलर्स कडून अंगठी घेउन मीना आणि वसंत एक ज्यूस आणि आईस्क्रीम पार्लर मध्ये गेले .
तिथे डबीतून अंगठी काढून त्याने बोटात घालून बघितली होती . तिच्या सांगण्यानुसार तिने ती वापस डबीत टाकून डबी पर्स मध्ये ठेवली होती .
घरी आल्यावर बघते तर डबी रिकामी होती .
आता वडिलांना समजले तर जावया साठी घेतलेली इतकी महागाची अंगठी हरवली हे ऐकून ते काय करतील ह्या भीतीने तिने पवन ला फोन केला होता .
मागून लगेच किशन आला . अर्धे जॅकेट , डोक्यावर हॅट , हातात कॅमेरा , गळ्यात दुर्बीण असा अवतार .
" हे काय रे किशन ?"
" शाळेत असल्यापासून मला डिटेक्टिव्ह व्हायचं होतं , आठवतं ? ......तुझा चोरलेला पेन त्या वाळ्याच्या बॅगमधून कसा काढून शोधून दिला होता !!......आज संधी आलीये , माझे चातुर्य दाखवायला . तुझ्या कॉपी चं कर्ज फेडायची वेळ आलीये!"
तो मीना समोर जाऊन बसला . त्याने तिला काही प्रश्न विचारले .
मधेच काहीतरी नोंद पण करत होता , नाही म्हणजे असं करतात न मोठे डिटेक्टिव्ह लोकं !!!
" तर , ज्यूस पिण्याआधी ती अंगठी बोटात होती ,आणि ज्यूस पितांना ती डबीत टाकली असं म्हणताय तुम्ही .."
" हो " ती उत्तरली .
" त्यानंतर तुम्ही कुठे गेलात ?"
" वसंत ला पान खायचं होतं , म्हणून पानपट्टीवर गेलो होतो ." तिच्या तोंडून
वसंत चा एकेरी उल्लेख ऐकून पवनला छातीत बाण घुसल्या सारखे झाले.
" नंतर?"
" अं s s , मग घरीच !"
"कितीची आहे ती अंगठी?"
"भारी हिरे आहेत त्यात म्हणून दोन लाखाची आहे."
पवन आणि किशन ची जीभ टाळ्याला चिकटली.......दोन लाख?......काय गरज आहे दोन लाखाची अंगठी घेण्याची? तेही त्या वसंत्यासाठी ?
*******
" किशन , तिची अंगठी शोधलीच पाहिजे रे बाबा !" पवन चिंताग्रस्त चेहऱ्याने म्हणाला .
" अरे एव्हढीशी अंगठी ! पडली असेल कुठेतरी" ..........अचानक काहीतरी सुचून तो ओरडला ......."अरे!!.....ज्यूस !!! पवन्या , वसंत च्या ज्यूस मध्ये तर पडली नसेल ? "
" मग त्याने गिळली की काय ?"
" सकाळ पर्यंत वाट बघावी लागेल .....याक !!!! ...शी!!!!..."
" काहीही नको रे बोलू , त्याला ज्यूस आणि अंगठी मध्ये गिळतांना फरक नाही कळत का? ....किती घाण बोलतोस रे !!!"
" एक काम करू , त्याचा एक्स रे काढू !!!.....ज्यूस का ज्यूस , अंगठी की अंगठी !!!" किशन चं डोकं भन्नाट चाललेलं होतं .
'फुकट चेक अप कॅम्प ' नावाखाली स्वतःच्या खिशातील हजार रुपये टाकून त्या दोघांनी वसंत ला कसे बसे एक्स रे आणि काही टेस्ट साठी तयार केलं.
एक्स रे तर काढला , पण पोटात अंगठी नव्हती ........इतका सगळा खटाटोप वाया गेला होता .
आता मात्र किशन मधील डिटेक्टिव्ह जागा झाला .
"मीनाताई , तुम्हाला नक्की आठवतंय न? की ज्यूस पितांना अंगठी होती?" ... डिटेक्टिव्ह किशन
"हो ! नक्की होती"
" ती वसंत नि हातात घेतली होती का?.....म्हणजे असं होऊ शकतं की अंगठी डबीत न ठेवल्या जाता चुकून वसंत नि खिशात टाकली असेल.."
"पण मग त्याने मला सांगितले असते न!....मी किती फोन केले त्याला.....त्याच्याकडे नाहीये ."
आता मात्र पवन ला खात्री वाटली की अंगठी च्या मुळाशी हा वसंतच आहे .
" किशन , ह्या वसंत ची कुंडली मांडून त्याची टांग त्याच्याच गळ्यात टाकायला पाहिजे ."
"ते सगळं करू , पण तू आधी मीना ला विचार की तिला खरच तुझ्याशी लग्न करायचंय की असंच ...आपलं..."
"तिचं प्रेम आहे रे माझ्यावर " पवन कळवळला .
दुसऱ्या दिवशी पवन ऑफिस मधून सुट्टी घेऊन किशन कडे गेला .
त्या दोघांना कसंही करून आता वसंत च्या घरात प्रवेश मिळवायचा होता .
त्यांनी वसंतच्या घरच्या कामवाल्यांकडे थोडी चौकशी केली , आणि मग एक प्लॅन तयार केला.
सकाळी वसंत इनामदारच्या दारात एक जोडपं उभं होतं . एक हट्टाकट्टा नवरा
धोंडू आणि त्याची ओबडधोबड , साडी नेसलेली , मोठ्ठ कुंकू लावलेली बायको केशर .
"किशन्या , काय चिकणा दिसतोय बे! खांद्यावरून पदर घे बाबा!...जरा सांभाळून हं ."
"असं काय म्हणता धनी ?" ...किशन नि नाटकी आवाजात म्हटलं.
"आवाज बाई सारखा काढ न , म्हैस वगारल्या सारखं वाटतंय."
" जास्त सुचना देऊ नकोस , नाहीतर इथंच साडी फेडून टाकीन!"
" बरं बाबा , चल आता!"
इनामदारांच्या बंगल्याची साफसफाई , घराबाहेरील बागेची काळजी आणि सगळ्या वरच्या कामासाठी माणसं हवी होती . त्यासाठी बंगल्याच्या मागील खोलीत ते जोडपे रहाणार होते.
" केशर , तू वरती जाऊन सगळ्या खोल्यात जाळे काढून घे , बाकी काम सांगायला मी येतेच ."
इनामदारीन बाई , भोळ्या बिचाऱ्या , त्यांच्या सांगण्यानुसार केशर ताबडतोब वरती गेली .
'तिला' वाटलं , पायात येणारी साडी वरती लुंगी सारखी खोचावी करण दोनदा 'ती' पाय अडकून पडणार होती .
वरच्या खोलीत वसंत टेबलापाशी लॅपटॉप वर काहीतरी बघत होता .
केशर आत गेली ..."खोली साफ करायची साहेब!" नाजूक हालचाली करत किशन म्हणाला .
"तू कोण?"
"मी नवी कामवाली साहेब!"
वसंत नं तिला वरून खालपर्यंत न्याहाळलं ......त्याची नजर 'केशर' नं ताबाडतोब वाचली .
" तू काय काय काम करणार?" हावरट पणे वसंत बोलला .
त्याच्याशी एकदम सलगी करत केशर म्हणाली , "तुम्ही जे म्हणाल ते ." आणि तिने पुन्हा लाडिक हालचाली केल्या .
"बरीच चालू दिसतेस हा "
"तुमि बी काय कमी नाही की!"
किशन ( केशर) वसंतला अगदी चीटकून बसला होता .
वसंत नि केशर चा हात पकडला तशी ती तिथून पळाली .
रात्री सगळी कामं आटोपून दोघे त्यांना दिलेल्या खोलीत गेले ,तशी किशन नि भराभरा साडी सोडून फेकली .
"हॅट लेका ! हे सांभाळणं फार अवघड आहे रे!"
"फार दिवस नाही , बस थोडी कळ काढ "
किशन सगळे कपडे फेकून चड्डी बनियन वर लोळत असतांनाच वसंत तिथे आला .
"धोंडू ?....दार उघड "
आता आली का पंचाईत! सगळं मुसळ केरात जाईल ह्या भीतीनं तशाच अर्धनग्न अवस्थेत किशन नि अंगावर पांघरूण ओढलं आणि आपले सगळे कपडे गुंडाळून आत लपवले .
" काय साहेब ?" धोंडू
" काय रे? ही तुझी बायको इतक्या लवकर कशी झोपली?
पवन नि पाहिलं , पांघरुणातून पट्ट्यापट्ट्याची चड्डी दिसत होती. त्याने पटकन तिथे टॉवेल फेकला .
" त ..तिला ..थोडं..बरं वाटत नाहीये ...काही काम होतं का साहेब?"
"नाही , पण उद्या येईल न ती कामावर ?"
"हो साहेब. आपल्या सेवेत हजर !"
हे ऐकून वसंत ला गुदगुल्या झाल्या...आणि नाईलाजानेच तो वापस गेला .
" मासोळी सापडली जाळ्यात!" पवन चित्कारला तसा ताडकन उठून किशन ओरडला ,
"तुला काय जातंय ? उद्या त्यानि माझ्या अंगावर हात टाकला तर?"
"तर ? ही! ..ही!..ही!.." पवन ला हसू आवरले नाही.
"हसतोय काय? तुझ्या निर्मला काकीचा दोन वेळा फोन येऊन गेला. काय उत्तर देऊ? माझा बा चिडलाय तिकडं! " किशन चा जीव टांगणीला लागला होता .
"जाऊ रे लवकर , माझी मीना पण तर वाट बघतेय !"
वसंत सकाळी ऑफिसला जाण्यासाठी उठला आणि समोर केशर! गडद रंगाची साडी , चेहऱ्यावर भडक मेकअप , ते बघून वसंत लाघट पणे तिच्या जवळ गेला.
तिनंही त्याला जवळ ओढले...तो आता आणखी जवळ येणार इतक्यात "मालकीण!" असं म्हणून तिनं त्याला दूर लोटलं.
असच आणखी एक दोनदा झाल्यावर मात्र वसंत इरेला पेटला.
केशर च्या मागेच लागला ...."केशर , तू फक्त माझी हो ,
तुला कांय पाहिजे ते खुशाल सांग " म्हणाला .
त्याच्या ह्या अवस्थेची किशन वाटच बघत होता
" साहेब , मला न , इथे भीती वाटते , आपण कुठेतरी बाहेर भेटू , पण हे धोंडू ला कळता कामा नये. मला अंगठी घालायची खूप हौस आहे . मला बाकी काही नको , फक्त एक छानशी अंगठीच द्या .मला न , मूल होत नाहीये....एका बाबानी सांगितलंय की बोटात अंगठी घातल्यास होऊ शकेल......वाटल्यास काही दिवसांनी पुन्हा वापस करिन ....फक्त काही दिवस घालून बघू दे...मी कुणाला दाखवणार नाही, खरच!" ....तिनं वसंत ला अंगठीची गळ घातली.
तिच्यासाठी वेडा झालेल्या वसंत ला त्यातली गोम कळालीच नाही. तो ह्या गोष्टीला कबूल झाला .
पवन मात्र चिडला होता..."तुला वसंत च्या रुम मध्ये ह्या करता पाठवले का?....त्याच्या कपाटातून अंगठी काढून आन न! ....चाळे का करतोय?"
"तू न फक्त कॉप्या पुरवायच्याच कामाचा आहेस बघ!.....अबे , मी त्याला बाहेर घेऊन जातो , तू आमचे एकत्र फोटो काढ आणि मीनाच्या वडिलांना नेऊन दाखव !...
मग बघ तुझे सासरे कसे चिडतात ते! वश्याचा पत्ता कट!...मग काय , तू आणि मीना!"
"सॉलिड!!" पवन ने किशन ला आनंदाने मिठीच मारली .
ठरल्याप्रमाणे वसंत नि गाडी तयार ठेवली.
खूप नटून थटून केशर मागच्या फाटकातून जाऊन गाडीत बसला ..म्हणजे...बसली.
वसंत एकदम लट्टू झाला होता .
सारखा तिच्याकडे बघून घायाळ होत होता.
मागे काही अंतर राखून एका रिक्षातून कारचा पाठलाग करणाऱ्या पवनचे मात्र हातपाय गळाले होते......त्याला डोळ्यासमोर सारखी मिनाच दिसत होती.
कार एक हॉटेलपाशी थांबली . मागे काही अंतरावर रिक्षा पण.
केशरच्या कमरेभोवती हात घालून वसंत आत जातांना , काउंटर पाशी उभे असतांना असे त्याने अनेक फोटो काढले .
" साहेब , आपल्याला येतांना धोंडू ने पाहिलं तर नाही ना ?" आपल्या दाढीचे खुंट दिसू नयेत ह्याचा आटोकाट प्रयत्न करत किशन म्हणजे केशर म्हणाला .
" तू चिंत नको ग करू , मी आहे न! ..तू आता बघच मी तुला कसा मोत्याने भरून टाकतो ते."
"इश्श! मोती नकोत , मला फक्त एक अंगठी द्या ! "
"एक काय ,अनेक देईन" असे म्हणत त्याने किशन च्या अंगावर झेपच घेतली.
"अंगठी द्या न गडे " किशन लाडात म्हणाला .
"ही काय अंगठी ,पण आधी मला ...." वसंत त्याला आपल्याकडे ओढत म्हणाला .
त्याला शिताफीने टाळत , कपडे सांभाळत किशन ने आधी त्याच्या हातातील अंगठी घेतली आणि रूमच्या बाल्कनीकडे गेला .
पाईपावरुन चढून पवन बाल्कनीत येऊन थांबला होता.
त्याने ह्या दोघांचे भरपूर फोटो काढले होते.
अचानक वसंत ने किशन ला मागून येऊन पकडले , तशी त्याने ती अंगठी पवन कडे बाहेर फेकली .
वसंत ने अधिरपणे सरळ त्याच्या पदराला हात घातला.....किशन गरगर गरगर फिरला....अख्खी साडी वसंत च्या हातात आली.....किशनने भराभर उरलेले कपडेही काढून फेकले...उघडाबंब!!!
आत पट्ट्या ची चड्डी!...
वसंत चा तोंडाचा मोठ्ठा आ झालेला .
कपाळाला टिकली , पायात उंच टाचेच्या चपला ,आणि फक्त चड्डीत उभ्या किशन कडे बघून त्याला सगळा खुलासा झाला.
"तुझ्या तं !!! किशन्या ?...थांब! तूला बघतोच!!!" हे वाक्य पूर्ण होइपर्यंत किशन ने बाल्कनीतून उडी मारली होती...चपला आत फेकून दिल्या होत्या....त्यांचा आवाज ऐकून सिक्युरिटी खाली येऊन थांबला होता.
वरती वसंत...खाली सिक्युरिटी... आणि मध्ये किशन!
इकडे आड तिकडे विहीर! सिक्युरिटी ने त्याला धोपटायला सुरुवात केली.
कसाबसा बिचारा त्याच्या तावडीतून सुटला .
शेवटी आपल्या मित्रा साठी काय पण करायला तयार होता न किशन.
******
मीना आणि तिचे बाबा हॉल मध्ये बसले होते .
समोर अनेक फोटो घेऊन. आपला होणारा जावई असा कुण्या स्त्रीच्य नादी.......बाबांना वसंत बद्दल चीड आणि पवनचे कौतुक वाटत होते .
शिवाय तिच्या हातातली अंगठी पाहून बाबा एकदम इम्प्रेस्ड !!
आपल्या पोरीनं एक चांगला तडफदार जोडीदार शोधला म्हणून बाबा खुश!
******
"काय मग मीना वहिनी? ...कसा होता आमचा प्लॅन?" किशन ने साडीची घडी करत आत्यंतिक आनंदाने विचारले.
"केशर वहिनी , प्लॅन तर खासच!" मीना पवन ला चिटकत म्हणाली, "फक्त एक गोची आहे!"
".....आता काय? "
"ही तुम्ही आणलेली अंगठी 'ती' दोन लाख वाली नाहीये , ही मागे वसंत नि गाड्यावरुन घेतली होती , ती आहे , पन्नास रुपयांची!! "
पवन आणि किशन त्या धक्क्याने मटकन खालीच बसले.
© अपर्णा देशपांडे
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
