लेखिका - वीणा श्रीकांत काटे
(ही कथा 1967 च्या सुमारास लिहिलेली आहे. त्यामुळे ह्यातील संदर्भ त्या काळातील आहेत.)
किर्रर्र बेल वाजली. तासिका संपली.
आज कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची शेवटची तासिका. अभ्यासक्रम पूर्ण झाला होता.
कॉलेजला परीक्षेच्या पूर्वतयारीच्या सुट्ट्या लागल्या.
सगळे विद्यार्थी उठले. स्वाती ही उठली.
आता पुन्हा भेट केव्हा हे कोणीच सांगू शकणार नव्हतं. सगळे एकमेकांना परीक्षेच्या शुभेच्छा देत घराकडे पांगू लागले.
स्वाती देखील घराच्या रस्त्याकडे वळली.
शरद रस्त्यावरच उभा होता. दुरूनच त्याने हात उंचावला. तिनेही प्रतिसाद दिला. झपाझपा चालत ती त्याच्याकडे निघाली.
शरद आधी खरं तर तिच्या भावाचा मित्र आणि नंतर तिचा वर्गमित्र ! उण्यापुऱ्या सव्वा वर्षांच्या ओळखीत त्यांची अगदी घट्ट मैत्री जमली होती.
"स्वाती, आम्ही आता गाव सोडून चाललोय"
"काय ?" स्वाती आश्चर्याने उद्गारली.
"हो मामानी त्याच्या गावी बोलावलंय. आईला घेऊन चाललोय . बाबांच्या माघारी चार घरच्या पोळ्या करून तिनं मला सांभाळलं. आता मात्र तिला कष्ट करु देणार नाही. तसेही एकटीसाठी घरभाडे थोडीच परवडणार आम्हाला ?" एका दमात शरदनं स्वातीला घडाघडा पाठांतर केल्यासारखं बोलून दाखवलं !
शरद च्या घरी तो आणि त्याची आई दोघेच ! एका खोलीत मायलेकरांचा संसार !
शिकवण्या घेऊन शरदही घरखर्चाला हातभार लावी.
स्वातीच्या नजरेसमोरून शरदचा जीवनपट भराभर पुढे सरकू लागला होता. स्वातीच्या भावाचा मित्र म्हणून तिच्या घरात पहिल्यांदा आलेल्या शरद तिच्या डोळ्यासमोर तरळून गेला.
गोरटेला, किडकिडीत आणि हडकुळा मुलगा ! सुती शर्ट आणि पायजमा वापरणारा ! आकर्षक असं नव्हतं काही त्याच्या राहणीमानात !
तिच्या भावाच्या ओळखीनं तिच्याकडे तिची पुस्तकं, नोटस् मागायला आला होता. तिनं दिल्यावर त्यांनं किंचित झुकून थँक्यू म्हटलं होतं!
स्वातीला त्याची कृतज्ञता भावली.
तिची पुस्तक परत करायला दोन दिवसांनी तो पुन्हा आला . त्यानं तिच्या ह्या पुस्तकांना सुबक कव्हरं लावली होती . त्यावर सुवाच्च्य अक्षरात तिचं नाव लिहिलं होतं .
शरद चे विचार प्रगल्भ होते. बोलण्यात ठामपणा होता. त्याचा आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत नेहमी पहिला क्रमांक असायचा.
शरदच्या मर्यादशील वागण्याने स्वाती प्रभावित होऊ लागली.
आपोआपच त्याला अभ्यासात मदत व्हावी म्हणून लायब्ररीत तास न् तास बसून नोट्स काढू लागली.
त्याच्या अभ्यासातील अडचणी ओळखून स्वतः सोडवू लागली.
"तुझ्यामुळे माझं कॉलेज पूर्ण होऊ शकलं, स्वाती !" शरदच्या आवाजानं ती भानावर आली.
"आणि परीक्षा...???"
"मी एकटाच तेवढ्यापुरता येऊन जाईन पण आपली भेट होईलच असं नाही !" शरद भारावला होता.
"उत्पद्यन्ते विलियन्ते दरिद्राणां मनोरथा:" "पाण्यातल्या बुडबुड्याप्रमाणेच दरिद्री मनुष्याचे मनोरथ देखील उत्पन्न होताच विरून जातात. जर तू मला मदत केली नसतीस तर माझं शिक्षणाचे स्वप्न अपूर्णच राहिलं असतं !" शरद हळवा झाला होता.
"पुन्हा भेटूया", स्वातीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
दिवसांमागून दिवस जात होते अन् स्वातीला तिच्या भावाकडून शरदच्या हकीकती समजत होत्या.
शरद उत्तम गुणांनी पास झाला.
शरद एका ठिकाणी पार्ट टाइम जॉब करू लागला.
मामाच्या घराशेजारी छोटसं घर भाड्याने घेतलं.
शरदची प्रगती ऐकून स्वाती हरखून जाई.
हल्ली घरात तिच्या लग्नाचा विषय होई. या ना त्या कारणाने ती स्वतः तो टाळत राही.
"शरद स्थिरस्थावर होईपर्यंतच ! एकदा त्याची भेट झाली की ....!" ती मनोरथ रचत राही ...
दिवसामागून दिवस सरत होते... पाहता पाहता दीड वर्ष निघून गेलं.
श्रावण महिना सुरु झाला होता. आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी भरून गेलं होतं. का कोण जाणे पण स्वातीचा मनही आज अधीर झालं होतं!
शेजारचा चार वर्षांचा चिमुकला सागर तिच्या अवतीभवती लुडबुड करत होता.
"मावशी, गोष्ट सांग", स्वातीचा पदर धरून तो हट्ट करू लागला. स्वातीचे चित्त मात्र पलीकडील गल्लीत सायकलची घंटी वाजवत जाणाऱ्या पोस्टमन कडे लागलं होतं !
"मावशी, गोष्ट !" सागर ने एकच धोशा लावला होता.
"एक होती चिमणी आणि एक होता कावळा" .... खिडकीतली नजरही न हलवता ती सागरला गोष्ट सांगू लागली !
"कावळ्याचं घर होतं शेणाचं ! चिमणीचं घर होतं मेणाचं ! एक दिवस काय झालं खूप मोठ्ठा पाऊस आला ..."
पावसाचे टप्पोरे थेंब आता खिडकीतून आत येऊ लागले होते. पाहता पाहता थेंबांनी धारांचे रूप धारण केले.
"डिंग डाँग" डोअर बेल वाजली ! तिनं धावतच दरवाजा उघडला .
भर पावसात रेनकोट घालून पोस्टमन उभा होता.
प्लास्टिकच्या पिशवीतील एक लिफाफा काढून त्याने स्वातीच्या हातात ठेवला आणि तो विजेच्या वेगाने रस्त्यावरून दिसेनासा झाला.
"मावशी , पुढे काय झालं ?पाऊस आला मग पुढे काय झालं ??" सागरच्या आर्जवांकडे दुर्लक्ष करून तिने लिफाफा उघडला.
एकाच दृष्टीक्षेपात तिने लिफाफ्यावरचं अक्षर ओळखलं. तिचं हृदय धडधडू लागलं. घाईघाईने लिफाफा उघडून तिनं वाचायला सुरुवात केली.
"प्रिय स्वाती ,
तेथून निघाल्यानंतर तुला पत्र लिहिण्याचा अनेकदा विचार केला पण लिहू शकलो नाही."
एवढं वाचताच स्वातीच्या हृदयाची धडधड दुपटीने वाढली.
ती पुढे वाचू लागली.
"मला आता कॉलेजात लेक्चरर ची परमनंट नोकरी लागली आहे. मामाच्या शेजारीच तीन खोल्यांचा लहानसा ब्लॉक भाड्याने घेतला आहे .आई देखील आता लग्न कर म्हणून आग्रह धरते आहे."
स्वातीने डोळे मिटून घेतले तिची आतुरता आता तिच्या हृदयातून तिच्या डोळ्यात पोहोचली होती.
ती पुढे वाचू लागली...
"संगीता ...आईच्या मैत्रिणीची मुलगी ...आईने तिला सून म्हणून पसंत केली आहे. लग्न तुळशीच्या लग्नानंतरच होईल. पत्रिका घरी येईलच ! पण तुला विशेष निमंत्रण !नक्की यायचं हं !!
स्वातीच्या डोळ्यातली आतुरता आता अश्रू बनून झिरपू लागली होती .
अश्रूंचा बांध जणू फुटला होता . पावसाच्या मुसळधारा आता अंगणात , सागरला सांगत असलेल्या गोष्टीत आणि स्वातीच्या डोळ्यातही बरसत होत्या !
"मावशी, का रडते ? गोष्ट सांग ना ! खूप मोठ्ठा पाऊस आला तर मग काय झालं ??
"बेटा, चिमणीचं घर वाहून गेलं ....!!!
©वीणा श्रीकांत काटे
सदर लेख लेखिका वीणा श्रीकांत काटे यांचा असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
