काही बोलायाचे आहे पण...

© नीलिमा देशपांडे 





"अरे अचानक काय झाले तुला रागिणी? आजकाल हे नेहमीचे झाले आहे तुझे.

आपण सगळे बोलत बसलेले असतो आणि तू अचानक अशी मधून निघून येतेस आपल्या रुममधे !

आताही मीच बोलतो आहे...तुला काही सांगायच असेल तर बोल ना घडाघडा, आम्ही बोलतो तसे...
निर्णय झाला की पुन्हा तुझी भूणभुण राहते.... माझे मत वेगळे होते म्हणून! 

आता तरी बोलणार का? की आम्ही ठरवून टाकू?


"सुधीर तुम्ही सगळे काय ठरवायचं ते ठरवा...मी माझ्या बेटू सोबत रुममधेच ठीक आहे"


काहीसे हिरमुसले होत रागिणीने तिच्या आवडीचे गाणे लावले ,जे ती आजकाल अनेकदा ऐकायची....

"काही बोलायचे आहे पण बोलणार नाही.
 देवळाच्या दारामधे भक्ती तोलणार नाही.... 
माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे पण पाकळी तयाची कधी फुलणार नाही...."


" रागिणी, हे गाण लावून काय सांगू इच्छीतेस तू? 

याचा अर्थ तुला आजही जे मी आणि आई बाबा बोलत होतो ते पटलेले नाही हे उघडपणे कळतय!

 जे मित्र मैत्रिणी आपल्या दोघांना लग्नांआधी सतत एकत्र पाहून लव्हबर्ड्स म्हणून चिडवायचे ते आता "An apple a day, keeps a doctor away!" म्हणायला लागलेत. 

एक डेंटिस्ट म्हणून तू आणि एमडी म्हणून मी किती स्वप्न पाहिली होती आठवत नाही का? 

आता करिअर तर सोड पण घरात देखील आपण एकमेकांशी बोलणे कमी केले आहे..."


रागिणी सगळं निमुटपणे ऐकून घेत होती पण बोलत नव्हती. 

सुधीर वैतागून बाहेर निघून गेला आणि आणखी एकदा रागिणी मनातल्या गोष्टी बोलू शकली नाही. 

लग्नानंतर वर्षभराच्या अनुभवाने तिला एकटेपणा जाणवत असताना लेकिचा जन्म झाला आणि मग तिची मुलगी तिचे सारे विश्व बनली. 

रागिणी त्यामूळे तिच्या बाबतीत खुप पझेसिव्ह झाली होती.

सुधीर सोबत वाद वाढत गेले आणि शेवटी ती लेकिला घेऊन कायमची माहेरी गेली.

काय आणि कशामुळे गोष्टी या थराला गेल्या हे सुधीरला किंवा त्याच्या आई वडीलांना उमजत नव्हते. 

नकळत काहीतरी मनात चुकीचे पेरले गेले आणि ते साठले असावे ज्याचा हा परिणाम आहे, इतपत कळण्याइतके ते समजदार होते. 

जे पेराल ते उगवते ही म्हण, शेतात पेरलेल्या बियाणा सारखीच मनात शिरलेल्या छोट्या बाबींनाही लागू पडते. 

काही वेळा आपण स्वत: काही पेरले नसले तरी आपोआप पिकासोबत उगवलेले गाजरगवत, शहाणा शेतकरी जसा काढून टाकतो तसे रागिणीच्या मनात झालेले गैरसमज दूर कसे करायचे हे समजण्यासाठी सुधीर एका मैरेज कोचला भेटला.

"रागिणीला परत आणण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे.

मी माझ्या पालकांचा एकुलता एक मुलगा आहे. आई बाबा डॉक्टर असल्यामूळे लहानपणापासून मला त्यांच्या माघारी अनेक निर्णय एकट्याने घेण्याची सवय लागली. 

आम्ही सगळे खुप बोलके आहोत. रागिणी एकटीच आमच्यात शांत आणि कमी बोलणारी. काहीसा अबोल असा तिचा स्वभाव मला आवडायचा आणि माहित होता त्यामूळे मला सुरुवातीला वाटले की, तिला आमच्या गप्पा ऐकणे आवडते. 

नंतर अचानक ती एकदा म्हणाली की तुम्ही सगळं ठरवून टाकता, मला संधीच मिळत नाही.....

आणि मग हा वाद हळूहळू वाढत गेला....तो इतका विकोपाला जाईल याची कल्पना नव्हती...आणि आता काय करू ते कळत नाही..."

सुधीरने कोचचे काही सेशन्स केले आणि दरवेळी त्याला त्याचा फायदा होत गेला. 

खुप प्रयत्न करून त्याने पुन्हा एकदा रागिणीचे मन आणि विश्वास जिंकून तिला घरी परत आणले. 

खुप खुश होत ते दोघे स्वत: कोचशी बोलले आणि मनापासून त्यांनी आभार व्यक्त केले. 

त्यांच्या एकत्र येण्याचा आनंद कोचलाही झाला होता. 

शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या,

" ही तूम्हा दोघांची दुनिया आहे. ती तुम्हीच सावरायची. सुधीर तुला आणि तुझ्या पालकांना जसं पटकन व्यक्त होता येत, तसं रागिणीच्या बाबतीत नाही.

हे तू आता समजून घेतलं आणि गोष्टी सुरळीत व्हायला सुरवात झाली. 

ती इमोशनल आहे. वाद झाला की त्यावर समाधान कारक उत्तर मिळेपर्यंत ती गोष्ट तिच्या मनात राहते, जे ती बोलूनही दाखवत नाही.

काही जणांना व्यक्त व्हायला आणि स्वत:चे मत पट्कन द्यायला जमत नाही. 

तुम्ही तिघे घरात, एका गटात असल्यासारखं झालं होत. रागिणी एकटी पडत गेली.यानंतर एकमेकांना समजून घेताना तिलाही तिचे मत आहे जे, ती उशिरा का होईना, हळूहळू व्यक्त करेल ह्याची काळजी तुम्ही घ्याल ही खात्री आहे मला.

आताच तू तिचे ऐकण्यासाठी वेळ दिला आणि तिचे मन जिंकलेस. खुप काही नको असतं नात जपायला, जर एकमेकांना समजून घेताना मनापासून वेळ दिला आणि प्रयन्त केला तर!"

ही गोष्ट कायमची लक्षात ठेवत, सुधीर आणि रागिणी आता त्यांची मुलगी आणि सुधीरच्या पालकांसोबत आनंदात जगत आहेत.



* 'लग्नाच्या' गाठी ! हया संग्रहातील कथा हया क्षेत्रातल्या तज्ञ : 'Millennial' Marriage Coach लीना परांजपे ह्यांच्या अनुभवांवर आधारीत असून त्यांना मी शब्दबद्ध केले आहे. यातील मुद्दे, कथानक हे सत्यकथांवर आधारीत असल्याने त्यातील नमुद केलेल्या अडचणी किंवा उपाय हयात बदल न करता, स्थळ काळ, नावे असे गरजेचे बदल केवळ करुन कथा लिहिल्या आहेत. त्यामूळे हया कथां कडे 'आमची मते वैयक्तिक मते किंवा विचार देणाऱ्या' अशा दृष्टीकोनातून न पाहता जागरुकता म्हणून वाचल्यास त्या आपल्याला खूप काही सांगून जातील हे निश्चीत!

*आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी.

*आपला अभिप्राय खुप महत्वाचा, तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधे आपले मत जरूर कळवा.


©®: नीलिमा देशपांडे 

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने