भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा!

© डॉ सुनिता चौधरी




"काहीही करा डाॅक्टर ! पण माझ्या मुलाला आणि नव-याला वाचवा हो ...! त्या दोघांशीवाय माझं काहीच नाहीये " म्हणत, वैदेही हुमसत - हुमसत डाॅक्टरांशी बोलत होती.

"हे बघा ताई ! आम्ही आमचे प्रयत्न करतच आहोत पण अपघात खुप मोठा झालाय आणि तुम्ही तर सगळं बघतच आहात " म्हणत डाॅक्टर हताशपणे तिथून निघून गेले.

वैदेही कितीतरी वेळ डाॅक्टरांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहातच बसली होती. 

हतबलता काय असते याचा जवळून अनुभव घेत वैदेही तीथल्याच एका खुर्चीवर मटकन बसली. 

समोरच असलेल्या आयसीयूच्या बाहेरून दिसणाऱ्या काचेकडे ती शुन्यात नजर लाऊन बसली होती. अचानक काहीतरी व्हावं आणि भयानक अपघातातून तिचा मुलगा आणि तिचा नवरा वाचावा एवढीच तिच्या मनाची हाक होती.

दिवसांमागून दिवस जात होते. डाॅक्टरांचे प्रयत्न चालूच होते. 

आतापर्यंत सतत हाॅस्पीटलला येऊन नातेवाईकही आता कंटाळले होते.

वैदेहीला सासू-सासरे नव्हते आणि बरेच नातेवाईक येऊन भेटून जात होते पण आपलं म्हणावं असं कोणी नव्हतं. 

वैदेहीचे आईवडील होते, त्यांनी तीला बराच आधारही दिला होता पण शेवटी त्यांनाही त्यांची कामं होतीच की, असं कीती दिवस ते तीला सोबत करणार होते म्हणून स्वतः वैदेहीनेच त्यांना जायला सांगितलं. 

आता सगळे खटाटोप ती स्वतः च करत होती शेवटी लोकांची मदत तीला कीती दिवस पुरणार होती?......

सोबतीला कोणी नसूनही एक आई आणि एक बायको तिथे तग धरून होते. कोणा एकाचंही दु:ख तीला सहन होणारं नव्हतं. तिने अजूनही आशा सोडली नव्हती.

एव्हाना पंधरा-सोळा दिवसात तिला हाॅस्पीटलमधलं आणि त्या बाहेरचंही बरंच काही माहित झालं होतं. 

ती संध्याकाळी थोड्या वेळासाठी हवापालट करायला हाॅस्पीटलच्या बाहेर यायची.

तिथे जवळच बरीच बैठी घरं होती अाजूबाजूला बरीच झाडं असल्याने तिथे तिचं मन प्रसन्न व्हायचं. 

समोरच बसायलाही जागा असल्याने वैदेही तिथपर्यंत जात काही वेळ त्या जागी बसायची.

तीचं मन तर भरलेलंच होतं पण आता रोज -रोज रडूनही काय होणार आणि तीच स्वत: खचली तर तीच्या नव-याला आणि मुलाला कोण बघणार म्हणत ती रोजच्या ह्या लढाईला लढण्यास सज्ज व्हायची.

वैदेही तीच्या भावनांमधे गुंतली होती. तितक्यात अगदीच कर्कश्य आवाजात परत 'तेच' सगळं सुरू झालं......

"कशाला जनमलास रं तू ,..... मरत का न्हाईस ? आईबापाला खाल्लंस अन् हितं येऊन मामालाबी गिळलास अपशकूनी कुठला" म्हणत, समोरच्या एका बैठे घरातून ती बाई रोज त्या मुलाला मारायची. 

मुलगा साधारण आठ वर्षाचा होता.
 
आतापर्यंत तिथल्या लोकांच्या बोलण्यातून वैदेहीला इतकं समजलं होतं की, ती बाई त्या मुलाची मामी आहे आणि त्या मुलाला सगळे किश्या म्हणत होते.

ह्या सात-आठ दिवसात जवळजवळ वैदेही हाच प्रकार रोज पहात होती. 

त्या मुलाला त्याची मामी शिव्या घालत रोज मारायची आणि ते आठ वर्षाचं निरागस लेकरू , मार खात रोज बाहेर येऊन हमसाहमशी रडायचं.

किश्या मार खाऊन झाल्यावर हमसाहमशी रडत वैदेही जवळच काही अंतरावर बसायचा आणि नजर शुन्यात ठेऊन; आज ना उद्या ही परिस्थिती बदलेल याची वाट पहायचा.
 
कितीतरी वेळा वैदेही आणि किश्याची नजरानजर व्हायची. कोणी कोणाचं दु:ख कमी करावं म्हणत त्या दोघांचे डोळे एकमेकांशी बोलायचे.
 
बराच वेळ झाला की वैदेही उठायची आणि जाताजाता पुन्हा एकदा मागे वळून जेंव्हा पहायची तेंव्हा किश्या तीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात केविलवाणा झाल्यासारखा वैदेहीला भासायचा.

"आनंद वाटता येत असतो पण दु:खाचे वाटेकरी खुप कमी असतात निदान आपलं दु: ख कोणालातरी कळतयं हेच खुप मोठं असतं".

वैदेही हाॅस्पीटलला पोहोचली हताश नजरेने आयसीयूच्या काचेतून तिने आत डोकावलं तर तिचा नवरा आणि मुलगा , होते त्याच परिस्थितीत शांतपणे बेडवर पहुडले होते. 

एक दीर्घ सुस्कारा सोडत वैदेही परत बसली.
  
किश्याचा चेहरा काही केल्या तिच्या नजरेसमोरून जात नव्हता. 

दिवसेंदिवस तीची बेचैनी वाढतच होती.
 
असेच अजून काही दिवस गेले. रोज तेच आयसीयू ,वैदेही, आणि किश्या ....

किश्याचा मार कधी चूकतच नव्हता. त्याला वाचवायला शेजारी यायचे पण उपयोग नव्हताच "इतकं गुणी पोरगं , असंच मार खात मरणार म्हणत शेजारीही त्याच्यासाठी हळहळायचे". 

पण किश्याचे भोग काही केल्या संपत नव्हते. आणि वैदेहीची अस्वस्थता अजूनच वाढत जात होती.

महीना होत आला होता पण आज काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळं झालं होतं.

"सकाळपासूनच डाॅक्टरांची टीम आयूसीयूत टिकून होते. 

वैदेहीने काचेतून आत डोकावताच तिच्या मनात धस्सsss झालं. 

आज काहीतरी सोक्षमोक्ष लागेल ह्या भीतीने तीची बोबडी वळत होती. 

डाॅक्टरांचे अथक प्रयत्न चालूच होते आणि वैदेहीची पापणी लवत नव्हती. 

एव्हाना दुपार झाली नव-याजवळच्या माॅनीटरवरची रेष सरळ झाली झाली तितक्यातच मुलाची स्थितीही गंभीर झाली. 

नवरा गेल्याचं दु:ख करावं का निदान मुलगातरी वाचावा याची भाबडी आशा करावी म्हणत तीची नजर आता मुलावर खिळून होती. 

आभाळ गच्च भरलं होतं. पाऊस कधी धो धो करत कोसळेल याची शाश्वती नव्हती. 

संध्याकाळ होत होती डाॅक्टरांचे प्रयत्न चालूच होते आणि अखेर मुलाजवळच्या माॅनीटरवरचीपण रेष सरळ झाली आणि डाॅक्टरांनी मान हलवली".

वैदेहीने एक आर्त किंकाळी फोडली. 

ती हाॅस्पीटलमधून बेभान होत बाहेर पळू लागली अंधार वाढला होता. 

ती रोजच्या ठिकाणी आली. आजही किश्या मारच खात होता मार खात तो आणि वैदेही समोरासमोर आले. किश्याचं भरलेलं मन अजूनच बेभान झालं आणि तो रडतच वैदेहीकडे पाहू लागला.

आज मात्र किश्याच्या रडण्यात वैदेहीचा सुरही मिसळला होता इतके दिवस अ‍ॅक्सीडेंट झालेल्या शरीराशी झुंजणारा तिचा नवरा आणि मुलगा तिच्या हातून निसटले होते. 

"आभाळ गच्च भरुन आलं होतं किश्या मार खाऊन रडत होता अचानक वैदेहीने जाऊन किश्याला मिठी मारली. 

दोघांनाही जगण्यासाठीची एक नवीन उमेद मिळाली होती. 

भरुन आलेल्या आभाळात सोनेरी कडा आली. पाऊस कोसळत होता अन् त्यांची मिठी घट्ट होत गेली".

समाप्त.


एकीकडे कोणीतरी हातून निसटत होतं तर एकीकडे कोणाशी तरी दु:खाचं नातं मजबुत होत होतं. आपलं नातं कधी, कुठे, कोणाशी आणि कसं जुळेल कोणीच सांगू शकत नाही ?...
वैदेही आणि किश्याला आता एकमेकांचा आधार होता. आभाळ जरी भरलेलं असलं तरी त्याला एक सोनेरी किनार असतेच नाही का?

© डॉ सुनिता चौधरी

सदर कथा लेखिका डॉ सुनिता चौधरी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!! 📝

माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने