ओझे

  © धनश्री दाबके




"अगं, एवढं काय भरलयंस ग ह्या बॅगेत? अठ्ठावीस किलो वजन झालंय हीचं. तेवीसचं लिमिट आहे एअरलाइन्सचं. माहितीये ना?" राजेश वैतागलाच. 

"अरे हो. तू आत्ताच तर वजन काटा आणलास ना? करुया थोडं सामान इकडे तिकडे. होईल मॅनेज" वनिता समजुतीच्या सुरात म्हणाली.

" नाही. काहीही इकडे तिकडे करायचं नाही. 

बाकी सगळ्या बॅग्स व्यवस्थित सेट झाल्यात. ही तुझीच काय ती इतकी जड आहे. तेव्हा अजिबात बाकीच्या बॅगांना हात लावायचा नाही आता. 

उद्या निघायची वेळ आली तरी तुझं हेच चाललय अजून. 

मान्य आहे आपण तिकडे परदेशात बिऱ्हाड थाटतोय पण तरी किती सामान घ्यायचं बरोबर. कानी कपाळी ओरडून सांगतोय की सगळं मिळतं तिकडे. पण तुला कळेल तर ना"

रागारागाने राजेशने वनिताची बॅग उघडली आणि हे काय आहे बघू, ते काय आहे बघू करत तो त्यातलं सगळं सामान उचकायला लागला. 

ते पाहून वनिताला ब्रम्हांड आठवलं. 

आता हा आपल्याला सगळं परत भरायला लावणार ह्या विचारानेच तिच्या पोटात गोळा आला. 

"तुला ही साडी घेतांनाच बजावलं होतं ना,  ही इतकी जड डिझायनर साडी घेऊ नकोस म्हणून. पण तुम्हा बायकांच्या हौसेला काही अंतच नाही ! 

आणि तुझ्या साड्या कमी म्हणून अजून ही आईंचीही साडी घेतलीस. 

गेल्या बारा वर्षांत तू किती वेळा साड्या नेसल्यास ते पाहातोय मी. आणि हे काय? हा इतका जड दासबोध? 

आता हा कधी वाचायचा? समर्थ, तुम्हीच वाचवा हो मला आता. हे सगळं काढून टाक. 

ग बघ कसं वजन कमी होईल ते. हे कमी केलंस की एखादं जॅकेटही मावेल ह्यात अजून. तिकडे थंडी असते. कामाला तरी येईल ते ह्या साड्या आणि दासबोधापेक्षा." 

राजेश उठला आणि त्याचं कपाटातलं जॅकेट घेऊन आला

" हे घे. हे जॅकेट भर आणि साड्या ठेवून दे इथेच." 

आईची ती काळी साडी काढलेली पाहून वनिताचा चेहरा पडला. 

" अरे ह्या एका साडीने काय होणारे?" 

पण राजेश काही ऐकायच्या मूडमधे नव्हताच. 

"तुला सांगितलं  न एकदा? आता परत चर्चा नको. 

मी बॅंकेत जाऊन येतोय. करंसी एक्सेंज करायची आहे आणि बाकीही लास्ट मिनिटची काही कामं आहेत ती आटोपून येतो." 

असं म्हणून रागातच राजेश बाहेर पडला. 

राजेशनी बॅगेतून काढलेली आईची ती काळी साडी आणि दासबोध पाहून वनिताला आईची आठवण आली. 

साडीवर  हात फिरवत वनिता तिथेच बसून राहिली. 

आधीच गेल्या दोन तीन महिन्यांपासून तिची फक्त धावपळ सुरु होती. 

लॉंगटर्मसाठी परदेशात निघाले होते वनिता, राजेश आणि त्यांचा आठ वर्षांचा सौमित्र. 

परदेशी जायचं म्हणून वनिताने नोकरी सोडली होती. 

तसंच आठव्या वर्षी ड्यू असलेली सौमित्रची मुंज जाण्याआधी करावी म्हणून गेल्याच महिन्यात त्याची मुंजही पार पाडली होती. 

त्यामुळे ऑफिसमधे राजीनामा, चार्ज हॅंडाओव्हर आणि घरात मुंजीची तयारी, नातेवाईक, केळवणं, बोलावणी, खरेदी, ग्रहमख आणि मग मुंज. 

कामांच्या रगाड्यामुळे वनिताची कंबर मोडायची वेळ आली होती. 

मुंजीच्या व्यापातून जरा शांतता मिळतेय न मिळतेय की लगेच परदेशी जाण्याची तयारी सुरु झाली होती. 

अजून वेळ आहे करता करता आता निघायचा दिवस अगदी उद्यावर येऊन ठेपला होता. 

इथलं इतक्या वर्षांच बसलेले बस्तान सोडून पुन्हा नव्याने सगळा संसार मांडायचा होता. जीवलगांना सोडून लांब जायचं होतं. 

सौमित्रही आजी आजोबा, शाळेतले मित्र या सगळ्यांना सोडून जायचं म्हणून उदास होता. 

नाही म्हंटलं तरी इतक्या धावपळीचा, संमिश्र मनस्थितीचा आणि आयुष्यात येऊ घातलेल्या एका मोठ्या बदलाचा ताण वनिताच्या मनावर आलाच होता. 

त्यात उद्या निघायचं आणि आज राजेश सारखा तिच्यावर चिडत होता. 

शेवटी वनिताच्या संयमाचा बांध फुटला आणि ती आईच्या साडीवरुन हात फिरवत रडायला लागली. 

वनिताने तिला नोकरी लागल्यावर पहिल्या पगारात ही काळी साडी  तिच्या आईला संक्रांतीसाठी घेतली होती. 

किती आनंद झाला होता आईला तेव्हा. 'मी कधी घराबाहेर पडले नाही पण तू आज स्वतःच्या पायावर उभी राहिलीस. माझे अपूर्ण स्वप्न तू पूर्ण केलंस.' हे म्हणतांना आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. 

माझ्या पहिल्या पगाराची ही आठवण आईने शेवटपर्यंत अगदी जीवापाड जपली. 

सौमित्रच्या पहिल्या संक्रांतीलाही आईने हीच साडी नेसली होती. 

आई गेल्यावर तिच्या सगळ्या साड्या मी वाटून टाकल्या पण ही मात्र तिची आठवण म्हणून माझ्या बरोबर आणली. 

तसाच हा दासबोध. सतत वाचायची आई. 

तोही तिची आठवण म्हणून जपलाय. 

नोकरीच्या धावपळीत कधी वाचायला जमलं नाही पण आता तिकडे रिकामा वेळ मिळेल तर वाचावा या विचाराने घेतला होता बॅगेत. 

वनिता विचारांच्या फेऱ्यात अडकली. 

ही डीझायनर साडी. ही तर गेल्याच महिन्यात मुंजीसाठी घेतेलेली. जड आहे खरी पण दिवाळीला नेसावी म्हणून घेत होते. 

ही साडी घेऊन जाणं तितकं महत्वाचं नाही पण या नेमक्या आईची आठवण म्हणून घेतलेल्या गोष्टींचच एवढं ओझं व्हावं इतक्या मोठ्या सामानात?  

जाऊ दे आता. 

राजेशने एकदा ठरवलं म्हणजे परत बोलण्यात काही अर्थ नाही. 

जड मनाने वनिताने साड्या आणि दासबोध परत कपाटात ठेवला. 

रुममधे समोरच कॉंप्युटर ट्रॉलीवर आईच्या फोटोची फ्रेम होती. तीच आईची आठवण म्हणून बॅगेत टाकली आणि वनिता पुढच्या कामाकडे वळली. 

राजेशचीही खूप धावपळ चाललीये. तो तर आपल्यापेक्षा अजून कितीतरी आघाड्या सांभाळतोय. 

त्यात त्याचं ऑफिसचं कामही चालूच आहे. 

त्यामुळेच त्याची इतकी चिडचिड होत असेल असा विचार करुन वनिता शांत राहिली. 

तासा दोन तासांनी राजेश त्याची कामं आटोपून घरी आला. 

आल्यावर परत त्याने बॅगेचं वजन केलं तर आता ते बरोबर लिमिटमधे बसत होतं. 

चला आता सगळ्या बॅगा फायनल झाल्या ह्या विचाराने त्याने एक सुटकेचा श्वास टाकला. 

बॅगा एका कोपऱ्यात रचून ठेवल्या आणि तो रुममधुन बाहेर पडणार तोच त्याला जाणवलं की ट्रॉलीवरचा सासूबाईंचा फोटो आता दिसत नाहीये. 

कुठे असेल? 

वनिताने कपाटात तर नसेल ठेवला म्हणून त्याने कपाटात चेक केलं आणि मग त्याला शंका आली म्हणून त्याने वनिताची बॅग चेक केली तर त्यात फोटो दिसला. 

अरे.. आईची आठवण म्हणून वनिता ती काळी साडी आणि दासबोध घेत होती. ती साडी वनिताच्या मनाच्या किती जवळ आहे. तिची खास आठवण आहे ती आयुष्यातली. आजही जणू आईच्या मायेची उब मिळते तिला त्यातून. मगाशी हे सगळं कसं विसरलो मी? 

वनिता  सांगत होती पण मी काही ऐकूनच नाही घेतलं तिचं. 

असा कसा वागलो मी? 

बॅगेतलं ओझं कमी करतांना तिच्या मनावर माझ्या हेकेखोरपणाचं किती ओझं लादलं मी? 

ती बिचारी माझ्या करीअरसाठी स्वतःच सगळं सोडून माझ्यामागे निघाली आणि मी? 

तिला चार पाच किलोंसाठी एवढं मणभर दुखावलं??  

काय झालं असतं थोडं तिच्या कलाने घेतलं असतं तर? चुकलोच मी. 

पण बरं झालं आत्ता तरी उजेड पडला ते. मग घाईघाईने राजेशने त्याचे जॅकेट बॅगेतून काढले आणि सासूबाईंची ती काळी साडी आणि दासबोध परत बॅगेत भरला. 

हा इतका वेळ काय करतोय ते बघायला तिथे आलेल्या वनिताने दारातूनच त्याला साडी बॅगेत ठेवतांना पाहिलं आणि ती तिथेच उभी राहिली. 

परत तिचे डोळे भरुन आले. 

बॅग व्यवस्थित बंद करुन मागे वळलेल्या राजेशला वनिता डोळे पुसतांना दिसली. 

दोघांची नजरानजर झाली आणि वनिता त्याच्याकडे पाहून मनभरुन हसली. 

तिच्या नजरेतल्या समाधानाने राजेशच्या मनावरचं तिला दुखावल्याचं ओझं क्षणात उतरलं आणि त्याने तिला मिठीत घेतलं. 

समाप्त

©® धनश्री दाबके


📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने