©वीणा श्रीकांत काटे
"बडनेरा रेल्वे स्टेशन वर आपले स्वागत आहे"... निवेदिकेचा मधाळ स्वर गुंजताच नीलाताईंनी कान टवकारले.
एकाच वेळी त्यांचे कान निवेदिकेच्या सूचनेकडे लागले तर डोळे सुधीरला शोधू लागले.
"आत्या, चल, लवकर ए-1 बोगी पलीकडे लागणार आहे असं म्हणत सुधीर धावतच आला आणि त्याने तिच्या अवजड बॅगा चालवायला सुरुवात देखील केली!
नीलाताई देखील त्यांची क्रीम रंगाची साडी, पर्स आणि चष्मा सावरत त्याच्या मागे धावू लागल्या.
त्यांची ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली तसं सुधीरनं त्यांचा बर्थ शोधून सामान बर्थखाली नीट लावून दिलं.
"मी निघू ?" सुधीरनं विचारलं अन् "बाबांना फोन कर गाडीत बसली म्हणून ! आई-बाबा काळजी करतात !" एवढं बोलून तो गाडी सुरू होण्यापूर्वीच प्लॅटफॉर्मवरून दिसेनासा झाला.
नीलाताईंनी हॅंडबॅगमधून शाल काढून अंगावर पांघरून घेत आजूबाजूला सहप्रवाशांकडे नजर टाकली.
खरंतर ही गाडी अडनिड वेळेची. हिला गर्दी कमीच . तिचं कंपार्टमेंट रिकामंच होतं . फक्त कुणीतरी वरच्या बर्थवर ताणून दिली होती.
खरंतर नीलाताईंना गाडीत बसवण्याची गरज नव्हती. त्या स्वतः व्यवस्थित गाडीत चढू शकल्या असत्या. साठीच्या असल्या तरी त्या अजूनही चपळ होत्या.
अमरावतीच्या नामवंत शाळेमध्ये साध्या शिक्षिकेपासून मुख्याध्यापिकेपर्यंतची मजल त्यांनी स्वबळावर मारली होती.
दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या त्यांच्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहात होत्या. दोन वर्षांपूर्वीच सहा सहा महिन्यांच्या अंतराने त्यांचे आईवडील दोघेही देवाघरी निघून गेले.
त्यांच्याजवळ लहानाची मोठी झालेली त्यांची लाडकी भाची देखील लग्न होऊन संसारात व मुलाबाळांत रमली होती.
एकटेपणा खायला उठला म्हणून त्या आता भारतभ्रमणाला निघाल्या होत्या ...एकट्याच !
"तुम्ही निलांबरी देशपांडे ना ?" स्वतःचे नाव कानावर पडताच त्यांनी आवाजाच्या दिशेने वळून पाहिले.
वरच्या बर्थवर साधारण त्यांच्याच वयाचा एक पुरुष उठून बसला होता. त्यांच्या उत्तराची वाट न बघताच तो भराभर बर्थ वरून खाली उतरला.
या वयातील त्याच्या चपळपणाचे नीलाताईंना खरोखर कौतुक वाटले.
त्यांनी हसून होकारार्थी मान डोलावली.
खरं तर त्यांना हा चेहरा ओळखीचा वाटत होता.
त्यांनी मनातल्या मनात अनेक नावांशी त्या चेहऱ्याच्या जोड्या जुळवून पाहिल्या. पण चेहरा आणि नाव यांची संगती काही जुळेना .
उगाच फजिती नको म्हणून चेहऱ्यावर स्मित आणत त्या म्हणाल्या ... "आपण....?"
"मी सुरेश जोशी ! रुक्मिणीनगरच्या वाड्यात तुमच्या वरच्या खोलीत राहायचो मी ! गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होतो ! शेखर चा मित्र !!
"हां हां, आठवलं !" भावाचे नाव ऐकताच नीलाताईंना क्ल्यू मिळाला.
अमरावतीला रुक्मिणीनगरला त्यांचा मोठ्ठा वडिलोपार्जित वाडा होता.
त्यातील एक खोली कायम विद्यार्थ्यांना राहण्यासाठी भाड्याने दिली जायची . हा सुरेश जोशी बहुदा चाळीसेक वर्षांपूर्वी त्या खोलीत राहत होता.
इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता ! समवयस्क असल्याने शेखरचा, तिच्या भावाचा चांगला मित्र झाला होता.
तिच्या आईला सगळ्यांना खाऊ-पिऊ घालायची आवड !
त्यात हा आई-वडिलांपासून दूर एकटा राहणारा ! बरेचदा चहा फराळाला तर कधी गप्पा मारायला घरी यायचा. तास न् तास गप्पा रंगायच्या.
नीला तेव्हा नुकतेच बीए होऊन शाळेत शिक्षिका म्हणून लागली होती.
सुरेश घरी आला की शेखरशी गप्पा मारत बसे.
कधीकधी नीला ही त्यांना सामील होई.
"छान दिवस होते ते !" त्यांना अगदी आतून वाटून गेलं !
इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा होताच सुरेश गावी निघून गेला ...तो आज भेटला ...अचानक आगगाडीत !
"कुठे असता हल्ली ?" विचारांची साखळी तोडत तिनं करायची म्हणून जुजबी चौकशी केली.
नागपूरला असतो ... एक मुलगा आहे.... मुलगा व सून दोघेही पुण्याला आयटी कंपनीत आहेत. एक मुलगी आहे ती लग्न होऊन नवऱ्याबरोबर सॅन फ्रान्सिस्कोला स्थायिक झाली आहे. दोन नाती आहेत मला ! " सुरेशनं हातचं न राखता माहिती पुरवली.
"आणि पत्नी ?"
हो,हो ... ती मुलीच्या बाळंतपणासाठी सॅन फ्रान्सिस्कोला गेलीय ... नागपूरला एकटा राहून कंटाळलो... म्हणून निघालोय पुण्याला मुलाकडे..." सुरेश बरेच मनमोकळे होते.
"बरं झालं, हे भेटले..."
नीलाताईंच्या मनात आलं ! "आता प्रवास कंटाळवाणा होणार नाही !"
"छान वाटलं तुमच्या सुखी संसाराबद्दल ऐकून..." नीलाताईंनी तोंड भरून सांगितलं....
"तुमचं काय ?? घरी कोण कोण असतं ???
सुरेशच्या प्रश्नाने नीलाताई दचकल्या . हाच तो प्रश्न जो त्यांना नकोसा वाटे ...इतर कुठल्याही विषयावर तास न् तास चर्चा करू शकणाऱ्या नीलाताई या प्रश्नाला शक्यतो टाळत.
"मी एकटीच !" नीलाताईंनी नाराजीनं सांगितलं .
त्यांना जाणवलं ...सुरेशची नजर त्यांच्या गळ्यात मंगळसूत्राचा शोध घेतेय् ...
"आणि मिस्टर..." खरंतर नीला ताईंना आता त्यांना हा संवाद थांबवावसा वाटू लागला ...
"नाही ...लग्न नाही झालं माझं ..."
"काय ...?" सुरेशला खरोखरीच शॉक बसला असं नीलाताईंना वाटलं.
"नाही, म्हणजे का नाही केलं लग्न ?? एक स्थळ म्हणून खरंतर किती उत्तम होतात तुम्ही ! "
गहूवर्ण, नाकी-डोळी नीटस, लांब केस, उच्चविद्याविभूषित आणि गृहकृत्यदक्ष ... नीलाताईंना स्वतःच्या लग्नाकरिता बनविलेला बायोडाटा आठवून भडभडून आलं .
"नसतं कुणाच्या नशिबात...!" नीलाताई बोलू लागल्या...
"आई-बाबांनी, दादानी खूप प्रयत्न केले ! कुठे पत्रिका जुळली नाही तर कुठे मी पसंत पडले नाही ...खूप जोडे झिजवले दादाने आणि तेवढेच नकार पचवले मी ! खरंतर काहीच अपेक्षा नव्हत्या माझ्या...."
"पण प्रेमविवाह ...??"
"छे ! हो तसा कुणी मला भेटलाच नाही ! न कुणी मला लग्नाबद्दल विचारलं न मी कुणाला ..." नीलाताई आता मोकळ्या झाल्या होत्या ...
"मग काय पुढील शिक्षण घेतलं ..." नीलाताई पुढे सांगू लागल्या ..."नोकरी होतीच! पुढे पदोन्नती होऊन पर्यवेक्षिका झाले मग उपमुख्याध्यापिका शेवटची सात वर्षे मुख्याध्यापिका होते मी !" त्यांनी एका दमात सांगून टाकलं.
नीलाताईंना आता किती बोलू आणि किती नको असे होऊ लागलं ...
"पण मग शेखर ..."
"हो हो , शेखर दादा पण रिटायर झालाय ..." सुरेशला अर्ध्यातच तोडत नीलाताई सांगू लागल्या... "बँकेत होता ...त्याचंही छानसं चौकोनी कुटुंब ...
तुमच्यासारखंच ! "
नीलाताईंना अडवणं सुरेशला जीवावर आलं ! किती तरी दिवस साठलेले पाणी वाट मिळताच वाहू लागते त्याप्रमाणे नीलाताईंच्या मनातील गोष्टी आता भराभर ओठांवर येऊ लागल्या.
"दादाचं मात्र वेळेवर लग्न झालं ... आत्येघरी सून माझी वहिनी ! दादाची नोकरी बदलीची म्हणून दोघेही बाहेर गावी राहिले ... राजा-राणीचा संसार ... दोन मुले झाली पण वहिनीच्यानं दोघांना सांभाळणं होईना ! मग तिची मोठी मुलगी मी सांभाळली ती तीन वर्षांची असल्यापासून ! तिचं शिक्षण ,लग्न , सणवार, बाळंतपण ... सगळं सगळं केलं ... सुधीरच्या म्हणजे भाच्याच्या शिक्षणाला हातभार लावला..."
"आणि काकाकाकू ??" सुरेशनं तिच्या वाहत्या धबधब्याला बांध घातला.
"माझ्याकडेच ! वीस वर्षांपूर्वी आमचा वडिलोपार्जित वाडा विकला.
बाबांच्या हिश्श्याला आलेल्या पैशातून दादाने औरंगाबादला थ्री बीएचके घेतला ... त्याच्या सासुरवाडी जवळ !
आई-बाबांना तिकडे जाणं प्रशस्त वाटेना ! मग मीच त्यांना सांभाळलं.
त्यांचं म्हातारपण, दुखणीखुपणी, औषध-पाणी सगळंच ... अगदी दोघांच्याही शेवटपर्यंत! बाबांचं वर्षश्राद्ध झालं गेल्या महिन्यातच !" बोलून बोलून नीलाताईंना दम लागला.
"शेगाssव कचोssरी..." फेरीवाल्याचा आवाज ऐकताच सुरेश उठला .
"शेगाव आलं वाटतं" असं म्हणत तो गाडीच्या खाली उतरला आणि दोनच मिनिटात गरमागरम कचोरी बांधलेले दोन पुडे घेऊन गाडीत शिरला ....
गाडीनं शेगाव सोडलं होतं ... आपल्या उजव्या हातातील कचोरी चा पुडा सुरेशनं नीलाताईंच्या हातात दिला .
दोघेही खाली मान घालून कचोरी खाऊ लागले.
"नीलांबरी, तुम्हाला एक विचारू ?"
"हो, विचारा की !"
"म् म् मला नकार का दिला होतात तुम्ही ?
"मी ???" नीलाताईंच्या हातातला कचोरीचा तुकडा गळून पडला .
"शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुमचा वाडा सोडून मी घरी नागपूरला परतलो.
नोकरीच्या शोधात होतो. एक वर्षांनी नोकरी मिळाली आणि आई आप्पांशी बोललो तुमच्याबद्दल ... आप्पांनी तुमच्या बाबांना नागपूरला भेटायला बोलावलं ... मी लगेचच शेखरला पत्र लिहिलं ...तुम्हाला लग्नाची मागणी घालण्यासाठी आणि आप्पांचा निरोप देण्यासाठी ...!"
नीलाताईंच्या तोंडून शब्द फुटेना !
"पुढच्या आठ दिवसातच शेखरचं पत्र मिळालं मला ...तुमचा नकार कळवणारं ... तुम्ही तुमच्या एका सहशिक्षकात गुंतलाय म्हणून ..." बोलता-बोलता सुरेश ची बोबडी वळली.
नीलाताई देखील स्तब्ध होत्या. त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंना वाट फुटली होती.
"दादानी का केलं असं ? अन् किती वेळा ?? मला जे नकार आले, ते खरोखरच आले की ...?? आई-बाबांना ह्यातलं काही माहित होतं ??? दादाच्या लेखी मी कोण होते ? आई-बाबांच्या आणि दादा-वहिनीच्या संसाराला एक टेकू ??" त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक प्रश्नचिन्हं फेर धरून नाचू लागली ...
"भुसावळ आलं वाटतं !" एसीच्या बंद खिडकीतून बाहेरचा अंदाज घेत सुरेशनं शांततेला वाचा फोडली.
"अगंबाई , उतरायचं मला !" असं म्हणत नीलाताई सामान बर्थच्या खालून बाहेर काढू लागल्या.
तेवढ्यात त्यांच्या पर्समधला मोबाईल खणखणला. फोन बाहेर काढून त्यांनी स्क्रीनवरचं नाव वाचलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा बदलल्या. त्यांनी तो फोन कट करून पुन्हा पर्सच्या आत ठेवून दिला.
"कुणाचा फोन ? उचलला नाहीत ? अहो, प्लॅटफॉर्म यायला वेळ आहे अजून ! सुरेशनं धीर करून विचारलं.
"शेखर दादाचा !" एवढे बोलून नीलाताई एकट्याच त्यांच्या जडजूड बॅगांचं ओझं वाहत बोगीच्या दरवाज्याकडे चालू लागल्या ....
हातातल्या बॅगांपेक्षा आयुष्याचं ओझं कितीतरी जड झालं होतं त्यांना ...!!!
समाप्त
© वीणा श्रीकांत काटे
सदर लेख लेखिका वीणा श्रीकांत काटे यांचा असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
