प्रीत ( भाग 2 )

प्रीत ( भाग 2 )
सौ.  प्रभा निपाणे

एका कामगाराची बायको आजारी होती. तो त्याच्या मित्राला पाचशे रुपये उसने मागत होता. बोलला पगार झाला की त्याचं दिवशी परत करतो. त्यांनी हे संभाषण ऐकले. त्याला बाबांच्या हाती निरोप देऊन केबिन मध्ये बोलवले. खरतर बाबाच मनातून धास्तावून गेले होते. न जाणो बिचाऱ्या कामगाराला काय बोलतात ?

तो सुध्दा लगेच भीत भीत केबिन मध्ये गेला. साहेब म्हणाले काय रे जीतू काय झाले ?

काही नाही साहेब .

काही नाही काय ?

काय ते खर खर सांग ?

खरच काही नाही साहेब.

तु निलेश ला पाचशे रुपये का मागत होता ?

दारू प्यायला का ?

नाही साहेब, मी दारू नाही पित. कोणाला पण विचारा.

माझी बायको आजारी आहे. तिला दवाखान्यात न्यायचे होते. म्हणून निलेशला मागितले. एक तारखेला पगार झाला की लगेच परत करतो.

बाकी काही नाही साहेब.

मग मला का नाही बोलला?

चुकले साहेब.

खिशातून पाकीट काढले.

पाचशेच्या दोन नोटा त्याच्या हातात दिल्या. म्हणाले हे पैसे घे, आणि हो ताबडतोब घरी जा. आधी बायकोला दवाखान्यात घेऊन जा. कामावर यायची घाई करू नको.आधी तिला बघ. अरे जेव्हा तुमचे कुटुंब सुखी असते ना तेव्हा तुम्ही सुखी असता. तेच सुख नव्या उमेदीने काम करायचे बळ देते. तुझ्या बायकोला बरे नाही. तुझे कामात लक्ष लागेल का ? उलट चुका होणार.

जा ! घरी जा !

विचाराच्या तंद्रीत अंकिता झोपी गेली. सकाळी स्वराजच्यासा आई उठून कधी गेल्या अंकिताला कळलेच नाही. पहाटे पहाटे तिला गाढ झोप लागली.

जाग आली, मोबाईल मध्ये पाहिले .

बापरे !

साडेआठ वाजले !

किती वेळ झोपलो आपण?

काय विचार करतील S.K. ची आई आपल्या बद्दल ?

फ्रेश होऊन स्वयंपाक घरात गेली. एक बाई कामाला आली होती. दोघी बसून चहा घेत होत्या. अंकिता जाताच म्हणाल्या, ये अंकिता !

सगुणाबाई, ही अंकिता . आपला स्वराज आहे ना ! त्याच्या वर्गात आहे. पण हीची खरी ओळख काय आहे ते सांगते.

आपले ते दिनू दादा आहेत न, साहेबांचे नविन ड्रायव्हर. त्यांची मुलगी अंकिता. काल हिने खूप मदत केली. शिवाय घरून जेवण आणून दिले. फार गुणी पोर आहे. रात्रभर माझ्या डोक्यावर थोपटत होती. कधी झोप लागली कळलेच नाही.

बर अंकिता तु काय घेते ? चहा ? कॉफी ? का दूध ?

काहीही चालेल , जे असेल ते.

काकु घरी आम्ही काळाच चहा पितो. दुधाचे चोचले आम्हाला परवडणारे नाही. माझी इंजिनिअरिंगची फी, पुस्तक, धाकट्या भावाची फी, पुस्तक आणि त्याचा बारावीचा क्लास. खूप डोक्याच्या वर होतंय आई बाबांच्या.

त्यांनी अंकिता कडे पाहिल एक हलक smile त्यांच्या चेहऱ्यावर होत. किती समंजस मुलगी असेच काहीसे म्हणायचे असावे.

काकु तुम्ही काकांना फोन केलेला का ?

कसा आहे आमचा S.K?

सॉरी काकू स्वराज कसा आहे आता ?

ठीक आहे .

तो पण बोलला माझ्याशी.

काकु मी आता घरी गेले तर चालेल का ?

अग काय घाई आहे,?

तुझे बाबा येतात आता नाष्टा घ्यायला. मी पण पट्कन आवरते आणि हॉस्पिटल मध्ये जाते. हे घरी येतील फ्रेश व्हायला.

काकु तुम्ही आराम करा, मी जाते बाबांसोबत. स्वराजला नाष्टा भरवते ,मग घरी जाईन. तोपर्यंत बाबा थांबतील हॉस्पिटलला. नंतर डबा घेऊन जाईल मग थांबेन दुपारी. तुम्ही जेवून , थोडी वामकुक्षी घेऊन सावकाश या. जास्त धावपळ करू नका.

नाही अंकिता माझे मन नाही लागणार. तु असे कर दुपारी तू ये. तेव्हढीच मला बोलायला सोबत . मला ऐकटेपणा पण जाणवणार नाही.

बर काकु !

काकु तुम्ही आता पासून डबा घेऊन जाऊ नका. मी गरम गरम घेऊन येते. तुम्हाला चालणार असे तर !

अंकिता चालायचा प्रश्नच नाही बेटा. पण विनाकारण तुम्हाला त्रास. तसे दिनू काल पासून खूप धावपळ करतो. त्यात तुझे सहकार्य. किती करताय सगळे ? अजून त्रास नको म्हणून म्हणते.

काकु खरच काही त्रास होणार नाही. उलट गरीबाला आपण कोणाच्या उपयोगात पडतो यातच खूप समाधान असते. त्यात तुम्ही माझ्या बाबांचे मालक.

बाबा नेहमी तुमच्या बद्दल सांगत असतात. फक्त स्वराज ची आणि बाबांची भेट झाली नव्हती. आता झाली तर अशा प्रकारे, त्याचे दुःख जास्त आहे.

खरय ग, पण खरच ही त्याचीच पुण्याई म्हणावी. गाडीचा चेंदामेंदा झाला. पण त्याच्या फक्त एका हातावर निभावले.

काकु यात तुमची पण पुण्याई आहेच. किती करताय तुम्ही तुमच्या स्टाफ साठी ?

गरीब लोकांसाठी ?

बाबा एकेक सांगत असतात. जेमतेम दीड दोन महिने झाले. घरी आले की फक्त साहेब आणि मालकीण बाई, यावर बोलत असतात.

तेव्हढ्यात दारात गाडीचा हॉर्न वाजला. स्वराजच्या बाबांना घेऊन बाबा आले. लगेच गाडीत बसलो. बाबांनी स्वराजच्या आईला हॉस्पिटलला सोडले. अंकिता रिक्षाने घरी आली. पटापट आवरले. दारावर छान हिरवीगार मेथी विकायला आलेली. एक जुडी घेऊन पटापट तोडली. लसूण हिरवी मिरची घालून भाजी केली, तूप लावून पोळ्या केल्या. वरण भात केला. तोंडी लावायला जुने निंबुचे लोणचे घेतले.

स्वराज आणि त्याची आई पोटभर जेवल्या. अंकिताचे स्वराज समोर भरभरून कौतुक करत होत्या. शेवटी अंकिता म्हणाली, काकु अहो खरच इतके काही केले नाही.

S.K. साठी आमच्या कॉलेजच्या प्रत्येक मुलाने हे केले असते. फक्त बाबा मुळे आम्ही जास्त जवळ आलो.

स्वराज म्हणाला, म्हणजे ? मला नाही कळले. म्हणजे स्वराज, ही अंकिता तुझ्या कॉलेजची मैत्रीण आहेच. पण बाबांनी नवीन ड्रायव्हर ठेवला रघु दादाच्या जागेवर माहित आहे न. हो माहित आहे. त्या दिनुची ही मुलगी अंकिता.

काय?

हो नेमकी इथेच त्यांची भेट झाली. नंतर सगळा उलगडा झाला.

स्वराज म्हणाला, म्हणजे मी कोण आहे हे सर्वांना कळले तर!!!

काय विचार करतील सगळे माझ्या बाबतीत ?

अंकिता म्हणाली, S.K. तुझ्या बाबतीत कुणाचाही गैरसमज होणार नाही.

उलट सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटतो. त्याहून जास्त काका काकूंचा. खरच संस्काराची भली मोठी शिदोरी तुझ्या सोबत दिली.

नाही अंकिता, प्रत्येक आईवडील आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत असतात. एखादा बाप भले दारू पीत असेल. पण तो आपल्या मुलाला नेहमी दारू कशी वाईट आहे हे समजावून सांगत असतो. हे ज्याचे त्याने ठरवायचे मला काय घ्यायचे आणि काय सोडायचे ?

दोघी चहा प्यायला कॅन्टीन मध्ये आल्या. स्वराज्य च्या आई म्हणाल्या, अंकिता उद्या स्वराजला सुट्टी होणार. तु तुमच्या सर्व मित्र मैत्रिणी ला घरी बोलव. आपण स्वराजचे जंगी स्वागत करू. पण हो यातले त्याला काही कळता कामा नये.

काय ?

काकु !

सगळ्या मित्र मैत्रिणींना बोलवू !

हो अग !

हा आनंदाचा क्षण अनुभवला की तो लवकर बरा होईल !

त्याची जगण्याची व्याख्या जरा वेगळीच आहे.

बाहेर येऊन ग्रुप मधील सगळ्यांना फोन करून सांगितले. हो पण यातले त्याला काही कळता कामा नये हे आवर्जून सांगितले.

कुणी बुके, कुणी मिठाई, एक मित्र सुंदर बासरी वाजवत होता. त्याला मुद्दाम बासरी घेऊन यायला सांगितले. मिञ म्हणाले आपण फटाखे पण फोडू.

अंकिता म्हणाली, नाही. हे असे फालतू पैसे उडवले ले आपल्या S.K. ला अजिबात चालणार नाही. आपण बुके सुध्दा आणायचा नाही. हा लगेच म्हणेल इतक्या पैश्यात चार वह्या झाल्या असत्या गरीब मुलांच्या. ओळखता न सगळे आपल्या S.K. ला. सगळ्यांना अंकिता चे म्हणणे पटले.

बरोबर संध्याकाळी सहा वाजता तो घरी येणार होता.

गाडीत त्याचे आई, बाबा आणि अंकिता चे बाबा.

अंकिता आणि बाकी मित्र परिवार त्याच्या स्वागताची जोरात तयारी करत होते. गेट पासून त्याच्या रूम परंत छान फुलांनी वाट सजवली होती. रूम मध्ये कुठे कुठे त्याच्याच बागेतल्या कुंड्या ठेऊन वेगळीच प्रसन्नता आणली होती.

सगळे लपून बसले. गाडीचा हॉर्न वाजताच, watchmen काका उठले त्यांनी गेट उघडले. गाडी आत आली, तसे सगळे गाडी भोवती गोळा झाले.

"Welcome home"

"Get well soon"

असे बोर्ड आणि मित्रांचा गराडा बघून तो खूप खुश झाला.

ये दोसती हम नही छोडेंगे ह्या गाण्याचे सुरू बासरीतून निघत होते. तो अधिकच खुश झाला. सगळ्यांनी टाळ्याचा गडगडाट करत S.K. चे स्वागत केले.

कॉलेज सुरू होतेच, अधून मधून मित्र येऊन भेटून जायचे. अंकिता शनिवार रविवार येत होती. तिला स्वराज ची आई मुद्दाम बोलवून घ्यायची. मग दोघी खूप गप्पा मारायच्या. चांगलीच गट्टी झाली दोघींची. रोज एकमेकींना फोन असायचेच. स्वराज सुध्दा आता कॉलेजला जायला लागला. हे इंजिनिअरिंग चे शेवटचे वर्ष होते. त्यामुळे सगळेच आता अभ्यासाला लागले.

स्वराजच्या सोशल वर्क मध्ये आता त्याच्या ग्रुपचा प्रत्येक जण सामील झाला होता. कारण सगळ्यांना आता स्वराज बद्दल खरे काय ते कळले होते. यात आपण खरच कुठेच नाही असेच प्रत्येकाला वाटत होते. त्यामुळेच आज एकाचे एकवीस झाले होते. अभ्यास सुध्दा जोरात चालला होता.

परीक्षा झाली. प्रत्येक जण एक धेय्य पुढे ठेऊन आपापल्या वाटेने गेले. कुणाला जॉब करायचा होता. कुणाला MS करून करायला परदेशात जायचे होते. तर कुणाला MBA तर कुणाला ME, M- TEC करायचे होते. कुणाचे कॅम्पस सिलेक्षण झाले होते. खरतर अंकिता चे पण कॅम्पस प्लेसमेंट झाले होते. पण जॉब चेन्नई ला मिळाला होता. त्यामुळे आईबाबांनी तिला इतक्या लांब पाठवायला नकार दिला.

म्हणाले, बाळा तू आता इथेच एखादी नोकरी शोध. एखादे वर्ष झाले की सुयोग्य वर शोधून तुझे लग्न उरकून टाकतो. एका जबाबदारीतून मुक्त होतो. मग राहिली अवि ची जबाबदारी .

खरतर अंकिताला पुढे शिकायचं होते. पण तिने तो विषय डोक्यातून काढून टाकला. तिने ठरवले, निकाल लागला की आधी जॉब शोधायचा. शक्य असेल तर जॉब करता करता याच सोमय्या कॉलेज मधून पार्ट टाईम MBA करु.

सगळे आपापल्या परीने पास झाले, कुणी नोकरी करू लागले. कुणी MS करायला गेले. कुणी MBA. अंकिता जॉब साठी प्रयत्न करू लागली. दोनच महिन्यांत एका कंपनीत जॉब लागला. स्वराज ला मात्र MBA करायचे होते. ते सुध्दा सोमय्या कॉलेज मधूनच. अपेक्षा केली त्या प्रमाणे त्याला सोमय्या ला एडमिशन सुध्दा मिळाली.

कॉलेज सुरू झाले. अंकिता ने सुध्दा बाबांना विचारून पार्ट टाईम MBA ला एडमिशन घेतली. ग्रुप वर सर्वांचे बोलणे होत होते.

जया त्यांच्याच ग्रुप मधील एक मैत्रिण तिने सांगितले माझे लग्न ठरले. अंकिता म्हणाली, माझ्या घरी सुध्दा तोच विषय असतो. मी MBA एडमिशन तर घेतली. पण पूर्ण करू देतात की नाही घरचे देवच जाणो. अगदी रोजच् हाच विषय.

हे ऐकले आणि स्वराज खूप अस्वस्थ झाला. त्याला त्या दिवसापासून फक्त अंकिता चेच विचार येत होते. कुठेतरी प्रितीची घनदाट सावली अंकिता च्या रूपाने आपल्यावर थंडगार वाऱ्याच्या झुळकीचा वर्षाव करत आहे. तर कधी वाटायचे, अंकिताच्या रुपात मोगऱ्याची फुले त्याची वाट सुगंधित करत आहे. मध्येच त्याला वाटायचे, नाजूक जुई आपण तिच्यावर उधळतो आहे. ती हळूच म्हणते नको रे !

नाजूक फुल ते!

असे नको उधळू !

हळू !

जरा जपून रे !

तो वेड्यासारखा तो गंध प्राशन करतो आहे.

त्याला कळून चुकले, हाच तो प्रितीचा गंध.

ज्यात मी अंतर्बाह्य न्हाऊन निघतो आहे.

हीच माझी प्रीत !

कित्येक महिने हेच विचार डोक्यात घोळत होते. आज ठरवले आईशी बोलावे. तिचे म्हणणे काय पडते ? त्यांना सुध्दा अंकिता सून म्हणून चालणार आहे का?

किती काही झाले तरी मी आईबाबांनी नाही म्हटले तर पुढे जाणार नाही. तसेही माझे प्रेम हे one way love आहे. तिचा काही वेगळा choice असु शकतो.

संध्याकाळी त्याने मुद्दाम चहा केला. दोन कप भरले, बिस्कीट घेतले. आईला आवाज दिला !

आई !

बागेत ये !

मी चहा बिस्किट घेऊन आलो! लवकर ये ग!

नाहीतर गार होणार !

अरे हो ! हो !

किती जोरात आरडाओरडा !

आई पाणी घेऊन आलो मी ! तुला चहाच्या आधी लागत माहित आहे मला.

काय रे आज काय विशेष? एकदम चहा बिहा !

आईवर इतके प्रेम उतू जायचे कारण समजेल का ?

कुणाच्या प्रेमात बिमात पडला की काय ?

तसे काही नाही आई !

तु तर सरळ सुतावरून स्वर्ग गाढते.

अरे तुमच्या वयात आलेल्या मुलांचे नाटक कळतात आम्हा आई बापांना !

एक घोट घेतला !

छान झाला रे चहा !

या आधी कधी केला होता ?

सरावाने करतो असा झाला !

तूच तर सांगून ठेवले न, एक कप पाणी, एक कप दूध, दोन चमचे साखर, दोन चमचे चहा पावडर आणि जरासा कुटून आल्याचा तुकडा.त्याला कशाला हवा सराव. पाठ आहे माते आपल.

अरे वाह !

बर बोल आज इतका मस्का का ?

आई अग खरच काही नाही ! ठीक आहे, निघते मग मी !

अग बस ! बस!

कुठे निघाली !

काम आहे !

बस ग !

माझे पण काम आहे !

मग लवकर बोल !

फार आढेवेढे घेऊ नको !

काय ते पटकन् बोल.

जागेवरून उठला, आई म्हणजे ! आई मी !

अरे काय अडखळतो असा.

आई मी म्हणतो ते तुला मान्य असेल का?

मुद्दाम खोडसाळ पणाने त्या म्हणाल्या, तू काही बोलला नाही तर मी काय मान्य करणार.

आई, मला ! आई मला !

मला ! मला! काय रे!

एका दमात बोलून गेला, आई मला अंकिता खूप आवडते. मी तिच्या प्रेमात पडलो !

अरे लबाड !

मी तर कधीच ओळखले होते तुझ्या मनातले. तुझे वागणे, बोलणे यातून जाणवत होते.

म्हणूनच मी सुध्दा तिला इथे बोलवत होते

काही ना काही निमित्याने! तिला अजून समजून घेण्यासाठी !

आई, म्हणजे तुला हे मान्य आहे.

अरे मान्य नसायला काय झाले . मी तर तुझ्या बाबांना या बद्दल बोलले सुध्दा.

ते इतकचं म्हणाले, त्याच्या कडून आधी कळू दे. उगाच त्याने आपल्या निर्णयाला होकार द्यावा हे त्याच्यावर दडपण नको.

काय?

येस ! स्वराज कक्कर !

Love You आई बाबा 
 त्याने आईला मागून मिठी मारली.
 क्रमशः
पुढील भागात
सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव.
📝माझी लेखणी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने