कळ

लेखक :- श्रीकांत काटे



हेमाताईंनी पायात चपला सरकवल्या. दाराला कुलूप लावले. सवयीप्रमाणे कुलुप दोन-तीनदा ओढून बघितले आणि कुलूप व्यवस्थित लागल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले.

जिना उतरून त्या खाली आल्या. पावसाची रिपरिप अजूनही सुरू होती- एखाद्या हट्टी रडक्या मुलासारखी. त्यांनी पर्समध्ये किल्ली ठेवली आणि पुरेसे पैसे असल्याची खात्री करून घेतली. हातातली छत्री उघडून त्या रिक्षाची वाट बघत उभ्या होत्या.

सकाळी त्यांची मुलगी सुधा ऑफिसमध्ये गेली होती. सुधाचे यजमानही कालच फिरतीवर बुलढाण्यास गेले होते.नातू आणि नातही शाळेच्या बसमध्ये गेलेले.


आता कमीत कमी तीन-चार तास तरी घरी कोणी येणार नव्हते. धुणीभांडी करणारी कामवाली बाई ही येऊन गेली होती.
बस !आता रिक्षा मिळाला की तडक डॉक्टर नम्रता कडे जायचं !

पोटात जीवघेणी कळ उमटतच होती. उभंही रहावत नव्हतं. पण नेहमी-नेहमी कोण आपल्यासोबत दवाखान्यात येणार या विचाराने त्या पोटातली वेदना सहन करत उभ्या होत्या.

पावसामुळे रस्त्यावर विशेष अशी रहदारीही नव्हती. वेदनेमुळे उभेही राहवत नव्हते. पण डॉक्टरकडे जाणे तर भाग आहे. त्या बाजूच्या दुकानाच्या पायरीवर टेकल्या.

"काय काकू ? कुठे ? डॉक्टरकडे का ? " त्या दुकानदाराने आस्थेने चौकशी केली.
"होय रे बाबा ! केव्हा एकदा हा त्रास कमी होईल असं झालंय !"

"होईल ! होईल !! देवावर भरवसा ठेवा ! " असे म्हणून दुकानदार गिऱ्हाईकाकडे वळला.

तेवढ्यात समोरून एक रिक्षा येताना दिसली. दुरून ती रिकामी की सवारीने भरलेली हे हेमाताईंना दिसेना. त्यांनी पर्स मधला आपला चष्मा काढला. तेवढ्यात तो रिक्षा जवळ आला. हेमाताईंनी त्याला थांबण्याची खूण केली. पण लगेच त्यांच्या लक्षात आलं. रिक्षेत कोणी तरी प्रवासी होता.

"बस ! पुढच्या गल्लीत ही सवारी सोडून येतोच काकू ! " रिक्षावाल्याने त्यांना दिलासा दिला.

"बघ रे ! तुला उशीर झाला अन दुसरा रिक्षा मिळाला तर मी काही थांबायची नाही हं !" हेमाताईंनी त्याला सुनावले. रिक्षावाल्याने ते ऐकले न ऐकल्यासारखे केले अन् रिक्षा वेगात पुढे नेली.

पाऊस सतत सुरू होता. रस्तेही ओले झाले होते. गेले आठ दिवस सूर्यदर्शनही झाले नव्हते. एखादा रिकामा रिक्षा चुकूनमाकून तरी मिळेल या आशेने हेमाताई रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आशाळभूत नजरेनं बघत होत्या. लवकरात लवकर एखादा रिक्षा मिळावा आणि आपण डॉक्टरांकडे जावं असं त्यांना वाटत होतं.

"काय काकू ? या पावसात कोण येणार दुसरा रिक्षावाला ! चला ! कुठे जाणार ? "

" दत्तमंदीर चौकात जायचं रे ! काय घेणार? " हेमाताईंनी हा प्रश्न केला खरा, पण रिक्षावाल्याने उत्तर द्यायच्या आतच त्यांनी छत्रीची घडी केली. "चल लवकर बाबा !" असं म्हणत त्या रिक्षात बसू लागल्या.

"20 रुपये घेणार बघा " रिक्षावाल्याने त्यांना सुनावले. वास्तविक दत्तमंदीराचे अंतर जास्त नव्हते. पण पोटातली कळ आणि वरून पडणारी पावसाची सर यासाठी त्यांनी रिक्षावाल्याने सांगितलेली रक्कम द्यायचे ठरवले.

"काय पाणी आहे बघा ! साला आमचा धंदा पण नीट करू देत नाही. नाही तेव्हा दडी मारतो आणि बरसतो तेव्हा असा बरसतो की जीव नकोसा होतो." 

रिक्षावाल्याचे स्वगत सुरू होते पण त्याला कोणतेच प्रत्युत्तर देण्याच्या मनःस्थितीत हेमाताई नव्हत्या. पोटातली कळ काही सुचू देत नव्हती.

गेली दीड वर्ष हे दुखणं हात धुऊन त्यांच्यामागे लागलं होतं. औषधे झाली- एक्स-रे झाले- सोनोग्राफी ही झाली. वेदनाशामक गोळ्यांनी तेवढ्यापुरता बरं वाटावं ! पण पुन्हा हे लोचट दुखणं मान वर काढायचं.

बरं ! डॉक्टर तरी किती बदलणाराय ! सुरुवातीला कोणी सांगितलं म्हणून होमिओपॅथीची औषधे घेतली. पण पाच सहा महिने झाले तरी पोटातल्या वेदनेला काही खंड नव्हता.

शेवटी मुलीच्या व जावयाच्या सूचनेवरून त्यांनी डॉक्टर बदलायचं ठरवलं. त्यांच्या दुखण्यामुळे घरातले सगळेच विमनस्क झाले होते. केव्हाही पोटातून कळ यायची. फरशीवर गडबडा लोळावसं त्यांना वाटायचं. पण दुखणं काही बरं होत नव्हतं. एक्स-रे झाले- सोनोग्राफीही झाली. रिपोर्ट सगळे नॉर्मल होते. मग ही वेदना कशामुळे ? काहीच समजत नव्हतं.

नातवंडांना एखादी गोष्ट सांगायला सुरुवात करावी आणि पोटातली वेदना त्यात खोडा टाकायची. नातवंड हिरमुसली व्हायची.
" त्या प्रणवची आजी बघ ! त्याला कशा छान छान गोष्टी सांगते ! आणि तू----? " नातवाचा तो निरागस प्रश्नही त्यांना पोटातल्या वेदनेइतकाच असह्य व्हायचा !
 
" आजी, मला भाजणीचं थालिपीठ करून दे ना ग ! " हे नातीचे आर्जवही त्या पूर्ण करू शकत नव्हत्या. भाजणीचे पीठ भिजवून-मळून होईपर्यंत पोटातली वेदना एखाद्या शहाण्या मुलासारखी शांत व्हायची पण गॅसची शेगडी पेटवून तव्यावर ते थालीपीठ करेपर्यंत पोटातली कळ सगळं शरीर ढवळून टाकायची.

एकदा तर त्या वेदनेने गॅसच्या शेगडीचे बटनही त्या बंद करायचं विसरून गेल्या. पोटावर हात ठेवून त्या समोर दिवाणखान्यात सोफ्यावर येऊन बसल्या. टीव्हीवरची एखादी सिरीयल बघून तरी तात्पुरती ही वेदना आपण विसरू म्हणून त्यांनी टीव्ही सुरू केला.

तेवढ्यात सुधाचे यजमान काही कामासाठी घरी आले. आल्या-आल्याच पाणी पिण्यासाठी त्यांनी फ्रीजचे दार उघडले आणि त्यांच्या तीक्ष्ण नाकाने स्वयंपाकघरात पसरलेल्या वासाचा वेध घेतला. त्यांनी गॅसच्या शेगडीकडे बघितले. शेगडीचे बटन ऑन होते. गॅस सगळ्या स्वयंपाक घरात पसरू लागला होता. त्यांनी ताबडतोब गॅसचे बटन बंद केले. खिडक्यांची दारे उघडली आणि जोरात ओरडले-

" काय आई ? गॅसचे बटनही बंद करण्याची शुद्ध नाही. या टीव्ही सिरियल्स ने तर सगळ्यांना पागल केले आहे ! आता कुठलेही स्वीच ऑन करू नका !"
हेमाताईंना मेल्याहून मेल्यासारखे झाले.

"अहो जावईबापू ! मी सिरीयल बघण्यासाठी नाही हो टीव्ही सुरू केला. थोडं तरी या वेदनेने कडे दुर्लक्ष व्हावं म्हणून...." हेमाताईंनी आपली सफाई पेश करण्याचा तोकडा प्रयत्न केला. पण व्यर्थ!

जावईबापूंनी काहीच न बोलता मानेला एक हिसका दिला आणि स्वतःशीच काहीतरी पुटपुटत ते बाहेर निघाले.      
हेमाताई खूपच खजील झाल्या.

'काय करावं ह्या वेदनेला ? अंगारे-धुपारे झाले, कुलदेवतेचा धावाही झाला !' पण मधुनच डोकं वर काढणारी ही वेदना एखाद्या लोचट मांजरी सारखी टपून बसली होती.

थालीपीठ करणे तर राहिले बाजूला ! संध्याकाळी सुधा ऑफिसमधून घरी आल्यावर तिच्या नवऱ्याने दुपारी झालेला प्रकार तिच्या कानावर घातला. 'मी जर देवासारखा वेळेवर काही कामासाठी घरी आलो नसतो तर कोणता अनर्थ ओढवला असता 'याचे रसभरीत वर्णन त्यांनी पत्नीजवळ केले.

सुधाही त्यादिवशी थोडी वैतागलेलीच होती. साहेबांशी तिचा ऑफिसच्या कामावरून थोडा खटका उडाला होता.त्यात ही भर !

" काय आई ! कशाला गं करतेस न पेलवणारी कामे ? तू जरी शांत बसलीस ना तरी पुरे !" सुधा वैतागून आईला म्हणाली.

हेमाताईंच्या डोळ्यात पाणी तरळले. 'काळ कोणावर कशी वेळ आणतो ? आज जर मला मुलगा असता तर कशाला मी जावयाच्या घरी मिंधी झाले असते ? '

सुधाच्या बाबांना जाऊन तीन-चार वर्षे झाली. पोटी मुलगा नाही. 'एकही बच्चा जीवन सच्चा' या म्हणीप्रमाणे एकुलत्या एक मुलीच्या भरवशावर त्यांनी पती वियोगाचे दुःख झेलले. आणि आता अशी परिस्थिती ? हि पोटातली वेदना देखील मान वर करून जगू देत नाही !

' गॅसच्या शेगडीचा नॉब का उघडा राहिला व टीव्ही का सुरू केला '' याचे स्पष्टीकरण त्या सुधाला देऊ लागल्या.

" आई, तुझं ते होमिओपॅथीचा फॅड जरा बाजूला ठेव ! दत्त मंदिर चौकात डॉक्टर नम्रता म्हणून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आहेत आपण आजच त्यांच्याकडे जाऊया." सुधाने फर्मान सोडले.

सुधासोबत त्या डॉक्टर नम्रताकडे गेल्या. दवाखान्यात गर्दी चिक्कार होती. पण सुधाच्या ओळखीमुळे डॉक्टरांनी हेमाताईंना तपासणीसाठी आत बोलावले. सगळी केस हिस्टरी जाणून घेतली. काही रक्त चाचण्या करायला सांगितल्या. पण तात्पुरता आराम पडावा म्हणून दोन-तीन दिवसांसाठी वेदनाशामक गोळ्या लिहून दिल्या.

रक्तचाचणीचा रिपोर्ट सुधाने परस्परच डॉक्टर नम्रताला दाखवला. त्या आधारावर डॉक्टरांनी दुसऱ्या जास्त पॉवरच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या. त्या गोळ्या घेतल्यावर काही तास बरे वाटायचे पण गोळीचा परिणाम उतरताच पोटातले दुखणे पुन्हा डोके वर काढायचे ! असेच बरेच महिने गेले.

पण दुःखात सुख एवढेच कि डॉक्टर नम्रता अतिशय हसतमुख होत्या. "काकू ! आम्ही काही देव नाही ! आमच्या कुवतीप्रमाणे अन् बुद्धीप्रमाणे आम्ही पेशंटला ट्रीटमेंट देतो. प्रयत्न करणे फक्त आपल्या हाती आहे ! देवावर भरवसा ठेवा !" डॉक्टर नम्रताचा हा सल्ला ऐकून हेमाताईंना जरा विचित्र वाटले." देवावर भरवसा ठेवायचा तर मग डॉक्टर कशाला हवा ? " त्या पुटपुटल्या.

" खरं सांगू काकू ! मी म्हणाले तसा डॉक्टर खरोखरच देव नसतो. प्रयत्न करणे त्याच्या हाती असते. शेवटी यश-अपयश हे त्यांच्या हाती--" डॉक्टरांनी साईबाबांच्या फोटोकडे बोट दाखवत सांगितले.

सुधाची ही वर्गमैत्रीण म्हणून हेमाताईंनी डॉक्टरांशी वाद घातला नाही. पण एक मन म्हणत होतं की मग इतके पैसे खर्च करून ही वैद्यकीय पदवी घेण्याचा काय उपयोग ? आपण त्यांच्याकडे का जायचं ? 
हेमाताईंच्या मनातली विचारांची ओढाताण पाहून डॉक्टर जाता जाता म्हणाल्या- 

"आम्ही एखाद्या टॉर्चसारखे असतो. टॉर्चच्या प्रकाशात आपल्याला रस्त्यावरचे दगड-धोंडे, खाचखळगे दिसतात. शेवटी रस्ता हा रस्ताच असतो. मोठा सर्चलाईट सुद्धा रस्त्याची दशा आणि दिशा बदलू शकत नाही शेवटी रस्ता आपल्यालाच पार करावा लागतो."

"काकू ! आला दत्तमंदीर चौक ! कुठे उतरायचंय तुम्हाला ?" रिक्षेवाल्याच्या प्रश्नानं त्या भानावर आल्या." तो बघा डावीकडचा डॉक्टर नम्रतांचा दवाखाना !" हेमाताईंनी रिक्षावाल्याला उत्तर दिलं.

दवाखान्यासमोर येताच पर्स मधली वीस रुपयांची नोट काढून रिक्षावाल्याच्या हातावर ठेवत त्या म्हणाल्या -"यावेळी पावसाने तुझ्यावर मेहेरबानी केली.नाही तर 15 रुपयांच्या वर मी एक पैसाही तुला दिला नसता."

हेमाताई दवाखान्यात शिरल्या. नेहमीप्रमाणेच पेशंटची गर्दी होती.त्यांनी आपली फाईल स्वागतिकेच्या हाती सोपवली आणि हळूच तिला सांगितले-"डॉक्टरांना सांग-सुधा सबनीस ची आई आली आहे म्हणून !"

" तुम्ही बसा !आतला पेशंट बाहेर आला की तुमचा निरोप देते मी " -स्वागतिकेने प्रतिसाद दिला.

दहा-पंधरा मिनिटांनंतर आपला पेशंट बाहेर आला. स्वागतिकेने हेमाताईंचा निरोप डॉक्टरांकडे पोचवला आणि बाहेर येऊन तिने हेमाताईंकडे बघून खूण करत म्हटले- 'चला !'.

 हेमाताई पोटातली वेदना घेऊनच आत गेल्या.

" काय म्हणताय काकू ? काही रिलीफ ?" - डॉक्टरांनी विचारले.

" कसला बोडख्याचा रिलीफ हो ! अगदी जीवघेणी वेदना असते ! तुमच्या गोळ्यांनी ही काही चमत्कार नाही घडवला !

"अरे !असं तर व्हायला नको ! बरं, तुमचं पथ्यपाणी-औषध वगैरे नियमित आहे ना?"

"अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे सगळं अचूक आहे. हे बघा ! मी मोबाईल फोनच्या हँडसेटमध्ये औषधांच्या वेळेचा अलार्म ही सेट केलाय ! पण सगळेच अपसेट होतंय हो ! शत्रूवरही अशी वेळ येऊ नये !" हेमाताई जराश्या घुश्श्यातच बोलल्या.

"कां ? काय झालं ? - डॉक्टरांनी विचारलं.

"मी तिखट आंबट सगळं वर्ज्य केलंय ! गोळ्याही नियमित घेते. हॉट वॉटर बॅग ने शेकल्यावर वेदना निमूट होते पण नाहीशी होत नाही.आता पाच सहा महिने झालेत जराही आराम नाही. की माझ्यासोबतच ही वेदना....".

हेमाताईंचे वाक्य अर्ध्यातच तोडत डॉक्टर म्हणाल्या- "इतकं नर्व्हस होऊ नये काकू!"

"का होऊ नये ! एक तर मी आश्रितासारखी मुलीकडे राहते. मुलगा नशिबातच नव्हता. त्यातच सुधाचे बाबाही नाहीत. जावयाच्या घरी मुलीच्या भरवशावर किती जगायचं ? आणि तेही अशी न शमणारी वेदना वागवत ! मला वाटतं देवानं पुण्य वाटलं तेव्हा एकतर मी झोपले असेन किंवा गैरहजर तरी असेन. तुमचं ठीक आहे ! तुम्ही स्वतः डॉक्टर ! तुमचे पती इंजिनिअर !! बाहेर पेशंटची ही गर्दी !!! खोऱ्याने पैसा ओढत असणार तुम्ही.शिवाय....."

हेमाताईंचे बोलणं अर्ध्यातच थांबवत डॉक्टर म्हणाल्या -" काकू दिसतं तसं नसतं हं ! तुम्ही म्हणालात तशी मी भौतिक सुखात असेनही पण दुःख किंवा दुर्दैव चोरांसारखं कोणाच्याही घरात शिरतं. तुम्हाला वाटतं ना की मी खूप सुखी आहे, सगळ्या सोयी-सवलती माझ्या समोर हात जोडून उभ्या आहेत ! मी अखंड सुखात डुंबत आहे ! माझ्याजवळ गाडी आहे, घर आहे, नवरा आहे ! वरवर बघता मी खूप सुखी आहे. पण तुम्ही सुधाच्या आई म्हणून तुम्हाला सांगते- " मी नेहमी आनंदी असते ! हसतमुख असते ! बाहेर पेशंटची ही गर्दी असते म्हणून काही मी सुखाच्या झोपाळ्यावर हिंदोळे घेत असेल असे तुम्हाला वाटत असेल तर मी एवढेच म्हणेन की तो तुमचा गैरसमज आहे !"

 "तुम्हाला म्हणून सांगते काकू ! मीही आनंदाने जगण्याचा प्रयत्नच करतेय. तुम्ही पोटात क्षणिक वेदना बाळगता पण माझ्या हृदयातील सल कोणतीच वेदनाशामक गोळी शमवू शकत नाही. मी इतरांच्या वेदना दूर करण्याचा प्रयत्न करते ! पण माझ्या उरातली सल ? तुम्हाला ठाऊक नसेल पण मला एकही अपत्य नाही ! आमच्या लग्नाला अठरा वर्षे झाली. दोघांच्याही सर्व तपासण्या झाल्या. पण मला मूल झालेच नाही. तुम्हाला निदान सुधासारखी प्रेमळ मुलगी तरी आहे ! पण मी ? गर्भाशयाला कर्करोग झाल्यामुळे आता तर माझे गर्भाशयच काढून टाकले आहे. आता परमेश्वराची कितीही करुणा भाकली तरी मी आई होऊ शकणार नाही. मला थोडे वैषम्य तरी वाटते पण माझे पती हा एक दिलदार माणूस ! तो म्हणतो - नसले मूल तर काय झाले ? आपणच एकमेकांची मुले होऊया ! आपणच एकमेकांवर पुत्रवत प्रेम करूया !! मानवी जन्म हा एकदाच मिळतो ! मग नसलेल्या गोष्टींची खंत करण्यापेक्षा जे आहे त्याच्यासोबत जीवन जगूया !"

"तुम्हाला क्वचित नाराज होणारी मुलगी तरी आहे ! कधीमधी कुरकुरणारा पण तुमचा मायेने सांभाळ करणारा जावई तरी आहे ! आजी-आजी अशी हाक मारणारी नातवंडे तरी आहेत ! पण मग आम्ही काय करायचं ? सांगा काकू - आम्ही काय करायचं ?"

डॉक्टर नम्रतांचे डोळे भरून आले होते. त्यांचा हात हातात घेत हेमाताई काही क्षण अवाक् झाल्या आणि लगेच स्वतःला सावरत म्हणाल्या- " सॉरी ! व्हेरी सॉरी !! मला हे खरंच माहीत नव्हतं ! आणि तुम्ही सुधालाही हे कळू दिलं नाही ! आय ॲम रियली सॉरी !"

आणि त्या डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन हातात घेऊन दवाखान्याच्या बाहेर रिक्षाची वाट बघू लागल्या.

 डॉक्टर नम्रताच्या हृदयातली कळ त्यांच्या पोटातल्या वेदनेवर मात करून गेली होती.                                                                                          
लेखक - श्रीकांत काटे 

सदर कथा दिवंगत लेखक श्रीकांत काटे यांची असून कथेचे सर्व हक्क त्यांच्या पत्नी वीणा काटे यांचेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने