घुसमट

 © कल्याणी पाठक (वृषाली काटे)



"रश्मी, मी निघतेय.. तुला किती वेळ आहे?" किमयानं ऑफिसमधून निघता निघता तिची सहकारी रश्मीला विचारलं.

"अगं, मला वेळ लागेल.. तू निघ.." खरं तर रश्मीचं हे उत्तर किमयाला अपेक्षितच होतं.

किमयानं बॉसच्या केबिनकडे बघितलं. त्यांचा बॉस रोहन अजूनही कामात गर्क होता. तिनं एक नजर रश्मीकडेही टाकली .. आजही ऑफीसमध्ये रश्मी अन् रोहन दोघेच.. तिच्या नजरेनं हेरलं अन् मनात काहीतरी विचार करत ती ऑफिसच्या बाहेर पडली.

रश्मी अन् किमयाच्या ऑफीसमध्ये स्त्री कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती. सगळ्याजणी भराभर आपली कामं आटोपून घरी निघून जात.. अपवाद मात्र रश्मीचा! तिला उशिरापर्यंत ऑफिस मध्ये थांबून काम करण्याची सवय होती. 

तिची ही सवय सगळ्यांनाच खटकायची. एक दोनदा काही सिनियर सहकाऱ्यांनी तिला हटकलं देखील. पण त्याचा रश्मीवर काहीएक परिणाम झाला नाही. तिचं उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबणं सुरूच राहिलं अन् आपोआपच तिच्या अन् रोहनच्या बाबतीत वावड्यादेखील.

रश्मीची तशी दाट मैत्री कुणाशीच नव्हती.. खरं तर तिला मैत्रीणीदेखील नव्हत्या.. ऑफिसात होत्या त्यांना नावापुरतं मैत्रीण म्हणायचं.. त्या होत्या फक्त तिच्या सहकारीच!

हं, तिचं तिच्या बॉसशी.. रोहनशी मात्र व्यवस्थित जमायचं. एक तर ती मुळात कामसू.. हुषार.. अन् बॉसला तिच्याकडून कशा प्रकारचं काम अपेक्षित आहे हे ती नीट जाणून होती. ती तिच्या कामाला पुरेपूर वेळ देऊ शकायची कारण ती एकटी होती.

हो, रश्मी घटस्फोटीता होती.. तिला ना मूल ना बाळ.. आपल्या लहानशा फ्लॅटमध्ये एकटीच राहायची. ना कसल्या जबाबदाऱ्या ना कसली बंधनं.. त्यामुळे तिचा जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्येच जायचा अन् नेमकं हे सगळं तिच्या सहकाऱ्यांना आवडायचं नाही.

आपोआपच तिच्याबद्दल वदंता सुरू झाल्या. म्हणूनच आज किमयानं मनाशी ठरवलं.. उद्या ह्या विषयावर रश्मीशी बोलायचं.. अन् मनात विचार पक्का करूनच ती ऑफिसच्या बाहेर पडली होती.

दुसऱ्या दिवशी किमया ऑफीसमध्ये शिरली तोच डोक्यात विचार पक्का घेऊन.. आज तिचं कामातही लक्ष लागेना. ती लंच टाईमची वाट बघत घड्याळाकडे पाहू लागली..

लंच टाईम झाला तशी ती उठून रश्मीच्या टेबलजवळ गेली.. तिला बोलवायला..

"अगं, मी डबा नाही आणत.. तुला तर माहित आहे.." रश्मीनं सांगितलं.

"अगं, आज मी पण डबा नाही आणलाय.. चल, 'साऊथ किचन'ला जाऊन डोसा खाऊया.." किमयानं रश्मीला बळेबळेच जागेवरून उठवलं अन् दोघी 'साऊथ किचन'च्या दिशेने चालू लागल्या.

आज किमयाच्या अशा वागण्याचं खरं तर रश्मीला आश्चर्यच वाटलं. मैत्रिणींच्या मोठ्ठ्या ग्रुपची लीडर असणारी किमया आज आपल्यासोबत ? ते ही डोसा खायला? रश्मीला मनातून कल्पना आलीच.. आपण कशासाठी बाहेर चाललो आहोत ह्याची!

दोन मसाला डोस्यांची ऑर्डर देऊन अपेक्षेप्रमाणे किमयाने विषय काढलाच.. "हे, बघ रश्मी.. तू गैरसमज नको करून घेऊस.. पण तुझं हे उशिरापर्यंत ऑफिसात बसणं खटकतं बघ.. सगळ्यांनाच..!"

"मग?" रश्मीनं थंडपणे विचारलं.

"अगं, पण तुझं वागणं सगळ्यांनाच खटकतंय म्हटल्यावर तू ते बदलायला नकोस का?" किमयानं विचारलं..

"म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे माझ्याकडून?" रश्मी अजूनही शांतच होती.

"अब आया उंट पहाड के नीचे.." किमयाने मनातच म्हटलं अन् तिनं सौम्य शब्दांत रश्मीला समजवायला सुरूवात केली.. " हे बघ, तू डिव्होर्सी आहेस.. म्हणून लोकांचं तुझ्याकडे विशेष लक्ष असतं.. म्हणजे तुझ्या चारित्र्याकडे..बघ बाई.. मला काही आडून आडून बोलणं जमत नाही.. तुला माहितीये.. मी स्पष्टवक्ती आहे ते.. " किमयानं बोलणं थांबवून जरा अदमास घेतला. रश्मी हातातल्या मेनू कार्डशी चाळा करत होती..

तिला अजूनही शांत बघून किमयानं पुढे बोलणं सुरू केलं.. "म्हणजे तू चांगली मुलगी आहेस.. माहिती आहे सगळ्यांना.. पण तरीही तुला सांगावेसं वाटतं.. जीव तुटतो अगं.. नको ऑफिसात उशीरापर्यंत थांबत जाऊस.. तुझ्याबरोबर रोहन देखील थांबतो अन् लोकांना चर्चेला उधाण येतं.."

"ओह.. असं आहे तर.." रश्मी बोलली.. मग मी काय करावं असं तुला वाटतं?

किमया मनातून आनंदली. आपण रश्मीला पाऊल वाकडं पडण्यापासून वाचवतोय असा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकला.. "तू एकटी नको राहत जाऊस.. आमचा लंच ग्रूप जॉईन कर ना! तू जेव्हढी बायकांमध्ये मिक्स होशील तेव्हढ्या तुझ्याबद्दल अफवा कमी पसरतील बघ.." किमयानं पोटतिडकीनं सल्ला दिला.

एव्हढ्यात वेटरनं डोस्याच्या दोन प्लेट्स समोर आणून ठेवल्या.  डोस्याचा एक तुकडा तोडून तो तोंडात टाकत रश्मीने बोलायला सुरूवात केली..

"हे बघ, किमया.. तुझी तळमळ समजतेय मला.. अन् गैरसमज देखील नाही करून घेत आहे मी.. पण मलाही माझी बाजू असेलच ना काहीतरी?"

"हो हो.. नक्कीच.." किमया म्हणाली खरी.. पण ह्यात तिला काही रश्मीची काही बाजू दिसेना.. तिने शांतपणे रश्मीचं ऐकायला सुरूवात केली..

"माझ्या डिव्होर्स नंतर मी येथे जॉईन झाले.. बरोबर ?"

किमयानं होकारार्थी मान डोलावली.

"मी तुमचा ग्रूप देखील जॉईन केला होता.."

"हो, आठवतंय मला..!" किमयानं स्मरणशक्तीला ताण दिला.. "पण तू अचानकच येणं बंद केलंस.."

"हो.. त्याचबद्दल बोलतेय मी! तुम्ही मला माझ्या व्यक्तिगत प्रश्नांबाबत विचारून अगदी हैराण केलंत.. "

"हैराण ?" चकित होण्याची पाळी आता किमयाची होती. "अगं.. तुझं मन मोकळं व्हावं म्हणून.. !"

"हो.. पण मला जखमांवरची खपली नव्हती काढायची अन् तुमच्यापैकी कुणीतरी मुद्दाम नकोसा विषय काढायच्या..  अन् ह्या चर्चेचा शेवट काय तर तू दुसरं लग्न कर ..!" रश्मीला ताण असह्य होऊ लागला.. तरीही ती बोलत राहिली.. " डिव्होर्स असो किंवा दुसरं लग्न.. हे माझे व्यक्तिगत विषय आहेत असं नाही का वाटत तुला? हो.. माझ्या काळजीपोटी सल्ला देत असणार तुम्ही मला.. मान्य आहे.. पण मी इरिटेट होतेय कुठेतरी.. हे नाही का जाणवलं तुम्हाला? प्रत्येक मुलगी जन्म घेते पण काहींची मानसिक जडणघडण नसते संसार करण्याची.. किंवा तडजोडी करण्याची.. मी गरीब बिचारी नाहीये.. पण मी तडजोडी करू शकत नाही.. ही माझ्यातली कमतरता आहे.. असं समज हवं तर.." रश्मीनं पाण्याचा ग्लास घटाघटा रिकामा केला.

"बरं, बाई.. यापुढे नाही कोणी तुझ्याशी ह्या विषयावर बोलणार! मी सांगेन सगळ्यांना.. आता तरी येशील ना?" किमयानं हुकमी एक्का काढला.

"नाही!" रश्मी ठासून म्हणाली. "माझी घुसमट होते अग तुम्हा बायकांच्या ग्रूपमध्ये.. तुमचे आवडीचे विषय म्हणजे नवरा.. सासू.. नणंद आणि हो , मुलं..! माझ्याकडे ह्यातलं काहीच नाहीये आणि म्हणून मी तुमच्यात मिसफिट होते.. नुसती श्रोत्याची भूमिका घेऊन बसणं.. ते ही रोज.. नाही शक्य होत मला! बरं माझ्या आवडीचे विषय वेगळे आहेत.साड्या, ज्वेलरी, प्रदर्शनं ह्या तुमच्या विषयांत मला गम्य नाही अन् कॉम्प्युटर, साहित्य, विज्ञान ह्या माझ्या विषयांत तुम्हाला रुची नाही.. आणि ती असावी असा माझा आग्रह देखील नाही.. पण मग केवळ लोकांना बरं दिसावं म्हणून मी माझी घुसमट का करून घेऊ?"

"अग पण निदान ऑफिस मध्ये उशिरापर्यंत थांबणं तर बंद करू शकतेस? लोक तुझ्याबद्दल अन् रोहनबद्दल काहीबाही बोलतात.. मला नाही ऐकवत ग!" किमया कळकळीनं म्हणाली.

"अगं, घरी मी एकटी! घराचं कुलूप देखील माझी वाट बघत नाही. घरी गेल्यावर माझी काम फार तर तासाभरात आटोपतात.. मग घर खायला उठतं.. म्हणून मी बराच वेळ ऑफिसमध्येच थांबते.. अन् रोहनबद्दल म्हणशील तर हो.. बोलतो आम्ही बरेचदा.. आमच्या काही समान आवडीच्या विषयांवर.. " रश्मी बोलू लागली.. "तशी तर तू ही मनमोकळी आहेस ग.. तू देखील बोलत असते.. बरेचदा.. अनेक पुरूषांशीही.. अवांतर विषयांवर.." रश्मीनंही स्पष्टवक्तेपणा दाखवलाच.

"अगं, ते वेगळं.. माझ्या नवऱ्याला माहिती आहे माझ्या मित्रांबद्दल.. खूप ब्रॉड माईंडेड आहे तो!" किमया अभिमानानं म्हणाली.

"तेच तर!तू विवाहित अन् तुझ्या नवऱ्याला चालतंय म्हणून ते चालतं.. आणि मी एकटी राहतेय म्हणून मला बंधनं आणि चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याची तयारी तुझी.." रश्मी रागावली होती.

"नाही, अगं.. लोक बोलतात म्हणून.." किमयानं बाजू सावरून घेतली.

"अगं, तू पण त्या लोकांमधली एक आहेस ना! तू थांबव बोलणं.. तू थांबू शकलीस तर इतर लोकही थांबतीलच एक ना एक दिवस! अन् लोक बोलत राहिलीत तरी हरकत नाही.. कारण माझा एकटेपणा दूर करायला लोक येत नाहीत.." रश्मी उठून उभी राहिली.

रश्मीची बाजू चूक का बरोबर हे तिला ठाऊक नाही.. पण तिलाही तिची म्हणून एक बाजू आहे हे नक्की! तुम्हाला काय वाटतं?


© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने