गमावलेले लेकरू

©®अनुजा धारिया शेठ



मालती दवाखान्यात लेकीच्या काळजीने फेऱ्या घालत होती...  आज त्यांच्या मुलीची म्हणजेच मधुराची डिलिव्हरी..  विहीणबाई मोठ्या नातीला घेऊन बसल्या होत्या... ४-५ वर्षाची पोर ती.. माझ्या मम्माला काय करतायत? बेबी कधी येईल याची वाट बघत होती... 

मालतीचे लक्ष मात्र कशातच लागत नव्हतं.. मनात हजार विचार येत होते.. आता सुद्धा मुलगी झाली तर...


जावई, विहीणबाई अगदी कान टवकारून बसले होते.. बाळाच्या रडण्याचा आवाज आला..  अन काय झाले ते ऐके पर्यंत हीच्या पोटात नुसता गोळा.... तिच्या मनाची अवस्था वेगळीच होती... तिला काहीच कळंत नव्हते... 

डॉक्टर बाहेर आल्या अन म्हणाल्या... काय योगायोग आहे बघा... गणेश जयंती आज अन गणपती आला बघा... मुलगा झाला अभिनंदन...

मालतीचा विश्वास बसतच नव्हता.. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले... तिने लगेच मधूकर रावांना फोन केला, मुलगा झाल्याचे ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला... तें म्हणाले, मालती आपण जे गमावले ते आज आपल्या नातवाच्या रुपात आपल्याला लाभले... दोघांना खूप आनंद झाला...

तेवढ्यात बाळाला घेऊन डॉक्टर बाहेर आले.. श्वास घ्यायला थोडा त्रास होत असल्यामुळे NICU मध्ये ठेवायला लागेल असे सांगितलं... 

मालतीचा चेहरा परत काळजीने पांढरा पडला... काळजीने कि भीतीने तिला काही कळत नव्हते.. 

तुम्ही जा सोबत असे विहीणबाईंना सांगितलं अन छोट्या चिऊ ला घेऊन ती दवाखान्यात थांबली... सिझर झाल्यामुळे मधुरा ग्लानीत होती. पण मालती मात्र भूतकाळात हरवली... जे माझ्या सोबत झाले ते माझ्या लेकीसोबत नको असे देवाला प्रार्थना करत होती... पण, मात्र भूतकाळातील विचारांनी अस्वस्थ झाले होते..

मधुरा चिऊ एवढीच होती... अन मालतीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला... 

खर तर चाहूल लागली तेव्हाच डॉक्टरने जुळे असल्याच सांगितलं त्या काळी जुळे म्हणजे जीवाला घोर असायचा... त्यात मधुरा लहान होती तिचे पण करावे लागे... तेव्हाच्या सासवा म्हणजे खडूसच... पिक्चर मध्ये दाखवतात तश्याच... त्यामुळे घरातली कामे... खूप थकवा यायचा... 

पण कोणाला सांगणार?? दिवस ढकलत होते मी... शेवटी त्रास झाला अन 8 व्यातच डिलिव्हरी झाली... 

राहायला गावात.. शहरात जाई पर्यंत वेळ गेला... डिलिव्हरी नॉर्मल झाली... दोन मुले झाली... पण त्या मुलांना काचेच्या पेटीत ठेवायला सांगितलं... 

शहरात जाई पर्यंत उशीर झाला त्यामुळे एकच पेटी शिल्लक होती... म्हणुन त्यांना मुंबईला हलवायला सांगितले... 

मला हलवणे शक्य नव्हते... मुलांना आधी हलवण्यात आले... घरात सर्वांची धावपळ सुरू होती... 

बिचारी मधुरा घाबरून रडू लागली तिला काही कळतच नव्हते.. काय सुरू आहे... 

बर नणंदा होत्या त्या पण सासू सारख्या खाष्ट.. सर्वानी तोंडसुख घ्यायचे काम केले पण हवी ती मदत नाही...

दोन गोंडस पिल्ल ज्यांना मी बघितल पण नाही... अन एका बाजूला मधुरा... यात आई म्हणून माझा जीव टांगणीला लागला होता... 

तेव्हा जे झालं तेच आता माझ्या मधुराच्या बाबतीत झाले तर... नाही मालती नाही असा विचार करायचा नाही अजिबात... पण म्हणतात ना, "मन चिंते ते वैरी ना चिंते" अशीच आज मालतीची अवस्था होती... 

सारखी देवाला हात जोडत होती.. मन मात्र परत परत भूतकाळात जात होते...

तिची तगमग तिलाच आठवत होती... चार दिवसांनी ती तीच्या दोन पिलांकडे गेली... तू निश्चिंत रहा... मधुराला मी बघेन, असे म्हणतं मालतीची ताई निलीमा हिने मधुराला आपल्या घरी नेले... आणि मालती शांत मनाने जाऊ शकली होती...

तिकडे ती पाच-सहा दिवसांची पिल्ले, अन इकडे ४-५ वर्षाची मधुरा... शेवटी आईचं मन ते दोन्ही कडे अडकलं होते... 

त्या काळी साधा फोन नसे त्यामुळे मोबाइल तर लांबची गोष्ट... सगळे छान सुरू होते... 

सासू अन नणंदा याना मात्र दुःखच जास्त झाले मुलगे झाले म्हणून... 

अन शेवटी नजर लागावे असेच झाले... आठ दिवसात एक बाळ काळे- निळे पडले.. अन सोडून गेले.. दुसरं जगेल या आशेवर दिवस पुढे ढकलत होते.. तर पुढच्या आठ दिवसात तें सुद्धा मला कायमच सोडून गेले...

ऊरी फुटणारा पान्हा कपडे ओले करत होता... पदर झाकून सुद्धा लपत नव्हता.. सार काही सुन्न... 

परत कधीच आई होता येणार नाही डॉक्टर म्हणाले, हे दुसरे बाळंतपण असले तरी काय झाले? कोणत्याही स्त्रीला हा धक्का पचवणे अवघडच असते... 

रडून रडून डोळे सुजले... मधुरा डोळ्या समोर दिसताच  परत खंबीरपणे उभी राहिले.. तरी लोकांच्या नजरा होत्याच त्रास द्यायला...

माझ्या चुलत जावेला मुलगा झाला तेव्हा मी गेल्यावर पदराखाली लपवून ठेवले.. त्यावेळी जाणवल कि पदराचा असाही वापर करता येतो... 

ह्यांच्या घरात मुलीच सर्व म्हणून कुत्सितपणे हसणारे चेहरे... सर्व दुर्लक्ष करत मधुराला वाढवले... मुलगा-मुलगी असा भेद न करता तिच्या सर्व आवडी-निवडी जपत तिला मोठे केले...

लग्न ठरवताना पण मुलीच आहेत हो ह्यांच्या कडे असे म्हणत आलेले नकार... त्यात नणंदेच्या मुलींना पण मुलगीच झाल्यामुळे सर्वत्र पसरलेल्या वास्तुदोषाच्या अफवा... हे सर्व पार करत मधुराचे लग्न जमले... गोड बातमी आल्यावर मनाला आलेली ऊभारी.. अन नातू होऊ दे म्हणून कुत्सितपणे हसुन बोललेले चेहरे...

नात झाली, आजी झाल्याचा आनंद झाला... अन मुलगीच झाली का? असे बोलणारी आपलीच माणसे भेटायला येऊन मनाच्या जखमेवर मिठ चोळून गेली... पण नातीचे करण्यात विसरून गेले मी सर्व...

ती कधी मोठी झाली कळलेच नाही, अन दुसरी बातमी आली माझ्या दुखावलेल्या मनाला नव्याने पालवी फुटली... 

मुलगा-मुलगी भेद न करणारी मी, एका नातेवाईकाच्या बोलण्याने भुलुन गेले अन माझ्याच लेकीला आपण लिंगपरीक्षण करू म्हणून गळ घातली... ती चिडली, आई काय बोलतेस तू? काही असले तरी चालेल पण मी असे काही करणार नाही... तेव्हा मलाच माझी लाज वाटली अन लेकीचे कौतुक सुद्धा... 

मी पालक म्हणून तिला घडवताना कुठे कमी पडले नाही याचा अभिमान वाटला मला... पण त्याच बरोबर मुलगा व्हावा म्हणून साकडे घालत होते..

मी माझ्या मुलांना गमावले असले तरी त्यांच्या सोबत घालवलेले तें क्षण अजूनही मनाच्या कोपर्यात साचून ठेवले होते... त्यानंतर माझी मुलगा नाही म्हणून या समाजाने केलेली अवहेलना... या कटू आठवणी सुद्धा मनाच्या कोपर्यात बंद केल्या... माझ्या या लेकीसाठी... पण हे परमेश्वरा आज तिला सुद्धा तू त्याच रेषेवर आणून उभे केलेस ? असे का? म्हणुन मालतीला मोठ्या मोठ्याने रडावसं वाट्त होते... आवंढा गिळत तिने स्वतःला सावरले, कारण ती दवाखान्यात होती...

मधुरा ग्लानीत होती... अन छोटी चिऊ आपल्या मालती आजी कडे बघत होती... मालतीने पटकन सा‌वरल... चिऊ घाबरत म्हणाली, आजी आपल्या बाळाला काय झाले ग? 

मालतीने धीर एकवटला अन उसने हसू आणत म्हणाली, काही नाही ग चिऊ.. आता बाबा घेऊन येतिल बघ बाळाला...

मधुकररावांना सर्व समजताच ते सुद्धा दवाखान्यात आले... दोघेही मनाने खचले असले तरी मधुराला अन चिऊला धीर देत होते...

मधुकर राव तेव्हा मालतीला म्हणाले, आपण आपली दोन मुले गमावली, काळाने पुढे आलो ग... पण तें सर्व मनी तसेच साचले आहे याची जाणीव ह्या आताच्या परीस्थीतीने करून दिली बघ... सल मनातून काही जात नाही बघ...

तेवढ्यात जावई अन विहीणबाईने येऊन सांगितलं, काळजी करण्यासारखे काहीच नाही... जन्मतः कावीळ आहे... अन पाणी जास्त झाल्या मुळे त्याच्या नाकात गेले बाकी काही नाही... हे ऐकताच दोघांचा जीव भांड्यात पडला...

मधुरा, बाळ, चिऊ ताई लवकरच मालती आजी कडे येणार म्हणून ती तयारी करायला गेली...

कुत्सितपणे हसणार्यांची तोंड मात्र बंद झाली होती, नातु घरी येणार म्हणून आजी बाई जोरात तयारी करत होती.... आज तीच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता...

मुलगा झाल्याचा आनंद जो तिला घेता आला नव्हता तो आज नातु रुपाने ती घेणार होती....


अजूनही समाजात बऱ्याच ठिकाणी मुलगा नाही म्हणून त्या स्त्रीला दूय्यम दर्जा दिला जातो...त्यावरून ही कथा सुचली आहे....


©® अनुजा धारिया शेठ

सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने