© सौ.वैशाली प्रदीप जोशी
सरोज अभ्यंकर - तीन भावंडांमध्ये मोठी. तो काळ आजपासून तीस वर्षांपूर्वीचा होता. सरोज ग्रॅज्युएट झाली अन् बँकेत नोकरीला लागली.
तिच्या वयाची तेवीस वर्षे पूर्ण झाली अन् तिच्यासाठी वर संशोधन सुरु झाले.
सरोजचे आईवडील सुशिक्षित. वडील एमएसईबीत अन् आई गृहिणी. त्याकाळी लग्नासाठी तेवीस वर्ष वय म्हणजे लग्नासाठी अगदी योग्य वय.
सरोजचं नांव त्या काळच्या प्रथेप्रमाणे वधुवर सुचक मंडळात नोंदवलं अन् पहिलं स्थळ पाहण्यात आलं ते निखिल कुलकर्णी ह्याचं...
हा निखिल इंजिनिअर आहे अन् एका कॉलेजमध्ये लेक्चरर आहे असं बायोडाटामध्ये नमूद केलं होतं. सर्वार्थानं हे स्थळ उत्तम आहे असं सरोजच्या आईवडिलांना वाटलं.
त्यात सरोज मोठी. तिच्या पाठच्या दोन बहिणी... हिला उजवली की एक जबाबदारी संपली असा विचार तर होताच आईबाबांचा पण त्यासाठी तडजोड नव्हती करायची त्यांना.
निखिलचं स्थळ अनुरूप वाटल्यानं त्यांनी वर्धेच्या कुलकर्ण्यांशी संपर्क साधला. तसंही नागपूर-वर्धा जेमतेम दीड-दोन तासाचा रस्ता.शिवाय जिल्ह्याचं ठिकाण.ह्या ठिकाणी सरोजची बदली सहज होईल. काही अडचण येणार नाही असंही वाटलं सर्वांनाच.
मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला खरा पण निखिलसोबत आलेली त्याची विवाहित बहीण सरोजच्या केशरचनेवरून बोलली तिला.
बाबांना जरा खटकलंच ते.
मुलाच्या बहिणीचा वारंवार हस्तक्षेप होईल का? मुलीला तिच्या मनाप्रमाणे राहण्याचं, कपडे वापरण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं ही जाणीव होती त्यांना. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं बैठकीत.पण मुलाच्या आईवडिलांनी बाजू सावरून घेतली आणि असं होणार नाही ह्याची ग्वाही दिली.
मुलाची चौकशी करता असं कळलं की मुलगा इंजिनिअर नसून इंजिनीअरिन्ग डिप्लोमा केलेला आहे आणि कॉलेजमध्ये लेक्चरर नसून 11 वी, 12 वी संलग्न असलेल्या शाळेत शिक्षक आहे.
निखिलच्या वडिलांनी ह्या गोष्टी स्वतःहून सांगितल्या आणि वधुवर सुचक मंडळात चुकीची माहिती देण्याचं कारण अगदी पटवून सांगितलं म्हणून कदाचित त्यांच्या प्रामाणिकपणावर अभ्यंकर मंडळींचा विश्वास बसला असावा.
अशा क्षुल्लक घटनेवरून हातचे स्थळ गमावू नये ह्या नातेवाईकांच्या सल्ल्यामुळे सरोजच्या वडिलांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
अर्थातच सरोज आणि निखिल दोघांनी एकमेकांना पसंत केलं अन् लग्नाच्या बोलणीसाठी बैठक बसली.
कुलकर्णी मंडळी खूपच समजूतदार होती.
त्यांनी रजिस्टर लग्नाचा प्रस्ताव मांडला. लग्नाला त्यांच्याकडची फक्त 15 माणसे येतील असं सांगितलं. मुलामुलीच्या कपड्याचा खर्च, आणि नवऱ्या मुलीला सोनंदेखील ते स्वतःच करणार होते.त्याबदल्यात त्यांना फक्त रु 25000 द्यायचे होते.ह्याशिवाय मानपान, हौसमौज काहीच नको होती त्यांना.त्यांचा विहीणीचे पाय धुणे, विहीण पंगत अश्या प्रथांनाही विरोध होता.
त्याकाळच्या मानाने हा "सौदा" फार स्वस्त होता. त्याकाळी लोक, खासकरून मुलाकडचे लोक वैदिक लग्नाचा, वरमायच्या हौसमौजीचा आग्रह धरत. त्यामुळे रजिस्टर लग्नासाठी तयार असलेली मंडळी फार आधुनिक वाटली सगळ्यांनाच.
त्याकाळी मोबाईल किंवा फोनचं प्रस्थ नव्हतं पण निखिल रोज एक पत्र आणि ग्रीटिंग पाठवत असे सरोजला. तेही कुरियरनं ! त्याकाळी कुरियरवाला दारात येण्याचं फार अप्रूप होतं सर्वाना...
"एव्हढी महागडी ग्रीटिंग्स आणि वर कुरियरचा खर्च ! हौशी दिसतोय निखिल आणि पैसा आहे जवळ !" सरोज सुखावली खरी पण रोजचा इतका खर्च तिच्या काटकसरी स्वभावाला पटेना..पण फक्त तीन महिने... लग्न झालं की आपण करू सगळं प्लॅनिंग म्हणून तिनं दुर्लक्ष केलं.
ठरल्याप्रमाणे लग्नासाठी कपडा खरेदीचा दिवस ठरला अन् सरोज तिच्या आई अन् धाकट्या बहिणीसह वर्धेत दाखल झाल्या.
साडीखरेदीसाठी मुलाकडून फक्त नवरा मुलगा अन् त्याची बहीण. खूप आग्रह केला सरोजनी अन् तिच्या आईनी पण मुलाची आई साडी खरेदीसाठी यायला नाहीच म्हणाली.
सरोजला जरा वेगळं वाटलं कारण नुकतंच तिच्या चुलत भावाच्या लग्नात बस्ता घ्यायला 10 जण गेले होते आणि दोन काकू खरेदीला नेलं नाही म्हणून नाराज झाल्या होत्या.त्याकाळची पद्धतच होती तशी!
पण एव्हढं-तेव्हढं मनावर नाही घ्यायचं म्हणून हा विचार ही झटकून टाकला सरोजनं..
साडी खरेदी करताना निखिलची बहीणही फार उत्साही नव्हतीच..."आटपून टाका, उरकून टाका, घेऊन टाका" हे तिचे शब्द वारंवार खटकत होते सरोजला. जेमतेम पाच-पाचशे रुपयांच्या दोन साड्या घेतल्या अन् शालूसाठी नाहीच म्हणाले ते लोक..."रजिस्टर लग्न आहे तर शालू कशाला हवा?" असा युक्तिवाद.
मंगळसूत्राच्या नावाखाली एक 10 ग्रॅमची सोन्याची चेन आणि त्यात वाट्या-मणी असं घेऊन "टाकलं" एकदाचं अन् आटोपली खरेदी !
निखिलचे कपडे आपल्यासमोर घ्यावेत असं वाटलं सरोजला पण "नंतर बघू आम्ही" म्हणून टाळलंच त्यांनी...
सरोज हिरमुसली."रजिस्टर लग्न असलं म्हणून काय झालं? लग्नाचा शालू हवाच ना !" तिचा हट्ट. पण आईनं समजूत काढली अन् नागपूरला येऊन 1500/- चा एक शालू घेतला तिच्यासाठी.
लग्नाचं रिसेप्शन ठरवलं होतं कुलकर्णी मंडळींनी.सरोजनं उत्सुकतेनं जेवणाचा मेन्यू विचारला.."त्यात काय-आलूवांग्याची रस्सा भाजी, पोळी,भात अन् बुंदी" निखिलच्या वडिलांनी बेफिकीरीनं उत्तर दिलं अन् रडू यायचं बाकी राहिलं होतं सरोजला.
पण तिच्या समजूतदार स्वभावानं ह्यावरही मात केली अन् "लोकांना कितीही जेऊ घातलं तरी चांगलं म्हणतं का कुणी? असू देत.रिसेप्शन एक दिवसाचं.पार पडलं की झालं !" असं म्हणत move on केलं.
लग्नाच्या वीस दिवसआधी सरोजला पत्र आलं निखिलचं. त्यात त्यानं कुणीतरी ओळखीची व्यक्ती मुंबईला आजारी आहे म्हणून तिथे त्यांची सेवा करायला जायची इच्छा व्यक्त केली होती अन् लग्नाच्या वऱ्हाडी मंडळींना वर्धेहून नागपूरला पाठवून तो स्वतः एकटा वेळेवर लग्नाला हजर होणार होता...
आता मात्र सरोजनं ह्या प्रकाराला विरोध केला. निखिलनं तिचं ऐकलं मात्र अन् लग्नाच्या आदल्या दिवशी दहा नातेवाईक घेऊन लग्नाला हजर तर झाला पण संध्याकाळीच सर्व वऱ्हाडीमंडळी सरोजला घेऊन एका मित्राकडे जेवायला गेली.
ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी असं नवरीला बाहेर पाठवणं कुणालाच प्रशस्त वाटेना.सरोजला देखील माहेरची ही शेवटची संध्याकाळ नातेवाईकांसोबत घालवायची होती. अभ्यंकरांकडे येणारी पाहुणेमंडळी नवरीला भेटायला आतुर होती अन् नवरी हॉलबाहेर !
अखेर लग्न पार पडलं.वरात वर्धेला पोचली. रिसेप्शन झालं.नवीन जोडपं फिरायला पचमढीला जाऊन आलं.सरोजची बदली वर्धेला झाली अन् रुटीन सुरु झालं.
आता सरोजला निखिल आणि त्याच्या घरच्या मंडळींचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली.
सरोजची नोकरी असल्याने तिला सकाळी जेवून ऑफिसला जायचे असे पण सकाळी साडेनऊ पर्यंत स्वैपाक करण्याची तिच्या सासूची मानसिकता नव्हती. शिवाय सरोजला सकाळी घरची स्वच्छतेची कामे नेमून दिली होती त्यामुळे तिला स्वैपाक करायला वेळ मिळत नसे. ती कॅशियर असल्याने तिला दुपारी फक्त जेवण्यासाठी घरी येणं शक्य होत नसे.मग कित्येकदा बाहेरच खाणं नाहीतर कडकडीत उपास...
निखिल स्वतः घरात खर्चायला पैसे देत नसे त्यामुळे ती जबाबदारी आपसूक सरोजवर येऊन पडली.त्याकाळी तिला पगार रु 2500/-. त्यात दोन हजार घरखर्चाला दिल्यावर तिच्याजवळ फारसा पैसा शिल्लक रहात नसे आणि पैसे असले तरी निखिल तिच्या पर्समधून काढून घेत असे.
खोटं बोलणं, खोटी कामं, दारू पिणं, आर्थिक गैरव्यवहार हे तर नेहमीचंच.
लग्नाआधी भावी पत्नीसाठी रोज ग्रीटिंग आणि कुरियरचा खर्च करणारा निखिल आता बायकोच्या आवश्यक गरजांसाठीदेखील टाळाटाळ करत होता.
एकदा निखिल मित्रांसोबत गमजा करत असताना सरोजनी ऐकलं की त्यानं हे लग्न सरोजची नोकरी, तिला मिळणारा पैसा अन् तिच्या वडिलांचं नागपूरला मध्यवस्तीत असणारं घर पाहून केलंय..
आता मात्र तिचे डोळे खाड्कन उघडले. ती तिच्या आईवडिलांशी ह्याबाबतीत बोलली अन् सांगोपांग विचार करत तिनं निखिलपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला...अन् लग्नानंतर वर्षभरातच तिनं घटस्फोट घेतला.
आज मनात राहून राहून विचार येतो तो एकच....भूतकाळ बदलता आला असता तर...
1) निखिलच्या बहिणीची सरोजच्या केशरचनेबद्दल शेरेबाजी केली तेव्हाच ह्या स्थळाबाबत पुनर्विचार केला असता तर?
2) लग्नाचा व्यवहार ठरवतेवेळी मुलाकडची मंडळी वाजवीपेक्षा समजूतदार कशी आणि का आहेत हे समजून घेतलं असतं तर?
3) मुलाच्या वडिलांनी प्रत्यक्ष भेटीत मुलाच्या शिक्षण आणि नोकरीसंबंधी खरी माहिती दिली तरी वधुवर सुचक मंडळात खोटी माहिती दिलीये ह्या सत्याकडे गांभीर्याने पाहिले असते तर?
4) एकुलत्या एका मुलाच्या लग्नाच्या खरेदीबाबतीत, हौशीमौजीच्या बाबतीत आई आणि रिसेप्शन बाबतीत वडील इतके उदासीन का आहेत ह्याचा तेव्हाच विचार केला असता तर? (त्याकाळी असं अपवादानेच घडत असे)
किंबहुना ते आधुनिक विचारांचे आहेत की मुलाच्या लग्नाबाबत उदासीन आहेत हे उमजून घेतले असते तर?
5) "हो. मी 'ड्रिंक्स' ocassionlly घेतो" हे पत्रातून लिहिलं होतं निखिलनं. पण शाळेतल्या शिक्षकाला असे कोणकोणते ocassions असतात जिथे 'ड्रिंक्स' घ्यायला लागतात ह्याचा विचार केला असता सरोजनं किंवा तसं आईबाबांच्या कानावर घातलं असतं तर?
6) रोज ग्रीटिंग आणि कुरियरचा खर्च निखिल कुठून, कसा आणि का करतो ह्याचा व्यावहारिक विचार करता आला असता तर?
7) लनासाठीच्या खरेदीवेळी सरोजला तिची "त्या" घरातली किंमत कळू लागली होती खरं तर...शितावरून भाताची परीक्षा करून तिनं तिथेच हे नातं न स्वीकारण्याचा निर्णय घेतला असता तर?
8) निखिलनं मुंबईला जाऊन वेळेवर लग्नाला येण्याचा निर्णय सरोजला पटला नव्हताच.तसंच लग्नाच्या पूर्वसंध्येला तिला बाहेर घेऊन जाणं हे ही डोक्याच्या बाहेर होतं तिच्या...
लग्नाला तेव्हाही नकार देऊ शकली असती ती..द्यायला हवा होता....
भूतकाळ बदलता आला असता तर....भविष्यकाळ काही वेगळा असता...आहे ह्यापेक्षा वेगळा....कदाचित ह्यापेक्षा चांगला...कदाचित वाईटही..
पण भूतकाळ बदलता येत नाही हेच खरं !
(सत्यघटनेवर आधारित)
© सौ.वैशाली प्रदीप जोशी
सदर कथा लेखिका सौ.वैशाली प्रदीप जोशी यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
सदर कथा लेखिका सौ.वैशाली प्रदीप जोशी यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

Thodfar asach maza bahini sobat pan zalay...
उत्तर द्याहटवा