© डॉ सुनिता चौधरी
कालपासूनच गण्याच्या आईचा डोळ्याला डोळा लागला नव्हता.
अगदी महिनाभरापासूनच तिने सुनेला गण्याच्या वर्ष श्राध्दाची तयारी करायला सांगितली होती पण तीची सून मात्र काही केल्या सासूचं मनावर घ्यायला तयार नव्हती. श्राध्दाचा विषय काढताच मख्ख चेहऱ्याने ती आपल्या सासूकडे बघायची आणि तिथून निघून जायची.
सासूला कळायला मार्ग नव्हता की, पोराच्या श्राध्दाचं आता काय होईल?
पण आता गेले दोन दिवस झाले गण्याच्या आईची चलबिचल वाढली होती. आठवडा राहिलाय पोराच्या श्राध्दाला अन् सून काही मनावर घेईना म्हणून त्यांचीही चिडचिड वाढली होती.
"काय तो सोक्स मोक्स उद्याला लाऊच…! काय करायली ही असं? ... नव-याचं स्राध्द हाय तर त्याची तयारी नग् का करायला? ....... पण हिला त्यातलं कायबी इचारलं तर आपलं मख्ख थोबाड घेऊन पुढं जातीया ही .... आता उद्याला समदं एकादाचं काय ते ठरवतेच"!
(गण्याची आई आपल्या मनाशीच संवाद साधत होती )
पोराचं वर्ष श्राध्द असून सून त्यावर काही बोलेना म्हणून सासूचा अगदीच तिळपापड होत होता. आता दुस-या दिवशी ह्याचा जाब विचारायचाच ह्याचा निश्चय करत सासूने कशीबशी रात्र काढली.
वर्षभरापुर्वी गण्याने परिस्थितीला आणि गरीबीला कंटाळून, गळ्याला फास लाऊन आत्महत्या केली होती. लग्नाला तीनचं वर्ष झालेली शकू दिड वर्षाचं एक पोर अन् दुसरं पोटोशी असलेलं मूल असताना विधवा झाली होती.
गण्याच्या मागं त्याची म्हातारी आई , विधवा बायको अन् दोन पोरं होती जी आता बापाला पोरकी झाली होती.
सकाळ झाली अन् गण्याची आई उठली ... सून कामाला जायच्या आत काय तो निर्णय घ्यावा म्हणून म्हातारी उंबरठ्यातच बसली होती.
घरातली सगळी कामं उरकत शकू बाहेरच्या कामाला निघाली.
तेवढ्यातच 'थांब शके कुट्ट निघालीस'?.... .. शकूला सासूचा आवाज आला अन् ती दारातच थबकली.......आता सासू आपल्याला मेलेल्या नव-याच्या वर्ष श्राध्दाचंच विचारेल हे तीला पक्कं माहीत होतं. शकूच्या मनाची चलबिचल वाढली होती. ....
ती क्षणभर दारातल्या उंबरठ्यावर थांबली खरी पण एक दृढनिश्चय करूनच ...... आता काय ते, सासूशी बोलायलाच हवं म्हणत ती ही सासूच्या आवाजासरशी मागे वळली.....
'काय झालं आई' ?..... म्हणत तिने सासू ला उलट प्रश्न केला.....
"काय झालं म्हणून काय विचारतेस ग् शके ? तुला कित्यांदा म्हनले की, माझ्या गन्याच्या स्राध्दाचं तू काय करनार हाईस? तर तू मख्या तोंडानं माझ्याकडं बघत निगतीया ; आता पोराचं स्राध्द पार काही दिसांवर आलंया, अन् तरी तुझ्या तोंडातून चकार शब्द न्हाय ! काय झालंया तरी काय तुला? जरा सांग म्हंजे मला बी कळल की माझ्या लेकराला मेल्यानंतर तरी सांती घावल का न्हाय "? बोलता - बोलता गण्या ची आई रडायला लागली.
शकू कामाला निघाली होती पण सासूच्या आवाजासरशी ती थांबली. मगाच पासून सासूचा शब्दन् शब्द ती ऎकत होती अन् आता सासू रडायला लागल्यावर तीला तीची खुप दया आली.
नऊ महीने ज्या लेकराला तळहाताच्या फोडासारखं जपलं . स्वतः चं रक्त आटवत पोराला मोठं केलं त्याला संसाराला लावलं आणि एक दिवस तोच पोरगा कोणाच्या ध्यानीमनी नसताना हे सगळं काही अचानक सोडून गेल्याने त्या मायमाऊलीवर कीती मोठा आघात झाला हे तिने तिच्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलं होतं. तीला खरंतर आपल्या मेलेल्या नव-याच्या रागापेक्षाही आता समोर असलेल्या आपल्या सासूची किव आली.
सासूला आधार देत बसवत ; हळूच ती म्हणाली की,
"आई ! का घालायचंय तुम्हांला ह्यांचं वर्षश्राध्द"?
"का घालायचं म्हंजे? स्राध्द घातल्याईना माझ्या लेकराच्या आतम्याला सांती कशी मिळणार?
किती दुखात होता त्यो, अन् नको ते पाऊल उचललं त्यानं ! पन आता त्याच्या आत्म्याला सांत करून त्याला सुखात बघायचं हाय बग मला"! म्हणत, गण्याच्या आईने परत डोळ्याला पदर लावला.
शकू ! आपल्या सासूचा हात हातात घेत म्हणाली, "आई ! रडू नका तुम्ही. तुमचं दु:ख खुप मोठं आहे. नवरा गेलाय त्यापेक्षा मुलगा वारल्याची बोच तुम्हाला रात्रंदिवस खातीये हे मला समजत नाहीये असं वाटतंय का तुम्हाला? मला तुमचा त्रास समजतोय हो" !
"मग त्रास समजतोय तर स्राध्दची तयारी कधी केली तू? माझ्या पोराच्या स्राध्दाला तू का टाळायलीस"? सासू शकूवर डाफरतच बोलायला लागली.
"काय म्हणायचंय आई तुम्हाला नेमकं? मी श्राध्दाला टाळाटाळ करतीये याचा अर्थ मला तुम्हांला त्रास द्यायचा आहे असं नाहीये. आपण हे असं ! काम करून जेमतेमच आपलं पोट भरतोय, आणि वर पोरांचा खर्च जरा वाढला की कसं भागेल ह्या चिंतेत सगळा दिवस जातो तिथे आपण असं वर्षश्राध्द घालून अजून कर्जबाजारी व्हायचं का"?
"अग् ! मंग म्हणून काय माझ्या पोराच्या आत्म्याला तसाच तळमळू द्यायचं का? चार बुकं शिकलेली तू, आता नवरा गेला म्हणून त्याच्या श्राध्दालाबी नाय म्हनायला लागलीस व्हय" ? सासू बोलतच होती.
"श्राध्द करायला मी नाही म्हणतच नाहीये पण मुळात इथे आपलंच पोट उपाशी ठेवून गावाला खाऊ घालायचं का आपण ? आणि कोणासाठी करायचं ते? एका अशा माणसासाठी जो जगण्याच्या लढाईत भ्यायला अन् स्वतःला संपवलं त्याने "!
"त्याला त्रास होत होता ग् शके ! माझं पोर त्रासलं होतं सगळ्यालाच अन् म्हणून त्यानं असलं वंगाळ काम केलं म्हणत गण्याच्या आई हमसाहमशी रडू लागली".
"हो ! ते त्रासले होते म्हणून मग बायकोला, म्हाता-या आईला, अन् पोराला वा-यावर सोडून निघून जायचं का? स्वतः पुरताचा त्रास त्यांनी संपवला अन् आपल्याला एकटं सोडलं . आपल्या मागे आपली बायका-पोरं, म्हातारी आई कशी जगेल याचा एकदाही विचार त्यांनी करायला नको होता का? पुरुषासारखा पुरुष अन् त्यानं आयुष्याच्या लढाईत हार मानत आपल्या लोकांचं आपण गेल्याने काय हाल होतील ह्याचा जराही विचार करायला नको होता का? बाईचा नवरा गेलाय म्हणत किती लोकांनी वाईट नजर माझ्यावर ठेवली पण तरी मी तटस्थ राहिले .मलाही त्रास झालाच ना मग मी ही संपवायचं होतं का स्वतः ला"?
"शके ! असलं वंगाळ नको ग् बोलू म्हणत सासूने शकूला मिठीत घेतलं अन् ती परत रडायला लागली".
"आई ! त्रास हा बायांनापण होतोच ना? पण बाई ही सहजासहजी आत्महत्या करत नाही कारण तीला तिच्या नंतर बाकीच्यांंचं काय होईल ह्याची चिंता आधी असते. मलाही वाटतं कधीकधी की, संपवावं सगळं ! पण नाही ; माझी लेकरं अन् माझी ही माऊली माझ्या डोळ्यासमोर येते अन् मला परत लढायची हिम्मत मिळते. जाणारा गेला, आणि स्वतः च्या मर्जिने गेला आयुष्याच्या लढाईत 'भ्याडपणाने तो मेला अन् मी त्याचं श्राध्द घालू का '? त्यांच्या जाण्याचं दु:ख मलाही खुप आहे पण त्यांच्या अशा जाण्याने आपले सोस तर संपले नाहीत ना ? मग आता माझ्यासमोर जे वाढलंय ते आधी बघणं मला भाग आहे, नाही का"?
"श्राध्द घालून मेलेल्या नव-याच्या आत्म्याला शांती देण्यापेक्षा माझ्या कुटुंबाला मी चार घास तृप्तीचे खाऊ घालेन यातच माझा देव आणि मी समाधानी आहे".
"आई ! अजूनही तुम्हांला त्यांचं श्राध्द घालायचं आहे का"?
शकूच्या सासूने स्वतः अन् शकूचेही पाणावलेले डोळे पुसले अन् उभी रहात म्हणाली;
"आज कामाला जायचं न्हाय का? की, गप्पाच मारत बसशील? ... जा लौकर मी पोरांना खाऊ घालते म्हणत ती आत गेली".
शकूला सासूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून गलबलून आलं.
पण आता तिने ठरवलं होतं. रडायचं नाहीच. आता फक्त आपल्याला लढायचंय आणि दोन हात करायचेच आहे ते ही ह्या आयुष्याशी !
समाप्त ...
"आत्महत्या हे कोणत्याही परिस्थितीचं समाधान नव्हे. त्रास होत असतो परंतू आलेल्या परिस्थितीला हिमतीनं सामोरं जाण्यातच खरं सामर्थ्य असतं. कोणी गेल्याने प्रश्न फक्त गेलेल्या व्यक्ती पुरताच सुटतो मात्र त्याच्यासोबतचर जोडले गेलेले जे असतात ते मात्र रोज कुढत जगतात त्यांचा विचारही करायलाच हवा ना"?
सदर कथा लेखिका डॉ सुनिता चौधरी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!! 📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
