©सौ.वैशाली प्रदीप जोशी
"ए, चल ना शलाका, नवीन रेस्टॉरंट उघडलंय आपल्या ऑफिसच्या जवळच... काय भन्नाट चायनीज मिळतं तिथे! लंच टाईममध्ये जाऊया सगळ्याजणी आज!" भाग्यश्री शलाकाच्या टेबलवर येत बोलली...
शलाकाचे डोळे खमंग चायनीजच्या नावाने लकाकले पण क्षणभरच..."अगं नाही जमणार मला!" ती खालमानेनंच उत्तरली.
शेजारच्या टेबलवर बसणाऱ्या हर्षदा आणि चित्रानं "हे माहितीच होतं आम्हाला" अश्या अर्थाने मान वेळावली.
"अगं का पण?"तुला काही पार्टी नाही मागत आहोत आम्ही, T T M M करायचंय " भाग्यश्रीनं थट्टा केली.
"अगं आज उपवास आहे माझा"
"आज कसला गं उपवास? बुधवारचा की द्वितीयेचा?" भाग्यश्रीनं तिला कुठलीही सबब देऊ द्यायची नाही हे ठरवलंच होतं.
"नाही, माझी पैश्याची पर्स घरी विसरलेय मी! नाहीच जमणार मला!" शलाकाचं चाचरणं भाग्यश्रीच्या नजरेतून सुटलं नाहीच.
इतक्यात हर्षदानं भाग्यश्रीला खूण करून जवळ बोलावून घेतलं अन् तो विषय तिथेच संपला.
ह्या सगळ्याजणी एका कंपनीत एकमेकींच्या सहकारी. शलाका, चित्रा अन् हर्षदा तिथे दोन वर्षांपासून आहेत आणि भाग्यश्री आत्ताच बदलीवर तिथे जॉईन झालीय.
सुरुवातीला शलाका ह्या महिला मंडळात, त्यांच्या कार्यक्रमात, पार्टीत सहभागी होत असे... पण नंतर ती सोबत येईनाशी झाली.
सुरुवातीला मैत्रिणींनी आग्रह केला पण तिचा सततचा नकार ऐकून त्यांनीही तिला बोलावणं सोडून दिलेलं.
भाग्यश्रीला मात्र शलाका एकलकोंडी नाही वाटली. पण ती काहीतरी लपवतेय, काहीतरी गडबड आहे हे मात्र तिने ताडलं.
एक दिवस ह्या तिघीजणी एकत्र डबा खात असताना शलाका टेबलवरच स्वतःजवळचा बिस्कीटचा पुडा चिवडतेय हे तिला दिसलं.
भाग्यश्री तशीच उठली अन् स्वतःच्या डब्यातल्या चार इडल्या अन् चटणी एका प्लेटमध्ये घेऊन शलाकाच्या टेबलवर गेली.
"अगं नकोय मला! actually घरून सकाळीच जेवून आलेय मी... just टाईमपास म्हणून बिस्कीट..." शलाकाचा स्वर रडवेला झाला.
"हूं... खाऊन घे" भाग्यश्री बाजूची खुर्ची तिच्या पुढ्यात घेऊन बसली.
समोर पूर्णब्रह्म पाहिल्यावर भुकेनं लाचार असलेली शलाका त्या इडल्यांवर तुटून पडली. आणि ह्या एका कृतीने शलाका आणि भाग्यश्रीचे बंध जुळले.
शलाका सगळ्यांमध्ये मिसळायला तयार नाही म्हटल्यावर भाग्यश्री लंचटाईम मध्ये शलाकाजवळ येऊन बसू लागली.
कधी शलाका डबा आणत असे...तर कधी भाग्यश्री तिला बळेच आपला डबा शेअर करायला लावी. हळूहळू तिनं शलाकाला बोलतं करायला सुरुवात केली होती.
त्यातून शलाकाचं एकत्र कुटुंब आहे, घरी नवरा, सासू-सासरे, दीर आहेत...नवरा एका मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे, सासूबाई शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत तर सासरे सरकारी नोकरीत होते. त्यांना पेन्शन मिळते.दीर अजून शिकतोय, एक नणंद आहे लग्न झालेली - ती ह्यांच्या घराजवळच राहते... नणंद नोकरी करत नाही त्यामुळे नवरा कामावर गेला की मुलीला घेऊन माहेरी येते ते थेट संध्याकाळीच घरी जाते एव्हढी माहिती भाग्यश्रीला मिळाली.
त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. भाग्यश्रीनं आपली कार काढली अन् पाहिलं तर शलाका आपली स्कुटी घेऊन पाऊस कमी होण्याची वाट बघतेय.
"अगं, पाऊस नाही थांबणार इतक्यात! सरळ टॅक्सी कर अन् घरी जा... स्कुटी राहू दे इथेच..अंधार होईल आता ... पावसा-पाण्याची कशाला थांबतेस बाई...माझं घर अगदीच विरुद्ध दिशेला आहे नाहीतर मीच सोडलं असतं" भाग्यश्रीने गाडी पुढे काढत शलाकाला हात दाखवला.
" हं", शलाकाने मान डोलावली. इतक्यात कुणीतरी भेटलं अन् भाग्यश्री कारच्या खिडकीचा काच खाली करून त्यांच्याशी बोलण्यात गुंगली. सहजच तिचं लक्ष आरश्याकडे गेलं तर शलाका अस्वस्थपणे तिच्या पाकिटातल्या काही नोटा पुन्हा-पुन्हा मोजत होती.
आता मात्र तिला राहवेना.तिनं कार रस्त्याच्या बाजूला पार्क केली अन् गाडीतली छत्री उघडून पावसात धावतच शलाकाजवळ पोहचली. तिला बघताच शलाकानं असहाय्यपणे तिच्या हातातल्या 10-10 च्या चार नोटा समोर धरल्या.
"टॅक्सीला कमीतकमी दीडशे लागतील गं... माझ्याजवळ एव्हढेच आहेत " शलाकाला रडू आवरेना.
भाग्यश्रीनं ओली होऊ नये म्हणून तिच्या डोक्यावर आपली छत्री धरली अन् दोघी ऑफिसच्या खालीच असलेल्या कँटीनमध्ये जाऊन बसल्या...
भाग्यश्रीनं दोघींसाठी कॉफी ऑर्डर केली अन् ओढणीनं ओला चेहरा टिपत असलेल्या शलाकाकडे रोखून बघितलं.
आता मात्र शलाका ती भेदक नजर टाळू शकली नाही.तिचा स्वतःवरचा ताबा सुटला अन् ती भारावल्यासारखी बोलू लागली....
"माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी मी...आमची आर्थिक परिस्थिती ठीकठाक ...म्हणजे खाऊन पिऊन सुखी...मी माझं शिक्षण पूर्ण केलं अन् ह्या कंपनीत नोकरीला लागले.
आता माझ्या आईबाबांना माझ्या लग्नाचे वेध लागले होते. तेव्हा एका विवाहविषयक साईटवर "हे" स्थळ पाहण्यात आलं. मुलगा दिसायला देखणा, पेशाने इंजिनियर, चांगली नोकरी भरपूर पगार, शिवाय घरी आर्थिक सुबत्ता... राहायला स्वतःचं घर... अगदी स्वप्नातलं म्हणतात तसं हे स्थळ होतं. त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.
लग्नाआधी तीन-चार वेळा भेटले असेन मी योगेशला. फार चांगले विचार त्याचे... आपण सगळे एकच आहोत ... मग "हे तुझं-ते माझं" असं कशाला... जे काही आहे, असेल ते "आपलं"...मला फार बरं वाटलं...ह्यापेक्षा उत्तम जीवनसाथी मला कुठून मिळणार होता!
दोन वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं. नव्यानवलाईचे मोरपंखी दिवस भुर्रकन उडून गेले... सुदैवाने माझी बदली लगेचच ह्या शाखेत झाली...पंधरा दिवसांच्या रजेनंतर मी ऑफिस जॉईन करणार होते."
वेटरनं टेबलवर कॉफी आणून ठेवली..गरमागरम कॉफीचा घोट घेत शलाकानं पुढे सांगायला सुरुवात केली.
आदल्या रात्री जेवणं उरकल्यावर योगेशने एका बँकेचा फॉर्म माझ्या पुढ्यात टाकला... मी बघितलं तर तो बँक अकाउंट ओपनिंगचा फॉर्म होता.
"अरे, माझं अकाउंट ऑलरेडी बँकेत आहेच ना! मग "ह्या" बँकेत जॉईंट अकाऊंट कशाला आणखी?"
"आपली सगळी स्वप्न एकत्र पूर्ण करायचीत ना आपल्याला...आणि हे "माझं -तुझं" काय असतं यार! हे जे सगळं आहे ते "आपलं" आहे ना...
तसं माझं आणि हिचंही जॉईंट अकाऊंट आहे बरं का सूनबाई! आमची दोघांचीही पेन्शन ह्यात जमा होते आणि आमच्या-आमच्या ATM कार्डने आम्ही आम्हाला लागतील तसे पैसे काढतो.. बघा बुवा.. तुम्हाला कसं पटतंय ते...माझे सासरे बोलले अन् सासूबाईंनी मान डोलावली. अन् मी "अजून एक अकाऊंट असलं तर काय बिघडलं" असा विचार करत त्या फॉर्मवर सही केली अन् आमच्या "दोघांच्या" नावाचं जॉईंट अकाऊंट उघडलं.
पुढच्याच महिन्यात गोडीगुलाबीनं त्यानं ऑफिसमध्ये मला माझे NEFT डिटेल्स बदलायला लावले अन् तेव्हापासून माझा पगार आमच्या जॉईंट अकाऊंटमध्ये जमा होतो."
"मग तुमचेही दोन ATM कार्ड्स असतील ना... आज पैसे नाहीत तर इथे जवळच आहे ना ATM सेंटर! का घरी विसरलीस कार्ड?" मी देऊ का पैसे सध्यापुरते? नंतर परत कर माझे मला! भाग्यश्रीनं शलाकाला बोलताना अडवलं.
"आमच्याकडे ATM कार्ड सोबत ठेवायची पद्धत नाही... हरवू शकतं म्हणे! म्हणून घरीच ठेवायचं तेही सासऱ्यांच्या ताब्यात... पैसे लागले की नवऱ्याला मागायचे, तो आणून देणार.... तसं काही महिने त्याने दिले आणून पैसे...
पण एक दिवस माझ्या आईला तिच्या वाढदिवसाची म्हणून साडी घेतली मी...मी कमावते तर तेव्हढं तर करू शकतेच ना मी असं वाटलं मला ! घरी सांगितलं तर सगळ्यांचे चेहरे मख्ख.... त्यांना ही गोष्ट आवडली की नाही काहीच कळेना....
मात्र तेव्हापासून योगेश मला अगदी मोजकेच पैसे देतो हातात... त्याचं म्हणणं आहे की मी तुला गाडीत पेट्रोल भरून देतो, तुझे सगळे खर्च करतो तर तुला पैश्याची गरजच काय म्हणून!
कधी जास्तीचे पैसे मागितले तर आधी कारण द्यायला लागतं आणि नंतर पैश्यांचा हिशेब... मला गरजेच्या वाटणाऱ्या वस्तू त्याला आवश्यक वाटत नाहीत आणि मग मला त्यासाठी पैसेही मिळत नाहीत...
त्याच्या मते, आपण घरी सगळं व्यवस्थित खातो-पितो ना... तुला घरात काही कमतरता आहे का? मग बाहेर मैत्रिणींसोबत पार्ट्या, हॉटेलिंग ह्याची गरजच काय! त्यामुळे मला असल्या कारणासाठी पैसे नाही मिळत.
"तरीच तू आमच्यासोबत येणं टाळतेस बाहेर, नाहीतर आपल्या सगळ्यांचे पगार इतकेही कमी नाहीत की आपण महिन्यातून एखाद-दोन वेळा बाहेर पार्टी नाही करू शकणार " भाग्यश्रीला शलाकाच्या वागण्याचा उलगडा होऊ लागला.
आजही टॅक्सीने घरी गेले तर आवडणार नाही त्यांना .... पैशाचा अपव्यय म्हणतात... सासुसासऱ्यांनी पूर्वी गरिबीचे दिवस पाहिलेत म्हणून ही उधळपट्टी वाटते त्यांना आणि योगेशला पण...."
तिनं कॉफीचा मग खाली ठेवत बाहेर बघितलं तर पाऊस थांबला होता. " चल बाय... म्हणत तिनं टेबलवरची पर्स उचलली अन् दोघी आपल्या गंतव्याच्या दिशेने चालू लागल्या.
क्रमशः
©सौ.वैशाली प्रदीप जोशी
सदर कथा लेखिका सौ.वैशाली प्रदीप जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
👍🏻mast
उत्तर द्याहटवा