पाचा वर पाच


© अपर्णा देशपांडे



" अहो s , अहो s , हे पाहिलात का ? " जोरात हाक मारत शामल ने श्याम ला बोलावले .

टॉवेल गुंडाळलेल्या , अंगाला साबण लावलेल्या अर्धवट अवस्थेत श्याम धडपडतच बाहेर आला .

" काय झालं ? काय झालं ? " त्याने घाबरत विचारले ....म्हणजे आपल्या चिरंजीवांनी गॅलरीतून गजातून मुंडकं बाहेर काढलं आणि आता ते फसलं की काय अशी शंका आली त्याला . कारण श्याम श्यामल जोडीचे हे ""प्रोडक्ट"" महा द्वाड होतं .


" अहो असे घाबरताय काय ? ...आणि ईश्श ! तसेच बाहेर आलात ? "

" झालं काय ते सांग आधी !! . केव्हढ्या जोरात ओरडलीस तू !! मी अंघोळ करता करता बाहेर आलोय .
.....हसतेस काय ? बोल न आता !! "


" चिडला की तुम्ही किनई , रणबीर कापूरच दिसता . "

" हे सांगायला तू मला असं किंचाळून बाहेर बोलावलंस ? आणि बाय द वे , 'कापूर' नाहीये तो , कपूर आहे ! आता सांग काय ते . "

" अरे हा s s ! ...अहो , हे बघा न , जाहिरात आलीये . पाच हजाराच्या खरेदीवर पाच हजाराची वस्तू
'फुकट' . " शामल खूपच प्रफुल्लित दिसत होती .

श्याम ने तीच्याकडे काय वेड लागलं की काय अशा अर्थाचा एक कटाक्ष टाकला आणि काहीही न बोलता अंघोळीला निघून गेला .

शामल काही कच्ची खेळाडू नव्हती . तिच्या आईकडून तिला भरपूर ट्रेनिंग मिळाले होते . 

आई म्हणायची ," हे बघ शामे , आपल्या जीवावर सगळं घर सोडून हे नवरे लोक ऑफिसला जातात . त्याचे आई वडील , बहीण भाऊ , आणि पोरं ह्यांचं आपणच करतो न? त्यांना ऑफिस मध्ये आठ तास 'पाट्या टाकायचा' रग्गड पगार मिळतो तसा आपल्याला मिळतो का ? ....चोवीस तास काम करूनही ?...मग? ..

म्हणून त्यांचा पगार आपल्याच हातात असला पाहिजे . लक्षात असू दे !! स्वतः साठी चार पैसे खर्च केले तर जगबुडी नाही होत . "

आईच्या ह्या मौलिक शिकवणीची ती पुरेपूर अंमल बजावणी करत असे .

आताही आपण अजिबात न ऐकता शॉपिंग ला जायचे असा निश्चयच केला तिने .

श्याम अंघोळ करून बनियान आणि ढिला पायजामा घालून समोर येऊन बसला . 

 त्यांचा पाच वर्षांचा 'शिनचान' म्हणजे चिरंजीव शिव हा पूर्ण लक्ष केंद्रित करू टीव्ही वर कार्टून बघत होता .

त्यात एक हेलिकॉप्टर दिसले तसा पोरगा ओरडला ,
" बाबा , मला खरे उडणारे हेलिकॉप्टर घायचंय . "

" अरे आपल्या सैनिकांसाठी असतात ते हेलिकॉप्टर ..असे विकायला नसतात बाजारात ." शाम ने वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला .

" बंटी कडे आहे ! खाली बागेत उडवतो तो ." शेवटी हा शामलचाच मुलगा ......आपला मुद्दा कसा सोडेल ....असा विचार करून तो काही बोलणार इतक्यात शिनचान ची मातोश्री मदतीला धावली .

" मागून मागून काय मागतंय लेकरू . एक मेलं हेलीकॉप्टरच ना ! घेऊयात की ! "

हे असे बोलणे म्हणजे धोक्याची घंटी आहे , हे शामच्या चाणाक्ष बुद्धी ने त्वरित ताडले .

मागे दोनच महिन्यांपूर्वी ह्याच ' मागून मागून काय मागतं लेकरू ' नावाच्या भावनाप्रधान शस्त्राने चांगला चार हजाराचा फटका बसला होता . 

त्याचं काय झालं होतं..हृतिक रोशन चा कुठलातरी सिनेमा आला होता . 

श्यामला साठी हृतिक रोशन म्हणजे जीव की प्राण . 

बायकोची अत्यंत निरुपद्रवी प्रेमकथा तीही एकतर्फी म्हणून श्याम च्या मते त्यात काही धोका वाटत नव्ह्ता . फक्त ह्या द्वाड शीनचान ची काय सोय करावी ह्या विचारात त्याने शिव ला विचारले ,

" बेटा , आम्ही दोघे इंजेक्शन घ्यायला जाणार आहोत , तू आजीकडे राहातेस का ? "

यावर तो म्हणतो कसा ,
" मलाही घ्यायचंय इंजेक्शन ! त्या रिगल टॉकीज मध्ये मिळते न ? मी बघितलं , आईनी मोबाईल वर रिगल टॉकीज मध्ये पैसे भरलेले . "

" बेटा , टॉकीज मध्ये नाही , हॉस्पिटलमध्ये जातोय आम्ही ."

" मी राहातो आजी सोबत , पण मग मला सोनू सारखी बंदूक घेऊन द्याल ? " पोरगा लगेच ' डील ' करत होता .

" हे कुठले दरिद्री डोहाळे रे तुझे ? ...बंदूक म्हणे ! "

" अहो , "" मागून मागून काय """ तर एक बंदुकच मागतोय ना ? .....कुठे मिळते सोनू ही बंदूक ? " तिने शिव ला विचारले ..

" इथेच !! सनी टॉईज मध्ये !! " चिरंजीव अतिउल्हासात ओरडले .


मायलेक ताबडतोब गेले , आणि दहाच मिनिटात . चार हजार 'डेबिट ' चा मेसेज आला . 

" एक बंदूक चार हजाराला ? श्याम ला फेफरं यायची वेळ आली होती.
आमच्या वेळी दिवाळीत टिकल्या फोडायची छोटीशी शंभर रुपयाची बंदूक मागितली तर बापाने दोन दगडं आणून दिले होते .

" हे घे ! याने फोड टिकल्या !! " असे म्हणून त्यांनी फुकटात बोळवण केली होती ........आणि आता चार हजार ?.......श्याम ला हे आठवले .

त्यामुळे आत्ता हे "" मागून मागून काय"" हे जर ऐकलं तर आपल्याला लोकांकडे ""मागायची "" वेळ येईल असे वाटले त्याला . 

स्वतःला सावरत तो म्हणाला , " शिव , त्या सनी टॉईज मध्ये मिळते का तुला हवे तसे हेलिकॉप्टर ? "

" तिथे नाही मिळत बाबा . शोधावे लागेल . "

" अहो , ह्या जाहिरातीत लिहिलंय , की त्यांच्या मॉल मध्ये तुम्ही पाच हजाराची खरेदी केल्यास पाच हजाराचे
कपडे , किचन वेअर किंवा खेळणं मोफत मिळेल . ......पाच वर पाच फ्री !! .....मग आपण शिव साठी हेलिकॉप्टर फ्री मिळवूया !! " हे बोलतांना तिचा आवेश पाक -भारत करार पूर्ण केल्यासारखा होता .

सगळा जामानिमा करून त्रिकुट पाच वर पाच ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मॉल वर पोहोचले .

गेल्याबरोबर काउंटर वरच त्यांना माहिती पत्रक मिळाले .

 ही योजना फक्त तिसऱ्या मजल्यासाठीच लागू होती . 

म्हणजे महिला आणि बाल विभाग . 

इतक्या मोठ्या मॉल मध्ये फिरायला एनर्जी हवी म्हणून आधी त्यांनी यथेच्छ खादाडी केली .

मग तलवार उपसून झाशी ची राणी तयार व्हावी , तशी हिने ओढणी बांधली , बॅग पाठीवर टाकली , ( नशीब त्यात शिनचॅन ला नाही बसवले ) आणि गर्दीत घुसली .


बाकी दोघे बाहेरच थांबले . 

 मग टाईमपास म्हणून शिनचान साठी इलेक्ट्रिक कार सफर , आईस्क्रीम , विडिओ गेम्स असे खिसा रिकामा करणारे , पण तसे किरकोळ वाटणारे करमणुकीचे प्रकार झाले .

हे करत असताना " बाबा , हेलीकॉप्टर !! " अशी छातीत कळ आणणारी मागणी अधून मधून येतच होती .
शामल येईपर्यंत किल्ला लढवायचा होता .

महाराज विशाळ गडावर पोहोचे पर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंड कशी लढवली असेल ह्याचा पूर्ण प्रत्यय आला श्यामला. 

पण इथे खिंड लढवून झाली तरी  श्यामल ' महाराणी" काही बाहेर आल्याचे संकेत मिळेनात .

शेवटी त्याला त्या अफाट गर्दीत हरवलेल्या शामल चा वर धरलेला हात दिसला . 

गर्दीतून सूर मारून लवकर बाहेर येता यावे म्हणून तिने हात वरच ठेवले होते आणि विजयी पताका दिसावी तशी त्या हातात मोठी बॅग पण दिसत होती .

" वाह !! झाली खरेदी ? " अतिशय आशादायी स्वरात त्याने विचारले .

" छे हो ! एक साडी आणि दोन कुर्ती मिळाल्या फक्त !! त्याखालच्या मॅचिंग लेगीन नाहीयेत तिथे . "

" मग आपल्या पाच पैकी कितीची खरेदी राहिली ? "

" अहो काहीही ही काय !!! फक्त साडीच तर चार हजारची आहे . दोन कुर्ती मिळून तीन हजार असे सात हजार झालेत , पण काय उपयोग ? अर्धवटच झालं न! "

आलेला हार्ट अँटॅक दाबून त्याने विचारले

" अग , पण तू पाच पर्यंतच घेणार होतीस न !! मग ? "

" असं मी कधी म्हटलं ? ......चला , आधी खेळणी विभागात जाऊ , मग लेगीन्स नंतर कधी घेता येतील ."

ह्या आकडे भंगापेक्षा प्रेमभंगाचे दुःख शीतल असावे असे वाटले त्याला .

' किड्स झोन ' मध्ये मुलांची प्रचंड गर्दी होती .

" उडवणेका हेलिकॉप्टर मीलेगा क्या ? " श्यामचे फाडु हिंदी . मोठाले दुकानं मराठी माणसाचे कसे असु शकतील ह्या विश्वासाने त्याने हिंदीत विचारले .

दुकानदाराने एक पिटुकले हेलिकॉप्टर काढून दाखवले . 

 पोराने ह्या काना पासून त्या कानापर्यंत नाही म्हणत मान फिरवली .

" वो 'पाच पे पाच फ्री' ऑफर है ना , उसमे चाहीये . बडावाला दिखाव . "

" ह्याच हेलिकॉप्टर ची किंमत पाच हजार आहे , कारण हा रिमोट ने उडवता येतो . हा बघा त्याचा रिमोट कंट्रोल !! चायनीज नाही , इंग्लंड चा आहे . " चक्क शुद्ध मराठीत बोलला बुवा .

" इतक्या छोट्या खेळण्याची किंमत पाच हजार ? "

" स्कीम मध्ये हाच आहे . मोठा हवा असेल तर मोठा दाखवू ? म्हणत उत्तराची वाट न बघता त्याने मोठे मॉडेल काढले . 

श्याम कळवळून नको नको म्हणत असतांना त्याने ते काउंटरवर ठेवले आणि शिव ने त्यावर झडप घातली . 

" बाबा , मला हेच हवं ...बाबा , हेच छान आहे . "

दुकानदार विजयी मुद्रेने श्याम कडे बघत होता .

" हे मोठे हेलिकॉप्टर कितीचे आहे ? " छातीवर दगड ठेऊन त्याने विचारले .

" फक्त सहा हजार . पण हे फ्री स्कीम मध्ये नाही . वेगळे पैसे द्यावे लागतील ." तुम्ही काय घेणार सहा हजाराची वस्तू ! असा भाव चेहऱ्यावर .

जोराची लागलिये आणि आतील माणूस बाहेर येतच नाहीये त्यावेळी जसा जसा चेहरा होतो , तसा श्याम चा चेहरा झाला होता .

पुन्हा शिनचॅन च्या मातेला उमाळा आला .

" एव्हढा काय विचार करताय ? ....

श्याम ने तिला गप्प बस असा खुणावत हात केला , करण पुन्हा त्याला
'"" मागून मागून काय"'' ची रेकॉर्ड ऐकायची नव्हती .

त्याने नाराजीनेच कार्ड काढले आणि तिच्या हातात दिले . 

आपली नापसंती माहीत असतांना शामल ने मुलाचा असा हट्ट पुरवण्याची जिद्द करावी याचे त्याला आश्चर्य वाटले होते .

" झालं का आमच्या शहेजादयांच्या मनासारखं ? " त्याने खेळण्याचा बॉक्स शिव च्या हातात देत म्हटले .

" बाबा , आय लव यु !!" शीनचान आनंदाने नाचत म्हणाला .

" अहो , जातांना ' अतिथी ' मध्ये जेवून जाऊया ? " हा बायकोचा प्रश्न त्याला मुद्दाम डीवचल्यासारखा वाटला .

" घरी जाऊन खिचडी खाऊ ...मी करेन खिचडी . तू थकली असशील ना शॉपिंग करून ? "

सोसायटीत गेल्या गेल्या शिव पळाला मित्रांना हेलिकॉप्टर दाखवायला .

तो तोंड धुवून , घाम पुसून जरा ' फ्रेश ' होऊन येत नाही तर हातात टॉवेल घेऊन बायको उभी . 

टेबलावर सुंदर सजावट करून जेवण तयार ...मी आपल्याच घरात आहे न ? की आज खूप जास्त खरेदी झालीये म्हणून माझी सेवा चालू आहे ....असा विचार चालू असतानाच समोर गार सरबताचा ग्लास !! ......

सरबत घेत त्याने मोबाईल हातात घेतला .... बँकेचा मेसेज होता .....

पहातो तर काय ....फक्त तीन हजार डेबिट ? ....

तेरा ऐवजी तीनच ? ...त्याने आधी सगळे मेसेज नीट पाहिले .... आणि मग वर शामल कडे .

ती मिश्किल डोळ्याने हसत होती .

" तोंडाचा आ बंद करा आधी . ..बावळट दिसताय . "

" ......"

" अहो , पाच वर पाच फ्री ही स्कीम तर होतीच . पण आत गेल्यावर तिथे महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा होत्या .
जी जिंकेल तिला खरेदीवर पन्नास टक्के डिस्काउंट होते . म्हणून सहा हजारचे खेळणे तीन ला पडले . "

" आणि तुझे ड्रेस ? "

" ते मी माझ्या बचतीच्या पैशात घेतलेत . म्हणून तर तुमचे कार्ड नव्हते नेले ना ! ...बघा न ! "
त्याने पुडके उघडले , आत सुंदर शर्ट , पॅन्ट आणि मॅचिंग टाय होता . "

त्याला पुढचे दीसलेच नाही कारण डोळ्यांवर धुके दाटले होते .

प्रेमाचं भरतं येऊन तो म्हणाला ,

" मला कशाला ग इतकं ? तुला ड्रेस ची गरज होती न ? "

" त्यात काय पाच वर पाच फ्री ही ऑफर उद्या पण आहेच की ! " तिने गंमतीने म्हटलं आणि श्याम ला पुन्हा घाम फुटला .

© अपर्णा देशपांडे

सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने